You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हार्वर्ड ह्युज : नखं न कापणारा, बाटलीत आपली लघवी भरून ठेवणारा विक्षिप्त अब्जाधीश
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी
'एक गोष्ट लक्षात ठेवा, असा कुठलाही माणूस नाहीये ज्याला मी विकत घेऊ शकत नाही किंवा मनात आणलं तर उद्धवस्त करू शकत नाही.'
एकेकाळी अमेरिकेतला सगळ्यांत श्रीमंत असलेल्या उद्योगपतीचे हे उद्गार आहेत. त्यांचं नाव हावर्ड ह्यूज आणि त्यांना जग उद्योगपती, संशोधक, चित्रपट निर्माता, एका नव्या युगाच हिरो म्हणून तर ओळखतंच पण एक विक्षिप्त, वेडसर म्हातारा, ज्याने आपल्या आयुष्याची 26 वर्ष एकट्याने, घरात कोंडून घेऊन काढली, म्हणूनही ओळखतं.
हा म्हातारा नंतर नंतर इतका वेडा झाला की त्याने आपली नखं कापणं बंद केलं आणि आपली लघवी बाटल्यांमध्ये भरून ठेवायला लागला.
काय होती त्याची कहाणी?
हावर्ड ह्यूज सिनियर यांच्या पोटी हावर्ड ह्यूज ज्युनियर यांचा जन्म 1905 साली झाला. ह्यूज सिनियर क्रूड ऑईल जमिनीतून काढण्यासाठी लागणाऱ्या ड्रिल्स बनवायचे आणि तसा बऱ्यापैकी पैसा राखून होते.
त्यांची पत्नी म्हणजे हावर्ड ह्यूज ज्युनियर यांची आईही एका उमराव घराण्यातली होती. ह्यूज सिनियर यांनी 1909 साली अशा एका ड्रिल मशीनचा शोध लावला ज्यामुळे तेलाच्या उत्खननाचा चेहरामोहराच बदलला. ग्रॅनाईटच्या कठीण दगडाला भेदू शकणारी ड्रिल त्यांनी बनवली. त्यांनी त्या ड्रिलचं डिझाईनच पेंटट आपल्या नावावर करून घेतलं.
तेल कंपन्या आता ह्यूज सिनियर यांच्या दारापुढे रांगा लावून ती ड्रिल मशीन मिळण्याची वाट पहायच्या. ह्यूज सिनियर यांनी प्रचंड पैसा कमावला.
हावर्डच्या आईलाही स्वच्छतेचं वेड होतं. वेडच म्हणावं लागेल. हाच स्वभाव नंतर हावर्डमध्ये उतरला.
हावर्ड जन्माला आला तेव्हा नाजूक प्रवृत्तीचे होता आणि आजारी असायचा. त्याला एका कानाने कमी ऐकायला यायचं.
हावर्डची आई या गोष्टीमुळे त्याची अतिकाळजी घ्यायची.
म्हणूनच कदाचित त्याचे वडील त्यांना नेहमी वेगवेगळ्या बोर्डिंग स्कूल्सला पाठवायचे. तिथे प्रवेश मिळण्याची चिंताच नसायची कारण हावर्डच्या वडिलांचं चेकबूक नेहमी तयारच असायचं.
हावर्ड एका लाजाळू, थोडासा बहिरा मुलगा होता. घरातल्या दोन पराकोटीच्या व्यक्तिमत्वांनी त्याला जसं वागवलं त्याचा त्याच्या मनावर परिणाम झाला नसता तर नवलच.
तो शाळेत कोणाशी बोलूही शकायचा नाही. त्याचा एकटेपणा दूर करायला त्याला शेवटी दोन मार्ग सापडले - सिनेमा आणि विमानं.
त्याला नवनवीन शोध लावण्याचा छंद होता. तो चौदा वर्षांचा असताना त्याचे वडील त्याला अमेरिकेतल्या दोन विद्यापीठांमध्य रंगणाऱ्या नौकायन स्पर्धेला घेऊन गेले.
वडिलांनी त्याला सांगितलं की तू या स्पर्धेत भाग घेतलास आणि जिंकलास तर मी तुला तू मागशील ते बक्षीस देईन. हावर्डने स्पर्धा जिंकून दाखवली आणि वडिलांकडे पाच डॉलर मागितले.
कारण जिथे स्पर्धा होत होती, तिथेच पाण्यावर उडणाऱ्या बोट कम विमानाची जाहिरात लागली होती आणि हावर्डला त्या विमानात बसायचं होतं. त्याने फक्त त्या विमानात बसण्याची संधी मिळावी म्हणून स्पर्धा जिंकून दाखवली होती.
यानंतर दोनच वर्षांनी हावर्डची आई वारली आणि त्यानंतर दोन वर्षांनी त्याचे वडील. 18 वर्षांच्या, शिक्षणही पूर्ण न झालेल्या हावर्डच्या हातात सगळी संपत्ती आली.
हावर्डला आता जग ठेंगणं झालं होतं, अशी कुठलीही गोष्ट नाही जी आपण आपल्या बापाच्या पैशानी विकत घेऊ शकत नाही याची त्याला खात्री पटली होती.
वडिलांचा जरी ऑईल ड्रिल्सचा व्यवसाय असला तरी यात हावर्डला अजिबात रस नव्हता. त्याला हॉलिवूड खुणावत होतं.
चंदेरी दुनिया
हॉलिवुडमध्ये पाय टाकल्या टाकल्या हावर्डने काय केलं असेल तर बापाचा पैसा उडवायला सुरूवात केली. पीटर हेन्री ब्राऊन आणि पॅट ब्रोसेक यांनी हावर्ड ह्यूज यांचं चरित्र लिहिलं आहे. ते आपल्या पुस्तकात लिहितात, "ह्यूजने कधीही महागड्या बुटांचा एक जोड खरेदी केला नाही, तो कायम 20 जोड खरेदी करायचा. त्याने कधी एक कार विकत घेतली नाही, तो कायम 6 कार विकत घ्यायचा."
"अत्यंत महागड्या घड्याळांचे खोकेच्या खोके विकत घ्यायचा. एकदा त्याने 20 सुट एकदम विकत घेतले होते."
याच काळात त्याने आपल्या नातेवाईकांना वडिलांच्या कंपनीतून बाहेर काढलं. त्यांचे शेअर्स 3.8 मिलियन डॉलर्सला विकत घेतले.
वडिलांच्या कंपनीतला सगळा पैसा आता तो सिनेमात ओतणार होता.
त्याने काढलेला पहिला चित्रपट 'टू अरेबियन नाईटस' हिट ठरला. पण नंतरच्या त्याचे पिक्चरने सारे रेकॉर्डस मोडले. सिनेमाचं नाव होतं 'हेल्स एजंल'.
पहिल्या महायुद्धावर बेतलेला हा चित्रपट होता ज्यात पहिल्यांना विमानं उडताना, विमानांचा युद्धात वापर होताना दिसलं होतं.
या चित्रपटासाठी जितकी विमानं आणि पायलट्सचा ताफा वापरला होता तितका ताफा तेव्हा जगातल्या अनेक देशांच्या सैन्याकडेही नव्हता असं म्हणतात.
या पिक्चरच्या निर्मितीची कथा पण विचित्र आहे. हावर्डला सवय होती की प्रत्येक गोष्ट स्वतःच्या मनाप्रमाणेच झाली पाहिजे. त्याच्या ओसीडीची (मंत्रचळ) ही सुरुवात होती.
हावर्डने अनेकदा स्क्रीप्ट लिहिली, बदलली, पुन्हा लिहिली. पण त्याचा सगळ्यात मोठा विचित्र कारभार होता मनासारखे ढग दिसले नाहीत तर विमानांचं शूट पुन्हा करायचं. एका जरी ढगाची जागा हावर्डच्या दृष्टीने नीट नसली तर सगळ्या ताफ्याला तो सीन पुन्हा करावा लागायचा. बरं तेव्हा ग्राफिक्स वगैरे काही नसल्याने सगळं माणसांना करणं आलं.
या सगळ्यांत प्रचंड वेळ, पैसा आणि श्रम गेले. एकदाचा पिक्चर बनून तयार झाला तोवर अमेरिकेत बोलपटांची क्रेझ आली होती.
सत्यानाश. मग हावर्डने पुन्हा सिनेमा बदलला, त्यात डायलॉग घातले, अनेक गोष्टी नव्याने शूट केल्या, संगीत घातलं. या सगळ्यांत पिक्चर रिलिज व्हायला अजून वेळ गेला.
पिक्चर रिलीज झाला तेव्हा त्याचा खर्च होता 40 लाख डॉलर्स. त्या काळाच्या मानाने ही रक्कम प्रचंड होती. पण या सिनेमाने हावर्डला निराश केलं नाही. बॉक्स ऑफिसवर हा पिक्चर दणदणीत चालला आणि जितका खर्च केला त्याच्या दुप्पट रक्कम कमवून दिली.
याकाळात त्याचा आयुष्यात खूप स्त्रिया आल्या,विशेषतः तेव्हा हॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्री त्याच्या मागेपुढे गोंडा घोळत होत्या.
नंतरच्या काही चित्रपटांनी इतका व्यवसाय केला नाही पण मग आला 'स्कारफेस'. या पहिला गँगस्टर पिक्चर होता. या भरपूर हिंसा, शिव्या होत्या.
अमेरिकेच्या सेन्सॉर बोर्डाने या पिक्चरमध्ये अनेक कट सांगितले. हावर्ड ह्यूजनी ते ऐकले तर नाहीच उलट सेन्सॉर बोर्डावर खटला भरला आणि जिंकला. 'स्कारफेस' मधली एकही शिवी कमी झाली नाही.
या चित्रपटाने इतिहास घडवला. हावर्डला प्रत्येक सिनेमात काही ना काही वेगळं करायचं होतं. त्याच्या पुढच्या 'आऊटलॉ' या पिक्चरमध्ये जी हिरोईन होती तिचे भरीव स्तन दिसायला हवे होते. त्यासाठी खास ब्रा हवी होती, ज्याने स्तन तर उंचावतील पण ती कपड्याबाहेर दिसणार नाही.
'साधासा इंजिनिअरिंग प्रॉब्लेम तर आहे,' त्यात काय असं म्हणत हावर्डने एक खास पुश-अप ब्रा बनवली होती. पण सिनेमाची हिरोईन जेन रसेलनी ती घालायला नकार दिला. इंजिनिअरिंगाचा वापर ब्रा-साठी करणारा हावर्ड पहिला संशोधक ठरावा.
हावर्ड त्याच्या आयुष्यात काय वाट्टेल ते करत होता. पण आता हावर्डचं लक्ष सिनेमात कमी आणि विमानाकडे जास्त होतं.
त्याला आता जगातलं सगळ्यांत वेगवान विमान बनवायचं होतं. 1935 मध्ये त्याने ते करूनही दाखवलं. 1938 साली त्यानी ठरवलं की संपूर्ण जगाला सर्वांत वेगवान प्रदक्षिणा घालायची. त्याने तेही केलं. तीन दिवस 19 तासात त्याने जगाला प्रदक्षिणा मारून दाखवली.
त्याच्या या पराक्रमाचं इतकं कौतुक झालं की न्यूयॉर्कमध्ये त्याच्यासाठी परेड ठेवल्या गेल्या.
त्याने एअरक्राफ्ट कंपनी स्थापन केली. विमानाचा व्यवसाय वाढत चालला होता. आता अमेरिकेच्या सैन्यानेही त्याच्याकडून विमानं आणि इतर साहित्य विकत घ्यायला सुरुवात केली.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्याने अमेरिकेच्या नौदलासाठी पाणबुडी डिझाईन केली.
पण हळूहळू हावर्डचं मानसिक संतुलन बिघडत चाललं होतं. त्याच्या ओसीडीने त्याचं आयुष्य व्यापलं होतं.
तो सतत हात धुवत राहायचा, इतका की त्याच्या हातातून रक्त निघेल. हावर्ड ह्यूजच्या आयुष्यावर आलेल्या 'एव्हिएटर' या चित्रपटात अभिनेता लिओनार्डो डी कॅप्रिओने त्याची भूमिका केली आहे.
त्यातही हा सीन दाखवलेला आहे की हावर्ड जोरजोरात हात धुतो, इतके की त्याच्या हातातून रक्त यायला लागलं.
तो एकदा केलेलं काम पाच-पाच वेळा तपासून पाहायचा. याचमुळे त्याने जे सैन्याचे काँट्रॅट घेतले होते त्यांना उशीर होत चालला होता, बजेटही वाढत चाललं होतं. तो डिझाईनमध्ये सतत बदल करत राहायचा.
याच काळात, 1946 साली त्याच्या विमानाचा अपघातही झाला. हा त्याचा पाचवा विमान अपघात होता आणि आधीच्या अपघातातून तो जसा सहीसलामत सुटला तसा यावेळी सुटला नाही.
तो जबर जखमी झाला. आपल्या वेदना कमी करण्यासाठी त्याने ड्रग्स घ्यायला सुरुवात केली आणि त्याही गर्तेत तो ओढला गेला. तो आयुष्यभर नंतर ड्रग्स घेत राहिला.
अशातच त्याच्यावर आरोप झाला की तो युद्धखोरी करून नफा कमवतोय. 1947 साली त्याला अमेरिकेच्या काँग्रेससमोर साक्ष द्यायला बोलावलं.
त्यावेळेस त्याने धडाडीने भाषण केलं आणि आपण कसे देशभक्त आहोत हे पटवून सांगितलं. पण हावर्ड ह्यूज ही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी दिसण्याची ही शेवटची वेळ होती. नंतरची 26 वर्षं हावर्ड लोकांना दिसला नाही.
पण त्याचा व्यवसाय वाढत होता. 1966 ते 1968 या काळात त्याने अमेरिकेतल्या लास वेगासमध्ये जमिनी, कॅसिनो आणि हॉटेल्स विकत घेतले. 1966 साली त्याच्या कंपनीने सर्व्हायवर 1 हे यान बनवलं. चंद्रावर जाणारं हे पहिलं अमेरिकन यान होतं.
त्याने लास वेगासमध्ये एक टीव्ही चॅनलपण विकत घेतलं. काहीजण म्हणतात की आपल्या आवडीचे पिक्चर पाहाता यावे म्हणून त्याने हे चॅनल विकत घेतलं. तो रात्री आपल्या आवडीचा सिनेमा लावायला सांगायचा आणि समजा त्याला झोप लागली तर चॅनेलला तो पुन्हा पहिल्यापासून सुरू करावा लागायचा अशीही कथा काही लोक सांगतात.
पण त्याचं वैयक्तिक आयुष्य थाऱ्यावर नव्हतं. त्याचा दिवसेंदिवस विक्षिप्तपणा दिवसेंदिवस वाढत चालला होता. त्याला सतत वाटायचं की त्याच्या अवतीभोवती कीटाणू आहेत. तो कधी कधी त्यांचं संपूर्ण कपाट, कपड्यांसह जाळून टाकायचा.
मग त्याच्या आयुष्यात एकदम विचित्र प्रसंग घडला. एकेदिवशी तो घरातून निघाला आणि त्याने घरातल्या नोकरांना सांगितलं की मी स्टुडिओत जाऊन काही पिक्चर बघणार आहे. तो त्या दिवशी स्टुडिओतल्या अंधाऱ्या खोलीत गेला ते चार महिने बाहेर आलाच नाही.
तो दिवसरात्र नग्नावस्थेत बसून राहायचा. स्वतःची लघवी बाटल्यामध्ये भरून ठेवायचा आणि नखं कधीच कापायचा नाही.
दूध किंवा चॉकलेट हे त्याचं जेवण असायचं. त्याच्या नोकरांनाही तो चिठ्ठ्या लिहून द्यायचा ज्यात लिहिलेलं 'असायचं की माझ्याकडे बघू नका, माझ्याशी बोलू नका.'
तो नंतर मरेपर्यंत वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये राहिला, वर्षानुवर्षं राहिला, पण सगळ्यात एक गोष्ट कॉमन होती, एक अंधारी खोली जिथे तो पिक्चर बघत बसायचा.
हावर्ड ह्यूज यांचा मृत्यू 1976 साली विमान प्रवासातच झाला. ते जसं आयुष्य जगलं तसंच त्यांना मरण आलं. मनासारखं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)