लिझ ट्रस: शाळेतील नाटकात पंतप्रधानांची भूमिका ते 45 दिवसांचं पंतप्रधानपद

फोटो स्रोत, EPA
ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना पंतप्रधानपदावर येऊन फक्त 45 दिवस झाले होते.
त्यांची नवी कर प्रणाली वादात सापडल्यानंतर त्यांना त्यांच्याच पक्षातून विरोध सहन करावा लागला होता.
त्यांनी सत्तेत येताच नवी कर प्रणाली आणत करांमध्ये मोठी कपात केली होती. ज्यानंतर त्यांना सर्वच स्तरातून मोठ्या टीकेला सामोरं जावं लागलं होतं.
लिझ ट्रस या आतापर्यंतच्या सर्वांत कमी काळ रहिलेल्या पंतप्रधान ठरवल्या आहेत. त्यांचा कार्यकाळ फक्त 45 दिवसांचा होता.
शाळेतील नाटकात पंतप्रधानांची भूमिका ते खऱ्याखुऱ्या पंतप्रधान
शाळेत असताना नाटकात पंतप्रधानांची भूमिका करणारी मुलगी भविष्यात पंतप्रधान होईल असं कोणी तेव्हा म्हटलं असतं तर ती व्यक्ती भविष्यवेत्ता म्हणून आता नावाजली असती.
कारण लिझ ट्रस यांनी शाळेत असताना मार्गारेट थॅचर यांची भूमिका केली होती त्याच लिझ ट्रस सप्टेंबर महिन्यात युकेच्या खऱ्याखुऱ्या पंतप्रधान बनल्या.
युकेच्या पंतप्रधानपदी लिझ ट्रस यांची निवड झाली. ट्रस या टोरीच्या लीडर बनल्या. कंझर्वेटिव्ह (हुजूर पक्ष) पार्टीचे युकेच्या संसदेत बहुमत आहे. बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते.
त्यानंतर हुजूर पक्षातील सभासदांनी आपला नेता निवडण्यासाठी मतदान केले आणि लिज ट्रस या युकेच्या पंतप्रधान बनल्या.
लिझ ट्रस यांचा प्रवास
लिझ ट्रसचा यांचा जन्म 1975 मध्ये ऑक्सफर्डमध्ये झाला. ट्रस यांचे वडील गणिताचे प्राध्यापक होते तर आई नर्स म्हणून सेवा बजावत होत्या.

लिझ वयाच्या चौथ्या वर्षी स्कॉटलंडमधील पेस्ली इथं राहायला गेल्या. यानंतर 1983 मध्ये त्यांनी शाळेत असताना एक नाटक केलं होतं. या नाटकात त्यांनी ब्रिटनच्या राजकारणी मार्गारेट थॅचर यांची भूमिका केली होती. यावरूनच त्यांना भविष्यात राजकारणी व्हायचं आहे हे दिसून आलं.
यानंतर त्यांचं कुटुंब लीड्स इथं स्थायिक झालं. तिथंच त्यांनी आपलं माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं.
बीबीसी रेडिओ 4 च्या प्रोफाइलशी बोलताना त्यांच्या धाकट्या भावाने सांगितलं की त्यांचं कुटुंब क्लॉडो आणि मोनोपॉलीसारखे बोर्ड गेम खेळायचे.
लिझला मात्र हरणं आवडायचं नाही. जेव्हा तिला आपण हरतोय असं वाटायचं तेव्हा ती गेम सोडून गायब व्हायची, असं त्यांच्या भावाने सांगितलं.

फोटो स्रोत, Reuters
ट्रस यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतलं. त्यासाठी त्यांनी तत्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्र हे विषय निवडले. यासोबतच त्या राजकारणातही सक्रिय होत्या.
सुरुवातीला त्यांनी लिबरल डेमोक्रॅट्ससोबत काम केलं आणि नंतर कंझर्व्हेटिव्ह पक्षासाठी सक्रियपणे काम केलं.
त्यांनी शेल अँड केबल अँड वायरलेससाठी अकाउंटंट म्हणून काम केलं होतं. पण त्यांना ओढ होती ती ब्रिटनच्या संसदेत जायची.
2001 आणि 2005 च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या उमेदवार म्हणून हेम्सवर्थ आणि कॅडर-व्हॅली मतदारसंघातून उभ्या होत्या. त्या निवडणुकांमध्ये त्यांना एकही जागा जिंकता आली नाही, मात्र तरीही 2006 मध्ये त्यांची ग्रीनीच कौन्सिलर म्हणून नियुक्ती करण्यात आली.
2008 मध्ये, त्यांनी राईट-ऑफ-सेंटर रिफॉर्म थिंक टँकच्या उपसंचालकपदी काम करायला सुरुवात केली.
त्या कंझर्व्हेटिव्ह नेते डेव्हिड कॅमेरून यांच्या जवळच्या "ए-लिस्ट" उमेदवारांच्या यादीत होत्या. पुढे 2010 साली पक्षाच्या सुरक्षित अशा दक्षिण पश्चिम नॉरफॉक जागेवरून त्या 13,140 मतांच्या फरकाने विजयी झाल्या. आणि संसदेत त्यांनी खासदार म्हणून पाऊल ठेवलं.
संसदेत असताना त्यांनी 'ब्रिटानिया-अनचेन्ड' या पुस्तकाचं सहलेखनही केलं.

फोटो स्रोत, EPA
खासदार झाल्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच 2012 मध्ये, त्या तत्कालिन सरकारचा भाग बनल्या. त्यांना तत्कालीन सरकारमध्ये शिक्षणमंत्री करण्यात आलं.
चीज स्पीचमुळे चर्चेत आल्या
शाळांमध्ये नव्या सुधारणा राबविण्यावरून ट्रस आणि उपपंतप्रधान निक क्लेग यांच्यात बराच वाद झाला. पण कॅमेरून यांनी त्यांना 2014 मध्ये पर्यावरण मंत्री म्हणून पदोन्नती दिली.
यानंतर 2015 मध्ये त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या.
2015 मध्ये, कंझर्व्हेटिव्ह कॉन्फरन्समध्ये चीजच्या आयातीवर भाषण दिल्याबद्दल त्यांची खिल्ली उडवण्यात आली. पण ट्रोलर्सच्या कमेंटला न जुमानता त्या पुढे जातच राहिल्या.
ब्रेक्झिट म्हणजेच युरोपियन युनियनपासून फारकत घेण्याच्या सार्वमतामध्ये त्यांनी युरोपियन युनियनमध्ये राहण्यासाठी पाठिंबा दिला होता. ब्रेक्झिट ही एक शोकांतिका असेल असं त्या यावेळी म्हणाल्या होत्या.
मात्र, नंतर त्यांनी आपला विचार बदलला.
2016 मध्ये त्या थेरेसा मे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये न्यायमंत्री बनल्या. त्याच्या पुढच्याच वर्षी त्या अर्थमंत्री बनल्या.
2019 मध्ये बोरिस जॉन्सन पंतप्रधान झाल्यानंतर ट्रस यांना आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्रिपदी नेमण्यात आलं.
परराष्ट्र मंत्री असताना त्यांनी उत्तर आयर्लंड प्रोटोकॉलच्या गुंतागुंतीच्या समस्येचं निराकरण करण्याची मागणी केली. त्यांच्या या मागणीवर युरोपियन युनियनने जोरदार टीका केली होती.
इराणमध्ये अटक करण्यात आलेल्या नाझानिन झाघारी-रॅटक्लिफ आणि अनुशेह आशुरी या दोन ब्रिटीश-इराणी नागरिकांची सुटकाही त्यांनी केली.
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा निषेध करण्यातही त्या पुढे होत्या. याबाबत त्यांनी नेहमीच कठोर भूमिका घेतली. रशियन सैन्याला देशातून हाकलून लावलं पाहिजे, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं.
ब्रिटनच्या काही लोकांनी युक्रेन युद्धात सामील होण्यासाठीची इच्छा व्यक्त केली होती. त्या लोकांना पाठिंबा दिल्याबद्दल ट्रस यांना टीकेचा सामना करावा लागला होता.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









