नूर इनायत खान : हिटलरच्या नाझी सैनिकांची हेरगिरी करणारी भारतीय वंशाची गुप्तहेर

ती रात्र होती 16 - 17 जून 1943 ची. ब्रिटनच्या टॅंगमेयर परिसरात चोहोबाजूंनी भयाण अंधार दाटला होता. त्या अंधारातच दोन विमान फ्रान्सच्या दिशेने झेपावली.

विमानाच्या पायलटने त्याच्या गुडघ्यावर एक चुरगळलेला नकाशा ठेवला होता. पण नकाशा बघावा म्हणूनही त्यानं टॉर्चचा उजेड पाडला नाही.

त्या विमानात ना बॉम्ब होता, ना ते विमान शत्रूवर हल्ला करण्यासाठी निघालं होतं.

त्या विमानाचा केवळ एकच उद्देश होता. तो म्हणजे जर्मन नियंत्रणाखालील प्रदेशात वायरलेस ट्रान्समीटर आणि सोबत नेलेला गुप्तहेर पोहोचवणं. हा गुप्तहेर दुसरा तिसरा कोणी नसून मॉस्कोमध्ये जन्माला आलेल्या भारतीय वंशाच्या नूर इनायत खान या होत्या.

या विमानाचा ताशी स्पीड 212 एमपीएच इतका होता. ब्रिटनच्या टॅंगमेयर परिसरातून निघालेलं हे विमान अवघ्या दीड तासात फ्रान्सच्या चराऊ कुरणांमध्ये पोहोचलं.

1150 मैलांपर्यंत प्रवास करता येईल या उद्देशाने विमानातून अतिरिक्त इंधनाच्या टाक्या सुद्धा नेण्यात आल्या होत्या.

नूर सगळ्यांच लक्ष वेधून घ्यायची..

रात्रीच्या अंधारात हे विमान शत्रू पक्षाला दिसू नये म्हणून त्याचा वरचा भाग आणि पंख रंगवले होते. त्यामुळे अंधारात हे विमान पाहणं अगदी अशक्यप्राय गोष्ट होती. ब्रिटनच्या सर्वोत्तम पायलटच्या हातातचं हे विमान दिलं जायचं.

आर्थर जे मॅगिडा यांनी 'कोड नेम मॅडलिन-अ सुफी स्पाय इन नाझी ऑक्युपायड पॅरिस' नावाचं नूरचं चरित्र लिहिलंय.

त्यात त्यांनी लिहिलंय, "त्या रात्री वायरलेस ट्रान्समीटर आणि नूर या दोन गोष्टी फ्रान्सला पोहोचवण्याची जबाबदारी फ्रँक रिमिल्स या पायलटवर होती. फ्रँकची नजर जेव्हा गहूवर्णीय नूरवर पडली तत्क्षणी त्याच्या मनात विचार आला की, कोणाच्याही नजरेच्या टप्प्यात सहज येईल अशा या युवतीला फ्रान्सला का पाठवलं जात असेल?"

मॅगिडा पुढे लिहितात, "त्याकाळी गुप्तहेर सहसा सामान्य दिसणारे असत जेणेकरून ते आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये सहज मिसळतील. सर्वश्रेष्ठ गुप्तहेर हे अतिसामान्य दिसायचे. पण नूर मात्र याउलट होती. कोणी तिच्याकडे पाहून दुर्लक्ष केलंय अशी ती नव्हतीच. तिच्यासोबत प्रशिक्षण घेणाऱ्या एका गुप्तहेराने सांगितलं होतं की, नूरला पाहिलेला कोणताही व्यक्ती तिला विसरेल असं कधी घडायचंच नाही."

सुफी उपदेशक वडील आणि अमेरिकन आई

नूरचा जन्म 1 जानेवारी 1914 रोजी सोव्हिएत युनियनची राजधानी मॉस्को इथं झाला होता. तिचे वडील जन्माने भारतीय तर आई अमेरिकन होती. तिच्या वडिलांचं नाव हजरत इनायत खान असं होतं आणि ते सुफी उपदेशक होते. तिच्या आईचं नाव ओरा रे बेकर असं होतं मात्र तिने ते नाव बदलून अमिना शारदा बेगम केलं होतं.

शारदा हे नाव भारतीय संत रामकृष्ण परमहंस यांच्या पत्नी शारदा यांच्या नावावरून ठेवण्यात आलं होतं. नूर, म्हैसूरचा राजा टिपू सुलतान याच्या वंशजांपैकी एक होती. त्याकाळी लहान पावलं असलेल्या तरुणींना सुंदर मानलं जायचं म्हणून नूरची आई तिचे पाय बांधून ठेवायची.

'स्पाय प्रिन्सेस द लाइफ ऑफ नूर इनायत खान' या पुस्तकाच्या लेखिका श्राबणी बसू सांगतात की, "नूर ही सडपातळ बांधा असलेली नाजूक तरुणी होती. तिची उंची 5 फूट 3 इंच इतकीच होती. तिला संगीत आणि वीणा वादनाची आवड होती. घरी सगळे तिला 'बाबुली' नावानेच हाक मारायचे. तिला एक मोठा भाऊ होता ज्याचं नाव विलायत खान असं होतं. नूर त्याला भाईजान अशी हाक मारायची. नूरची आई भलेही अमेरिकन होती मात्र नूरची जडणघडण ही भारतीय वातावरणातचं झाली होती."

नूरचे वडील इनायत खान आपल्या भावांसोबत हिंदीत बोलायचे. त्यामुळे त्यांच्या दोन्ही मुलांना हिंदी आणि उर्दूची समज होती.

नूर 12 वर्षांची असताना भारतात आली. आपल्या आईवडिलांसोबत भारतात आल्यावर तिने बनारस, जयपूरसह दिल्लीला भेट दिली. तिथे तिने सुफी संत हजरत निजामुद्दीन औलिया यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. वयात आल्यावर म्हणजेच विशीत असताना तिने युरोपियन पद्धतीचा पोशाख घालायला सुरुवात केली.

वायरलेस ऑपरेटरचं ट्रेनिंग...

नूरला गुप्तहेर व्हावंसं वाटण्याचं कारण होतं तिचा भाऊ. नूरच्या भावाने रॉयल एअरफोर्स जॉईन केली होती. साहजिकच नूरचा सरकारी सेवेकडे ओढा जास्तच वाढला. 1939 च्या जूनमध्ये 'विमेन ऑक्जिलरी एअरफोर्स' दलाची स्थापना करण्यात आली होती.

हे दल स्थापन होण्यामागे कारण असं होतं की, महिलांना इथं नोकऱ्या मिळतील जेणेकरून त्यांच्या कुटुंबातील पुरुष कोणतीही चिंता न करता युद्धभूमीवर जातील. त्या काळात हजारो महिलांना या दलात टेलिफोन आणि टेलिप्रिंटर ऑपरेटर म्हणून नोकऱ्या देण्यात आल्या होत्या.

नूरला 19 नोव्हेंबर 1940 मध्ये द्वितीय श्रेणीची एअरक्राफ्ट वुमन म्हणून नोकरी मिळाली. तिला ही नोकरी मिळाली कारण ती अस्खलितपणे फ्रेंच बोलायची. पुढे वायरलेस ऑपरेटरचं प्रशिक्षण घेण्यासाठी 40 महिलांसोबत तिला हॅरोगेटला पाठवण्यात आलं. नंतर तिने एडिनबर्गमध्ये वायरलेस टेलिग्राफिस्टचंही प्रशिक्षण घेतलं.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचं समर्थन..

दरम्यानच्या काळात भारतात स्वातंत्र्यलढ्याची चळवळ जोरावर होती. नूरवरही या चळवळीचा प्रभाव पडला होता. किंबहुना तिच्यावर जवाहरलाल नेहरूंचा खूप प्रभाव होता. तिने आपल्या भावाच्या वाढदिवसानिमित्त नेहरूंचं आत्मचरित्र त्याला भेट म्हणून दिलं होतं.

श्राबणी बसू लिहितात, "महायुद्ध सुरू होतं आणि ब्रिटिशर्स या युद्धात गुंतले होते. अशावेळी भारतीय नेत्यांनी स्वातंत्र्याचा आग्रह धरू नये. भारतीय लोकांनी या युध्दात ब्रिटनला साथ दिली तर त्यांचा आत्मविश्वास वाढेल असं नूरचं मत होतं. नूरच्या भावाला वाटतं की, दुसऱ्या महायुद्धानंतही नूर जिवंत असती तर तिने भारतीय स्वातंत्र्य लढ्यात स्वतःला झोकून दिलं असतं."

हेरगिरीच्या पेशात येण्याआधी एका अधिकाऱ्याने नूरची मुलाखत घेतली होती. त्याने नूरला विचारलं होतं की, भारताच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटीश सरकारविरुद्ध लढणाऱ्या भारतीय नेत्यांना तुम्ही पाठिंबा द्याल का? यावर नूरने होकारार्थी उत्तर दिलं होतं. यावर तिला विचारलं की, तिचं हे पाऊल ब्रिटिश राजवटीच्या शपथेच्या विरोधात नाही का?

त्यावेळी नूर उत्तरली की, "जोपर्यंत जर्मनीशी युद्ध सुरू आहे तोपर्यंत ती ब्रिटीश सरकार प्रति असलेली आपली निष्ठा कायम ठेवेन. पण युद्धानंतर ती ब्रिटनविरुद्धच्या स्वातंत्र्य लढ्यात आपल्या देशाला पाठिंबा देईल."

आणि वेरा अॅटकिन्सने नूरला चांदीचा ब्रोच दिला...

आपल्या कामगिरीवर निघण्यापूर्वी एसओईच्या वरिष्ठ अधिकारी वेरा ऍटकिन्स यांनी नूरला एक फ्रेंच ओळखपत्र, रेशनकार्ड, आणि एक पिस्तूल दिली. चार इंच लांबीला असलेली ही वेबली एम 1907 पिस्तुल बाहेरून एखाद्या वॉटर गनसारखी दिसायची.

आर्थर मॅगिडा आपल्या पुस्तकात लिहितात, "अ‍ॅटकिन्सने नूरचे खिसे तपासले. त्यात लंडनचे छाप असलेले लेबल्स, कागदपत्रे, सिगारेट, अंडरग्राऊंड तिकीट्स अशा हरएक गोष्टी तिने काढून घेतल्या. नूरचा फ्रेंच हेअरकट करण्यासाठी इंग्लंडमध्ये राहणाऱ्या फ्रेंच हेअर कटर्सना बोलावण्यात आलं.

नूरसाठी फ्रेंच स्टाइलचे कपडे शिवण्यात आले. आता अॅटकिन्सला निरोप देण्याची वेळ आली होती. त्याच दरम्यान नूरचं लक्ष तिच्या ड्रेसवर असलेल्या सिल्व्हर बर्ड ब्रोचकडे गेलं. नूरला तो ब्रोच आवडला. क्षणाचाही विलंब न करता अॅटकिन्सने तो ब्रोच नूरच्या हातात दिला. नूर पाच फूट होती, विमानात चढण्यासाठी तेवढी उंची पुरेशी नव्हती. त्यामुळे एका एअरमनने नूरला उचलून विमानात बसवलं.

नूरने ब्रिटनला गुप्त माहिती पाठवायला सुरुवात केली...

फ्रान्समध्ये उतरताच पुढच्या प्रवासासाठी नूरला सायकल देण्यात आली. तिने सायकवरून सात मैलावर असलेलं इतीश गाव गाठलं. त्या गावापासून पॅरिस 200 मैलांवर होतं. त्यासाठी तिने ट्रेन पकडली.

फ्रान्समध्ये राहण्यासाठी नूरने 'जीन मेरी रेनिया' हे नवं नाव धारण केलं. जसं नकळतपणे नूर हे नाव तिच्या लेखणीतून बाहेर पडायचं तसंच अगदी नकळतपणे जीन मेरी रेनिया हे नाव लिहिता यावं, यासाठी नूरने अक्षरशः या नावाची घोकंपट्टी केली होती. ब्रिटनमध्ये गुप्तहेर म्हणून काम करताना तिला मॅडलिन नावाने ओळखलं जायचं.

नूर फ्रान्समध्ये आल्याच्या अगदी काही दिवसांतच नाझींनी प्रॉस्पर नेटवर्कच्या सर्व एजंटना अटक केली. पुढच्या काही महिन्यात नूर सोडून एकही ब्रिटिश एजंट वर्किंग नव्हता. ती आपला जीव धोक्यात घालून जर्मन सैन्याच्या गुप्त बातम्या लंडनला पोहचवू लागली. फ्रेंच रेसिडेंट मूव्हमेंटच्या संपूर्ण बातम्याही ती ब्रिटनला देत होती. तिने ब्रिटिश गुप्तहेरांचे दूत म्हणूनही काहीकाळ काम केलं.

नूरची सुटकेस आणि ट्रान्समीटर पॅराशूटच्या साहाय्याने पोहोचली...

आर्थर मॅगिडा लिहितात, "इंटेलिजन्स सेलसाठी काम करत असताना, नूर दर रविवारी सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी लंडनला मॅसेज पाठवायची. बुधवारी मात्र 2 वाजून 10 मिनिटांनी मॅसेज पाठवला जायचा. त्या बदल्यात रोज सकाळी 6 वाजता आणि दुपारी 1 वाजता लंडनहून मॅसेज यायचा. ती तिच्या फ्लॅटचा दरवाजाही सहसा उघडायची नाही. त्यासाठी एक कोडवर्ड ठरलेला होता. दारावर आलेला व्यक्ती कोडवर्डमध्ये विचारायचा की, 'मी ओराची मुलगी असलेल्या जीन मेरीला भेटू शकतो का?'

त्यावर नूर विचारायची की, "म्हणजे बेब्स का" आणि ती दरवाजा उघडायची.

नूर फ्रान्समध्ये आली होती तेव्हा तिला तिच्यासोबत ट्रान्समीटर आणता आला नव्हता. तिला तिचा ट्रान्समीटर मिळावा यासाठी बीबीसीने 21 जून रोजी आपल्या बातम्यांमध्ये 'कमिशनर बिकम्स स्टॉकब्रोकर' हा कोडवर्ड उच्चारला होता.

या कोडवर्डचा अर्थ होता की, दोन रेडिओ सेट आणि नूरची सुटकेस पॅराशूटने शेतात टाकली जाईल. ज्याठिकाणी पॅराशूट येणार होता त्याठिकाणी नूर पोहोचली. रेडिओ सेट तर तिला मिळाला, मात्र तिची सुटकेस एका झाडावर कोसळली. त्या सुटकेसमध्ये असलेले तिचे कपडे झाडांच्या फांद्यांमध्ये अडकले. नूर बरोबर तिचे दोन मदतनीस आले होते. त्यांनी कसंबसं त्या फांद्यामधून नूरची सुटकेस आणि कपडे काढून तिथून प्रयाण केलं.

सहकाऱ्यांनी विश्वासघात केला आणि नूर जर्मनीच्या हाती लागली...

तिच्या सोबत असलेल्या एका सहकाऱ्याने तिची टीप जर्मन एजंटना दिली. नूरचा विश्वासघात झाला होता. नूरने बाहेरून आल्यावर जेव्हा आपल्या फ्लॅटचा दरवाजा उघडला तेव्हा आधीच तिथे जर्मन एजंट येऊन बसला होता. त्या जर्मन एजंटच नाव होतं पियर कार्तू.

श्राबणी बसू सांगतात, "कार्तूने नूरचे मनगट पकडताच, तिने त्याला कडकडून चावा घेतला. तिच्या चाव्याने कार्तूच्या हातातून रक्त यायला लागलं. कार्तूने तिला सोफ्यावर ढकललं आणि तिच्या हातात बेड्या घालण्याचा प्रयत्न केला. पण नूर कार्तूला जुमानत नव्हती."

शेवटी, त्याने त्याचं पिस्तूल बाहेर काढलं आणि नूरला धमकावलं की, आता तिने थोडी जरी हालचाल केली तर तो तिला गोळ्या घालेल. एका हातातलं पिस्तुल नूरवर रोखत त्याने दुसऱ्या हाताने फोन डायल केला. त्याने फोनलाईनवर सांगितलं की त्याला मदतीची गरज आहे.

तिथे हजर असलेल्या अर्न्स्ट वोग्टने त्या प्रसंगाचं इत्यंभूत वर्णन करताना सांगितलं की, "मी तिथं पोहोचल्यावर बघतो तर काय मॅडलिन सोफ्यावर वाघिणीसारखी बसली होती. तिला कार्तूने एका बाजूने कव्हर केलं होतं. नूरच्या डोळ्यात राग पेटला होता. ती कार्तूला 'सेल्स बाख' (डर्टी जर्मन) म्हणत होती. तिकडे कार्तूच्या मनगटाला खोल जखम झाली होती आणि त्यातून रक्तस्त्राव होत होता."

तिथून अटक करून नूरला गेस्टापोच्या ऑफिसात नेण्यात आलं. काहीही झालं तरी ती तोंडातून एक शब्दही काढणार नाही असं तिने जर्मन गुप्तचर अधिकाऱ्यांना आधीच सांगितलं होतं.

त्या ऑफिसातून तिला तुरुंगात हलविण्यात येणार होतं. तेव्हा नूरने जर्मन अधिकाऱ्यांसमोर एक विचित्र अट ठेवली. नूर म्हणाली की, तिला तुरुंगात जाण्याआधी अंघोळ करायची आहे. जर्मन गुप्तहेरांनाही नूरकडून माहिती हवीच होती. त्यांनी तिची अट मान्य केली. पण तिच्यावर लक्ष ठेवता यावं म्हणून त्यांनी तिच्या बाथरूमचा दरवाजा थोडा उघडा ठेवला.

श्राबणी बसू लिहितात, "दार उघडं ठेवल्याचं दिसताच नूर खेकसली आणि म्हणाली की, मला पूर्ण अंघोळ करायची आहे. माझे कपडे काढल्यावर गार्डने पाहू नये म्हणून मला पूर्ण दरवाजा लावायचा आहे. जर्मनांनीही नूरची ही विनंती मान्य केली आणि तिला दार लावू दिलं. लगोलग नूरने बाथरूमच्या खिडकीतून उडी मारली आणि तिच्या शेजारील खिडकीखाली आली. पावलांचा आवाज न करता चालायची आणि छतावर चढायची तिला सवय होतीच.

ती पळून जाणार एवढ्यात जर्मन अधिकारी वोग्टने तिला पाहिलं. तो जवळच्याच दुसऱ्या टॉयलेटमध्ये गेला होता आणि हा निव्वळ योगायोग होता. नूरला पाहून वोग्ट जागीच खिळला. नूर उभी असलेल्या खिडकीकडे सरकत तो तिला हळूच म्हणाला की, मॅडलीन मूर्खपणा करू नकोस. तू स्वतःचं स्वतःच्या विनाशला कारणीभूत ठरशील. तुझ्या आईचा विचार कर. वोग्टने तिचा खांदा पकडून तिला खाली खेचलं आणि तिला तिच्या सेलपर्यंत नेलं."

पळून जाण्याचा दुसरा प्रयत्नही अयशस्वी...

अशाप्रकारे आपण जर्मनीच्या कचाट्यात सापडलो म्हणून नूरला रडू कोसळलं. असं पकडलं जाण्यापेक्षा आपण जीव द्यायला हवा होता म्हणत ती तिच्या खोलीत जाऊन रडू लागली. काहीवेळाने एक गार्ड तिच्यासाठी जेवण घेऊन आला पण तिने जेवायलाही नकार दिला.

तिने ती रात्र उपाशीच घालवली. वोग्टने तिला त्याच्या खोलीत बोलावणं धाडलं. तिथे गेल्यावर वोग्टने तिला इंग्लिश चहा आणि सिगारेट देऊ केली. ती तो चहा प्यायली आणि सिगारेटचे झुरके घेऊन निघून गेली, पण तिने अन्नाचा कण पोटात घेतला नाही.

तुरुंगात असताना ती राखाडी रंगाचा जंपर आणि निळा स्लॅक्स घालायची. कारण याच कपड्यांमध्ये तिला अटक झाली होती. काही दिवस गेले आणि तिने तुरुंगातून पळून जाण्याचा आणखी एक अयशस्वी प्रयत्न केला.

ती कसंबसं तुरुंगाच्या छतावरही पोहोचली होती. पण तिचं दुर्दैव म्हणावं की, त्याचवेळी ब्रिटिश विमानांनी त्या भागात हवाई हल्ला सुरू केले होते. हल्ला झाल्यानंतर छतांवर सर्चलाइट टाकण्यात आले होते. त्याच दरम्यान नूरच्या खोलीची झडती घेण्यात आली होती, पण नूर तिच्या खोलीत नव्हती.

लगेचच जर्मन सैनिकांनी संपूर्ण परिसराला वेढा दिला. नूर पुन्हा एकदा जर्मन सैनिकांच्या हाती लागली होती. त्या सैनिकांनी तिला खूप मारहाण केली आणि तिला 84 नंबरच्या सेलमध्ये पुन्हा डांबण्यात आलं. शेवटी बर्लिनहून थेट निर्देश आले आणि नूरला सर्वात धोकादायक कैदी ठरवण्यात आलं.

नूरच्या हातपायांना साखळदंड बांधले होते...

नूरला जर्मनीच्या फोर्जिम तुरुंगात ठेवलं होतं. एवढंच नाही तर तिच्या हातापायांना साखळदंड बांधले होते. तिच्या हातात बेड्या घातल्या होत्या. त्यामुळे ना धड तिला उठता येत होतं ना धड बसता येत होतं.

ते लोक नूरला जेवणात बटाट्याची साल आणि कोबीचं सूप द्यायचे. त्यांनी तिला जवळपास उपाशीच ठेवलं होतं. गेस्टापोने तिला क्षणभराचीही उसंत दिली नव्हती. तिने तिच्या साथीदारांची नाव सांगावीत म्हणून तिला सतत प्रश्न विचारले जायचे. पण नूरने तोंडातून एक शब्दही काढला नाही.

तिला एकांतवासात ठेवण्यात आलं. ना तिला स्वतः काही खाता येत होतं ना स्वतःची स्वच्छता करता येत होती. तिच्या या कामासाठी जर्मन गुप्तहेरांनी एक बाई नियुक्त केली होती. पण त्या बाईला नूरशी बोलण्याची परवानगी नव्हती.

तुरुंगातल्या त्या अंधाऱ्या कोठडीत राहणाऱ्या नूरला बाहेरच्या जगात काय सुरू आहे याची कल्पना नव्हती, ना तिला वेळेचा अंदाज होता. तिला सकाळी येणाऱ्या नाश्त्यावरून आणि जेवणाच्या वेळेवरून ती दिवसाचा अंदाज बांधायची.

तिच्या कोठडीचा दरवाजा कधीच उघडला जायचा नाही. सततच्या उपाशी राहण्याने नूर अशक्त झाली होती मात्र तिने हिंमत सोडली नाही. साखळदंडाने बांधून ठेवलं होतं तरी थोडं चालायची जेणेकरून तिचं मन, तिची बुद्धी सक्रिय राहील.

पॉईंट ब्लॅक रेंजने निशाणा साधला...

12 सप्टेंबरला नूरला डाकाऊ छळ छावणीत नेण्यात आलं. त्या छळ छावणीच्या प्रवेशद्वारावर एक पाटी लावली होती. त्या पाटीवर 'अरबाएत माच्ट फ़्रे' असं लिहिलं होतं. या छावणीत गेलेला व्यक्ती जिवंत परतायचा नाही.

या छळछावणीत 1933 ते 1945 या कालावधीत 30,000 लोकांचा मृत्यू झाला होता. त्या रात्री नूरवरही अत्याचार झाले.

श्राबणी बसू सांगतात, "जर्मन सैनिकांनी तिला कोठडीत जाऊन मारहाण केली. त्यांनी नूरचे कपडे उतरवले आणि रात्रभर पायतल्या बुटांनी तिला मारहाण केली. त्या सैनिकांचे पाशवी अत्याचार करून झाल्यावर त्यातल्या एकाने तिला गुडघ्यावर बसायला सांगितलं. आपली पॉइंट ब्लँक रेंज पिस्तुल काढून त्यातली एक गोळी नूरच्या मस्तकावर झाडली. मरताना नूरच्या तोंडातून फक्त एकच शब्द बाहेर आला. तो शब्द होता 'लिबर्ते' म्हणजेच 'स्वातंत्र्य'.

नूरचा मृत्यू झाला त्यावेळी ती अवघ्या 30 वर्षांची होती. त्यानंतर तिचं मृत शरीर ओढून भट्टीत टाकण्यात आलं. काही मिनिटातच स्मशानभूमीच्या चिमणीतून धूर निघताना प्रत्यक्षदर्शींनी पाहिलं होतं. नूरची आई आणि भाऊ त्या रात्री इंग्लंडमध्ये होते. त्यांच्या स्वप्नात नूर आली होती. नूर सैन्याच्या गणवेशात उभी होती. चारी बाजुंनी निळा प्रकाश पसरला होता आणि ती सांगत होती मी आता 'आझाद' आहे."

फ्रान्स आणि ब्रिटनने दिला सन्मान...

नूरने दाखवलेल्या धाडसाबद्दल 1949 मध्ये तिला ब्रिटनचा सर्वोच्च सन्मान असलेला जॉर्ज क्रॉस देण्यात आला. फ्रान्सनेही 'क्वा दे गे' हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन तिचा गौरव केला. फ्रेंच सरकारने पॅरिसमधील तिच्या 'फजल मंझिल' या घराबाहेर एक फलक लावलाय. दरवर्षी 'बॅस्टिल डे' दिवशी नूरच्या सन्मानार्थ फ्रेंच लष्करी बँडच्या वतीने गाणं वाजवलं जातं.

2006 मध्ये भारताचे तत्कालीन संरक्षण मंत्री प्रणव मुखर्जी यांनी नूरच्या पॅरिस येथील घरी जाऊन तिला श्रद्धांजली वाहिली होती.

लंडनमधील गॉर्डन स्क्वेअर गार्डन मध्ये नूरचा कांस्य पुतळा बसविण्यात आला आहे. 8 नोव्हेंबर 2012 रोजी ब्रिटनच्या राजकुमारी ऍनी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. 2014 साली नूर जन्मशताब्दी निमित्त ब्रिटनच्या रॉयल मेलने नूरच्या नावे एक टपाल तिकीट प्रसिद्ध केलं होतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)