You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारताचा 'कोहिनूर' खरंच ब्रिटिशांनी लुटला का? या हिऱ्याविषयीचे 6 गैरसमज
जगातल्या सगळ्यात वजनदार आणि तरीही देखणे पैलू पाडलेल्या हिऱ्यांपैकी एक हिरा आहे कोहिनूर. त्याचं वजन आहे 105.6 कॅरेट्स किंवा 21 ग्रॅम.
भारतीयांच्या मनात आपल्या मालकीचा हिरा ब्रिटिशांनी लुटून नेला अशा भावना आहेत. तसंच या हिऱ्याचा इतिहास राजांमधली भांडणं आणि युद्धांचा आहे.
काकतिया राजघराण्याकडे पहिल्यांदा या हिऱ्याची मालकी होती. तिथून पुढे मुघल, इराणी, अफगाण राजांकडे फिरून हा हिरा शेवटी पंजाबच्या शीख राजांकडे आला. तिथून या हिऱ्याची खरी चर्चा सुरू झाली.
1813 मध्ये राजा रणजित सिंग यांनी अफगाण राजाकडून तो मिळवला होता. पण, 1849मध्ये इंग्रजांबरोबर झालेल्या युद्धात शिख राजांचा पराभव झाला पंजाब प्रांत ईस्ट इंडिया कंपनीत विलीन करण्यात झालं. त्यावेळी 29 मार्च 1849 ला झालेल्या करारात हा हिरा कंपनीला देण्यात आल्याची नोंद आहे.
तेव्हाचे ब्रिटिश गव्हर्नर जनरल डलहौसी यांनी मग कोहिनूर हिरा इंग्लंडच्या राणीला युद्धात केलेली लूट म्हणून नजर केला. आणि अशा पद्धतीने हा हिरा ब्रिटिश राजघराण्यात आला.
पण, राजघराण्यातल्या पुरुषांना कोहिनूर हिरा युद्धात लाभदायी वाटायचा नाही. त्यामुळे राजघराण्यातल्या महिलांनीच तो कायम वापरला.
महाराणी व्हिक्टोरिया यांनी कोहिनूर आपल्या ब्रूचमध्ये जडवून घेतला, तर राणी अलेक्झांड्रा आणि क्विन मेरी यांनी पहिल्यांदा कोहिनूरला आपल्या मुकुटात स्थान दिलं. महाराणी एलिझाबेथ प्रथम यांनीही हा हिरा वापरला. त्यानंतर लंडनमधल्या एका संग्रहालयात कोहिनूर हिरा ठेवण्यात आला आहे.
या हिऱ्याबद्दल अनेक समज-गैरसमजही आहेत.
कोहिनूरबद्दलची सहा मिथकं
विल्यम डॅलरिंपल आणि अनिता आनंद या लेखकांनी कोहिनूर हिऱ्यावर एक माहितीपर पुस्तक लिहिलं आहे. त्यात या सहा मिथकांबद्दल त्यांनी सविस्तर लिहिलं आहे.
मिथक 1 : कोहिनूर हा सगळ्यात मौल्यवान, अग्रगण्य भारतीय हिरा आहे
सत्य : कोहिनूर भारतातून युकेकडे हस्तांतरित झाला तेव्हा त्याचं वजन 193 मेट्रिक कॅरेट इतकं होतं. कोहिनूरच्या तोडीचे आणखी दोन हिरे भारताकडे होते. यातला एक आहे दरिया-इ-नूर, जो सध्या तेहरानमध्ये आहे. दुसरा हिरा म्हणजे द ग्रेट मुघल डायमंड. यालाच ओरलोव्ह हिरा म्हणूनही ओळखलं जातं.
हे दोन्ही हिरे इराणी राजा नादिरशाहने 1739मध्ये भारतातून लुटून नेले. तेव्हा कोहिनूरची फारशी चर्चाही नव्हती. पंजाबच्या राजांकडे आल्यावर ही चर्चा सुरू झाली.
मिथक 2 : कोहिनूर हिऱ्यात खोट नाही
सत्य : हा आणखी एक गैरसमज आहे. कोहिनूरला पैलू पाडण्यापूर्वीही या हिऱ्यात खोट होती. त्याच्या केंद्रस्थानी काही पिवळे डाग आहेत. यातल्या एका डागामुळे हा हिरा प्रकाशही परावर्तित करू शकत नाही आणि त्यामुळे त्याची चकाकी कमी होते.
शिवाय हा हिरा कधीही जगातला सगळ्यात मोठा हिरा नव्हता. आताही आकारात त्याची क्रमवारी जगात नव्वदावी आहे.
मिथक ३ : कोहिनूर हिऱ्याचं उत्पादन कोल्लूरच्या खाणीत झालं
सत्य : कोहिनूर हिरा नेमका कधी सापडला हे नक्की सांगणं अशक्य आहे. त्यामुळे या हिऱ्याबद्दल आख्यायिका मात्र पसरल्या. काही जण भगवान कृष्णाच्या काळात हिरा सापडल्याचंही सांगतात.
हिरा कधी, कुठे तयार झाला सांगता येत नाही. पण, इतकं स्पष्ट आहे की, हिरा खाणीत तयार झालेला नाही. तो एका नदीच्या पात्रात जमिनीखाली सापडला.
मिथक 4 : कोहिनूर मुघल बादशाहच्या खजिन्यातला सगळ्यात मौल्यवान हिरा होता
सत्य : हिंदू आणि शिख राजांचं हिऱ्यांवर प्रेम होतं, तर मुघल राजांना पाचू किंवा इतर रंगांतले खडे जास्त आवडायचे. त्यांचा खजिना आणि मुकुटातले खडे हे रंगीबेरंगी आणि कोहिनूरपेक्षा जास्त मौल्यवान होते.
मुघल राजा हुमायूनने कोहिनूर इराणी राजाला भेट म्हणून दिला होता. कोहिनूर हिऱ्याचं महत्त्वं तेव्हा मुघल राजांना नव्हतंच.
मिथक 5 : कोहिनूर हिऱ्याची चोरी झाली
सत्य : नादिरशाह यांच्या ताब्यात असलेला हिरा मिळवण्यासाठी मुघल राजा महम्मद शाह रंगिला यांनी तो आपल्या फेट्यात लपवला आणि पळवून आणला अशी एक आख्यायिका आहे.
पण, इतिहासकारांच्या मते ही आख्यायिकाच आहे, सत्य नाही. कारण, हिरा तेव्हा फेट्यात नाही तर मयूर सिंहासनामध्ये होता.
मिथक 6 : कोहिनूरला पैलू पाडताना त्याचा आकार कमी झाला
सत्य : हिरा चुकीच्या पद्धतीने कापला गेल्यामुळे त्याचा आकार कमी झाल्याची गोष्ट खरी आहे. पण, तो कोहिनूर हिरा नव्हता.
फ्रेंच हिरे व्यापारी जाँ ताव्हर्निए यांनी असा एक प्रसंग सांगितलाय खरा. औरंगजेब बादशाहकडे असलेला एक हिरा पैलू पाडणाऱ्या कारागिराने चुकीच्या पद्धतीने कापला होता. पण, तो हिरा कोहिनूर नाही तर ग्रेट मुघल डायमंड होता.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)