ट्वेन्टी20 वर्ल्डकप: यजमान आणि गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचं पॅकअप

फोटो स्रोत, Mark Brake-ICC
वर्ल्डकप आणि ऑस्ट्रेलिया यांचं नातं अगदी घट्ट असं. यंदाचा वर्ल्डकप तर ऑस्ट्रेलियातच आयोजित करण्यात आला आहे. पण सातत्याचा अभाव, दुखापती, अचंबित करणारे निर्णय यामुळे ऑस्ट्रेलियाचं वर्ल्डकपमधलं आव्हान संपुष्टात आलं आहे.
विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाचा संघ गतविजेता होता. गतविजेत्या संघावर प्राथमिक फेरीत बाद होण्याची नामुष्की ओढवली आहे.
ट्वेन्टी20 वर्ल्डकप स्पर्धेत यजमान संघाला जेतेपद पटकावता येत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.
दुसऱ्या गटातून इंग्लंड आणि न्यूझीलंड यांनी सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे तर ऑस्ट्रेलियासह श्रीलंका, आयर्लंड आणि अफगाणिस्तान यांचं आव्हान संपुष्टात आलं आहे.
इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील लढतीवर ऑस्ट्रेलियाचं नशीब अवलंबून होतं. इंग्लंडने श्रीलंकेवर विजय मिळवला आणि ऑस्ट्रेलियाना नारळ मिळणार हे स्पष्ट झालं.
ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इंग्लंड या तिन्ही संघांचे 7 गुण झाले. पण अव्वल रनरेटच्या बळावर इंग्लंड आणि न्यूझीलंड संघांनी सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवला.
ऑस्ट्रेलियाने 5 लढतींपैकी 3 मध्ये विजय मिळवला. न्यूझीलंडविरुद्ध त्यांना मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं तर पारंपरिक प्रतिस्पर्धी इंग्लंडविरुद्धची लढत पावसामुळे रद्द करण्यात आली.
ऑस्ट्रेलियाने गेल्या वर्षी न्यूझीलंडला नमवत पहिल्यांदाच ट्वेन्टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा केला होता.
ऑस्ट्रेलियाने वनडे प्रकारात 1987, 1999, 2003, 2007, 2015 इतक्या वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे.
ऑस्ट्रेलियाची वर्ल्डकपची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली. ऑस्ट्रेलियाने नेहमीच न्यूझीलंविरुद्ध खेळताना वर्चस्व गाजवलं आहे. मात्र यंदा त्यांनी सलामीच्या लढतीत ऑस्ट्रेलियावर 89 रन्सनी विजय मिळवला.
न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कोणत्याही आंतरराष्ट्रीय सामन्यात तब्बल 11 वर्षानंतर विजय मिळवला.

फोटो स्रोत, Albert Perez
न्यूझीलंडने पहिल्यांदा बॅटिंग करताना 200 रन्सचा डोंगर उभारला. डेव्हॉन कॉनवेने 92 तर फिन अलनने 42 रन्सची खेळी केली. कॉनवेने 7 फोर आणि 2 सिक्ससह शानदार खेळी सजवली.
युवा अलनने ऑस्ट्रेलियाच्या तुल्यबळ आक्रमणाला नामोहरम केलं. जेम्स नीशामने 13 बॉलमध्ये 26 धावा कुटल्या. ऑस्ट्रेलियाला प्रत्युत्तरादाखल खेळताना 111 रन्स करता आल्या. ग्लेन मॅक्सवेलने सर्वाधिक 28 रन्स केल्या.
टीम साऊदी आणि मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलियाने या पराभवातून सावरत श्रीलंकेचा धुव्वा उडवला. श्रीलंकेने 157 रन्सची मजल मारली. पाथुम निसांकाने 40 तर चरिथ असालंकाने 38 रन्सची खेळी केली.
मार्कस स्टॉइनसच्या 18 बॉलमध्ये 59 रन्सच्या वादळी खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने 7 विकेट्सने विजय मिळवला. कर्णधार आरोन फिंचने 31 तर मॅक्सवेलने 23 रन्स करत त्याला चांगली साथ दिली.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हा अशेस मुकाबला जोरदार रंगणार अशी चिन्हं होती मात्र धुवाधार पावसामुळे मेलबर्न इथे होणारी ही लढत रद्द करावी लागली.
एक पराभव आणि एक सामना रद्द झाल्याने ऑस्ट्रेलियाने बाद फेरीसाठी गणितीय समीकरणांवर अवलंबून राहावे लागणार हे स्पष्ट झाले.
आयर्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलियाने वर्चस्व गाजवलं. ऑस्ट्रेलियाने 179 रन्स केल्या. कर्णधार फिंचने 44 बॉलमध्ये 63 रन्सची खेळी केली. स्टॉइनसने 35 रन्स केल्या.
आयर्लंडला हे लक्ष्य पेलवलं नाही आणि त्यांचा डाव 137 रन्समध्येच आटोपला. पॅट कमिन्स, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तानविरुद्ध प्रचंड फरकाने जिंकण्याची आवश्यता होती. पण तसं झालं नाही. अफगाणिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलियाला विजयासाठी संघर्ष करावा लागला आणि त्यांनी 4 रन्सनी निसटता विजय मिळवला.
बाद फेरीसाठी ऑस्ट्रेलियाच्या आशा श्रीलंकेवर एकवटल्या होत्या. पण इंग्लंडने या लढतीत विजय मिळवला आणि गतविजेत्या आणि यजमान संघाचं पुनश्च जेतेपदाचं स्वप्न धुळीस मिळवलं.
पाथुम निसांकाच्या 67 खेळीच्या बळावर श्रीलंकेने 141 रन्सची मजल मारली. पाथुमला बाकी बॅट्समनची साथ मिळाली नाही. इंग्लंडतर्फे मार्क वूडने 3 विकेट्स घेतल्या.
इंग्लंडने अॅलेक्स हेल्स (47) आणि बेन स्टोक्स (42) यांच्या संयमी खेळाच्या बळावर सरशी साधली. इंग्लंडने 6 विकेट्स गमावल्या पण स्टोक्सने नाबाद राहून संघाला विजय मिळवून दिला.

फोटो स्रोत, Mark Metcalfe-ICC
धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचं फॉर्मात नसणं ऑस्ट्रेलियाला चांगलंच महागात पडलं. कर्णधार आरोन फिंचही सूर गवसला नाही. अफगाणिस्तानविरुद्ध फिंच हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे खेळूही शकला नाही. ग्लेन मॅक्सवेलचा अनुभव ऑस्ट्रेलियाच्या कामी आला नाही.
अफगाणिस्तानविरुद्धच्या महत्त्वपूर्ण लढतीत ऑस्ट्रेलियाने प्रमुख बॉलर मिचेल स्टार्कला खेळवलं नाही. या निर्णयावर प्रचंड टीका होत आहे.
गतविजेता संघ असूनही ऑस्ट्रेलियाची स्पर्धेतली कामगिरी यथातथाच राहिली. याचा फटका त्यांना बसला.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








