या माकडाने हे मुंगूस पाळलंय, की अजून काही भयानक घडतंय ?

    • Author, एला हॅम्बली
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

खाली दिसणाऱ्या या फोटोत बोनबो जातीचं एक माकड एका लहान मुंगुसाला कडेवर घेऊन बसलेलं दिसतंय. या माकडाच्या कवेत ते मुंगूस असं बसलंय जणू काही त्या माकडाचा पाळीव प्राणीच आहे.

आता यात गंमत अशी आहे की पाळीव प्राणी ही संकल्पना जगात फक्त माणूस राबवतो. म्हणजे माणसं प्राणी पाळतात, इथे काय प्राण्यानेच प्राणी पाळला की काय अशी शंका येते.

की इथे काहीतरी अजून भयानक घडतंय? म्हणजे हे माकड त्या लहानशा मुंगुसाला आता ठार करायच्या बेतात आहे, आणि ठार करून खाणार आहे?

पण ही गोष्ट तर त्या माकडाने ते मुंगूस पाळलंय यापेक्षाही विचित्र आहे कारण बोनबो जातीची ही माकडं मुख्यत्वेकरून फळच खातात आणि सहसा शिकार करत नाही.

डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोच्या ख्रिश्चन झॅगलर यांनी हा कुतुहल चाळवणारा फोटो टिपला आहे.

ख्रिश्चन यांचा हा फोटो लंडनमधल्या नॅचरल हिस्ट्री म्युझियमच्या वाईल्डलाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी निवडला गेला आहे.

ख्रिश्चन हे सालोंगा नॅशनल पार्कमध्ये बोनबो माकडांचा माग घेत होते. गर्द रानात पावसाळ्यात छातीपर्यंत पाणी भरलं होतं त्यावेळी त्यांना एक नर जातीचं माकड मुंगुसाच्या पिल्लाला हातात घेऊन बसलंय असं दिसलं.

"त्या मुंगुसाच्या पिल्लाला ते माकड इतक्या काळजीपूर्वक हाताळत होतं ते पाहून मी आश्चर्यचकित झालो. मी लगेच त्याचा पाठलाग करायला सुरुवात केली आणि फोटो काढायला लागलो," बीबीसीशी बोलताना ख्रिश्चन म्हणाले.

त्या माकडाने तासभर त्या माकडाला कडेवर उचलून घेतलं होतं आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवत होता.

पण ते माकड कदाचित त्या मुंगुसाच्या पिल्लाला खाण्याच्या विचारात असू शकतं.

दोन दशकांपासून बोनबो माकडांचा अभ्यास करणाऱ्या डॉ बार्बरा फ्रुथ म्हणतात की, "बोनबो माकडं शिकारही करतात. जेव्हा ते आपल्या भक्ष्याला पकडतात तेव्हा लगेच त्याला ठार करत नाहीत, तर ते जिवंत असतानाच खायला सुरुवात करतात."

पण कधीकधी जर जेवण जास्त झालं असेल आणि पकडलेल्या भक्ष्याचा आकार मोठा असेल तर ते त्या भक्ष्याला आपल्या पाळीव प्राण्यासारखं वागवतात. बोनबो माकडं या प्राण्यांना नंतर मारून खातात.

डॉ. फ्रुथ यांना वाटतं की या फोटोतही तेच घडतंय. पण बोनबो माकड शांत असतात, आक्रमक नसतात हेही त्या सांगतात.

त्या म्हणतात, "प्राणीसंग्रहालयात असलेल्या बोनबो माकडांच्या अभ्यासावरून आम्हाला हे कळलं आहे की ही माकडं आपली प्रजाती सोडून इतर प्रजातीच्या प्राण्याची काळजीही घेतात. त्यांच्यात ती समानुभूती असते. पण जंगलातली माकडं एखादा प्राणी दीर्घकाळासाठी पाळतील असं वाटत नाही."

पण बोनबो माकडं आपल्या कळपातल्या बाकीच्या सदस्यांचा आदर मिळवण्यासाठी, भाव खाण्यासाठी इतर प्राण्यांना आपला पाळीव प्राणी पाळू शकतात ही शक्यताही त्या नाकारत नाहीत.

या फोटोच्या बाबतीत मात्र या लहानशा मुंगुसाला काही त्रास झाला नाही. त्या बोनबो माकडाने नंतर त्याच्या 'पाळीव प्राण्याला' सोडून दिलं आणि ते टुणकन उडी मारून पळून गेलं.

माकडांना भावना असतात का?

विनया जंगले या मुंबईत वन्यजीव अभ्यासक आहेत.

बीबीसी मराठीशी बोलताना त्या म्हणाल्या, "माकडांचा बुद्ध्यांक (IQ) आणि भावनांक (EQ) दोन्ही चांगला असतो. ज्या परिस्थितीत ते आहेत त्याच्याशी ते पटकन जुळवून घेतात. ते जितकं प्रेम करतात तितकाच टोकाचा तिरस्कारही करतात. जंगल हा त्यांचा नैसर्गिक अधिवास आहे. मात्र जंगलं कमी झाल्याने त्यांचा ओढा शहराकडे वाढला आहे."

माकड आणि माणसांच्या संवेदना बऱ्याचशा सारख्या असतात असं जंगले यांना वाटतं.

प्राणीदेखील संवेदनशील असतात का?

माकड आणि वानर मूक असले तरी त्यांची संवेदनशीलता कमालीची असते. प्राणीमित्र असलेले धनराज शिंदे एक किस्सा सांगतात.

"मध्य प्रदेशात एकदा एका माकडिणीचं पिल्लू गेलं. तेव्हा ती त्याला घेऊन पशुवैद्यकीय इस्पितळात पोहोचली. ती तिथे गेल्यावर पिल्लाला घेण्याचा प्रयत्न करताच ती अस्वस्थ झाली आणि झाडावर जाऊन बसली. पिल्लू मेलं होतंच. मग कसंतरी ते डॉक्टरांच्या हाती लागलं आणि त्यांनी उपचाराचं नाटक केलं. तेही माकडिणीने पाहिलं. नंतर अनेक दिवस ती त्या गावात फिरत होती."

माकडांनाही माणसांसारखेच आजार होतात. Bereavement: Reactions, Consequences, and Care या पुस्तकात माकडांच्या भावभावनांबद्दल विस्ताराने मांडणी केली आहे. माकडाची किंवा वानराची आई गेली तर माकड सैरभैर होतात.

मात्र दु:खाचे कढ येणं, कोसळून जाणं, उन्मळून पडणं अशी लक्षणं आढळून येतात. आपल्या जवळचा व्यक्ती गेला तर माकडं सैरभैर होतात. किंचाळणं, ओरडणं हेही लक्षणं दिसून पडतात. त्यामुळे दु:खं ही प्राण्यांनाही चुकत नाही पण ते व्यक्त करण्याची माकडांची पद्धत ही बरीचसी माणसांसारखीच असते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)