'या' हार्मोनमुळे तुमची सेक्स करण्याची इच्छा वाढते...

हार्मोन, सेक्स

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हार्मोनमुळे सेक्सची इच्छा वाढते
    • Author, फिलिपा रॉक्सबी
    • Role, बीबीसी आरोग्य प्रतिनिधी

दोन वैज्ञानिक संशोधनांमधून समोर आलंय की ज्या स्त्री आणि पुरुषांना सेक्स करण्याची इच्छा होत नाही अशांना किसपेप्टीन हा हार्मोन दिला तर त्यांची सेक्स करण्याची इच्छा वाढते.

या प्रयोगात सहभागी झालेल्या लोकांना उत्तेजक व्हीडिओ दाखवून त्यांच्या मेंदूचे स्कॅन करण्यात आले. या स्कॅनमधून लक्षात आलं की त्यांच्या लैंगिक प्रेरणांशी संबधित असलेल्या मेंदूच्या भागात हालचाल दिसून आली. ही हालचाल या हार्मोनमुळे झाली.

यूकेतल्या रिसर्चर्सचं म्हणणं आहे की किसपेप्टीन हे संप्रेरक सेक्सची इच्छा न होणाऱ्या लोकांच्या उपचारासाठी वापरता येऊ शकतं पण त्यासाठी अजून मोठ्या प्रमाणावर अभ्यास व्हायला हवा.

लंडनच्या इंपिरियल कॉलेजमधल्या संशोधकांचं म्हणणं आहे की प्रौढांच्या तुलनेत तरूणांची सेक्स करण्याची इच्छा कमी होत चालली आहे.

अर्थात सेक्स करण्याची इच्छा न होणं यामुळे प्रत्येकाला फरक पडतो असं नाही, पण काहींसाठी ती गोष्ट ताणाची ठरू शकते ज्यामुळे आयुष्य उद्धवस्त करणारे मानसिक तसंच सामाजिक परिणाम होऊ शकतात.

पीटर (बदलेलं नाव) आज 43 वर्षांचे आहेत. त्यांना फार कमी वेळा सेक्स करण्याची इच्छा होते. त्यांनी या प्रयोगात भाग घेतला होता.

ते म्हणतात, "मला सेक्स करण्याची इच्छा होत नाही. मी नेहमी कारणं द्यायचो की मी खूप थकलोय किंवा मला स्ट्रेस आलाय आणि सेक्स करणं टाळायचो. पण मी माझ्या पार्टनरला हे सांगू शकलो नाही कारण त्यांना गैरसमज झाला असता की माझं त्यांच्यावर प्रेम नाही किंवा मी त्यांच्याकडे आकर्षित झालो नाही."

किसपेप्टीन हे असं संप्रेरक आहे जे शरीरात नैसर्गिकरित्या उत्पन्न होतं आणि शरीरातल्या इतर लैंगिक हार्मोन्सला स्रवण्यासाठी मदत करतं. स्त्री किंवा पुरुष वयात येताना किसपेप्टीन हे हार्मोन महत्त्वाचं ठरतं.

आधी झालेल्या संशोधनातून हे समोर आलं होतं की किसपेप्टीनमुळे स्त्रियांच्या अंडाशयाला संकेत जातो की अंडी तयार करा तर सुदृढ पुरुषांमध्ये किसपेप्टीनमुळे मुड सुधारतो असं दिसून आलेलं आहे.

पहिल्यांदाच या हार्मोनची चाचणी सेक्सची इच्छा कमी असणाऱ्या किंवा अजिबात नसणाऱ्या लोकांवर केली गेली आहे.

"ज्या लोकांना सेक्सची इच्छा कमी असते ते लोक खूप विचार करतात असं आढळून आलं आहे. ते सतत आत्मवलोकन करत असतात आणि शरीराच्या नैसर्गिक इच्छा दाबून टाकतात. त्यामुळे त्यांना सेक्सची इच्छा होत नाही," या संशोधनाचे सहलेखक अलेक्झांडर कॉमिनोस म्हणतात.

"किसपेप्टीन शरीराच्या नैसर्गिक इच्छांना जागा देतो त्यामुळे ती व्यक्ती स्वतःबद्द्ल अतिविचार करत नाही."

व्हायाग्रा या कामोत्तेजक गोळीपेक्षा हे हार्मोन वेगळ्याप्रकारे काम करतं. व्हायग्रा लिंगाकडे जाणारा रक्तप्रवाह वाढवते, त्यामुळे लिंग ताठ न होण्याची समस्या सुटते.

पण किसपेप्टीन नैसर्गिक इच्छांना वाव देतं.

हार्मोन, सेक्स

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हार्मोन्सचा परिणाम होतो

या अभ्यासात 21 ते 52 या वयोगटातले 32 पुरूष आणि 19 ते 48 या वयोगटातल्या 32 महिलांचा अभ्यास केला गेला होता, ज्यांना मुळातच सेक्सची इच्छा कमी आहे.

या प्रयोगात भाग घेणाऱ्यांना एकदा सलाईनमधून किसपेप्टीन देण्यात आलं आणि एकदा त्यात फक्त डिस्टील वॉटर होतं.

दोन्ही प्रसंगी त्यांचे मूड, वागणं, मेंदूची हालचाल मापली गेली. त्यांच्या मेंदूचे स्कॅन होत असताना त्यांना कामोत्तेजक व्हीडिओ दाखवण्यात आले.

पुरूषांच्या लिंगाचा ताठरपणाही मोजला गेला.

'माझ्या मुलाचा जन्म झाला'

पीटर म्हणतात की या प्रयोगाचा अनुभव वेगळाच होता. ते म्हणतात की या प्रयोगात भाग घेतल्याचा त्यांना आनंद आहे.

"मी आता बाप झालोय. ज्या आठवड्यात मी या प्रयोगात भाग घेतला त्याच आठवड्यात माझे पार्टनरशी संबंध आले आणि तिला गर्भधारणा झाली."

आता या प्रयोगामुळेच पीटरच्या पार्टनरला गर्भधारणा झाली की नाही हे कोणी सिद्ध करू शकत नाही पण पीटर म्हणतात की, "त्यांना आता सेक्स करण्यात जास्त रस आहे. ते स्वतःहून पुढाकार घेतात."

सेक्स करण्याची इच्छा होत नसल्याने ज्यांच्यावर सतत ताण येत होता अशांना या प्रयोगामुळे फायदा झाला.

हार्मोन, सेक्स

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हार्मोन्स

ज्या पुरूषांना किसपेप्टीन दिलं गेलं होतं, त्यांच्या लिंगाचा ताठरपणा 56 टक्क्यांनी वाढला असं अभ्यासातून दिसून आलं.

"अनेकांच्या MRI मध्ये सकारात्मक फरक दिसून आले. MRI मशीन स्कॅन तुमच्या मेंदूचं आणि शरीराचं स्कॅन करतंय हे काही उत्तेजक वातावरण नाही, त्यामुळे कदाचित या लोकांना आपल्या घरी बेडरूममध्ये अधिक चांगले रिझल्ट मिळतील." कॉमिनोस म्हणतात

महिलांनी सांगितलंकी त्यांना 'अधिक सेक्सी' झाल्यासारखं वाटतंय तर पुरूषांनी म्हटलं की त्यांना सेक्सबद्द्ल 'अधिक आनंदी' झाल्यासारखं वाटतंय.

हा अभ्यास जामा ओपन नेटवर्क या अभ्यास नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.

यूकेच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या वेबसाईटनुसार सेक्स करण्याची इच्छा न होणं ही फार सामान्य बाब आहे आणि अनेक लोकांमध्ये आढळून येते.

नात्यात तणाव, मानसिक ताण, सेक्स संबधित आजार, हार्मोनची पातळी घसरणं, मेनोपॉज, बाळंतपण आणि थकवा अशा अनेक गोष्टींमुळे हे होऊ शकतं.

तसं अँटी डिप्रेसंट औषधं घेणं, इतर औषधं घेणं किंवा विशिष्ट प्रकारची निरोधकं वापरणं तसंच खूप दारू पिणं यामुळेही सेक्स करण्याची इच्छा कमी होऊ शकते.

कॅन्सर, हृदयरोग, मधुमेह, थायरॉईड अशा रोगांमुळेही सेक्स करण्याची इच्छा कमी होऊ शकते.

बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर
फोटो कॅप्शन, बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)