क्रुड ऑईल खरेदीसाठी अमेरिकन पेट्रोडॉलर की चिनी युआन? भारतापुढे पर्याय काय?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अनीस अलकुदैही
- Role, बीबीसी अरबी
काही दिवसांपूर्वी अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये एक बातमी आली होती की, सौदी अरेबिया चीनकडून तेलाच्या विक्रीच्या बदल्यात युआनमध्ये पैसे घेण्याचा विचार करत आहे.
या बातमीसोबतच ही पेट्रोडॉलर युगाच्या समाप्तीची सुरुवात तर नाही ना? अशा अफवांनाही वेग आला.
'पेट्रोडॉलर' ही संज्ञा सत्तरच्या दशकात प्रचलित झाली आणि त्यामुळे जागतिक व्यापारातील आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी पसंतीचे चलन म्हणून डॉलरचं स्थान बळकट होत गेलं.
ऊर्जा क्षेत्रातील प्रकाशन एनर्जी इंटेलिजेंसचे वरिष्ठ संपादक रफिक लट्टा म्हणतात की, चिनी चलन युआनबद्दलची बातमी सौदी स्रोतांच्या हवाल्यानं आली होती.
सौदी अरेबियानं अद्याप याबाबत अधिकृतपणे काहीही सांगितलेलं नाही. मात्र ही माहिती समोर येताच आणखी काही दिवस हा वाद रंगणार हे निश्चित होतं.
ऊर्जा तज्ज्ञ डॉ. अनस अलहाजी म्हणतात की, या वर्षी जागतिक तेल व्यवसाय 2.6 ट्रिलियन पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. त्यामुळे ही मोठी रक्कम असेल.
याचा अर्थ असा होईल की, ज्या चलनात तेलाची खरेदी आणि विक्री केली जाईल त्या चलनात तरलता चांगली असायला पाहीजे.
ते म्हणतात की, डॉलर हेच ते चलन आहे ज्याद्वारे हे काम उत्तम प्रकारे पार पाडता येतं. याची इतरही अनेक कारणं आहेत.

फोटो स्रोत, NURPHOTO
डॉलरमध्ये सर्वाधिक तरलता असून त्याचा विनिमय दर इतर चलनांपेक्षा अधिक स्थिर आहे आणि ते संपूर्ण जगात व्यवहारासाठी सर्वांत जास्त स्वीकारलेलं चलन आहे.
पेट्रोडॉलरची सुरुवात
जागतिक तेलाच्या संकटानंतर, 1974 मध्ये सौदी अरेबियाच्या सरकारनं तत्कालीन अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्याशी एक करार केला, ज्या अंतर्गत सौदी अरेबियाची तेल निर्यात डॉलरमध्ये होईल असं ठरलं. या कराराअंतर्गत सौदी अरेबियाने आपला पैसा यूएस ट्रेझरी बाँडमध्ये गुंतवला.
सौदी अरेबिया आणि अमेरिका यांच्यातील या कराराचे दूरगामी परिणाम झाले. अनेक देशांनी सौदी अरेबियाच्या पावलावर पाऊल ठेवलं आणि जगभर तेलाच्या किमती या डॉलरमध्ये ठरल्या गेल्या.
यामुळेच जगभरातील देशांनी तेल खरेदी करण्यासाठी परकीय चलनाचा साठा डॉलरमध्ये ठेवण्यास सुरुवात केली जेणेकरून ते तेल आणि ट्रेझरी बाँड खरेदी करू शकतील, पाश्चात्य देशांमध्ये गुंतवणूक करू शकतील आणि इतर परदेशी वस्तू आणि सेवा आयात करू शकतील.
रफिक लट्टा म्हणतात, "आज आपल्याला वाटत असलेली जागतिक अर्थव्यवस्था इथपर्यंत आणण्यात डॉलरच्या साहाय्याने झालेल्या व्यापारानं मोठी भूमिका बजावली आहे."
"जगभरातील ज्या देशांनी परकीय चलनाचा साठा ठेवला आहे, त्यांच्यात तुम्हाला असं आढळेल की, 60 टक्क्यांहून अधिक रक्कम डॉलरमध्ये आहे."

फोटो स्रोत, Getty Images
ते म्हणतात, "पेट्रोडॉलर अर्थव्यवस्थेचा अमेरिकन सत्तेच्या निर्मितीमध्येही मोठा वाटा आहे. आणि या परिस्थितीत कोणताही बदल हा केवळ आर्थिक पैलूपुरता मर्यादित नसतो. त्याचा थेट परिणाम जागतिक राजकारण आणि आंतरराष्ट्रीय संबंध आणि समीकरणांवर होतो."
संरचनात्मक बदल
2020 च्या आकडेवारीनुसार, चीन सध्या दररोज 1 कोटी 10 लाख बॅरल कच्च्या तेलाची आयात करतो.
यापैकी 17 लाख बॅरलहून अधिक तेल सौदी अरेबियातून आयात केलं जातं. चीनच्या तेल आयातीपैकी हे प्रमाण सुमारे 17 टक्के आहे. सौदी अरेबियाच्या एकूण तेल निर्यातीच्या हे प्रमाण 26 टक्के आहे.
चीन रशियाकडूनही दररोज 15 लाख बॅरल तेल आयात करतो. याआधारेच सध्या जगभरात चीन हा ऊर्जेचा प्रमुख ग्राहक बनला आहे.
या वास्तवामुळे जागतिक तेल बाजाराची रचनाच बदलली आहे. आता चीन तेलाच्या बाजारपेठेत मोठा ग्राहक म्हणून उदयास आलेला आहे.
भारत, जपान आणि दक्षिण कोरियासारखे आशियाई देशही कच्च्या तेलाचे मोठे ग्राहक म्हणून उदयास आले आहेत.
यूएस एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या 2020 च्या आकडेवारीनुसार, सौदी अरेबियाची 77 टक्के तेल निर्यात आशियाई बाजारपेठांमध्ये जाते.
या तेलाचा फक्त 10 टक्के हिस्साच युरोपात जातो. अमेरिकेत दररोज केवळ 5 लाख बॅरल तेल निर्यात होतं. सध्या अमेरिका जास्तीत जास्त स्थानिक पातळीवर काढलेल्या तेलावर अवलंबून आहे.
हे वास्तव लक्षात घेऊन सौदी अरेबिया, रशिया आणि इतर तेल निर्यातदार देश आता चीन आणि इतर आशियाई देशांशी राजनैतिक संबंध निर्माण करू पाहत आहेत.
याद्वारे, त्यांना त्यांचं तेल या महत्त्वाच्या बाजारपेठांपर्यंत पोहोचत राहण्याची खात्री ठेवायची आहे.
तेल निर्यात करणाऱ्या देशांना यासाठी चीन, भारत, दक्षिण कोरिया आणि जपानमध्ये रिफायनरीज बांधायच्या आहेत.
याद्वारे तेल खरेदी करणाऱ्या देशांना दीर्घकालीन खरेदी करार मिळतात.
सौदी कंपनी आरामकोने अलीकडेच चीनसोबत पेट्रोल केमिकल कॉम्प्लेक्स आणि रिफायनरी बांधण्यासाठी भागीदारी करार केला आहे.
याद्वारे ऊर्जा क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये राजनैतिक संबंध निर्माण होऊ शकतात.
युआन मध्ये व्यवहार का?
डॉ. अलहाजी म्हणतात की, डॉलरऐवजी इतर चलन वापरण्याबाबतचा वाद 50 वर्षांहून अधिक जुना आहे.
गेल्या काही वर्षांत युआन या चिनी चलनात खरेदीची चर्चाही जोर धरू लागली आहे.
रफिक लट्टा म्हणतात, "वास्तविक, ही गोष्ट आता समोर आली आहे आणि त्यामुळे सौदी अरेबिया आणि अमेरिका यांच्यातील तणाव दर्शवते.
जागतिक तेल बाजार गेल्या काही काळापासून या संरचनात्मक बदलाचा साक्षीदार आहे. रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे बदललेल्या भू-राजकीय वातावरणाकडंही ते पाहत आहेत.
आणि शेवटी, ते चीनसोबतच्या महत्त्वाच्या संबंधांवरही लक्ष ठेवून आहेत.
सौदी अरेबियाकडून खरेदी केलेल्या तेलाचे पैसे युआनमध्ये दिल्यास सौदी अरेबिया आणि चीन या दोन्ही देशांसाठी ही व्यवस्था विमा पॉलिसीसारखी होईल, असं अनेक तज्ज्ञांचे मत आहे.
यासह, भविष्यात कोणत्याही निर्बंधांमुळे डॉलरमध्ये तेल व्यवहारांवर बंदी आली तर युआन हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









