'हार्मोनल इम्बॅलन्स' म्हणजे काय? त्यामुळे मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अलामुरु सौम्या,
- Role, बीबीसी तेलुगू पत्रकार.
सरिताची मासिक पाळी अनियमित आहे. एकदा पाळी सुरू झाली की, रक्तस्त्राव जवळपास 15-20 दिवस सुरूच असतो. या काळात तिच्या ओटी पोटात सतत दुखत असतं. जोपर्यंत रक्तस्राव सुरू असतो तोपर्यंत दुखणं ही सुरूच असतं.
पण यावेळी दोन महिने उलटले तरी तिचा रक्तस्त्राव थांबला नाही. शेवटी तिने डॉक्टरांकडे धाव घेतली.
35 वर्षांच्या सरिताच्या शरीरातील हार्मोन इम्बॅलन्स असल्याचं निदान डॉक्टरांनी केलं आणि तिच्या या त्रासावर 'हार्मोनल मेडिसिन' घ्यायला हवं असं सुचवलं.
38 वर्षांच्या शिरीषाची सतत चिडचिड होत असते, राग येणं, झोप न लागणं, थकवा येणं अशा सगळ्या गोष्टींमुळे तिचं घरात आणि घराबाहेरील लोकांशी अजिबात पटत नाही.
तिचं मानसिक आरोग्य बिघडलं. तिला नैराश्य जाणवल्यामुळे तिला मानसोपचार तज्ज्ञाकडून उपचार घेण्याची गरज निर्माण झाली.
तिने ज्या चाचण्या केल्या त्यातून असं समजलं की, 'हार्मोनल इम्बॅलन्स'मुळे तिला या समस्या सुरू झाल्या आहेत.
तज्ज्ञांच्या मते, भारतातील दर दहा महिलांपाठीमागे एका महिलेला 'हार्मोनल इम्बॅलन्स'ची समस्या असते.
'हार्मोनल इम्बॅलन्स' कोणत्याही वयात उद्भवण्याची शक्यता असते.
पौगंडावस्थेत, गर्भधारणेवेळी, बाळंतपणात, प्री-मेनोपॉज किंवा मेनोपॉजपर्यंत कधीही या समस्येला सामोरं जावं लागू शकतं.

फोटो स्रोत, Getty Images
हार्मोन्स म्हणजे नेमकं काय असतं? आणि ते कशाद्धतीने काम करतात?
हार्मोन्स म्हणजे एक प्रकारचं रसायन म्हणता येईल. आपल्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथी असतात. या ग्रंथींची एक सिस्टीम असते ज्याला 'एंडोक्राइन सिस्टम' म्हणतात.
या एंडोक्राइन ग्रंथींना अंतःस्रावी ग्रंथी असंही म्हणतात. या ग्रंथी हार्मोन्स (संप्रेरकं) तयार करतात आणि रक्ताच्या माध्यमातून शरीरातील वेगवेगळ्या अवयवांपर्यंत पोहोचवतात. अवयवांच्या कार्यामध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी हार्मोन्सवर असते.
जसं की, चयापचय क्रिया असेल, एनर्जी लेव्हल असेल, रिप्रोडक्शन, वाढ, ताणतणाव, जखमा आदींचं नियमन आणि समन्वय करण्याची जबाबदारी या हार्मोन्सवर असते.
आता हे हार्मोन्स फ्लकच्यूएट म्हणजे त्यात चढउतार होत राहतो, यालाच म्हणतात हार्मोनल इम्बॅलन्स. त्याचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.
तणाव, बाहेरील वातावरण, दीर्घकालीन आजार, अनुवांशिक बदल, विशिष्ट प्रकारची औषधे, जीवनशैलीतील बदल, अॅलर्जी, मद्यपान, धूम्रपान इत्यादींमुळे हार्मोन्समध्ये चढ-उतार होऊ शकतात.

फोटो स्रोत, Getty Images
याची लक्षणं काय आहेत?
तज्ज्ञांच्या मते, शरीरात हार्मोन्सचं असंतुलन झाल्यास काही लक्षणं दिसून येतात.
• यात थकवा येतो, लक्ष केंद्रित करणं अशक्य होतं
• भरपूर घाम येतो
• वजन वाढतं किंवा कमी होतं
• चेहऱ्यावर पिंपल्स येतात
• मानसिक तणाव, नैराश्य येतं
• वंध्यत्व
• अनियमित मासिक पाळी, जादाचा रक्तस्त्राव
• केस गळती
• हृदयाच्या ठोक्याच्या गतीमध्ये बदल
• हायपरटेन्शन, डायबेटीस
• संभोगाची इच्छा उडून जाणं
त्यामुळे जर तुमच्यात ही लक्षणं दिसली तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

फोटो स्रोत, Getty Images
'हार्मोनल इम्बॅलन्स' आहे हे कसं ओळखायचं?
डॉक्टर लक्षणं आणि रुग्णाच्या मेडिकल हिस्ट्रीचा आधार घेऊन 'हार्मोनल इम्बॅलन्स' असल्याचं निदान करतात.
कधीकधी क्लिनिकल टेस्ट करणं आवश्यक असतं. यात हार्मोन्समध्ये जर बदल झाले असतील तर ते स्कॅनिंगच्या माध्यमातून तसेच ब्लड टेस्ट करून समजतं.
यात संतुलन यावं म्हणून आहार पद्धती, जीवनशैली, औषध आदींमध्ये बदल करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
हार्मोनल इम्बॅलन्समुळे महिलांना इतर अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं.

फोटो स्रोत, Getty Images
1. पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम डिसऑर्डर (PCOD)
पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) आणि पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम डिसऑर्डर (पीसीओडी) हे महिलांमध्ये आढळणारे सगळ्यात कॉमन डिसऑर्डर आहेत.
याचा महिलांच्या ओव्हरीज म्हणजेच अंडाशयावर परिणाम होतो. युकेच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसनुसार, पीसीओडी असल्यावर तीन मुख्य लक्षणं दिसून येतात.
यातलं पहिलं म्हणजे अनियमित मासिक पाळी. म्हणजेच तुमच्या अंडाशयातून वेळेवर अंडी बाहेर पडत नाहीत.
हाय एन्ड्रोजन्स
एंड्रोजेन्स हे मेल हार्मोन असतात. स्त्रियांमध्ये हे हार्मोन कमी प्रमाणात आढळतं.
जर याची पातळी जास्त असेल तर चेहरा आणि शरीराच्या इतर भागांवर केसांची वाढ होते.
पॉलीसिस्टिक ओव्हरीज
यात ओव्हरीज म्हणजे अंडाशय मोठं होतं. यात द्रवाच्या पिशव्या तयार होतात. त्याला वॉटर सिस्ट किंवा फॉलिकल्स असं म्हणतात. हे फॉलिकल्स अंडाशयांभोवती जमा होतात.
जर यातले कोणतेही दोन लक्षणं आढळली तर डॉक्टर पीसीओडीचं निदान करतात. एनएचएस नुसार, काही स्त्रियांना 20 व्या वर्षीच पीसीओडीची लक्षणं दिसून येतात. तर काहींना ही लक्षणं लवकर दिसत नाहीत. याचा परिणाम गर्भधारणेवर होतो, म्हणजे यात उद्भवू शकतात.
पीसीओडीमुळे अनेक समस्या निर्माण होतात. जसं की, अनियमित मासिक पाळी, रक्तस्त्रावात वाढ, गर्भधारणेच्या समस्या, चेहऱ्यावर अति केस, छाती, नितंब, वजन वाढणं, केस गळणं, चेहरा तेलकट होणं, पिंपल्स, टाइप 2 डायबेटीस होणं.
युकेच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसनुसार, कधीकधी इतर काही कारणांमुळे हार्मोन्समध्ये चढउतार येतो. म्हणजे पीसीओडी नसतो मात्र हार्मोन्सची लेव्हल वाढलेली असते. जसं की बऱ्याचदा पीसीओडी आनुवंशिक असल्याचं म्हटलं जातं.
काहीवेळेस शरीरात इन्सुलिन हार्मोनची पातळी वाढते. इन्सुलिनची पातळी वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणावर हार्मोन्स स्त्रवतात. इन्सुलिन हार्मोन्समध्ये जात स्त्रवल्याने टेस्टोस्टेरॉन सारखं हार्मोन जास्त सक्रिय होतं. वजन जात असेल तरी देखील इन्सुलिन वाढू शकते.
त्यामुळे पीसीओडीवर असा कोणताच उपाय नाही. लक्षणं कमी व्हावीत म्हणून डॉक्टर औषधे लिहून देतात. वजन घट केल्यास, आहारात बदल केल्यास या लक्षणांचा प्रभाव कमी करता येतो.
मासिक पाळीच्या समस्या, नको असलेल्या केसांची वाढ, वंध्यत्व यासाठी औषध उपलब्ध आहेत. जर वंध्यत्वावर औषधं देऊन फरक पडत नसेल तर डॉक्टर लॅपरोस्कोपिक ओव्हेरियन ड्रिलिंग (LOD) नावाची शस्त्रक्रिया सुचवतात.
यात लेझरने अंडाशयातील नको असलेले टिशू काढले जातात. हे उपचार केले की गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते.

फोटो स्रोत, Getty Images
2. प्री-मेन्स्ट्रुअल डिप्लोपिक डिसऑर्डर (PMDD)
महिलांमध्ये मासिक पाळी येण्यापूर्वीही काही लक्षणं दिसून येतात. याला प्रीमेनस्ट्रुअल सिंड्रोम (PMS) असं म्हणतात.
यात मूड स्विंग, टेन्शन, चिडचिड, थकवा, निद्रानाश, पोट फुगणे, स्तन दुखणे, पोटदुखी, डोकेदुखी अशा गोष्टी होतात. प्रत्येक महिन्याला हीच लक्षणं दिसतात असं नाही.
कधीकधी ही लक्षणं गंभीर होतात. अशावेळी डॉक्टर हार्मोनल मेडिसिन आणि अँटी-डिप्रेसंट पिल्स देतात. प्रीमेनस्ट्रुअल सिंड्रोम का होतो? याचं उत्तर कोणाकडेच नाहीये.

फोटो स्रोत, Getty Images
पण एनएचएसनुसार, मासिक पाळी येताना हार्मोन्समध्ये बदल घडत असतात, त्याच्याच परिणामांमुळे अशी लक्षणं दिसून येतात.
मात्र काही महिलांमध्ये तीव्र स्वरूपाची लक्षणं दिसून येतात. मग त्याला प्रीमेनस्ट्रुअल डिस्फोरिक डिसऑर्डर (PMDD) म्हणतात.
प्रीमेनस्ट्रुअल डिस्फोरिक डिसऑर्डर मध्ये जी लक्षणं दिसतात ती प्रीमेनस्ट्रुअल सिंड्रोमपेक्षा गंभीर असतात. याचा दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
• यात पेटके येणे, डोकेदुखी, सांधेदुखी, स्नायूदुखी
• सतत भूक लागणे, वेळेवर झोप न येणं
• टेन्शन, भीती, राग, नैराश्य तर कधी आत्महत्येचे विचार
वरीलपैकी कोणतीही लक्षणं आढळल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने प्रीमेन्स्ट्रुअल डिसफोरिक डिसऑर्डरला आरोग्य समस्या म्हणून मान्यता दिली आहे.
तज्ञ सांगतात की, या समस्यांकडे कानाडोळा करून चालणार नाही, याची लक्षणं ओळखून त्यावर त्वरित उपचार करायला हवेत.
3. मेनोपॉज
वयाचा मध्य गाठल्यावर स्त्रियांची मासिक पाळी बंद होते याला मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती म्हणतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते साधारण 45 ते 55 वयोगटातील महिलांना मेनोपॉज होतो.
मेनोपॉजनंतर अंडाशयात अंडी तयार होत नाहीत. रक्तातील इस्ट्रोजेनची पातळी कमी होते. तसेच मेनोपॉज नंतर गर्भधारणा होण्याची शक्यता पूर्णपणे कमी होते.
मेनोपॉजची सुरुवात टप्प्याटप्याने होते. पहिल्यांदा तर पेरीमेनोपॉजचा टप्पा सुरू होतो, यात मासिक पाळी अनियमित व्हायला सुरुवात होते.
त्यानंतर मेनोपॉजचा टप्पा येतो. पेरीमेनोपॉजची फेज बरीच वर्ष राहू शकते. याचा स्त्रियांवर मानसिक, शारीरिक, भावनिक परिणाम होतो.
डॉ.रोम्पिचरला भार्गवी सांगतात की, मेनोपॉज आजार नसून एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. अंडाशयातील अंडी संपल्याने आणि दुसरं म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स अशा दोन गोष्टींमुळे मेनोपॉज होतो.
डॉ. भार्गवी सांगतात की, "आपल्या देशात दरवर्षी सुमारे एक कोटींच्या आसपास महिलांना मेनोपॉजला सामोरं जावं लागतं. इस्ट्रोजेन हे फिमेल हार्मोन (स्त्री संप्रेरक) आहे.
ते कमी व्हायला लागलं की स्त्रियांमध्ये मानसिक आणि शारीरिक बदल व्हायला सुरुवात होते. जर 12 महिन्यात बाईला मासिक पाळी आली नाही तर मेनोपॉज झाला असं समजतात."
मेनोपॉजच्या दरम्यान स्त्रियांच्या पाळीच्या रक्तस्त्रावात बदल होतो, थकवा, हॉट फ्लॅशेस, घाम, हृदयाची धडधड, निद्रानाश, चिंता, चिडचिड, राग, नैराश्य, विनाकारण रडणं आणि इतर शारीरिक समस्या दिसून येतात.
त्यामुळे संतुलित आहार, नियमित व्यायाम, धुम्रपान, मद्यपान, मसाले टाळल्यास वरील लक्षणांपासून आराम मिळू शकतो.
डॉ. भार्गवी सांगतात की, मेनोपॉजच्या काळात हॉट फ्लॅशेस येणं, रात्री घाम येणं यांवर औषधोपचार करता येतात. सोबतच ज्या स्त्रियांना कमी वयात मेनोपॉजला सामोरं जावं लागलंय किंवा ज्यांना
कमी वयात हिस्टेरेक्टॉमीचं निदान झालंय यासाठी ही औषधं उपलब्ध आहेत.
हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी म्हणजे काय?
जेव्हा मेनोपॉजची लक्षणं गंभीर रूप धारण करायला लागतात तेव्हा डॉक्टर 'हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी' सुचवतात. एनएचएसच्या म्हणण्यानुसार, शरीरात हार्मोन्सची पातळी कमी झाल्यावर हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी वापरली जाते.
हॉट फ्लॅशेस, घाम येणं, मूड बदलणं, योनीमार्गात कोरडेपणा, सेक्सची इच्छा निर्माण न होणं या सगळ्या लक्षणांवर उपाय हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी योग्य ठरते.
पण एखाद्या विशिष्ट प्रकारच्या औषधाने स्तनांचा कर्करोग होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं एनएचएसने म्हटलंय.
तसेच ज्या स्त्रियांनी स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, गर्भाशय मुखाचा कर्करोग, ब्लड व्हेसल्स क्लॉट, उच्च रक्तदाब, यकृताच्या समस्या आदींवर उपचार घेतलेत त्यांनी तसेच गर्भवती महिलांनी हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी घेऊ नये असं एनएचएसने म्हटलंय.
डॉ. भार्गवी सांगतात, "जेव्हा मेनोपॉज लवकर होतो किंवा मग त्याची लक्षणं गंभीर असतात तेव्हा शक्य तितक्या लवकर इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनच्या गोळ्यांचे डोस घेणं चांगलं.
या गोळ्यांचं सेवन दीर्घकाळ सुरू ठेवल्यास रक्तवाहिन्यांशी संबंधित, स्तन, हृदय, मेंदूशी संबंधित समस्या उदभवू शकतात. तसेच यकृतावरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे या गोळ्या फक्त सहा महिने ते वर्षभरासाठीच घ्याव्यात."
अनुवांशिकतेमुळे हार्मोनल इम्बॅलन्स होऊ शकतो का?
डॉ. शैलजा सांगतात की, महिलांमध्ये वंध्यत्व, अनियमित मासिक पाळी आणि लठ्ठपणा दिसून येतो तो हार्मोनल इम्बॅलन्समुळे. आणि हार्मोनल इम्बॅलन्स अनुवांशिक असू शकतं.
हार्मोन इम्बॅलन्स होण्यामागे बरीच कारणं असू शकतात. जसं की, जीवनशैलीतील झालेले बदल, प्रक्रिया केलेले अन्न, पॅकेज फूड, साखरयुक्त पदार्थाचं अतिसेवन, लठ्ठपणा.
डॉ. शैलजा सांगतात की, बऱ्याचदा अनियमित मासिक पाळी, अनियंत्रित रक्तस्राव यावर उपाय म्हणून गर्भनिरोधक गोळ्या दिल्या जातात.
या गोळ्या इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनची लेव्हल बॅलन्स करण्यासाठी दिल्या जातात. सहा महिने ते एक वर्ष या कालावधीसाठी या गोळ्या घेतल्या जातात. पण जर या कालावधीपेक्षा जास्त काळ या गोळ्यांचं सेवन केलं ते ब्लड प्रेशर, रक्ताशी संबंधित समस्या, लठ्ठपणा आदी समस्या उद्भवू शकतात.
हार्मोनल इम्बॅलन्स कोणत्या एका विशिष्ट वयात उद्भवणारी समस्या नाहीये असं डॉक्टर शैलजा सांगतात. त्या पुढे सांगतात की, कोणत्याही वयात हा त्रास सुरू होऊ शकतो.
बऱ्याचदा पौगंडावस्थेमध्ये मासिक पाळीमध्ये जास्त रक्तस्त्राव होण्याची समस्या उद्भवू शकते. वयाच्या 30 ते 40 व्या वर्षात हार्मोनल इम्बॅलन्स होऊ शकतं. मेनोपॉजच्या काळात शरीरात अनेक बदल घडत असतात.
"पण आजच्या पिढीतील मुली भराभर तारुण्यात येताना दिसतात. याचं एक कारण म्हणजे त्यांच्या शरीरात इस्ट्रोजेनचं प्रमाण वाढतंय. मुलींच्या आहारात आलेल्या दूध, मांस, जंक फूड मध्ये इस्ट्रोजेनच प्रमाण जास्त असतं. जास्त दूध मिळावं म्हणून गुरांना अशा पद्धतीची हार्मोनल इंजेक्शन्स टोचली जातात."
"त्याचप्रमाणे कोंबडी, मेंढ्या, शेळ्या यांची वाढ लवकर व्हावी यासाठी त्यांना सुद्धा हार्मोनल इंजेक्शन्स दिले जातात. जंक फूडमध्ये इस्ट्रोजेन असतं. याचं सेवन करून पौगंडावस्थेतील मुली लवकरच तारुण्यात येतात."
मानसिक आरोग्य
डॉ. शैलजा सांगतात की, प्रसूतीनंतर आणि मेनोपॉजनंतर हार्मोनल बदलांमुळे नैराश्य येण्याची शक्यता जास्त असते.
"त्यातल्या त्यात प्रसूतीदरम्यान नैराश्याची भावना कमी असते. पण प्रसूतीनंतरच्या काळात ही भावना वाढीस लागते. मेनोपॉजच्या काळात तर बहुतांश महिलांना मानसिक समस्यांना सामोरं जावं लागतं."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








