You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
sexsomnia : झोपेत सेक्स करण्याचा आजार असतो? बलात्काराच्या आरोपात ही पळवाट ठरू शकते?
- Author, एमा एल्स
- Role, बीबीसी न्यूज
त्या रात्री तिच्यावर बलात्कार झाला. प्रकरण पोलिसात गेलं. पण तिला सेक्ससोम्निया असं म्हणत ब्रिटनच्या क्राउन प्रॉसिक्युशन सर्व्हिसने (CPS) ही केस बंद केली.
हे घडलं होतं तिला असलेल्या झोपेच्या दुर्मिळ आजारामुळे. पुढे प्रकरणात बरेच ट्विस्ट येत गेले. तिने प्रकरण लावून धरलं आणि तिची ती केस पुन्हा सुरू झाली.
नेमकं प्रकरण काय आहे?
साऊथ लंडनमध्ये राहणारी 24 वर्षांची जेड 2017 च्या एका रविवारी सोफ्यावर पहुडली होती. झोपेत असलेल्या जेडला हळूहळू भान आलं आणि तिने त्याला समोर अर्धनग्न अवस्थेत पाहिलं. त्याच्या गळ्यात असणारी साखळीही तुटून जमिनीवर पडली होती.
तिला जाणवलं की, आपल्यासोबत काहीतरी चुकीचं घडलंय. झोपेत कोणीतरी तिच्यावर बलात्कार केला होता असं तिला वाटलं. तिने लगेचच पोलीस स्टेशन गाठलं आणि त्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
या गोष्टीला तीन वर्ष उलटून गेले. अलीकडेच तिला ब्रिटनच्या क्राउन प्रॉसिक्युशन सर्व्हिसच्या (cps) वकिलांनी तातडीने पोलिस स्टेशनमध्ये बोलावलं.
वकील जेडला म्हटले, ही केस आता पुढं जाणं कठीण आहे. त्यांनी तिला पुढं सांगितलं की, या केसशी संबंधित ते दोन 'स्लिप एक्स्पर्ट' शी ते बोलले आहेत. त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुला सेक्ससोम्निया असू शकतो. कदाचित झोपेत तू सेक्ससाठी संमती दिली असावी.
सेक्ससोम्निया ही एक गंभीर आरोग्य समस्या आहे. या समस्येने त्रस्त असलेले लोक झोपेत सेक्स करतात.
इंग्लंड आणि वेल्सच्या कायद्यानुसार, झोपेत असलेल्या व्यक्तीने सेक्स केल्यास त्याने त्यासाठी संमती दिलीय असं मानलं जातं नाही. पण तेच दुसरीकडे एखाद्या स्त्रीने सेक्ससाठी संमती दिली आहे असा विश्वास निर्माण करणारी थोडी जरी परिस्थिती दिसून येत असेल तर आरोप असलेल्या व्यक्तीला दोषी ठरवता येणार नाही.
वकिलांच हे म्हणणं ऐकेपर्यंत जेडला अजिबात कल्पना नव्हती की, तिला सेक्ससोम्निया आहे. जेड त्या वकिलांना म्हणाली की, असं काही घडेल याची मला अजिबात कल्पना नव्हती. नेमकं काय झालं तेच मला समजत नाहीये.
ती सांगते, "मागच्या 13 वर्षात माझे दोन रिलेशनशिप होऊन गेले पण त्यातल्या कोणीही मला याबद्दल सांगितलं नाही."
पण सीपीएसच्या निर्णयानुसार हे प्रकरण बंद करावं लागणार होतं आणि आरोपी पूर्णपणे निर्दोष मुक्त होणार होता.
जेव्हा ती पहिल्यांदा पोलीस स्टेशन मध्ये गेली तेव्हा तिथल्या अधिकाऱ्यांनी तिला झोपेबाबत प्रश्न विचारले.
तेव्हा तिने त्या अधिकाऱ्याला सांगितलं की, तिला गाढ झोप लागते. या गाढ झोपेमुळेच ती लहान असताना झोपेत चालायची. पण तिच्या या उत्तरामुळे तिची केस बंद होईल असं तिला वाटलं नव्हतं.
त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं?
जेडने तिच्या बेस्ट फ्रेंड बेलला घडलेला प्रकार सांगितला. बेलने त्याच दिवशी लगेचच 999 वर कॉल करून पोलिसांना याबाबत माहिती दिली.
जेडने कॉल केलेला दिवस बेलला आठवतोय.
तो सांगतो, "तिचा इतका दुःखी आणि जड आवाज मी कधीच ऐकला नव्हता. तिने सांगितलं की, तिच्यावर बलात्कार झालाय. जेव्हा तुमची जवळची व्यक्ती तुम्हाला याबाबत सांगते तेव्हा काही क्षणासाठी तुमच्या पायाखालची जमीन सरकते."
हे सगळं घडण्याच्या आदल्या रात्री...
ती निवांत संध्याकाळ होती. कालिसे, जेड आणि बेल एकत्र बारमध्ये गेले. कालिसे वाईन प्यायली. ती संध्याकाळ मजेत गेली.
कालिसे आणि बेलने टॅक्सी बुक केली आणि ते घरी गेले. जेडने तिथूनच जवळच राहणाऱ्या मित्राच्या फ्लॅटवर जायचं ठरवलं.
तेव्हा पहाटेचे 2 वाजले होते. फ्लॅटमध्ये काहीजण गप्पा मारत होते म्हटल्यावर जेड ब्लॅंकेट अंगावर घेऊन सोफ्यावरचं झोपून गेली.
पहाटे 5 वाजता तिचा डोळा उघडला तेव्हा तिच्या पॅन्टचं बटन उघड होतं. तिची ब्रा सुद्धा काढली होती. तिला सोफ्याच्या पलीकडे बसलेला माणूस दिसला.
तिने त्याला विचारलं, "तू माझ्यासोबत काय केलंस? इथं काय घडलं?"
त्यावर तो म्हणाला, "काहीतरी न सांगता येण्याजोगे घडलं. तू समजून घेण्याऐवढी शहाणी आहेस."
जेड सांगते, "असं बोलून तो तिथून लगेचच निघून गेला. दार तसंच उघड होतं. मी लगेचच बेलला फोन केला."
त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर दोन पोलिस अधिकाऱ्यांनी जेडला फॉरेन्सिक चाचणीसाठी नेलं. योनीतील स्वॅब चाचण्यांमध्ये वीर्य दिसून आलं. सोफ्यावर जे वीर्य पडलं होतं त्याचे नमुने मॅच झाले.
पोलिसांनी चौकशी केली सुरू केली असता आरोपीने उत्तर द्यायला टाळाटाळ केली. यावर सीपीएसने त्याच्यावर बलात्काराचे आरोप लावण्याचा निर्णय घेतला. यावर मी काही चुकीचं केलेलं नाही असं त्याचं म्हणणं होतं. सुनावणीची तारीखही निश्चित करण्यात आली.
प्रत्यक्षात तपास झाला नाही.
सीपीएसने केस बंद करायचा निर्णय घेतला. जेडला त्यांचा हा निर्णय पटला नाही. तिने हे सगळं चुकीचं घडतंय हे सिद्ध करायचा विडाच उचलला. पण अपील करण्यासाठी तिच्याकडे फारच कमी वेळ शिल्लक होता.
तिने पोलिसांच्या मुलाखती, टॉक्सिकॉलॉजी टेस्ट रिझल्ट्स आणि स्लीप एक्सपर्ट रिपोर्ट्स या सर्व गोष्टी गोळा केल्या. पोलिस स्लिप एक्स्पर्टच्या थिअरील इतकं महत्त्व देत आहेत हे पाहून तिला धक्काच बसला.
पोलिसांनी प्रत्यक्षात येऊन तिची भेट न घेता परस्पर तज्ज्ञांची मतं घेऊन खटला बंद केला होता.
'स्लीपिंग सेक्स' म्हणजे काय?
सुरुवातीला या स्लीपिंग एक्स्पर्टने जेडला सांगितलं की, "तिला त्या दिवशी सेक्ससोमनियाचा अटॅक आला असेल. तिने डोळे उघडे ठेवून सेक्स केला असू शकतो. "
खरं तर हा तज्ज्ञ त्या आरोपीचं प्रतिनिधित्व करतोय असं जेडला वाटलं.
सीपीएसने आणखीन एका स्लीपिंग एक्स्पर्टला आणलं होतं. जेडने पोलिसांना सांगितलं होतंच की, तिला झोपेत चालायची, बोलायची सवय होती म्हणून.
"हे बघता तिला झोपेत सेक्ससोम्नियाचा अटॅक आला असावा," असं तो तज्ञ म्हणाला.
या दोन्ही तज्ज्ञांचे युक्तिवाद ऐकून जेडला काय बोलायचं ते सुचेना. तिने विचार केला की, "मला त्याच दिवशी सेक्ससोमनियाचा अटॅक कसा काय आला. ज्या व्यक्ती सोबत आधी कधीच सेक्स केला नाही त्या व्यक्तीसोबत सेक्स करणं मी कसं मान्य करू?"
त्यानंतर जेडनेही स्लीपिंग एक्स्पर्ट आणायचे ठरवले. याच दरम्यान लंडन स्लीप सेंटरमध्ये तिची भेट डॉ. इर्शाद इब्राहिम यांच्याशी झाली. त्यांनी बऱ्याच बलात्काराच्या प्रकरणांमध्ये तज्ज्ञ म्हणून काम केलं होतं.
पण एवढ्या केसेसमध्ये पीडितेला सेक्ससोमनिया झाल्याची पहिलीच केस त्यांच्याकडे आली होती. बलात्कार प्रकरणांमध्ये सहसा आरोपींना सेक्ससोमनिया असतो.
बीबीसीच्या रिपोर्ट्स मध्येही एखाद्या पीडितेला सेक्ससोमनिया झाल्याचं आढळलेलं नाही.
इब्राहिम सांगतात की, "सेक्ससोमनियाचे निदान करण्यासाठी आत्ता तरी कोणत्या चाचण्या उपलब्ध नाहीत. पण शक्यतो पुरुषांना सेक्ससोमनिया असतो आणि ते झोपेत सेक्स करतात."
यात जेडने तिची स्लिप टेस्ट म्हणजेच पॉलीसोम्नोग्राफी केली. या टेस्टमध्ये तुमच्या ब्रेन व्हेव्ज, तुमचा श्वासोच्छ्वास आणि झोपेच्या वेळी ज्या हालचाली होतात त्या तपासल्या जातात.
जेडने झोपेत सेक्स करण्याची संमती दिली होती का?
जेड झोपेत घोरते आणि तिला 'स्लीप ॲप्निया' आहे असं तिच्या स्लिप टेस्टमधून पुढं आलं. अशा समस्या असलेल्या लोकांना झोपेत श्वास घ्यायला त्रास होतो.
यावर डॉ. इब्राहिम सांगतात की, "या दोन्हीमुळे सेक्ससोम्निया होऊ शकतो. त्या दिवशी तिला सेक्ससोम्निया अटॅक आलेला असू शकतो."
डॉक्टरांनी विचारलं की, पण प्रत्यक्षात जे घडलं त्यात सेक्ससोम्नियाचा वाटा कितपत होता?
इब्राहिम म्हणतात, हा खरं तर खूप महत्त्वाचा प्रश्न होता.
ते सांगतात, "यावर तिने उत्तर दिलं की, एकतर तसं घडलं असेल किंवा घडलं नसेल."
जेडला त्या दिवशी सेक्ससोम्नियाचा अटॅक आला नव्हता यावर तिचा ठाम विश्वास होता. पण स्लीपिंग एक्स्पर्टचं म्हणणं अगदी याविरुद्ध होतं.
त्यामुळे तिने एक वकील गाठला आणि कोर्ट या आजाराकडे कशा पद्धतीने पाहतं याविषयी माहिती घेतली.
बॅरिस्टर अॅलिसन समर्स केसी यांनी बरीच बलात्काराची प्रकरण हाताळली आहेत. यात सेक्ससोमनियाची प्रकरणही होती.
अॅलिसन यांनी जेडला सांगितलं की, "एखाद्या व्यक्तीला हा आजार आहे की नाही हे डॉक्टर निश्चितपणे सांगू शकत नाहीत. पण या प्रकरणात असं घडलंय असं दाखवून आरोपीची निर्दोष मुक्तता होते."
तिला न्याय मिळाला का?
सीपीएसच्या गाईडलाईननुसार, प्रकरणातील तथ्य जाणून घेण्यासाठी सेक्ससोम्निया आणि झोपेत चालण्याची कोर्टातली इतर प्रकरणही तपासून घेतली पाहिजेत.
पण, जेडचं प्रकरण कोर्टात गेलंच नाही. तिने जो रिसर्च केला त्याचाच आधार घेत तिने सीपीएसच्या केस बंद करण्याच्या निर्णयाला आव्हान दिलं.
जेडने सीपीएसच्या दुसऱ्या चीफ क्राऊन प्रोसिक्युटरकडे स्वतः केलेला तपास आणि रिपोर्ट सादर केले. त्यावर या प्रकरणाचा तपास पुढं सुरू ठेवावा असं मत या प्रोसिक्युटरने व्यक्त केलं. हे प्रकरण कोर्टात नेऊन स्लीपिंग एक्स्पर्टची मतं आणि आरोपीच्या वकिलाचा युक्तिवाद ऐकून घ्यावा, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
कदाचित ज्युरी त्याला दोषी ठरवणार नाहीत. पण याचा तपास व्हावा असं आता सरकारी वकिलांचं मत आहे.
प्रोसिक्युटर जेडला म्हणाले, "या सगळ्या प्रकरणात तुला जो मनस्ताप झालाय याचा विचार करूनही वाईट वाटतं."
त्यांनी सीपीएसच्या वतीने जेडची माफी मागितली.
जेड म्हणते, "मला नाही वाटत की आता मला न्याय मिळेल. पण अशा प्रकरणात कोणत्या चुका टाळाव्यात याबाबत सीपीएसला नक्कीच काहीतरी समज मिळेल."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)