IndvsSA: किलर मिलर ठरला आफ्रिकेचा तारणहार; भारतावर 5 विकेट्सनी विजय

फोटो स्रोत, Gallo Images
किलर मिलर या नावाने प्रसिद्ध डेव्हिड मिलर आणि एडन मारक्रम या दोघांच्या शानदार खेळीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने अटीतटीच्या लढतीत भारतावर 5 विकेट्सनी थरारक विजय मिळवला. या विजयाचा पाया रचला डेव्हिड मिलर (56) आणि एडन मारक्रम (52) यांच्या अर्धशतकी खेळींनी.
दक्षिण आफ्रिकेच्या विजयासह पाकिस्तानसाठी सेमी फायनलचा मार्ग अधिक खडतर झाला आहे. भारताचा यंदाच्या वर्ल्डकपमधला पहिलाच पराभव आहे. गुणतालिकेत दक्षिण आफ्रिकेचा संघ 5 गुणांसह अव्वल स्थानी आहे. भारतीय संघ 4 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. पाकिस्तानला सेमी फायनल प्रवेशासाठी आता गणितीय समीकरणं आणि नशीब यांच्यावर अवलंबून राहावं लागणार आहे.
134 रन्सचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची 24/3 अशी घसरगुंडी उडाली पण मिलर-मारक्रम जोडीने चौथ्या विकेटसाठी 60 बॉलमध्ये 76 धावांची भागीदारी केली. भारतीय बॉलर्सच्या शिस्तबद्ध माऱ्यामुळे दक्षिण आफ्रिकेला 10 ओव्हर्समध्ये केवळ 40 रन्स करता आल्या.
ड्रिंक्स ब्रेकनंतर मिलर-मारक्रम जोडीने पुढच्या 5 ओव्हर्समध्ये 55 रन्स चोपून काढल्या. मारक्रम आऊट झाल्यावर मिलरने सामन्याची सूत्रं हाती घेतली. रवीचंद्रन अश्विनच्या बॉलिंगवर जोरदार आक्रमण करत मिलरने रनरेटचं दडपण खाली आणलं.
चार विकेट्ससह भारताच्या डावाला खिंडार पाडणाऱ्या लुंगी एन्गिडीला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं. "हा अगदीच चुरशीचा सामना होता. बॉलर म्हणून पाठलाग करताना पाहत राहण्यावाचून पर्याय नसतो पण मिलर-मारक्रम जोडीने संस्मरणीय विजय मिळवून दिला. वर्ल्डकप स्पर्धेत स्वत:च्या कामगिरीवर मॅच जिंकून देणं माझं स्वप्न होतं. ते पूर्ण झालं. आम्ही या खेळपट्टीवर आधी खेळलो होतो, त्यामुळे कशा पद्धतीची बॉलिंग करायची याचा अंदाज होता. सेकंड इनिंग्जमध्ये 10व्या ओव्हरनंतर मारक्रम-मिलर यांनी पवित्राच बदलला आणि भारतीय बॉलर्सचा समाचार घेतला", असं लुंगीने सांगितलं.
पर्थच्या चेंडूला उसळी मिळणाऱ्या खेळपट्टीवर अर्शदीप सिंगसह सगळ्याच भारतीय बॉलर्सनी टिच्चून बॉलिंग करत दक्षिण आफ्रिकेला अडचणीत टाकलं होतं.
छोट्या पण आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचीही डळमळीत सुरुवात झाली. आक्रमक फटकेबाजीसाठी प्रसिद्ध क्विंटन डी कॉकला अर्शदीप सिंगने फसवलं. स्लिपमध्ये राहुलने त्याचा सुरेख कॅच टिपला.
अर्शदीपच्या भन्नाट स्विंगसमोर रायली रुसो धारातीर्थी पडला. त्याला भोपळाही फोडता आली नाही. यामुळे दक्षिण आफ्रिकेची अवस्था 3/2 अशी झाली. रन्ससाठी झगडणाऱ्या तेंबा बावूमाने एडम मारक्रमला हाताशी घेत डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
मोहम्मद शमीच्या बॉलिंगवर अक्रॉस जाऊन पॅडल स्विप करण्याचा प्रयत्न सपशेल फसला. विकेटकीपर दिनेश कार्तिकने अफलातून कॅच टिपत बावूमाची खेळी संपुष्टात आणली.
10 ओव्हर्समध्ये दक्षिण आफ्रिकेला केवळ 40 रन्स करता आल्या. या बदल्यात त्यांनी तीन विकेट्स गमावल्या. यानंतर मिलर-मारक्रम जोडीने पुढच्या 5 ओव्हर्समध्ये जोरदार फटकेबाजी करत 55 धावा चोपून काढल्या.
मारक्रम 52 रन्स करून आऊट झाला. 6 फोर आणि एका सिक्ससह मारक्रमने महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळी साकारली. मारक्रम बाद झाल्यानंतर मिलरने सगळी सूत्रं आपल्या हाती घेत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
मिलरने 46 बॉलमध्ये 4 फोर आणि 3 सिक्सेससह नाबाद 59 रन्सची खेळी केली.
'लुंगी'समोर नांगी
दक्षिण आफ्रिकेच्या लुंगी एन्गिडीच्या भेदक माऱ्यासमोर भारताची दाणादाण उडाली. अपवाद सूर्यकुमार यादवचा. 49/5 स्थितीतून भारताने सूर्यकुमार यादवच्या 68 रन्सच्या खेळीच्या बळावर 133 रन्सची मजल मारली.
पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांना नमवल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला होता. मात्र पर्थच्या खेळपट्टीशी जुळवून घेण्यात भारताच्या आघाडीच्या बॅट्समनना कठीण गेले.
भारताचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. भारतीय संघाने अक्षर पटेलऐवजी दीपक हुड्डाचा संघात समावेश केला तर दक्षिण आफ्रिकेने तबरेझ शम्सीऐवजी लुंगी एन्गिडीला संधी दिली.
लुंगी एन्गिडीचा वेगवान बॉल पूल करण्याचा रोहित शर्माचा प्रयत्न पूर्णत: फसला आणि एन्गिडीने स्वत:च्या बॉलिंगवर उत्तम कॅच घेतला. आणखी एका उसळत्या बॉलवर राहुल माघारी परतला. दुखापतीतून पुनरागमन केल्यानंतर रन्ससाठी झगडणाऱ्या लोकेश राहुलला या सामन्यातही सूर गवसला नाही. त्याने स्लिपमध्ये कॅच दिला. त्याने 9 रन्स केल्या.

फोटो स्रोत, Paul Kane
स्पर्धेत उत्तम फॉर्मात असणाऱ्या विराट कोहलीने चांगली सुरुवात केली मात्र अचानकच लुंगीच्या बॉलिंगवर पूलचा फटका मारण्याचा प्रयत्न त्याच्या अंगलट आला. त्याने 12 रन्स केल्या. अक्षरच्या जागी संघात आलेल्या दीपक हुड्डाने वाईड बॉलला बॅट लावण्याची चूक केली आणि बॉल विकेटकीपर क्विंटन डी कॉकच्या हातात जाऊन विसावला. त्याला भोपळाही फोडता आला नाही.
हार्दिक पंड्याकडून संयमी खेळीची अपेक्षा होती मात्र लुंगीच्या बॉलिंगवर त्याने पूलचा फटका खेळला. कागिसो रबाडाने पुढे धावत येऊन डाईव्ह मारत सुरेख कॅच घेतला आणि हार्दिकला माघारी परतावलं. हार्दिक आऊट होताच भारताची अवस्था 8.3 ओव्हर्समध्ये 49/5 अशी झाली.
लुंगी एन्गिडीच्या 3 ओव्हर्सच्या ओपनिंग स्पेलमध्ये 17 रन्सच्या मोबदल्यात 4 विकेट्स घेतल्या. एका बाजूने सहकारी आऊट होत असतानाही सूर्यकुमारने आक्रमक पवित्रा म्यान केला नाही.

फोटो स्रोत, Paul Kane
सूर्यकुमारने कागिसो रबाडा, लुंगी एन्गिडी, वेन पारनेल यांचा सामना करत धावफलक हलता ठेवला. केशव महाराज या स्पिनरच्या बॉलिंगवर सूर्यकुमारने हल्ला चढवला. एन्गिडीच्या बॉलिंगवर फोर मारत सूर्यकुमारने अर्धशतकाला गवसणी घातली.
सूर्यकुमारने 40 बॉलमध्ये 6 चौकार आणि 3 सिक्सेससह 68 धावांची तडाखेबंद खेळी केली. अश्विन 7 रन्स करून तंबूत परतला. लुंगीने 4 विकेट्स घेतल्या. अनुभवी डावखुऱ्या वेन पारनेलने अवघ्या 15 रन्स देत 3 विकेट्स पटकावल्या.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








