टिकटॉक मुलांना भीक मागायला लावून कसं कमावतंय पैसे..

लहान मुलं
फोटो कॅप्शन, गिफ्टसाठी भीक मागत लहान मुलं अनेक तास टिकटॉकवर लाईव्ह स्ट्रिम करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
    • Author, हना गेल्बार्ट, ममदौह अकबिएक आणि झियाद अल कत्तान
    • Role, बीबीसी ग्लोबल डिसइन्फॉर्मेशन युनिट, बीबीसी न्यूज अरेबिक आणि बीबीसी आय इनव्हेस्टिगेशन्स

सीरियाच्या छावण्यांमध्ये असलेल्या विस्थापित कुटुंबांतील सदस्य सध्या टिकटॉकवर मदतीसाठी देणगीची भीक मागत आहेत. त्यातून मिळणाऱ्या रकमेपैकी 70 टक्के रक्कम कंपनी स्वतः ठेवून घेत असल्याचं, बीबीसीच्या संशोधनात आढळून आलं आहे.

या सोशल मीडिया अॅपवर लहान मुलं अनेक तास लाईव्ह स्ट्रिमिंग करून रोख मूल्य असलेल्या डिजिटल गिफ्ट द्यावे म्हणून, प्रेक्षकांना याचना करताना दिसत आहेत.

या लाईव्ह स्ट्रिमिंगमधून तासाला जवळपास 1000 डॉलर एवढी कमाई होते. मात्र त्यापैकी अगदी कमी किंवा नाममात्र भाग हा शिबिरातील लोकांना मिळत असल्याचं, बीबीसीच्या लक्षात आलं.

अशा प्रकारे भीक मागायला लावून होणाऱ्या शोषणाविरोधात त्वरित कारवाई करणार असल्याचं टिकटॉकनं म्हटलं आहे.

कंपनीच्या प्लॅटफॉर्मवर अशा प्रकारचा कंटेंट प्रसिद्ध करण्यास परवानगी नसल्याचं कंपनीनं म्हटलंय. तसंच यातून म्हणजे डिजिटल गिफ्टमधून मिळणाऱ्या कमिशनची रक्कम बरीच कमी असल्याचंही कंपनीनं सांगितलं. मात्र त्यांनी नेमका आकडा सांगण्यास नकार दिला.

यावर्षीच्या सुरुवातीला टिकटॉक यूझर्सना त्यांच्या अॅपमध्ये सीरियाच्या छावण्यांमधील विस्थापितांच्या कुटुंबांच्या लाईव्ह स्ट्रिम्सचे फीड मोठ्या प्रमाणावर दिसत होते. त्यावर काही यूझरकडून पाठिंबा दर्शवण्यात येत होता तर काही जण यातून होणाऱ्या भ्रष्टाचाराबात चिंता व्यक्त करत होते.

टिकटॉकवर सुरू असेल्या या ट्रेंडसाठी टिकटॉकच्या एका तथाकथित मध्यस्थानं सोय उपलब्ध करून दिली असल्याचं बीबीसीला उत्तर-पश्चिम (वायव्य) सीरियातील छावण्यांमध्ये आढळून आलं. या मध्यस्थानंच या कुटुंबांना फोन आणि लाईव्ह स्ट्रिमिंगसाठी इतर साहित्य पुरवल्याची माहिती मिळाली आहे.

हे मध्यस्थ चीन आणि मध्य आशियातील काही एजन्सीबरोबर काम करतात. त्यांनीच या कुटुंबांना टिकटॉक अकाऊंटही सुरू करून दिले असल्याचं सांगितलं. टिकटॉकवर यूझरनं जास्तीत जास्त वेळ घालवावा म्हणून लाईव्हस्ट्रिम करणाऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी टिकटॉकची एक यंत्रणा जागतिक स्तरावर काम करते. या एजन्सी त्याच यंत्रणेचा एक भाग असतात.

टिकटॉकच्या अल्गोरिदमनुसार कंटेंट तयार करणारा जो फोन नंबर वापरत असेल त्याच्या मूळ भौगोलिक स्थितीनुसारच यूझरला पाहण्यासाठी कंटेंट सुचवला जातो. त्यामुळं ब्रिटिश सिमकार्डला प्राधान्य देत असल्याचं मध्यस्थांनी सांगितलं. अशा प्रकारचे ऑनलाईन गिफ्ट देण्याच्या बाबतीत युकेतील लोक सर्वाधिक उदार असल्याचं त्यांनी सांगितलं.

मोना अली अल करिम आणि त्यांच्या सहा मुली या टिकटॉकवर रोज लाईव्ह जाणाऱ्या कुटुंबांपैकी एक आहेत. तंबूमध्ये अनेक तास जमिनीवर बसून इंग्रजीतील काही वाक्यं ते वारंवार बोलतात. "प्लीज लाईक, प्लीज शेअर, प्लीज गिफ्ट," असं ते म्हणत असतात.

मोनाच्या पतीचं हवाई हल्ल्यामध्ये निधन झालं होतं. या लाईव्हस्ट्रिमद्वारे त्या त्यांची अंध मुलगी शरिफाच्या शस्त्रक्रियेसाठी पैसे जमवत आहेत.

लाईव्ह स्ट्रीमद्वारे जे गिफ्ट मागतात ते व्हर्च्युअल स्वरुपात असतात. पण त्यासाठी प्रेक्षकांना खरे पैसे मोजावे लागतात आणि अॅपमधून रोख स्वरुपात ते पैसे काढले जाऊ शकतात. लाईव्ह स्ट्रिम पाहणारे प्रेक्षक हे काही पैसे किंमत असलेल्या डिजिटल रोझपासून ते 500 डॉलरपर्यंतच्या व्हर्च्युअल (आभासी) लायन अशा माध्यमातून हे गिफ्ट पाठवतात. त्यातून कंटेंट क्रिएटर्सना गिफ्ट मिळते.

सीरियातील विस्थापितांच्या या छावण्यांमधून लाईव्ह स्ट्रिमिंग होणाऱ्या 30 टिकटॉक अकाऊंट्सवर बीबीसीनं पाच महिने लक्ष ठेवलं. त्यांच्याबाबत माहिती मिळवण्यासाठी एक कंप्युटर प्रोग्राम तयार केला. त्यातून हे समोर आले की, या प्रत्येक खात्याला प्रेक्षकांकडून तासाला जवळपास 1 हजार डॉलर पर्यंतच्या किमतीचे डिजिटल गिफ्ट देणगी स्वरुपात मिळत होते.

पण छावणीतील कुटुंबांनी सांगितलं की, त्यांना या रकमेतील केवळ एक छोटा भागच मिळत होता.

टिकटॉक
फोटो कॅप्शन, सिरियन कुटुंबाबरोबर केलेलं टिकटॉक लाईव्ह 50 हजार लोकांनी पाहिलं असं किथनं सांगितलं.

या गिफ्टपैकी नेमका किती भाग स्वतःकडं ठेवतं हे सांगण्यास टिकटॉककडून नकार मिळत होता. त्यामुळं नेमका कुठे किती पैसा जातो हे शोधण्यासाठी बीबीसीनं एक प्रयोग केला.

सीरियातील एका रिपोर्टरनं टिकटॉकशी संबंधित एजन्सीशी संपर्क साधला आणि ते छावणीत राहत असल्याचं सांगितलं. त्यांनी एक टिकटॉक खातं मिळवलं आणि लाईव्ह स्ट्रिमिंग केलं. लंडनच्या बीबीसीमधील एका कर्मचाऱ्यानं त्यांना दुसऱ्या एका खात्यावरून जवळपास 106 डॉलर किमतीचे गिफ्ट पाठवले.

हे लाईव्ह स्ट्रिम संपलं तेव्हा सिरियातील त्या अकाऊंटमधील बॅलेन्स होतं 33 डॉलर. म्हणजेच खात्यात मिळालेल्या गिफ्टपैकी जवळपास 69 % हिस्सा टिकटॉकनं घेतला होता.

टिकटॉकवरील इन्फ्लुएन्सर आणि पूर्वाश्रमीचा रग्बी प्लेअर असलेल्या किथ मेसननं एका कुटुंबाच्या लाईव्ह स्ट्रिमदरम्यान 300 पाऊंड स्टर्लिंग (330 डॉलर) एवढी देणगी दिली. तसंच त्याच्या सुमारे दहा लाख फॉलोअर्सनाही त्यानं देणगी देण्याची विनंती केली.

पण यापैकी बहुतांश रक्कम ही संबंधित सोशल मीडिया कंपनी स्वतःकडे ठेवत असल्याचं बीबीसीनं त्यांना सांगितलं. त्यावेळी हा हास्यास्पद प्रकार असून सीरियातील कुटुंबांबरोबर अन्याय असल्याचं ते म्हणाले.

"याबाबतीत पारदर्शकता असायला हवी. माझ्यासाठी हा लोभीपणा आहे. यालाच स्वार्थी म्हणतात," असं ते म्हणाले.

106 डॉलरच्या गिफ्टपैकी जे 33 डॉलर कंटेट क्रिएटरला मिळाले होते त्यापैकीही जवळपास 10 टक्के रक्कम ही स्थानिक मनी ट्रान्सफर करणाऱ्यानं घेतली. तर टिकटॉकचा जो मध्यस्थ असतो तो 35% रक्कम घेतो. म्हणजे त्या कुटुंबाला केवळ 19 डॉलर एवढी रक्कम शिल्लक राहते.

अशा कुटुंबांबरोबर टिकटॉकवर काम करता यावे म्हणून मोबाईल फोन, सिमकार्ड आणि वाय-फाय कनेक्शन घेण्यासाठी जनावरं (पशुधन) विकावी लागली, असं या मध्यस्थांपैकी एक असलेल्या हामीदनं सांगितलं.

हामीद सध्या 12 वेगवेगळ्या कुटुंबांबरोबर दिवसातील काही तास लाईव्ह स्ट्रिमिंग करतात.

टिकटॉक

फोटो स्रोत, TIK TOK/INSTAGRAM

या कुटुंबांना उदरनिर्वाह करता यावा, यासाठी टिकटॉकचा वापर करत असल्याचं हामीद सांगतात. यासाठी होणारा खर्च वगळता मिळणाऱ्या नफ्याचा बहुतांश भाग कुटुंबांना देत असल्याचं, त्यांनी सांगितलं.

इतर मध्यस्थांप्रमाणं हामीदनं त्यांना चीनमधील थेट टिकटॉकबरोबर काम करणाऱ्या एजन्सीजचा पाठिंबा असल्याचं सांगितलं.

"आम्हाला अॅपमध्ये काही अडचण आली तर ते मदत करतात. ब्लॉक झालेले अकाऊंट ते पुन्हा सुरू करतात. आम्ही त्यांना पेजचे नाव, प्रोफाईल पिक्चर देतो आणि ते खाते सुरू करतात, " असं हामीद म्हणाले.

अशा एजन्सींना "लाईव्हस्ट्रिमिंग गिल्ड्स" म्हणून ओळखलं जातं आणि त्या जगभरात पसरलेल्या आहेत. अधिकाधिक लोकांचं लक्ष वेधून घेता येतील अशा प्रकारचे लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यासाठी कंटेंट क्रिएटर्सना मदत करण्यासाठी त्यांचा टिकटॉकबरोबर करार असतो.

टिकटॉक त्यांना लाईव्ह स्ट्रिमिंगच्या वेळेनुसार आणि मिळालेल्या गिफ्टच्या मूल्यानुसार कमिशन देत असतं, असं या एजन्सींनी बीबीसीला सांगितलं.

वेळेवर भर असतो म्हणजेच सिरियातील शिबिरातील मुलांसह हे टिकटॉकर्स एकाच वेळी अनेक तासांसाठी लाईव्ह जात असतात.

अशा लाईव्ह स्ट्रिममुळं टिकटॉकच्या प्लॅटफॉर्मद्वारे लहान मुलांचे शोषण किंवा हानी होण्यापासून रोखण्याच्या मूळ धोरणांची टिकटॉक कडूनच पायमल्ली केली जात असल्याचं, अॅक्सेस नाऊ या डिजिटल हक्क संघटनेच्या मारवा फताफ्ता यांनी म्हटलं.

"प्रेक्षकांकडून थेपटणे गिफ्ट मागण्याची परवानगी यूझर्सना नसते, हे टिकटॉककडून स्पष्ट केलं जातं. त्यामुळं हे टिकटॉकच्या धोरणांचे स्पष्टपणे उल्लंघन तर आहेच शिवाय, या लोकांच्या अधिकारांवरही त्यामुळं गदा येते," असं त्या म्हणाल्या.

लोक पाठिंबा आणि काही प्रमाणात सहानुभूती मिळण्यासाठी त्यांच्या कथा ऑनलाईन शेअर करू शकतात, असं त्यांनी मान्य केलं. पण या लाईव्ह स्ट्रिममध्ये सन्मानाचा अभाव असून ते अपमानास्पदही असतं, असंही त्या म्हणाल्या.

टिकटॉकच्या नियमानुसार, लाईव्ह जाण्यासाठी तुमचे किमान 1000 फॉलोअर्स असणं गरजेचं आहे. तसंच तुम्ही थेटपणे गिफ्टची मागणी करू शकत नाही. शिवाय या प्लॅटफॉर्मद्वारे अल्पवयीन मुलांचे कोणत्याही प्रकारे शोषण किंवा त्यांना हानी होता कामा नये.

मात्र, जेव्हा बीबीसीनं 30 अकाऊंटद्वारे मुलांचा वापर करून भीक मागितली जात असल्याचं अॅपमधील यंत्रणेच्या माध्यमातून टिकटॉकच्या लक्षात आणून दिलं, त्यावेळी टिकटॉकनं यापैकी कोणत्याही प्रकरणामुळं त्यांच्या धोरणांचं उल्लंघन होत नसल्याचं उत्तर दिलं.

त्यानंतर बीबीसीनं जेव्हा टिकटॉकशी थेट संपर्क साधून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी कंपनीनं हे सर्व अकाऊंट बॅन केले.

त्यानंतर त्यांनी एक निवेदनही सादर केलं. "बीबीसीनं आमच्यासमोर सादर केलेली काही माहिती आणि आरोपांबाबत आम्ही अत्यंत चिंतित आहोत. याबाबत आम्ही तत्काळ कठोर कारवाई केली आहे.

"आमच्या प्लॅटफॉर्मवर अशाप्रकारच्या कंटेंटला परवानगी नाही. अशाप्रकारे होणारं शोषण रोखण्यासाठी आम्ही आमची जागतिक स्तरावरील धोरणं अधिक बळकट करत आहोत," असं त्यांनी निवेदनात म्हटलं.

टिकटॉक हे जगातील सर्वात वेगानं वाढणारं सोशल मीडिया अॅप आहे. 2017 मध्ये याची सुरुवात झाली तेव्हापासून केवळ इन अॅप स्पेंडींग (अॅपमध्ये यूझरकडून पैसे मोजून घेतल्या जाणाऱ्या सेवा) च्या माध्यमातून तब्बल 6.2 अब्ज डॉलरची कमाई टिकटॉकनं केलीय. अॅनालिटिक्स कंपनी सेन्सर टॉवरनं ही माहिती दिलीय.

टिकटॉकवर लाईव्ह स्ट्रिमिंग करून पैसा कमावण्याच्या मार्गाला पर्याय म्हणून बीबीसीनं सिरियात काम करणाऱ्या काही धर्मदाय संस्थांशी संपर्कही साधला.

त्यापैकी तकाफुल अलशाम नावाच्या संस्थेनं मूलभूत गरजा भागवण्यासाठी पुढील तीन महिने साहित्य पुरवण्याची तयारी दाखवली. तसंच मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्यातही ते मदत करणार आहेत.

पण अजूनही या छावण्यांमधील काही मोजके लोक वगळता अनेकांसाठी ऑनलाईन भीक मागण्याशिवाय पैसे कमावण्याचे इतर अत्यंत कमी पर्याय आहेत. त्यामुळं अजूनही रोज शेकडो कुटुंबं लाईव्ह जातात आणि अजूनही त्यांना मिळणाऱ्या देणगीच्या पैशातील बहुतांश वाटा टिकटॉककडेच जात आहे.

अतिरिक्त संशोधन आणि रिपोर्टींग : मोहम्मद अब्दुल्लाह, रुनाको सेलिना, सायरस चॅन, नेड डेव्हीस आणि केटी लिंग.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)