शिलाजित काय आहे? ते कसं बनतं? आरोग्यासाठी त्याचे काय फायदे आहेत?

    • Author, मुसा यावरी
    • Role, बीबीसी उर्दू, (हुंजा व्हॅली) पाकिस्तानमधून

"ही गोष्ट 1985 सालातली आहे. शिलाजित नेमकं असतं तरी काय म्हणून मी ते वापरून बघायचं ठरवलं. कपभर शिलाजित प्यायलो, पण थोड्याच वेळात मला चक्कर यायला लागली. मी पळत जाऊन अंगावर एक बादली पाणी ओतून घेतलं. पण चक्कर काही थांबेना, म्हणून तातडीनं दवाखान्यात गेलो. डॉक्टरांना घडलेली परिस्थिती सांगितली आणि सांगता सांगताच चक्कर येऊन पडलो. चार तासांनी मला शुद्ध आली. डॉक्टरांनी माझ्या कानशिलात लगावली आणि म्हणाले की, पुन्हा असं काही केलंस तर याद राख."

ही गोष्ट आहे हुंजा खोऱ्यातल्या अलीआबादच्या करीमुद्दीनची. ते आपल्या वडिलांसोबत 1980 पासून शिलाजित बनवण्याचा व्यवसाय करतात. मी त्यांना त्यांच्या घराच्या छतावर भेटलो, तिथं बाजूलाच शिलाजित वाळत घातलं होतं.

पण शिलाजित नेमकं असतं तरी काय? ते बनवायचं कसं?

मध्य आशियातल्या पर्वतरांगांमध्ये हे शिलाजित सापडतं. पाकिस्तानबद्दल सांगायचं तर गिलगिट-बालटिस्तानच्या पर्वतरांगांमध्ये हे आढळतं.

करीमुद्दीन सांगतात की, डोंगरात ज्या गुहा असतात तिथं वर्षानुवर्षं खनिजं आणि वनस्पतीच्या घटकांपासून एक प्रकारचा पदार्थ तयार होतो त्याला 'शिलाजित' म्हणतात.

पण हे शिलाजित शोधणं वाटत तेवढं सोपं नाही. करीमुद्दीनचे कारागीर शिलाजित शोधण्यासाठी दिवस उजाडायच्या आधीच डोंगरांच्या वाटेला लागतात. कड्याकपऱ्यांमधून वाट काढत हे शिलाजित शोधायला बरेच दिवस लागतात.

शिलाजित शोधताना दोन महत्त्वाच्या टप्प्यांतून जावं लागतं-

1. उंच पर्वतांच्या शिखरांमध्ये पोहोचून शोध घेणं

2. शिलाजित साफ करणं किंवा फिल्टर करणं

शिलाजितची शोधमोहीम

डोंगरांच्या, पर्वतांच्या माथ्यावर जाऊन ज्या प्रकारे हे शिलाजित शोधलं जातं ते पाहून नक्कीच अंगावर शहारे येतील. माझीही अवस्था अशीच काहीशी झाली होती. आम्ही बरेच तास प्रवास करून हुंजा खोऱ्यात पोहोचलो.

हुंझा खोऱ्यातल्या पर्वतरांगांमध्ये शिलाजित शोधण्यासाठी जाणाऱ्या लोकांना तिथला बराच अनुभव असतो. गेल्या 15 वर्षांपासून या खोऱ्यात शिलाजित शोधायला जाणारे गाझी करीम सांगतात की, "शिलाजीत शोधण्यासाठी काही तास तर कधी कधी काही दिवसही घालवावे लागतात."

मग हा कच्चा माल घेऊन शहराकडे परत येतात. हा माल काही खास दुकानदारांना विकला जातो. ते विशिष्ट पद्धतीने त्याची साफसफाई करून पुढे विकतात.

शिलाजीत शोधणारे लोक टोळक्याने प्रवास करतात. बऱ्याचदा त्यांचा चार-पाच जणांचा गट असतो. त्यांपैकी एक जण स्वयंपाकी म्हणून काम करतो, उरलेले इतर लोक शिलाजित शोधत डोंगरदऱ्या पालथे घालतात. शिलाजित ज्या गुहेत मिळेल असं वाटत तिथं ते घट्ट दोरी बांधून उतरतात.

गाझी सांगतात, "पहिल्यांदा तर आम्ही दुर्बीण लावून गुहेत डोकावतो. इथं शिलाजित आहे असं वाटलंच तर जवळ जाऊन पाहतो आणि एक विशिष्ट वासावरून आम्हाला समजतं की, हे शिलाजितच आहे."

दरम्यान, गाझी मोठ्या कौशल्याने त्या दरीत उतरले. गुहेत आत शिरल्यावर त्यांनी शिलाजित सापडलं म्हणून त्यांच्या मित्रांना हाक मारली.

गुहेत आत उतरल्यावर पहिल्यांदा हे शिलाजित गोणीत भरून दोरीच्या सहाय्याने वर आणतात. नंतर गुहेतून ते स्वतः बाहेर येतात.

या सगळ्याला किमान अर्धा तास लागतो. पण त्या अर्ध्या तासात जर कोणी दोरी नीट बांधली नसेल किंवा सेफ्टी बेल्ट नीट बांधला नसेल, तर दोरी तुटण्याची शक्यता जास्त असते, असं गाझी सांगतात.

मात्र आजपर्यंत तरी अशी कोणतीही घटना घडली नसल्याचंही ते पुढे सांगतात.

जेव्हा ते अशाप्रकारे शोधमोहीमेवर जातात तेव्हा त्यांना वेगवेगळ्या प्रमाणात हे शिलाजित मिळतं. गाझी सांगतात की, त्यांनी आतापर्यंत सर्वाधिक 20 मण शिलाजीत गोळा केलंय. कधीकधी त्यांना रिकाम्या हाताने सुद्धा परत यावं लागतं.

शिलाजित स्वच्छ करण्याची प्रक्रिया

फिल्टर करायच्या आधी शिलाजित दगडातच एक विशेष घटक म्हणून चिकटलेला असतो. हे कारागीर शहरातल्या साफसफाई आणि गाळण प्रक्रिया करण्याऱ्या लोकांना शिलाजित विकतात.

करीमुद्दीन 1980 पासून हे काम करत आहेत. ते सांगतात, की त्यांच्या वडिलांनी सूर्यप्रकाशात हे शिलाजित फिल्टर करायला सुरुवात केली. त्याला 'आफताबी शिलाजित' असं नाव दिलं.

शिलाजित फिल्टर करताना डोंगरातून आणलेले मोठे दगड लहान तुकडे तुकडे करून एका मोठ्या बादलीत टाकतात. त्यात ठराविक प्रमाणात पाणी घालून मोठ्या चमच्याने ढवळत राहतात जेणेकरून शिलाजित त्या पाण्यात विरघळेल.

मग काही तासांनंतर पाण्याच्या पृष्ठभागावर आलेली घाण काढून टाकली जाते.

करीमुद्दीन सांगतात, "आम्ही हे पाणी आठवडाभर असंच ठेवतो. या काळात पाण्याचा रंग पूर्णपणे काळा झालेला असतो. म्हणजेच आता शिलाजित दगडांमधून बाहेर पडून पाण्यात पूर्णपणे विरघळलेलं आहे असं समजतं."

ते सांगतात, की हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. यात शिलाजितच्या पाण्यातून हानिकारक पदार्थ वेगळे करावे लागतात.

"पण लोक पैसे कमावण्याच्या नादात हे पाणी कापडातून गाळून तीन ते चार तास उकळतात. यामुळे असं होतं की हे पाणी लवकर घट्ट होतं. त्यामुळे हे शिलाजित लवकर तयार होतं. पण त्याचे फायदे कमी आणि तोटेच जास्त आहेत."

असं केल्याने काय काय तोटे होऊ शकतात याबद्दल करीमुद्दीन सांगतात की, कापडातून गाळल्यामुळे त्यामध्ये हानिकारक घटक तसेच राहतात. दुसरं म्हणजे शिलाजित पाण्यात उकळल्यामुळे यातली सर्व खनिजे संपून जातात, ज्याचा काही उपयोग होत नाही.

करीमुद्दीन मात्र शिलाजितच्या फिल्ट्रेशनसाठी तब्बल तीस ते चाळीस दिवस लावतात. हे शिलाजित गाळण्यासाठी ते एक खास मशीन वापरतात. हे मशीन त्यांनी परदेशातून मागवलं आहे. ते मशीन त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांपासून लपवून ठेवलंय.

त्यांच्या मते, "आम्ही शुद्ध शिलाजित बनवतो हेच आमच्या यशाचं गमक आहे."

शिलाजित बनवण्याचा अंतिम टप्पा

हे शिलाजित गाळून झाल्यानंतर ते पाणी काचेच्या एका भांड्यात ठेवलं जातं. जसंजसं हे पाणी सुकून जाईल तसंतसं ते शिलाजितचं दुसरं पाणी त्या भांड्यात टाकत राहतात. नंतर जेव्हा सगळं पाणी सुकल्यावर राहतं ते अस्सल शिलाजित.

अशा प्रकारे 'आफताबी शिलाजित' तयार केलं जातं आणि पॅकिंग करून दुकानदारांना पुरवलं जातं.

करीमुद्दीन सांगतात की, ते शिलाजितची प्रत्येक खेप मेडिकल टेस्टसाठी पाठवतात. तिथून मिळणार प्रमाणपत्र शिलाजितच्या शुद्धतेचा पुरावा आहे. यात 86 प्रकारचे खनिज घटक असल्याची नोंद असते.

करीमुद्दीन सांगतात, "ते 10 ग्रॅम शिलाजित 300 ते 600 रुपयांना विकतात. शिलाजितची मागणी आणि उपलब्धता लक्षात घेऊन त्याची किंमत ठरवली जाते. पण काही दुकानदार त्यांच्या मर्जीने हव्या त्या किंमतीला विकतात."

खरं आणि बनावट याच्यातला फरक कसा ओळखाल?

करीमुद्दीन सांगतात की, शिलाजित ओळखण्यासाठी एक विशिष्ट वास असतो. दुकानदार अशीच ओळख पटवतात.

"लोक शिलाजितचं प्रमाण वाढवण्यासाठी त्यात पीठ वगैरे मिसळतात. त्यात अस्सल शिलाजित टाकल्यानंतर तसाच वास यायला लागतो.

त्यामुळे वासापेक्षा दुकानदाराला मेडिकल टेस्ट असलेल्या शिलाजितची मागणी करावी. त्यात 86 प्रकारची खनिज आहेत याची खात्री करण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे."

शिलाजित व्हायग्रा सारखं काम करतं का?

शिलाजितबद्दल लोकांच्या मनात अनेक गैरसमज असल्याचं करीमुद्दीन सांगतात. वास्तविक पाहता यामध्ये असणारे घटक शरीरातील कमतरता पूर्ण करतात. त्यामुळे शरीरातील उष्णता वाढून रक्तप्रवाह वाढतो. ते व्हायग्रासारखे काम करत नसल्याचं करीमुद्दीन सांगतात.

इस्लामाबाद मधील डॉ. वाहीद मेराज सांगतात, "लोह, जस्त, मॅग्नेशियमसह 85 हून अधिक खनिज घटक शिलाजितमध्ये आढळतात. या सर्व खनिज घटकांमुळे शरीरात रक्तप्रवाह वाढतो आणि प्रतिकारशक्ती वाढते."

ते पुढे सांगतात, "याचा वापर अल्झायमर, नैराश्य यांसारख्या आजारांवरही करण्यात येतो."

"उंदरांवर जेव्हा याची टेस्ट केली तेव्हा त्याच्या शुगर लेव्हलमध्ये सकारात्मक परिणाम दिसून आला. त्यामुळे शुगर पेंशटवर उपचार करण्यासाठी देखील शिलाजित उपयुक्त आहे."

याशिवाय शिलाजित हाडं आणि सांधे यांच्यासाठीही खूप फायदेशीर असल्याचं डॉक्टर सांगतात.

पण जर शिलाजित नीट फिल्टर केलेलं नसेल तर मात्र नुकसान होण्याची शक्यता असते. तसेच त्याचा अतिवापर आरोग्यासाठीही हानिकारक असतो.

शिलाजित किती प्रमाणात घ्यायचं?

करीमुद्दीन सांगतात की, "चण्याच्या डाळीएवढं शिलाजित कोमट दुधात मिसळून घ्यायचं. पन्नास वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक याचं सेवन सलग दोन ते तीन महिने करू शकतात. तरुणांनी मात्र आठवड्यातून दोनदाच घ्यावं."

ब्लडप्रेशरच्या रुग्णांनी त्याचा अजिबात वापर करू नये.

"85 खनिजं जेव्हा पोटात जातात तेव्हा ब्लडप्रेशर असंही वाढतंच. त्यामुळे ज्यांना आधीच ब्लडप्रेशरचा त्रास आहे त्यांनी याचं सेवन करू नये."

शिवाय हार्ट पेशंटनेही यापासून दूरच राहावं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)