You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अफगाणिस्तान: ‘कदाचित मी मारली जाईन, पण मी शिक्षण घेईनच’
- Author, योगिता लिमये
- Role, बीबीसी प्रतिनिधी
30 सप्टेंबरच्या सकाळी 20 वर्षांची मरियम काबूलच्या दश्त-ए-बरची भागातील काज शिक्षण केंद्रात जाण्यासाठी धडपडत होती. हे केंद्र शहरातील हजारा अल्पसंख्याकांचं घरच आहे.
मरियमला वहिदा या तिच्या जवळच्या मैत्रीणीनं त्या दिवशी पहाटे फोन केला आणि म्हणाली, "तू अजून झोपेत का आहेस? ऊठ, आज आपली परीक्षा आहे."
अफगाणिस्तानमधील कॉन्कोर विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी त्यादिवशी सराव परीक्षा होती. मरियम रस्त्यातच असताना वहिदानं तिला पुन्हा फोन केला आणि लवकर येण्यास सांगितलं. कारण मरियमनं वहिदासाठी जागा पकडून ठेवली होती.
सकाळी सव्वा सात वाजता मरियम परीक्षा केंद्रावर पोहोचली तेव्हा तिला गोळीबाराचा आवाज ऐकू आला. "मी ऐकलेला तो सर्वांत भयानक स्फोट होता," असं मरियम सांगते.
"मी मुलांना परीक्षा केंद्राबाहेर पळताना पाहिलं, भिंतीवरून उड्या मारताना पाहिलं. काही क्षणानंतर मुलींनाही बाहेर पळताना पाहिल. त्यांच्यापैकी अनेक जण जखमी झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावर आणि कपड्यांवर रक्त होतं."
मरियमला केंद्रात प्रवेश देण्यात आला नाही, पण तिनं घरी परत जाण्यास नकार दिला. वहिदा बाहेर येण्याची ती वाट पाहत राहिली.
पण वहिदा बाहेर आली नाही.
30 सप्टेंबर रोजी एका खासगी कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या 45 विद्यार्थिनींमध्ये वहिदाचा समावेश होता.
"ती मला माझ्या बहिणीसारखी होती. आम्ही सगळं काही एकमेकींबरोबर शेयर करायचो. वहिदानं या कोर्सच्या तयारीसाठी एक दिवसही क्लास बुडवला नाही. पाऊस असो, बर्फवृष्टी असो किंवा पूर, ती केंद्रापासून खूप दूर राहत होती, तरीही ती नेहमी क्लासला हजर राहायची."
त्या दिवशी (शुक्रवारी) सकाळी वहिदाचे वडील मोहम्मद अमीर हैदरी हे दुकानात जाण्यासाठी लवकर निघाले होते.
"त्या दिवशी मी तिला पाहिलंही नाही. ती आमच्या कुटुंबाची हीरो होती, माझी परी होती. तिनं शाळेत नेहमीच उत्कृष्ट कामगिरी केली आणि गेल्या महिन्यात झालेल्या सराव परीक्षेतही तिनं 650 विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक गुण मिळवले होते. ती फक्त अभ्यासात हुशार होती, असं नाही.
"तिची वर्तणूक खूप चांगली होती आणि समाजातील सर्वजण तिच्यावर प्रेम करत होते. मला माहित नाही की, देवानं माझी तिचे वडील म्हणून निवड का केली आणि तो तिला माझ्यापासून इतक्या लवकर का घेऊन गेला?"
स्फोटानंतर मोहम्मद आणि मरियम वहिदाला शोधत अनेक दवाखान्यांमध्ये गेले.
"तालिबान आम्हाला आत जाऊ देत नव्हतं. शेवटी अली जिना हॉस्पिटलमध्ये मरियम आत गेली," मोहम्मद तो दिवस आठवताना रडत होते.
"ती रडत बाहेर आली आणि काही मिनिटांनी किंचाळत म्हणाली की तिनं वहिदाचा मृतदेह पाहिला आहे," मोहम्मद पुढे सांगतात.
अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था ढासळत असताना मोहम्मद यांना खासगी क्लाससाठी पैसे देणं शक्य नव्हतं. विशेषत: भाजीपाला विकून येणाऱ्या तुटपुंज्या कमाईतून ते आणखी बिकट होतं.
"मी जिथं जमेल तिथं बचत केली. मी वेळप्रसंगी कमी अन्न विकत घेतलं आणि वहिदा आणि माझ्या इतर मुलांच्या शिक्षणावर पैसा खर्च केला," मोहम्मद सांगतात.
तालिबाननं गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सत्ता काबीज केल्यापासून काबूलसह बहुतेक अफगाणिस्तानात मुलींना माध्यमिक शाळेत जाण्यास मनाई करण्यात आली आहे. वहिदानं गेल्या वर्षी माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं होतं, पण तिला तिच्या लहान बहिणींच्या शिक्षणाची काळजी होती.
"शाळेत शिकवले जाणारे सर्व विषय तिनं तिच्या बहिणींना शिकवायला सुरुवात केली होती," मोहम्मद सांगतात.
तालिबानी सत्तेत महिलांच्या अधिकार आणि स्वातंत्र्यावर निर्बंध वाढल्यामुळे देशातील लाखो तरुणी आणि मुलींवर निराशेची वेळ आली आहे.
"जेव्हा मला हताश वाटायचं किंवा अभ्यासाची प्रेरणा मिळत नव्हती, तेव्हा मी वर्ग चुकवायचे. तेव्हा वहिदा मला म्हणायची की, मी तुला मदत करेन, काळजी करू नकोस. पण कृपया क्लाससाठी येत जा,'" मरियम सांगते.
माध्यमिक शाळेत शिकलेल्या अनेक मुलींसाठी खासगी शिक्षण केंद्र हे त्यांचा दिवस भरून काढण्याचा हक्काचा मार्ग होता.
17 वर्षीय ओमुलबनिन असघरीचं हार्वर्ड विद्यापीठात राज्यशास्त्र किंवा अर्थशास्त्राचा अभ्यास करण्याचं स्वप्न होतं. शेवटच्या वर्षात शाळेत जाण्यास मज्जाव केल्यामुळं तिनं घरी जमेल तितका अभ्यास केला आणि काजमध्ये कोर्ससाठी प्रवेशही घेतला.
तिचे भाऊ मुख्तार मोदब्बर सांगतात, "शिक्षण थांबणार नाही, हे तिला सुनिश्चित करायचं होतं. तिचं ज्ञान अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्याच्या पातळीवर होतं. ती खूप वाचायची. ती नेहमी पुस्तकांनी वेढलेली असायची आणि फिट राहण्यासाठी रोज व्यायामही करायची."
मुख्तार हे ओमुलबनिनचे शिक्षकही होते. काज केंद्रात ते 10 वर्षांपासून भौतिकशास्त्र आणि गणित शिकवत आहेत.
"ओमुल नेहमी माझ्याशी मस्करी करायची आणि म्हणायची 'लाला ( मोठा भाऊ), मी परदेशात जाऊन शिकणार आहे आणि नंतर परत येऊन महिलांच्या हक्कांसाठी काम करणार आहे. एक दिवस मी तुमच्यापेक्षा जास्त प्रसिद्ध असेल."
23 मार्च रोजी तालिबाननं मुलींसाठी माध्यमिक शाळा पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली होती. ओमुलबनिन शाळेत गेली, पण तिला आणि तिच्या वर्गमित्रांना अवघ्या तासाभरात परत पाठवण्यात आलं. कारण तालिबाननं आपला निर्णय मागे घेतला होता.
"ती माझ्यासाठी सर्वांत वाईट आठवण आहे. तिनं फोन केलेला मी पहिला माणूस होतो. तिला रडणं थांबवता आलं नाही. सकाळी शाळा सुरू व्हायच्या वेळी आणि दुपारी शाळा सुटायच्या वेळी ती अस्वस्थ व्हायची," मुख्तार सांगतात.
हल्ल्याच्या दिवशीची सकाळ आठवून मुख्तार सांगतात, "ती खूप आनंदी होती. तिनं लवकर नाश्ता केला आणि नेहमीपेक्षा लवकर ती केंद्राकडे निघाली."
या केंद्रात काम करणाऱ्या त्यांच्या धाकट्या भावाचा फोन आला तेव्हा मुख्तार घरीच होते. बहीण जखमी झाल्याची माहिती त्यांना देण्यात आली. त्यांनी लगेच केंद्राकडे धाव घेतली, तेव्हा त्यांना कळलं की त्यांच्या बहिणीची हत्या झाली आहे.
मुख्तार सांगतात, "ओमुलबनिन ही आम्हा पाच भावंडांपैकी सर्वांत लहान आणि कुटुंबातील सर्वांत प्रिय होती. आम्ही उद्ध्वस्त झालो आहोत. माझ्या आईला हृदयविकार आहे आणि ओमुलचा मृत्यू झाल्यापासून तिची प्रकृती खूप वाईट आहे."
अफगाणिस्तानमध्ये हजारा समुदायाचं वर्चस्व असलेल्या शाळा आणि शिक्षणाच्या ठिकाणांवर अनेक हल्ले झाले आहेत. गेल्या शुक्रवारच्या बॉम्बस्फोटाची जबाबदारी आतापर्यंत कोणत्याही गटानं स्वीकारलेली नाही. पण, या पूर्वीच्या हल्ल्यांमागे आपला हात असल्याचं इस्लामिक स्टेटची प्रादेशिक संलग्न संघटना इस्लामिक स्टेट खोरसान प्रांत किंवा ISKPने म्हटलं आहे.
"प्रत्येक हल्ल्याचा सर्व विद्यार्थ्यांच्या विशेषत: मुलींच्या मनोबलावर परिणाम होतो. हल्ल्यामुळे त्यांना आणि आम्हालाही भीती वाटते," मुख्तार सांगतात.
"पण धोका असूनही मी शिकवत राहीन. अफगाणिस्तानची तरुण पिढी शिक्षित झाल्यास आपलं भविष्य धोक्यात येईल, अशी भीती या हिंसाचारामागील लोकांना वाटते. या आठवड्यात मी माझी बहीण आणि माझे इतर अनेक विद्यार्थी गमावले आहेत. पण मला हेही लक्षात ठेवावं लागेल की, शेकडो जण अजूनही जिवंत आहेत आणि त्यांना शिक्षण हवं आहे. त्यांचं भविष्य अंधकारमय होऊ नये अशी माझी इच्छा आहे."
धोकादायक परिस्थितीमुळे वहिदाचे वडील तिला केंद्रातील क्लासेसमध्ये जाणं बंद करण्यास सांगायचे. "ती मला काहीही म्हणत नव्हती. पण, ती तिच्या आईला सांगायची की, ती थांबणार नाही. कारण तिला मेडिकलचा अभ्यास करून देशाची सेवा करायची होती," मोहम्मद सांगतात.
"मी फक्त केंद्र पुन्हा सुरू होण्याची वाट पाहत आहे आणि मी माझा कोर्स पूर्ण करण्यासाठी परत जाईन. याआधी मला वर्गात जाण्यासाठी प्रेरणा हवी होती. पण आता क्लास करणं ही गोष्ट माझ्यासाठी बांधिलकी आणि जबाबदारी आहे," मरियम सांगते.
ती पुढे सांगते, "वहिदा, नाझनीन, शबनम, नर्गिस, समीरा आणि माझ्या मारल्या गेलेल्या दहा मित्रांसाठी मला माझं शिक्षण चालू ठेवावं लागेल. एके दिवशी आमचाच विजय होईल. "
तो दिवस कधी येईल किंवा तो दिवस तिच्या आयुष्यात उजाडेल की नाही, याची मरियमला खात्री नाही. पण, तिला हे घडेल असा विश्वास आहे.
"कदाचित आमच्यापैकी बरेच जण मारले जातील, पण आम्हीच जिंकू," असं ती म्हणते.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)