कॉमनवेल्थ गेम्स 2022 : लॉन बॉलमध्ये भारतीय महिला संघाला सुवर्ण पदक, हा खेळ नेमका काय आहे?

    • Author, विधांशु कुमार
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

भारताच्या लॉन बॉल खेळातील महिला संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. भारतीय महिला संघानं 17-10 नं दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला.

बर्मिंघममध्ये सुरू असलेल्या कॉमनवेल्थ खेळात भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत.

रविवारी म्हणजेच 31 जुलै रोजी भारताच्या लॉन बॉल खेळातील महिला संघाने न्यूझीलंडला पराभूत करुन अंतिम सामन्यात स्थान पक्कं केलं होतं.

या खेळाबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे.

हा लॉन बॉल खेळ असतो तरी कसा? हे आपण येथे जाणून घेऊ

प्राचीन खेळ

लॉन बॉल हा एक प्रकारचा बॉलिंग गेम आहे. याची सुरूवात इंग्लंडमध्ये तेराव्या शतकात झाली. याचे औपचारिक नियम 18 व्या शतकाच्या शेवटी तयार करण्यात आले.

सध्या जवळपास 40 देशांमध्ये हा खेळ खेळला जातो.

लॉन बॉलचा कॉमनवेल्थ खेळांमध्ये समावेश असला तरी ऑलिंपिक आणि आशियाई खेळांमध्ये त्याला अजून प्रवेश मिळालेला नाही.

1966 वगळता सर्व कॉमनवेल्थ खेळांमध्ये या खेळाचा समावेश करण्यात आला आहे.

खेळाचे नियम

लॉन बॉल खेळ गवत असलेल्या मैदानात किंवा लॉनवर खेळला जातो. हा खेळ एकेकटे खेळाडू किंवा संघामधून खेळला जातो.

सिंगल्समध्ये दोन खेळाडू एकमेकांसमोर उभे असतात. तर सांघिक खेळाच्या इव्हेंट प्रकाराता 2, 3 किंवा 4 जणांचा संघ असतो. चार खेळाडूंच्या प्रकाराला फोर्स म्हणतात.

खेळाची सुरुवात नाणेफेकीने होते. नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला जॅक बॉल रोल करण्याची संधी मिळते. हा बॉल थ्रोईंग बॉलपेक्षा लहान असतो.

नाणेफेक जिंकणारा खेळाडू प्लेइंग एरियाच्या एका एंडपासून दुसऱ्या एंडच्या दिशेने तो रोल करतो.

जॅक जेथे थांबेल तो खेळाडूंसाठी लक्ष्य ठरतो.

आता खेळाडूंना एकेक करुन थ्रोईंग बॉल करायचा असतो.

त्यासाठी जास्तीत जास्त जॅकपर्यंत पोहोचणं आवश्यक असतं. बॉल जितका जवळ पोहोचतो तितके अधिक गुण मिळतात.

सिंगल्समध्ये एका प्रकारात ज्या खेळाडूला आधी 25 गुण मिळतात तो सेट जिंकतो.

थ्रो केल्यावर खेळाडू बॉल प्लेइंग रिंकच्या बाहेर जाऊ शकतात.

मात्र शेवटी त्यांना प्लेइंग एरियाच्या आतच थांबावे लागते नाहीतर त्यांना खेळातून बाहेर केलं जातं.

बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्सच्या फोर्स प्रकाराता प्रत्येक खेळाडूला प्रत्येक एंडमधून 2 बॉल रोल करण्याची संधी मिळते.

म्हणजे चार एंडनुसार संघातल्या चारही खेळाडूंना 8-8 बॉल रोल करण्याची संधी मिळते. खेळ इथंच संपत नाही.

फोर्स इव्हेंटमध्ये एकूण 15 एंडनंतर अंकामध्ये अग्रेसर असणाऱ्या संघाला विजयी घोषित केलं जातं.

भारतीय संघ

भारतीय संघाच्या फोर्स प्रकारात लवली चौबे, पिंकी, नयनमोनी सैकिया, रुपा रानी टिर्की या खेळाडू आहेत.

भारतीय संघाचा कॉमनवेल्थमध्ये प्रवेश होऊन 12 वर्षेच झाली आहेत. या लहानशा काळातच कॉमनवेल्थमध्ये भारताचं पदक निश्चित झालं आहे.

भारतीय महिला संघाचा बर्मिंगघमपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. प्रायोजक नसल्यामुळे हा संघ स्वतःच्या पैशावर इंग्लंड दौरा करत आहे.

लवली चौबे झारखंड पोलिसमध्ये आणि नयनमोनी सैकिया आसाम पोलिसमध्ये कॉन्स्टेबल्स आहेत.

रुपा रानी टिर्की झारखंडच्या रामगडमध्ये क्रीडा अधिकारी आहेत तर पिंकी या दिल्लीच्या एका शाळेत क्रीडाशिक्षिका आहेत.

क्रिकेटर्सचा आवडता खेळ

लॉन बॉल जगभरात खेळला जात नसला तरी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे अनेक क्रिकेटर्स हा खेळ खेळतात.

स्टीव्ह वॉ आणि मार्क वॉसुद्धा हा खेळ खेळतात.

महेंद्र सिंह धोनीसुद्धा रांचीमधल्या लॉन बॉ़ल सराव मैदानात हा खेळ खेळताना दिसला आहे.

भारतीय संघाच्या या कामगिरीनंतर त्यांना सरकारद्वारे मदत मिळून या खेळाचा प्रसार होईल अशी आशा आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)