You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अफगाणिस्तान: जेव्हा माजी महिला पत्रकाराला दिवसाढवळ्या गोळ्या घालून मारण्यात आलं...
राजकीय सल्लागार आणि माजी टीव्ही अँकर मीना मंगल यांच्या दिवसाढवळ्या झालेल्या हत्येप्रकरणी निषेध नोंदवला जात आहे. अफगाणिस्तानमधील राजकीय नेते तसंच महिला हक्कांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मिना यांना न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे.
राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी त्या टेलिव्हिजन अँकर म्हणून कार्यरत होत्या. शनिवारी अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये भरदिवसा गोळ्या घालून मंगल यांची हत्या करण्यात आली.
मारेकऱ्यांना लवकरात लवकर पकडू, असं देशाचे कार्याध्यक्ष अब्दुला अब्दुला यांनी म्हटलं आहे.
हत्येमागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र कौटुंबिक वादामुळं हत्या झाल्याचा संशय आहे. त्याचदृष्टिनं तपासही केला जातोय.
मंगल शनिवारी कार्यालयात जायला निघाल्या होत्या. त्या अफगाणिस्तान संसदेत सांस्कृतिक आयोगात काम करत होत्या. 7.20 च्या सुमारास गोळ्या झाडून त्यांना मारण्यात आलं, असं शनिवारी गृहमंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
अफगाणिस्तान सर्वोच्च न्यायालय, नागरी हक्कांसाठी लढणारे गट, महिलांविरोधातील हिंसाचाराविरोधात काम करणाऱ्या संघटनांनी या हत्येचा गांभीर्याने तपास व्हावा, अशी मागणी केली आहे.
मंगल यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. त्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटत असल्याचं मंगल यांनी फेसबुक पोस्टद्वारे म्हटलं होतं, असं ट्वीट महिला हक्कांसाठी काम करणाऱ्या वाझमा फ्रोग यांनी केलं होतं.
मंगल आणि त्यांचे पती दोन वर्षांपूर्वी विभक्त झाले होते. मंगल यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या पतीविरुद्ध घरगुती हिंसाचाराची तक्रार केली, असं अॅटर्नी जनरल यांच्या कार्यालयाच्या प्रवक्त्यांनी बीबीसीला सांगितलं.
हे प्रकरण कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणं हाताळणाऱ्या न्यायालयाकडे सोपवण्यात आलं आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
मंगलचे वडील बीबीसीशी बोलताना म्हणाले, "घरगुती भांडणांमुळे मी माझी हुशार मुलगी गमावली. नोकरी करणाऱ्या माझ्या मुलीचं रक्षण का करू शकले नाहीत, असं मला सरकारला विचारायचं आहे. घराबाहेर पडून समाजासाठी काही करणाऱ्या माझ्या इतर मुली किंवा इतर महिलांचं रक्षण त्यांनी करावं अशी मी विनंती करतो."
मंगलच्या मृत्यूनंतर महिलांविरोधात होणाऱ्या अन्यायाबाबत अफगाण सोशल मीडिया विश्वात प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
अफगाणिस्तानातील महिलावंरोधात काबूल शहरात अनेक 'हाय प्रोफाइल' गुन्हे घडतात. त्यामध्ये सर्वांत सुरक्षित 'ग्रीन झोन'चाही समावेश आहे असं काही जणांचं म्हणणं आहे.
'महिला ठार मारण्याच्याच लायकीची असते असं वाटल्यामुळे एका महिलेचा दिवसाढवळ्या खून करण्यात आलाय, असं महिला हक्कांसाठी लढणाऱ्या वझमा फरोग म्हणतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)