You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तालिबानमधील अंतर्गत कलह विरोधकांसाठी संधी ठरू शकतो का?
- Author, माजीद नुसरत
- Role, अफगाणिस्तानसंबंधी प्रकरणांचे तज्ज्ञ, बीबीसी मॉनिटरिंग
अफगाणिस्तानाच्या उत्तर प्रांतातील फरयाबमध्ये नुकताच निर्माण झालेला कलह मिटवण्यात तालिबानला यश आलं. मात्र या असंतोषानं तालिबानमधील जातीय आणि समुदायांमधील मतभेद सर्वांसमोर आले.
त्याचा फायदा इस्लामिक स्टेटच्या कट्टरतावाद्यांबरोबरच नुकत्याच स्थापन झालेल्या तालिबान विरोधी नॅशनल रेझिस्टन्स फ्रंटलादेखील होऊ शकतो.
यावर्षी जानेवारीच्या मध्यात तालिबाननं प्रसिद्ध उझबेक कमांडर मखदूम आलम यांना ताब्यात घेतलं होतं. त्यावर नाराज होत उझबेकिस्तानचे आंदोलक आणि योद्धे फरयाब प्रांताची राजधानी मायमानामधील रस्त्यांवर उतरले होते.
मखदूम यांनी फरयाब, जोझ्जान आणि सर-ए-पोल सारख्या उत्तरेतील प्रांतांमध्ये अनेक वर्ष तालिबानी पथकांचं नेतृत्व केलं होतं. तालिबाननं या परिसरांमध्ये पश्तूनहून शेकडो अतिरिक्त सैनिक आणून परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. मात्र, त्यापूर्वीचे दोन दिवस अराजकता असलेले होते. या दोन दिवसांत पश्तून योद्ध्यांना निःशस्त्र करण्यात आलं होतं.
हिंसाचारामुळं अनेक लोक मारले गेले आणि जखमीही झाले. तालिबाननं सर-ए-पोलमध्येही विशेष पथकातील 2,500 सदस्य तैनात केले. या प्रांतातही असाच हिंसाचार आणि संघर्ष सुरू झाल्याच्या अफवा होत्या.
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात काबूलवर ताबा मिळवल्यानंतर तालिबाननं अफगाणिस्तानात ज्या प्रशासनाची स्थापना केली होती, त्यातील जवळपास सर्व सदस्य पश्तून होते. तालिबानच्या या पावलामुळं अफगाणिस्तानच्या उत्तर भागातील बिगर-पश्तून सहकाऱ्यांना निराश केलं.
नाराजीचं एक कारण हेही होतं की, तालिबानच्या 85 हजार योद्ध्यांपैकी पाचवा भाग असलेले सदस्य हे बिगर पश्तून आहेत. गेल्यावर्षी उन्हाळ्यात उत्तर भागात ताबा मिळवण्यात त्यांचीही मोलाची भूमिका होती.
अफगाणिस्तानच्या लोकसंख्येपैकी जवळपास 40 टक्के पश्तून आहे. तर दक्षिणेत यांची संख्या अधिक आहे. ताजिक आणि उझबेक देशाच्या उत्तर भागात बहुसंख्याक आहेत.
समर्थक विरोधात जाता कामा नये
तालिबान प्रशासनाबाबत आतापर्यंत केवळ एवढीच माहिती होती की, यात सहभागी पश्तुनांच्या दोन गटांमध्ये मतभेद आहेत. विशेषतः पूर्व पश्तून (हक्कानी) आणि त्यांचे दक्षिणेतील प्रतिस्पर्धी (कांधारी) यांच्यात.
पण फरयाब प्रांतातील असंतोषानं उत्तर भागातील तालिबान प्रसासनाची कमकुवत बाजूही सर्वांसमोर आली.
मखदूम यांच्या अटकेमुळं उझबेकींच्या मनात पश्तुनांच्या तुलनेत भेदभाव होत असल्याची भावना अधिक बळावली.
तालिबान त्यांनी उझबेक कमांडरला अटक का केली हे समजावत राहिलं. स्थानिक माध्यमांनी अपहरणासह अनेक अस्पष्ट आरोपांचा दाखला दिला. पण त्या सर्वाला अपयश आलं.
"मखदूम आलमच्या अटकेनं फरयाबच्या लोकांना विरोध व्यक्त करण्याची संधी दिली. सर्व आंदोलक मग ते महिला असो की पुरुष तालिबान समर्थक नव्हते, हे समोर आलं. एखादा मुद्दा जातीय मुद्दा बनतो तेव्हा, विचारसरणी, पक्षाची मान्यता आणि विश्वास प्रणाली बळ गमावत असते," असं या प्रकरणी प्रसिद्ध यूट्यूबर रझाक ममुन यांच्या एका चर्चासत्रात उझबेक लेक्चरर तोरडिकल मैमानगी म्हणाले.
तालिबानच्या अधिकाऱ्यांनी आणि समर्थकांनी हा असंतोष शांत केला आणि यावर टीका केली. पण बहुतांश प्रमुख उझबेक आणि ताजिक तालिबान कमांडर आणि अधिकाऱ्यांनी या प्रकरणी मौन कायम ठेवलं. काही मोजक्या लोकांनी अगदी औपचारिक प्रतिक्रिया दिल्या.
दरम्यान एका उझबेक कमांडरनं व्हीडिओच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली. "माझ्या प्रिय देशबांधवांनो.. मी कारी सलाहुद्दीन अयुबी सध्या काबूलमध्ये आहे. मी फरयाब प्रांतामध्ये गेलेलो नाही. त्यामुळं मला घातपातानं ठार केल्याचं वृत्त चुकीचं आहे.
अफगाणिस्तानचे शत्रू लोकांमध्ये भीती पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. मला काहीही त्रास नसल्याचा विश्वास मी देशवासियांना देऊ इच्छितो. इस्लामिक अमिरात एक आणि एकसंघ आहे," असं त्यांनी व्हीडिओत म्हटलं आहे.
त्यापूर्वी उत्तर प्रांतातील सुत्रांच्या हवाल्यानं, 'द वॉल स्ट्रीट जर्नल' नं बातमीत फरयाबमध्ये मध्यस्थीसाठी जाताना कारी सलाहुद्दीन अयुबी यांच्यावर दोन वेळा हल्ला झाल्याचा दावा केला होता. अयुबी बंडखोरांसोबत जाऊन मिळतील अशी भीती पश्तून तालिबानला होती, असंही बातमीत म्हटलं होतं.
या हल्ल्यात एक बॉडीगार्ड मारला गेला आणि अनेक जखमी असल्याचंही या वृत्तात म्हटलं होतं.
मखदूमला ताब्यात घेतल्यांतर लगेचच आणखी एक बिगर पश्तून कमांडर कारी वकील यांनाही ताब्यात घेण्यात आलं होतं. हश्त-ए-सोभ वृत्तपत्राच्या वृत्तानुसार कारी वकील ताजिक समुदायाचे आहेत.
उत्तरेत सहकाऱ्यांना कमकुवत करू इच्छितो तालिबान
तालिबान कायम त्यांच्या सशस्त्र विरोधकांना लोकांच्या नजरेतून उतरवण्यासाठी इस्लामिक स्टेटशी संबंधित, चोर किंवा अपहरणकर्ता म्हणून सादर करतं.
फरयाब प्रांतात अशांतता पसरण्याच्या पूर्वीच सोशल मीडियावर अभ्यासक उत्तरी प्रांतात तालिबानच्या पश्तून आणि बिगर पश्तून गटांमध्ये असलेल्या तणावाबाबत चर्चा करत आहेत. मात्र, अफगाणिस्तानमधील माध्यमं, तालिबानच्या बदल्याच्या भीतीनं अशा प्रकारची वक्तव्य करणं टाळत आहेत.
प्रसिद्ध पत्रकार ताजुदीन सोरॉश यांनी 9 डिसेंबरला एक ट्वीट केलं. "सूत्रांच्या माहितीनुसार फरयाबमध्ये उझबेकी आणि पश्तुनी यांच्यात पडलेली फूट पाहता, तालिबानच्या बदरी ब्रिगेडनं मखदुम आलम यांच्या 70 निकटवर्तीय उझबेकींना इस्लामिक स्टेटशी संबंध असल्याच्या आरोपात ताब्यात घेतलं. त्यामुळं उत्तर भागात तालिबानचे माजी कमांडर (उझ्बेक) सलाहुद्दीन अयुबी फरयाब परत आले आहेत."
तालिबान उत्तर भागातील कमांडरच्या शक्तीनं चिंतीत असून त्यामुळं ते अफगाणी लष्कराकडून गेल्यावर्षी जप्त केलेली शस्त्रं परत न करण्यासारख्या आरोपांद्वारे त्यांची शक्ती कमी करण्याचा प्रयत्न करू इच्छितात, असं फरयाबचे माजी गव्हर्नर नकीबुल्लाह फाइक यांनी म्हटलं.
भविष्यात काय होऊ शकतं?
तालिबान पाश्चिमात्य सैन्य दलांच्या विरोधात विजयाचा डंका वाजवत असला किंवा कोणत्याही बंडखोरीला सामोरं जायला सज्ज असल्याचं दाखवत असलं तरी, फरयाब प्रांतातील असंतोष जातीय अल्पसंख्याकांमध्ये असलेली नाराजी मांडणारा आहे.
तसंच भविष्यात हा मुद्दा एवढा मोठा बनू शकतो की, तालिबानचे विश्वासू समजले जाणारे बिगर पश्तून इतर विचारसरणीच्या गटात समाविष्ट होऊ शकतात, अशीदेखील शंका आहे. या मतभेदाचा फायदा, देशांतर्गत आणि विदेशी तत्वंही घेऊ शकतात.
अफगाणिस्तानवर तालिबानच्या ताब्यानंतर आयएसची स्थानिक शाखा इस्लामिक स्टेट खुरासन (आयएसकेपी) नंदेखील लहान-सहान हल्ल्यांची संख्या वाढवली आहे, तर अहमद मसूद यांच्या नेतृत्वातील नॅशनल रेझिस्टन्स फ्रंट (एनआरएफ) नंदेखील नुकतीच सैन्याची हालचाल वाढवली आहे. एनआरएफ आगामी काळात मोठ्या बंडखोरीची तयारी करत असल्याचं म्हटलं जात आहे.
हा धोका ओळखत तालिबाननं हिज्ब उत-तहरीर आणि जमियत-ए-इस्लाह सारख्या मौलवी आणि गटांवर लहानसहान कारवाई सुरू केली आहे. त्यांनी ताजिक आणि उझबेक यांच्याकडून पाठिंबाही मिळवला आहे. हे दोन्ही गट सशस्त्र कारवायांसाठी ओळखले जात नसले तरी तालिबान त्यांना आयएससाठी सदस्यांची भरती करणारे गट म्हणून ओळखतं.
दरम्यान, किमान शेकडोंच्या संख्येत इस्लामिक मुव्हमेंट ऑफ उझ्बेकिस्तान (आयएमयू) आणि इतर मध्य आशियाई कट्टरतावादी उत्तर भागात शांत आहेत. त्यांचे तालिबानबरोबरचे संबंध अनेक वर्षांपासून बिघडलेले आहेत. आयएमयूबरोबर तालिबानच्या संबंधांमध्ये 2015 मध्ये कटुता आली होती. त्यावेळी या गटानं आयएसबरोबर निष्ठा दाखवली होती.
"जेव्हा तालिबानकडे तुटवडा निर्माण झाला तेव्हा ताबा मजबूत करण्यासाठी त्यांनी तालिबानातून हजारो तालिबान योद्धे आणि समर्थकांना अफगाणिस्तानात बोलावलं होतं," असं डिसेंबरच्या महिन्यात वॉशिंग्टन पोस्टनं एका बातमीत म्हटलं होतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)