ट्वेन्टी20 वर्ल्डकप : मॅच संपून विजयी जल्लोष, दोन्ही संघ तंबूत, पण नोबॉलमुळे सगळे पुन्हा मैदानात

झिम्बाब्वे, बांगलादेश, ट्वेन्टी20 वर्ल्डकप

फोटो स्रोत, PATRICK HAMILTON

फोटो कॅप्शन, मॅच संपल्यानंतर संदिग्धता निर्माण झाली.

मॅच संपल्यानंतर पुन्हा सुरू होण्याचा अनोखा प्रकार वर्ल्डकपच्या एका मॅचदरम्यान पाहायला मिळाला.

ब्रिस्बेन इथे सुरू असलेल्या वर्ल्डकप स्पर्धेत बांगलादेश आणि झिम्बाब्वे यांच्यातला मुकाबला शेवटच्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलपर्यंत जाऊन पोहोचला. शेवटच्या बॉलवर झिम्बाब्वेला जिंकण्यासाठी 6 रन्सची आवश्यकता होती. फोर मारला तर मॅच सुपर ओव्हरमध्ये गेली असती.

झिम्बाब्वेच्या मुझाराबानीने बॅट जोरात घुमवली पण बॉल हुकला आणि विकेकीपर नुरुल हसनच्या ग्लोव्हजमध्ये जाऊन विसावला. त्याने स्टंपिंग केलं आणि बांगलादेशने सामना जिंकला.

झिम्बाब्वेचे खेळाडू निराश होते. बांगलादेशच्या खेळाडूंनी जल्लोष केला आणि एकसाथ येत घोषणा दिल्या. खेळाडूंनी हस्तांदोलन केलं. दोन्ही संघ मैदानात परतले. खेळपट्टी साफ करण्यासाठी ग्राऊंडस्टाफ मैदानात आला. रोलर चालवणारी मंडळीही निघाली.

मात्र, त्याचवेळी एक नाट्य घडलं. शेवटच्या ज्या चेंडूवर स्टंपिंग केलं तो बॉल नोबॉल देण्यात आला. नियमानुसार विकेटकीपरने बॉल स्टंप्सच्या मागे टिपणं अपेक्षित आहे. नुरुलने स्टंपिंग केलं पण बॉल स्टंप्सच्या पुढे टिपून केलं होतं. त्यामुळे थर्ड अंपायरने नोबॉल दिला. मैदानातल्या जायंट स्क्रीनवर नोबॉल ही अक्षरं उमटली तेव्हा दोन्ही संघ डगआऊटमध्ये परतले होते. प्रेझेंटेशनची तयारी सुरू झाली होती. थर्ड अंपायरने मैदानातल्या अंपायर्सना यासंदर्भात कळवलं. दोन्ही संघांतल्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि धक्का असे भाव होते.

मैदानात परतण्यावाचून त्यांच्याकडे पर्याय नव्हता. बांगलादेशची टीम आणि झिम्बाब्वेचे दोन्ही बॅट्समन मैदानात आले. शेवटचा बॉल नोबॉल देण्यात आल्याने तांत्रिकदृष्ट्या शेवटचा बॉल फ्री हिट असणार होता. या बॉलवर रनआऊट सोडून अन्य प्रकारे बॅट्समन आऊट होऊ शकत नाही.

बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसनने फिल्डिंग सजवली. मोसादेक हुसेनवर दडपण होतं. कारण आता त्याच्याकडे बचावासाठी 4 रन्स होत्या. 3 रन्स झाल्या तर मॅच सुपर ओव्हरमध्ये जाण्याची शक्यता होती. मुझाराबानीने पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न केला पण तो प्रयत्नही फसला. झिम्बाब्वेला एकही रन मिळू शकली नाही आणि बांगलादेशने पुन्हा एकदा विजयी जल्लोष केला.

झिम्बाब्वे, बांगलादेश, ट्वेन्टी20 वर्ल्डकप

फोटो स्रोत, Chris Hyde-ICC

फोटो कॅप्शन, शेवटच्या बॉलवरचा थरार

मोसादेकने हुशारीने बॉलिंग करत मुझाराबानीला चकवलं. तीन तासांच्या अटीतटीच्या अशा या मुकाबल्यात पारडं एकदा बांगलादेशकडे एकदा झिम्बाब्वेकडे असं कलत होतं. बांगलादेशच्या बॉलर्सनी टिच्चून करत झिम्बाब्वेला नमवलं.

बांगलादेशने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला होता. नजमुल होसेन मंटोने 55 बॉलमध्ये 71 रन्सची खेळी केल्यामुळे बांगलादेशने दीडशे रन्सची मजल मारली. कर्णधार शकीब अल हसनने 23 तर अतिफ हुसेनने 29 रन्स करत मंटोला चांगली साथ दिली. झिम्बाब्वेतर्फे रिचर्ड नगारावा आणि ब्लेसिंग मुझाराबानी यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

या छोटेखानी लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची अवस्था 35/4 अशी झाली. क्रेग अर्व्हाइन आणि भरवशाचा सिकंदर रझा दोघेही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. थोड्या अंतराने रेगिस चकाव्बाही आऊट झाला. यानंतर शॉन विल्यम्स आणि रायन बर्ल यांनी सहाव्या विकेटसाठी 43 बॉलमध्ये 63 रन्सची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. रनरेटचं आव्हान वाढत असताना विल्यम्सला शकीबने चलाखीने रनआऊट केलं. त्याने 42 बॉलमध्ये 8 फोरसह 64 रन्सची खेळी केली.

शेवटच्या ओव्हरमध्ये मोसादेकने ब्रॅड इव्हान्सला आऊट केलं. पाचव्या बॉलवर नकाराग्वाही आऊट झाला. शेवटच्या बॉलवर मुझाराबानीला आऊट करत मोसादेकने बांगलादेशला थरारक विजय मिळवून दिला. पण शेवटचा बॉल नोबॉल देण्यात आला. फ्री हिट लागू झाली आणि बांगलादेशवरचं दडपण वाढलं. मोसादेकने दडपणाच्या क्षणीही हुशारीने बॉलिंग करत मुझाराबानीला सिक्स किंवा फोर मारु दिला नाही.

या विजयासह बांगलादेशने तीनपैकी दोन सामन्यात विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. दुसरीकडे झिम्बाब्वेनं पाकिस्तानला नमवण्याची किमया केली होती. झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातली लढत पावसामुळे पूर्ण होऊ शकली नाही. सद्यस्थितीत बांगलादेश आणि झिम्बाब्वे गुणतालिकेत पाकिस्तानच्या पुढे आहेत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)