डॉलर इतका मजबूत का होतोय, अन् जगभरात भीतीचं वातावरण का पसरलंय?

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

गेल्या दशकात अमेरिकी डॉलर इतर चलनांच्या तुलनेत सर्वांत मजबूत स्थितीत राहिला आहे. याचा अर्थ डॉलर खरेदी करणं अधिक महाग झालं आहे. एक डॉलर खरेदी करण्यासाठी आता पूर्वीपेक्षा अधिक पाऊंड, युरो किंवा येन लागू शकतात.

याचा परिणाम जगभरातील व्यापार, उद्योग आणि घरांवरही होत आहे.

डॉलर इंडेक्स (DXY) हे अमेरिकी डॉलरची जगातील इतर सहा चलनांशी तुलना करतं. यामध्ये युरो, पाऊंड आणि येन यांचा समावेश आहे.

2022 मध्ये डॉलर इंडेक्स 15% वाढला आहे. डॉलर गेल्या 20 वर्षांत सर्वोच्च पातळीवर असल्याचं हे आकडे दाखवून देतात.

डॉलर इतका मजबूत का आहे?

वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी अमेरिकेच्या सेंट्रल बँकेनं यंदा अनेक वेळा व्याजदर वाढवले आहेत. यामुळे डॉलर वापरणाऱ्या आर्थिक उत्पादनांच्या कमाईत वाढ झाली आहे. अमेरिकेचे सरकारी बाँड (रोखे) याचं एक उदाहरण आहे.

भविष्यात व्याजासह पैसे परत करण्याचं आश्वासन देऊन सरकार आणि कंपन्यांसाठी कर्ज घेण्याचा रोखे हा एक मार्ग आहे. सरकारी रोखे हे सामान्यपणे सुरक्षित मानले जातात.

गुंतवणूकदार अलीकडच्या काही दिवसांत अमेरिकन रोखे खरेदी करण्यासाठी लाखो डॉलर्स खर्च करत आहेत. हे रोखे खरेदी करण्यासाठी त्यांना डॉलर खर्च करावे लागत आहेत आणि वाढत्या मागणीमुळे डॉलरचं मूल्य वाढलं आहे.

जेव्हा गुंतवणूकदार डॉलर खरेदी करण्यासाठी इतर चलनांचा वापर करतात, तेव्हा त्या चलनांचं मूल्य घसरतं.

जागतिक अर्थव्यवस्था संकटात असतानाही गुंतवणूकदार डॉलर खरेदी करायची इच्छा बाळगून आहेत. याचं कारण म्हणजे अमेरिकेची अर्थव्यवस्था खूप मोठी आहे आणि तिला 'सुरक्षित ठिकाण' समजलं जातं. त्यामुळे दरही वाढतात.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

तेलाच्या वाढत्या किमतींमुळे युरोप आणि आशियातील अनेक अर्थव्यवस्था संकटात सापडल्या आहेत.

अमेरिकेत गेल्या सहा महिन्यांत वाढत्या किमतींचा फारसा परिणाम झालेला नाहीये.

अमेरिकेची अर्थव्यवस्थाही गेल्या तीन महिन्यांत थोडी संकुचित झाली असली, तरी कंपन्यांमध्ये नोकरभरती केली जात आहे. याकडे एक आशादायी चित्रं म्हणून पाहिलं जाऊ शकतं.

पाऊंडपेक्षा डॉलर मजबूत

26 सप्टेंबर रोजी डॉलरच्या तुलनेत पाऊंडची विक्रमी पातळीवर घसरण झाली. त्याची किंमत 1.03 डॉलर होती. तेव्हापासून आता थोडी सुधारणा झाली आहे.

या वर्षाच्या सुरुवातीपासून पाऊंडमध्ये 20 टक्क्यांची घसरणी नोंदवली गेली आहे. यानंतर ब्रिटनचे अर्थमंत्री क्वासी क्वार्टेंग यांनी 45 अब्ज पौंडांच्या कर कपातीसह एक मिनी बजेट सादर केलं. याशिवाय त्यांनी व्यवसाय आणि घरगुती वीजेमध्ये अनुदान देण्याची घोषणाही केली.

आणखी कर कपात होऊ शकते, असं त्यांनी सूचित केलंय. अर्थमंत्र्यांच्या या निर्णयामुळे सरकारी कर्ज खूप वाढू शकतं, या भीतीपोटी अनेक गुंतवणूकदारांनी यूकेचे बाँड्स आणि इतर मालमत्ता विकल्या आहेत. त्यामुळे पाऊंडची किंमतही घसरली आहे.

मजबूत डॉलरचा कमकुवत चलनांवर कसा परिणाम होतो?

पाऊंडप्रमाणे जपानी येन चलनाची किंमत डॉलरच्या तुलनेत 20 टक्क्यांनी घसरली, तर युरोची 15 टक्क्यांनी.

कमकुवत चलन असलेल्या देशांना मजबूत डॉलरचा फायदा होतो. कारण त्यांच्यासाठी वस्तू आणि सेवा विकणं स्वस्त होतं. त्यामुळे निर्यात वाढते.

पण, याचा अर्थ अमेरिकेतून होणारी निर्यात महाग होते असाही होतो. तेलाची किंमत अमेरिकन डॉलरमध्ये निश्चित केली जाते, त्यामुळे अनेक देशांमध्ये तेल महाग झालं आहे.

प्रातिनिधिक फोटो
फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

उदा. यूकेमध्ये वर्षाच्या सुरुवातीला एक लीटर पेट्रोलची सरासरी किंमत 1.46 पाऊंड होती, ती आता 15 टक्क्यांनी वाढून सरासरी 1.67 पाऊंड इतकी झाली आहे. जुलैमध्ये ही किंमत 1.91 पाऊंडसह सर्वोच्च पातळीवर होती.

सरकार आणि कंपन्या अनेकदा अमेरिकी डॉलरमध्ये कर्ज घेतात. कारण त्याचं मूल्य त्यांच्या स्वतःच्या चलनाच्या तुलनेत स्थिर असतं.

डॉलरचं मूल्य वाढल्यास स्थानिक चलनात कर्जाची परतफेड करणं कठीण होऊन जातं.

डॉलर मजबूत झाल्याचा अर्जेंटिना सरकारवर वाईट परिणाम झाला आहे. सरकारनं सामानाच्या आयातीवर तात्पुरती बंदी घातली आहे. आपला सुरक्षित चलन साठा वाचवण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचललं आहे.

इतर देश काय पावलं उचलत आहेत?

जगातील अनेक देश व्याजदर वाढवून त्यांच्या चलनाचं मूल्य वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. ब्रिटननं आतापर्यंत 2 टक्क्यांनी दर वाढवला आहे.

ब्रिटनची मध्यवर्ती बँक 'बँक ऑफ इंग्लंड'नुसार, व्याजदर आणखी वाढू शकतात. तर व्याजदर 6 टक्क्यांपर्यंत जाऊ शकतात, असंही काही तज्ञांचं मत आहे.

युरोपियन सेंट्रल बँकेनं व्याजदरात 1.25 % वाढ केली आहे. व्याजदर वाढल्यानं वाढत्या किमती कमी होण्यास मदत होते. पण त्याचबरोबर सर्वसामान्यांना आणि व्यावसायिकांना कर्ज घेणं महागात पडतं.

यामुळे महागाई कमी होण्यास मदत होते. पण, कंपन्यांचा नफा कमी होण्याची भीती असते आणि लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागतात. कुटुंबे त्यांच्या खर्चात कपात करू लागतात. यामुळे मंदीत जाण्याची म्हणजेच अर्थव्यवस्था संकुचित होण्याची भीती असते.

अलीकडच्या काही दिवसांत, पाऊंडची किंमत घसरण्यापूर्वी बँक ऑफ इंग्लंडनं ब्रिटन मंदीत जाण्याविषयी इशारा दिला होता.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)