रशिया आणि युक्रेनमधील युद्ध 150 दिवसांनंतरही का सुरू आहे?

गेल्या अनेक दिवसांपासून रशियाच्या बॉम्बवर्षावाचा सामना करणाऱ्या बखमत शहराच्या आकाशात धुराचे लोट दिसतात.
फोटो कॅप्शन, गेल्या अनेक दिवसांपासून रशियाच्या बॉम्बवर्षावाचा सामना करणाऱ्या बखमत शहराच्या आकाशात धुराचे लोट दिसतात.
    • Author, अँड्र्यू हार्डिंग
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, पूर्व युक्रेनमधून

पूर्व युक्रेनमध्ये लढणाऱ्या युक्रेनच्या सैनिकांचं म्हणणं आहे की पाश्चात्य देशांकडून मिळालेल्या आधुनिक शस्त्रांमुळे रशियाकडून होणाऱ्या बाँबवर्षावाला आळा बसला आहे. पण ही तात्पुरती तडजोड आहे की वादळापुर्वीची शांतता?

गेल्या अनेक दिवसांपासून रशियाच्या बॉंबवर्षावाचा सामना करणाऱ्या बखमत शहराच्या आकाशात धुराचे लोट दिसतात.

दोन युक्रेनी लढाऊ विमानं कमी उंचीवरून उड्डाण करत आहेत. यातच 86 वर्षांच्या ऐना इवानोवा, काठीच्या आधाराने आपल्या बागेत काम करताना दिसतात.

त्या म्हणतात, "आमच्या आयुष्यात काहीच उरलेलं नाहीयेत. आम्ही कुठेच सुरक्षित नाही आहोत. मला प्रामाणिकपणे वाटतं की मी मरून जायला हवं होतं."

त्यानंतर 10 मिनिटांनी पश्चिमेला सूर्यफुलांनी भरलेल्या शेतात पाच किंवा त्याहीपेक्षा अधिक वेळा स्फोट झाल्याचा भयानक आवाज कानी पडतो.

युक्रेनच्या उत्तरेला उद्ध्वस्त झालेल्या स्लोवयांक प्रदेशातून कोणी डोनबास प्रदेशातल्या युद्धाच्या वेशीपर्यंत गेला किंवा दक्षिणेला दोनेत्स्कमधल्या आता रिकाम्या झालेल्या शेतीप्रधान गावांमधून चक्कर मारली तर त्यांना दिसेल की रशियाने या सगळ्या भागांमध्ये बॉम्बवर्षाव केला आहे.

पण दोनेत्स्कच्या बाहेरच्या बाजूला गव्हाच्या शेताजवळ असलेल्या एका तोफखाना युनिटचे प्रमुख कमांडर दिमित्रो आपल्या मतावर ठाम आहेत.

ते म्हणतात, "आता रशियन आधीसारखे हल्ले करत नाहीत. त्यांच्याकडून बॉम्बहल्ले होण्याचं प्रमाण आधीच्या तुलनेत अर्धं झालं आहे. कदाचित त्याहूनही कमी, 2/3 कमी झालंय."

ते एका वाहनावर हात फिरवत आहेत. हे वाहन म्हणजे स्वयंचलित तोफ आहे. फ्रान्समध्ये बनलेल्या या सिझर तोफेच्या मोठ्ठ्या नळीचा रोख रशियाच्या दिशेने आहे. पाश्चिमात्य देशांकडून युक्रेनला मिळालेल्या हत्यारांपैकी एक ही तोफ आहे. ही आता पूर्ण डोनबास प्रदेशात फिरताना दिसते. दिमित्रो आणि इथल्या अनेकांना वाटतं की अशा प्रकारची शस्त्रास्त्रं युक्रेनला रशियाच्या विरोधात मदत करत आहेत.

फ्रान्सची सिझर गन

कानठळ्या बसतील अशा आवाजात सिझर गनने पहिल्यांदा तीन तोफगोळे डागले. दिमित्रोने म्हटलं की हे गोळे 27 किलोमीटर दूर असणाऱ्या रशियाच्या सैन्यांवर आणि तोफखान्याच्या बाजूला डागले गेले आहेत.

दिमित्रो यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पसरतं. ते म्हणतात, "आमचा नेम अचूक आहे. आम्ही रशियन सैन्यावर दूरपर्यंत हल्ला करू शकतो."

एका मिनिटात या तोफखाना तुकडीने आणखी दोन गोळे डागले. रशियाची तोफ याचं प्रत्युत्तर देणार, त्याच्या आता हे वाहन पटकन पुढे निघूनही गेलं.

बॉम्बवर्षावात उद्ध्वस्त झालेली जागा

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, बॉम्बवर्षावात उद्ध्वस्त झालेली जागा

युक्रेनमध्ये गेल्या काही दिवसात असे बरेच ड्रोन फुटेज आणि व्हीडिओ शेअर होत आहेत ज्यात रशियान भागात सलग स्फोट होताना दिसत आहेत.

साहजिकच युक्रेनच्या नागरिकांसह सैनिकही हे व्हीडिओ पाहात आहेत.

आतापर्यंत असं म्हटलं जात होतं की दारूगोळ्याचा हा भलामोठा साठा युद्धरेषेपासून लांब ठेवला गेला होता. आता या साठ्यात अमेरिकन हायमार क्षेपणास्त्र यंत्रणा आणि पोलंडचे क्राब होवित्झरसारख्या आधुनिक शस्त्रास्त्रांची भर पडली आहे.

स्लोवयांस्कच्या संरक्षणासाठी तैनात असलेल्या एका स्वयंसेवकांच्या तुकडीची कमान सांभाळणाऱ्या 52 वर्षांच्या यूरी बेरेजा यांनी म्हटलं की, "ती शांतता ऐका."

शहराच्या पूर्व भागात जवळपास तासभर कोणत्याही प्रकारच्या स्फोटाचा आवाज ऐकू आला नाही.

बेरेजा म्हणतात आता खरी बरोबरी झालीये.
फोटो कॅप्शन, बेरेजा म्हणतात आता खरी बरोबरी झालीये.

बेरेजा म्हणतात, "हे सगळं तुम्ही दिलेल्या तोफांमुळे शक्य झालंय. त्यांच्या अचूकतेने मारा करण्याच्या क्षमतेमुळे शक्य झालंय. आधी आमच्या एका हत्यारासमोर रशियाच्या 50 तोफा असायच्या पण आता परिस्थिती बदलली आहे. आमच्या पाच तोफांच्या तुलनेत त्यांच्याकडे आता एकच तोफ आहे. आता खरी बरोबरी झालीये."

पण दिमित्रोसारखंच बेरेजांनाही वाटतं की रशियाला तोडीचं आव्हान देण्यासाठी युक्रेनला पाश्चात्य देशांच्या हत्यारांची गरज आहे.

बेरेजा म्हणतात, "ते आम्हाला हरवू शकत नाही आणि त्यांना हरवण्यासाठी आम्ही समर्थ नाही. आम्हाला आणखी सुरक्षा उपकरणं हवीत. हत्यारबंद वाहनं, रणगाडे, एव्हिएशन उपकरणं, ड्रोन असं हवंय. या गोष्टी नसतील तर आमचे लोक मोठ्या प्रमाणावर मारले जातील. रशिया असंच युद्ध करतंय. त्यांना लोकांच्या आयुष्याची पर्वा नाहीये."

दिमित्रो म्हणतात, "पाश्चिमात्य देशांनी जितकी शस्त्रास्त्र पाठवली. प्रत्यक्षात आम्हाला त्याहून तिप्पट जास्त हत्यारं हवीत. तेही लवकरात लवकर."

शस्त्रास्त्रांची कमतरता हे एकच कारण नाहीये ज्यामुळे युक्रेनला युद्धात अडचण येतेय. रशियाचा बॉम्बवर्षाव कमी झाला असला तरी त्यांचे सैनिक बखमत भागात महत्त्वाच्या भागांच्या जवळ पोचलेत. युक्रेनी सैन्य सैनिकांची कमी संख्या आणि ट्रेनिंगसारख्या मुद्द्यावरून चिंतेत आहेत.

एक माजी ब्रिटीश पॅराट्रूपर युक्रेनी सैनिकांना ट्रेनिंग देत आहेत. ते ज्या सैनिकांना ट्रेनिंग देत आहेत ते सगळे स्वयंसेवक आहेत. त्यांना फक्त काही आठवड्यांचं सैनिकी प्रशिक्षण मिळालं आहे. त्यांच्या कमांडरांनी ब्रिटनहून आलेल्या ट्रेनर्ससोबत पाच दिवसांच्या खास प्रशिक्षणांचं आयोजन केलं आहे.

ट्रेनिंग घेणारे एक 22 वर्षांचे कमांडर व्यवसायाने वकील आहेत. त्यांच्या विनंतीवरून त्यांचं नाव इथे देत नाही आहोत. त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "भीती तर वाटतेच. मी याआधी कधीच युद्ध पाहिलं नाहीये."

रॉब नावाच्या एका अमेरिकन ट्रेनरने सांगितलं की, "या लोकांना बेसिक ट्रेनिंगही मिळालं नाहीये."

सैन्याला प्रशिक्षण नसणं ही युक्रेनची डोकेदुखी बनली आहे
फोटो कॅप्शन, सैन्याला प्रशिक्षण नसणं ही युक्रेनची डोकेदुखी बनली आहे

सध्या युक्रेनने पाश्चात्य देशांना त्यांचे सैनिक पाठवावेत किंवा सैन्य कॉक्ट्रॅक्टर्स पाठवावेत अशी विनंती केली आहे. पण इथे काही खासगी संस्था आहेत ज्या युक्रेनी सैन्याची मदत करत आहेत.

अमेरिकन सैन्यात मरीन म्हणून काम केलेले कर्नल (निवृत्त) अँडी मिलबर्न म्हणतात, "समुद्रात एका पाण्याच्या थेंबासारखी ही मदत आहे पण याने फरक पडतो, भले तो अगदी लहानसा का असेना."

ते म्हणतात की त्यांच्या संस्थेचा अमेरिकेच्या सरकारसोबत काही संपर्क किंवा करार नाहीये पण मिलबर्न यांच्यामते पाश्चिमात्य देशांचं धोरण पळपुटं आहे.

"ही एक विचित्र गोष्ट आहे. या लोकांनी आपल्या इतक्या लोकांना गमावलं आहे पण तरी त्यांच्याकडे ट्रेनर्स नाहीयेत. पाश्चात्य देशांना यासाठी तातडीने एक योजना बनवायला हवी."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)