You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाराष्ट्र दिन: संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आपल्या पहाडी आवाजाने गाजवणारे शाहीर अमर शेख
- Author, तुषार कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठी
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ज्या कलावंतांनी आपलं सर्वस्व पणाला लावून महाराष्ट्राचा मंगल कलश मराठी जनतेच्या हाती ठेवला त्यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि शाहीर अमर शेख यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं.
आज शाहीर अमर शेख यांचा जन्मदिन आहे. आपल्या गायन आणि काव्याच्या माध्यमातून केवळ संयुक्त महाराष्ट्र चळवळच नव्हे तर त्याआधी स्वातंत्र्य चळवळ आणि नंतर गोवा मुक्तिसंग्रामात त्यांनी जनजागृतीचं कार्य केलं.
शाहीर अमर शेख म्हटल्याबरोबर सर्वांत आधी डोळ्यासमोर येतो तो त्यांनी लिहिलेला 'समाजवादी शिवछत्रपती' किंवा 'अमर अभिलाषा' हा पोवाडा.
समाजवाद, साम्यवादाच्या व्याख्या तयार होण्याआधी शिवाजी महाराजांनी आपलं राज्य समतेच्या आधारावर बनवलं आणि त्यांनी एका आदर्श समाजवादाची पायाभरणी केली, अशी मांडणी अमर शेख यांनी आपल्या पोवाड्यातून केली.
महाराष्ट्राचा प्रखर अभिमान असलेला हा कवी राष्ट्रभक्त होता. महात्मा फुले, महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर यांच्या स्वप्नातला भारत आपल्याला साकारायचा असेल तर आपल्याला एकता आणि समतेवर आधारित समाज उभा करावा लागेल याची जाणीव त्यांच्या काव्यातून ठायीठायी जाणवते.
कामगार चळवळीचं नेतृत्व
20 ऑक्टोबर 1916 रोजी अमर शेख यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या ठिकाणी झाला. त्यांचे वडील हुसेन शेख रेल्वेत तिकीट चेकर होते तर आई या गृहिणी आणि कवियित्री होत्या.
अमर शेख यांचं मूळ नाव मेहबूब शेख पटेल. त्यांच्या आई मुनेरबी यांना 'दुसऱ्या बहिणीबाई' असं म्हटलं जायचं. शेख मुनेरबी यांचं औपचारिक शिक्षण झालेलं नव्हतं पण विद्वानांही लाजवेल असं काव्य त्यांनी निर्माण केलं होतं. अमर शेखांनी काव्याचा वसा त्यांच्याकडूनच घेतला.
हुसेन शेख आणि मुनेरबी यांचा घटस्फोट झाल्यानंतर मुलांची जबाबदारी मुनेरबी यांनीच घेतली. मुनेरबी यांनी अत्यंत कष्टात आपल्या मुलांना वाढवलं. आईच्या कष्टाची जाणीव पोरवयातील अमर शेख यांना होती.
त्यामुळे ते अगदी लहान वयापासूनच हाती पडेल ते काम करू लागले. कधी ट्रकवर क्लीनर, तर कधी पाणक्याचं काम त्यांनी केलं. दहा बारा वर्षांचे असतानाच ते बार्शीतील राजन मिलमध्ये कामगार म्हणून लागले. परिस्थितीमुळे त्यांना सातवीपर्यंतच शिक्षण घेता आलं.
तिथे काम करत असतानाच त्यांनी कामगारांचं दुःख, दैन्य जवळून पाहिलं. आपणही त्यांच्यापैकीच एक आहोत असं नाही तर, ते आणि आपण एकच आहोत अशी भावना मनात ठेऊनच ते त्यांचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न आपल्या परीने करू लागले.
कामगारांच्या मेळाव्यात गाणी म्हणत असताना कामगार नेत्यांनी त्यांच्या गुणांची पारख केली. इतक्या लहान वयात त्यांना पहाडी आवाजाची देणगी लाभली आहे हे त्यांच्या नजरेतून सुटलं नाही. मग ज्या ठिकाणी कामगार, कष्टकरी लोकांचा मोर्चा सभा असेल त्या ठिकाणी अमर शेख गाऊ लागले.
सुरुवातीचं गाण्याचं प्रशिक्षण त्यांनी बार्शीतील नारायण भट यांच्याकडे घेतलं. पण कामाच्या जबाबदारीमुळे त्यांना ते सुरू ठेवता आला नाही. जेव्हा शक्य असेल तेव्हा ते स्वतःच रियाज करू लागले आणि आपल्या आईच्या कविता ऐकता ऐकता स्वतःही कविता रचू लागले. कोल्हापूरचे शाहीर हैदर लहरी त्यांचे आदर्श होते.
शाहीर हैदर लहिरींनी रशियन क्रांतीवर पोवाडा लिहिला होता. त्यामुळे ते त्यांच्याकडे आकर्षित झाले आणि त्यांच्याप्रमाणेच आपणही लिहावं आणि गायन करावं असं त्यांच्या मनात आलं.
गिरणी चळवळीतील नेते कमलाकर पिंपरकर आणि कहाडकर यांच्या सोबतीने ते विविध ठिकाणी कार्यक्रम करून इंग्रज आणि सरंजाम प्रवृत्तीच्या भांडवलदारांविरोधात जनजागृती करू लागले. 1939 साली युद्धविरोधी घोषणा दिल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली. 1939 ते 1941 या काळात त्यांना साधारणतः 18 महिन्यांचा तुरुंगवास झाला.
अभिनेता म्हणून ओळख
तुरुंगातून सुटल्यावर इंग्रजांची नजर त्यांच्यावर होती. त्यामुळे त्यांना पुन्हा कामगार चळवळीत आणि स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणं लगेच शक्य नव्हतं. त्या दरम्यान त्यांनी चित्रपटसृष्टीत काम केलं. प्रसिद्ध दिग्दर्शक मा. विनायक यांच्याकडे त्यांनी सहायक चित्रपट दिग्दर्शक म्हणून काम केलं.
पुढे त्यांनी आचार्य अत्रेंच्या 'महात्मा फुले' या चित्रपटात काम केलं. तसंच 'प्रपंच' नावाच्या चित्रपटातही ते प्रमुख भूमिकेत झळकले. त्यांच्या अभिनयाची दखल प्रादेशिक तसंच राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली होती.
1944 मध्ये त्यांनी पुन्हा चळवळीवर लक्ष केंद्रित केलं. 7 जानेवारी 1944 साली टिटवाळ्यात किसान सभा झाली होती. त्यामध्ये त्यांनी आपले पोवाडे सादर केले. हा कार्यक्रम त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला कारण या कार्यक्रमानंतरच अण्णाभाऊ साठे आणि द. ना. गव्हाणकर यांच्या बरोबर येऊन त्यांनी 'लाल बावटा कला पथका'ची स्थापना केली. यानंतर महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात एक नवं पर्व सुरू झालं.
'माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होते या काहिली...' या अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेल्या गीताला द. ना. गव्हाणकर यांनी चाल दिली होती. आपल्या कार्यक्रमात अमर शेख हे गीत सादर करत असत. अमर शेख अण्णाभाऊंचं मैना सादर करणार आहेत हे कळल्यावर लोक पंचक्रोशीतून जमत आणि मग क्रांतीचा हा जलसा रात्रभर चालत असे.
'समाजवादी शिवछत्रपती'
अमर शेख हे केवळ प्रतिभावान गायकच नव्हते तर ते एक विचारशील कवी देखील होते. इतिहास आणि राजकारणाचा त्यांचा अभ्यास तगडा होता. त्याचबरोबर त्या इतिहासाची कालसुसंगत मांडणी करून आपल्या काव्यातून त्याची अभिव्यक्ती कशी करायची याचं कसब त्यांच्याकडे होतं.
छत्रपती शिवाजी महाराज कसे राजे होते याचं वर्णन त्यांनी असं केलं आहे,
शिवबा सरजा राजा होतो, भुमिहीना प्रेम कवळितो, त्यांना
जमिन मिळवुनी देतो, मिळवून बियाणं देतो, भू लागवडीला आणितो
शिवाजी महाराज हे केवळ राजे नव्हते तर भूमिहीनांवर प्रेम असलेले त्यांना त्यांचा हक्क देणारे इतकंच नव्हे तर बी-बियाणं मिळवून देऊन शेतकऱ्यांची जमीन फुलवून देणारे प्रजाहितदक्ष राजे होते. आणि महसुलाची शिस्त लावून त्यांनी भ्रष्टाचार थांबवला होता, असं देखील अमर शेख म्हणतात.
डॉ. अजीफ नदाफ यांनी शाहीर अमर शेख यांच्या पोवाडे, लोकगीतं आणि कवितांचं संकलन केलं आहे. तसंच त्यांनी काही काळ अमर शेख यांच्यासोबत काम देखील केलं आहे.
शिवाजी महाराजांचं वर्णन समाजवादी शिवछत्रपती असं का केलं आहे असं विचारलं असता, डॉ. अजीज नदाफ यांनी बीबीसीला सांगितलं की, "शाहिरी परंपरेप्रमाणे शिवाजी महाराजांच्या पोवाड्यातून अमर शेखांनी त्यांचं चरित्र तर सांगितलंच आहे. पण त्याच बरोबर त्यांच्या कार्यपद्धतीचे बारकावे आणि तत्कालीन समाजजीवनावर त्यांचा काय प्रभाव होता हे देखील मांडलं आहे. संपूर्ण समाजासाठी समान न्याय देणारा हा राजा होता म्हणून त्यांचं वर्णन शाहिर अमर शेखांनी समाजवादी शिवछत्रपती असं केलं आहे."
'राष्ट्रीय शाहीर'
अमर शेख हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर अवघ्या भारत देशाचे शाहीर होते असं लोककलावंत आणि मुंबई विद्यापीठाच्या लोककला विभागाचे प्रमुख गणेश चंदनशिवे सांगतात.
"अमर शेखांची शाहिरी केवळ एका चळवळीपुरती मर्यादित नाही तर महाराष्ट्रातील तसेच देशातील कामगार, दलित, बहुजन, महिला, कष्टकरी यांची हाल-अपेष्टा आणि कष्टाच्या बेडीतून सुटका करवून देणारी आहे," असं मत चंदनशिवे यांनी मांडलं.
कम्युनिस्ट चळवळीतील कलावंत हे राष्ट्रीय प्रवाहापासून दूर असतात असा आरोप काही जण करतात. त्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर अमर शेखांचं काव्याचं आकलन तुम्ही कसं करता असं विचारलं असता चंदनशिवे सांगतात की "अमर शेखांच्या शाहिरीला आपण एका पक्षाच्या चौकटीत बंदिस्त करू शकत नाही. राजकीय संघटना म्हणून जरी ते कम्युनिस्ट पक्षाशी निगडित असले तरी त्यांच्या काव्यातून त्यांनी मांडलेले विचार हे सर्व जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातूनच आहेत.
"संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील काही नेते हे पक्षाशी निगडित होते तर काही नेते स्वतंत्ररीत्या लढत होते. अमर शेखांनी आपल्या काव्यातून मराठी माणसाची व्यथा मांडली आहे. ते जेव्हा मराठी माणसाचं दुःख मांडतात तेव्हा ते मुस्लीम नसतात किंवा चळवळीतील नेते नसतात. आणि जेव्हा ते भारत मातेचं वर्णन करतात तेव्हा ते एक महाराष्ट्रीयन नसतात. अमर शेख हे विद्रोही कवी होते, पण त्यांनी समतेच्या मार्गातूनच विद्रोह केला," असं चंदनशिवे सांगतात.
"जेव्हा चीनने भारतावर आक्रमण केलं होतं तेव्हा कम्युनिस्ट चीनविरोधात त्यांनी गीत रचलं होतं. बर्फ पेटला हिमालयाला विझवायला चला हे आपण लक्षात घ्यायला हवं," असं चंदनशिवे सांगतात.
प्रसिद्ध साहित्यिक ग. त्र्यं. माडखोलकरांनी त्यांचा उल्लेख 'राष्ट्रीय शाहीर' असाच केला आहे.
अमर शेख हे शाहीर, कामगार पुढारी, स्वातंत्र्य सैनिक, अभिनेता असं बहुआयामी व्यक्तिमत्त्व होतं. आचार्य अत्रे म्हणायचे, "अमर शेख म्हणजे धग, रग, आग, धुंदी आणि बेहोषी ह्यांची जिवंत बेरीज."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)