You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लोक या माणसाला 'काहीही न करण्याचे' पैसे देतात
- Author, प्रतिनिधी
- Role, बीबीसी रिल्स
पैसे कमावणं प्रत्येकाच्या आयुष्याचं ध्येय असतं. आयुष्यातल्या गरजा पूर्ण करायला माणसांना पैसे लागतात आणि ते पैसे कमावण्यासाठी काम करावंच लागतं.
तरीही... तरीही प्रत्येकाच्या मनात, 'असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी' असं एक स्वप्न असतं. काहीही न करता पैसे मिळाले पाहिजेत.
आता तुम्ही म्हणाल असं कुठे असतं होय... पण जगात काही माणसं असतात भाग्यवान. आपण जळून काही फायदा नाही.
जपानचा शोजी मारिमातोही अशाच लकी माणसांपैकी एक. लोक त्याला काहीही न करण्याचे पैसे देतात. त्याला लकी म्हणायचं की हुशार हे तुम्ही ठरवा पण ही त्याची गोष्ट.
"लोक मला म्हणायचे, तू एकटा असा आहेस जो रिकामा आहे, काहीही काम करत नाही," शोजी बीबीसी रिल्सशी बोलताना म्हणतो.
आणि त्यातून त्याला एक कल्पना सुचली. "लोकांना माझी 'काही न करण्याची' सेवा द्यायची."
शोजी जी सेवा त्याच्या ग्राहकांना पुरवतो ती फारच वेगळी, भन्नाट, युनिक आहे. लोक त्याला 'काहीही न करण्याचे' पैसे देतात. शब्दश: काहीही न करण्याचे.
नाही लक्षात आलं? बरं, तुमच्या घरातला नळ खराब झाला की तुम्ही काय करता? प्लंबरला बोलावता. तो येतो, तुमच्या घरातला नळ दुरुस्त करतो आणि तुम्ही त्याला पैसे देता. म्हणजे तुमच्या घरात येऊन नळ दुरुस्त केल्याची सेवा पुरवल्याबद्दल तुम्ही प्लंबरला पैसे देता.
पण शोजीचे ग्राहक त्याला बोलावतात, तो त्यांच्यासोबत बसतो, पण काहीच करत नाही. ना बोलतो, ना काम करतो, ना कुठली मदत करतो. तो समजा हॉटेलमध्येही एखाद्या ग्राहकासोबत बसला असेल तर आपला मोबाईल काढून बघत बसतो. आणि त्याची वेळ झाली की बॅग खांद्याला लावून चालू लागतो.
फक्त या गोष्टीचे लोक त्याला पैसै देतात.
"जेव्हा कोणी माझी सेवा घेतं, तेव्हा मला ठरलेल्या ठिकाणी जायचं असतं, एखाददोन जुजबी प्रश्नांना उत्तरं द्यायची असतात आणि तिथे बसून फक्त खायचं, प्यायचं असतं. मी स्वतःहून कधी त्यांच्याशी बोलतही नाही," तो सांगतो.
तुला तुझ्या ग्राहकांबद्दल काही जाणून घ्यायचं नसतं का? असं विचारल्यावर तो स्पष्ट म्हणजो, "अजिबात नाही."
त्याच्या बऱ्याचशा ग्राहक या महिला आहेत. आम्ही त्यांच्याशीही बोललो.
एका महिलने सांगितलं की तिने नुकताच एक कॅफे सुरू केला आहे. "आमच्या कॅफेत कोणीच येत नव्हतं. रिकाम्या खुर्च्या बघून मला वाईट वाटायचं, मग आम्ही शोजीची सेवा घेतली. त्याला आमच्या कॅफेत बसायला सांगितलं आणि खायला प्यायला दिलं."
आणखी एका महिलेने सांगितलं की, "मी टोकियोत फारशी येत नाही, मला इथलं माहिती नाही. मी त्याची सेवा घेतली कारण मला इथल्या एका प्रसिद्ध केकच्या दुकानात जायचं होतं आणि मी त्याला सोबत घेऊन गेले."
शोजी म्हणतो की महिला त्याची सेवा तेव्हा घेतात जेव्हा त्यांना एखाद्या ठिकाणी जायचं असतं आणि तिथे त्यांना एकटं जाणं अवघड वाटतं. त्यांना फक्त कोणीतरी सोबत हवं असतं.
पण शोजीची ही सेवा स्वस्त अजिबात नाहीये. एकावेळी त्याच्यासोबत बाहेर जाण्यासाठी तुम्हाला जवळपास 6500 रूपये मोजावे लागतात. याशिवाय तुम्हाला त्याला येण्याजाण्याचा खर्च आणि तेवढ्या काळात इतर कोणतेही खर्च आले (जेवणाचं बिल, किंवा एखाद्या ठिकाणाची एन्ट्री फी) तर तुम्हाला ते द्यावे लागतात.
शोजी त्याला भेटलेल्या काही महिलांचे किस्सेही सांगतो.
"सिनेमात कसं कोणी गाव सोडून जात असेल तर त्यांचे आप्तेष्ट जमतात, रूमाल हलतात. तसा अनुभव एका महिला ग्राहकाला हवा होता. ती टोकियो सोडून ओसाकाला जात होती. तिने माझा सेवा घेतली आणि मी तिला निरोप द्यायला स्टेशनवर गेलो."
"दुसरी एक महिला होती. तिच्या पार्टनरने आत्महत्या केली होती. तिने माझी सेवा घेतली. ती तिच्या पार्टनरची एक पांढरी टोपी घेऊन आली आणि तिने मला ती घालायला सांगितली. नंतर ती तासभर त्याच्याबद्दल बोलत बसली. तिला कदाचित तिचं मन मोकळं करायचं होतं. तिला या गोष्टी कुटुंब किंवा मित्रांसोबतही बोलायला कठीण जात होतं."
पण शोजीची सेवा फक्त महिलाच वापरतात असं नाहीये. पुरुषही त्याला वेगवेगळ्या गोष्टींसाठी संपर्क करतात. सगळ्यांना एकच गोष्ट हवी असते, कोणीतरी सोबत असावं, त्याबदल्यात त्या व्यक्तीने इतर कोणत्याही अपेक्षा करू नयेत.पुन्हा त्रास द्यायला येऊ नये.
शोजी म्हणतो, "मी ही सेवा सुरू केली कारण मला एक प्रश्न समाजाला विचारायचा होता की काहीही न करणारा माणसाला या समाजात किंमत आहे की नाही?"
शोजी सांगतो त्याने त्याच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती पाहिली होती की जी काहीच काम करत नव्हती. त्याच व्यक्तीकडून प्रेरणा घेत शोजीने देखील काही न करण्याचा निर्णय घेतला.
शोजी तसा स्वभावाने एकलकोंडा आहे. तो अनेक लोकांसोबत खूपवेळ राहू शकत नाही, काम करू शकत नाही.
"माझ्या एका माजी बॉसने मला सांगितलं होतं की तू इथे असलास काय, नसलास काय... काहीच फरक पडत नाही. मग मी नोकरी सोडली. मला वाटत होतं मी काहीच करू शकत नाही."
आज शोजीचे दिवसातून कमीत कमी एक आणि जास्त जास्त तीन ग्राहकांसोबत सेशन असतात. त्याचा हा 'काहीच न करण्याचा धंदा' त्याला चांगलंच व्यग्र ठेवतोय.
शोजीला वाटतं की त्याच्याकडे येणारे अनेक ग्राहक एकटेपणाच्या भावनेतून त्याची सेवा घेतात.
"ते एकटे असतात असं नाही, अनेकदा गुंतागुंतीच्या नात्यांमध्ये अडकलेले असतात, त्यांना फक्त स्वतःची एक स्पेस हवी असते, ती मी देतो."
तो पुढे म्हणतो, "रस्त्यावरून चालताना आजूबाजूला लोक पाहिले की मला वाटायचं मी यांच्यासारखा का नाही. हे नॉर्मल आहे, आसपासच्यांशी सहजरित्या संवाद साधू शकतात. यांचं सगळं बरं चाललं आहे. पण मला आज कळतं की हे नॉर्मल वाटणारे लोकही शल्य घेऊन वावरतात, संवाद साधू शकत नाही, बरेचसे माझ्यासारखेच आहेत."
शोजीकडे अनेक ग्राहक पुन्हा पुन्हा येतात. त्यातल्या एक महिला ग्राहक कोतोमी इशिहारा म्हणतात, "त्याच्यासोबत असताना मी पूर्णपणे स्वतंत्र असते आणि तरीही एकटी नसते. असा अनुभव मला बाकी कोणाबरोबरच येत नाही. म्हणूनच मला त्याची सेवा आवडते. मला नव्या गोष्टी करता येतात, नवीन ठिकाणी जाता येतं आणि कोणाचं फुकट ऐकून घ्यावं लागत नाही."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)