You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्रिन्स चार्ल्स यांनी ओसामा बिन लादेनच्या कुटुंबियांकडून 10 लाख पाऊंड घेतले - रिपोर्ट
यूकेचे प्रिन्स चार्ल्स यांनी ओसामा बिन लादेनच्या कुटुंबियांकडून 10 लाख पाऊंड घेतल्याचं संडे टाईम्सने म्हटलं आहे.
2013 साली प्रिन्स चार्ल्स यांनी ओसामा बिन लादेनच्या सावत्र भावांकडून हे पैसे स्वीकारले असल्याचं त्या बातमीत म्हटलं आहे. तोवर ओसामा बिन लादेनला अमेरिकेने ठार करून फक्त दोनच वर्षं झाली होती.
हे पैसे प्रिन्स चार्ल्स यांची स्वयंसेवी संस्था द प्रिन्स ऑफ वेल्स चॅरिटेबल फंडला मिळाले आहेत.
पैसे स्वीकारण्याचा निर्णय या स्वयंसेवी संस्थेच्या ट्रस्टींचा होता आणि हा निधी स्वीकारण्याआधी सर्व प्रकारची माहिती घेण्यात आली होती, असं राजवाड्याकडून सांगण्यात आलेलं आहे.
"याचा दुसरा कुठलाही अर्थ लावला तर तो चुकीचा ठरेल," असं ब्रिटनच्या राजघराण्याच्या वतीने सांगण्यात आलं.
संडे टाईम्समध्ये प्रकाशित झालेल्या बातमीतले अनेक मुद्दे चुकीचे आहेत असंही त्यांचं म्हणणं आहे.
ओसामा बिन लादेनच्या कुटुंबाने 1994 सालीच त्याच्याशी असलेलं आपलं नातं तोडून टाकलं आणि त्याचे सावत्रभाऊ त्याच्या कोणत्याही कृतीत सहभागी नव्हते, त्यांचा बिन लादेनशी काहीही संबंध नव्हता.
या बातमीनुसार प्रिन्स चार्ल्स यांनी बकीर बिन लादेन तसंच त्यांचे भाऊ शफिक बिन लादेन यांच्याकडून देणगी स्वीकारली. बकीर सौदी अरेबियातल्या एका धनाढ्य कुटुंबाचे प्रमुख आहेत. शफिक बिन लादेन यांची प्रिन्स चार्ल्स यांनी राजवाड्यात भेटही घेतली.
संडे टाईम्सने आपल्या बातमीत म्हटलंय की राजघराण्याच्या अनेक सल्लागारांनी देणगी स्वीकारू नका, असा सल्ला देऊनही चार्ल्स यांनी हे पैसे स्वीकारले.
पण द प्रिन्स ऑफ वेल्स चॅरिटेबल फंडचे अध्यक्ष सर इयान चेशायर यांनी संडे टाईम्सला सांगितलं की 2013 साली जी देणगी स्वीकारली गेली त्यावर बरंच विचारमंथन झालं होतं, आणि त्यावेळेच्या पाच ट्रस्टींनी 'विचारपूर्वक' हा निर्णय घेतला होता.
"अनेक सुत्रांकडून माहिती मिळवण्यात आली, तिची पडताळणी करण्यात आली. यात काही सरकारी सुत्रांचाही समावेश होता. ही देणगी स्वीकारण्याचा निर्णय सर्वस्वी ट्रस्टींचा होता, यातून दुसरा अर्थ काढणं पूर्णपणे चुकीचं ठरेल," सर इयान पुढे म्हणाले.
द प्रिन्स ऑफ वेल्स चॅरिटेबल फंड यूकेतल्या इतर स्वयंसेवी संस्थाना निधी देतं ज्यातून या संस्था यूके, कॉमनवेल्थ आणि परदेशात विविध प्रकल्प चालवतात.
बीबीसीचे राजघराणं प्रतिनिधी जॉनी डेमंड यांचं विश्लेषण
याप्रकरणी कोणतेही नियम मोडले गेलेले नाहीत. सगळ्या पडताळण्या, चौकशा केल्या गेल्या आणि अगदी परराष्ट्र मंत्रालयालाही त्यांचं मत विचारलं होतं. परराष्ट्र मंत्रालयानेही या देणगीला आक्षेप घेतला नाही.
मग तरी ही एवढी मोठी बातमी का ठरते?
द प्रिन्स ऑफ वेल्स चॅरिटेबल फंडमधल्या सुत्रांनी बीबीसीला सांगितलं की कुटुंबातल्या एकाच्या चुकीमुळे संपूर्ण कुटुंबाला शिक्षा देण्यात येऊ नये. त्या कुटुंबातल्या इतर सदस्यांना देणगी द्यायची असेल तर त्यापासून थांबवण्यात येऊ नये. हे एका अर्थाने बरोबरही आहे.
पण प्रिन्स चार्ल्स आणि त्यांच्या निकटवर्तीयांना खरंच ओसामा बिन लादेनच्या कुटुंबाकडून देणगी घेण्यात आक्षेपार्ह काही वाटलं नसेल? ही गोष्ट एवढी साधी होती का की इतक्या वर्षांत त्यांना सार्वजनिकरित्या याबद्दल काही सांगावसं वाटलं नाही.
कारण एकदा ही माहिती सार्वजनिकरित्या बाहेर आली असती तर कितीही चौकश्या केल्या असल्या, पडताळण्या केल्या असल्या, नियम पाळले असले तरी लोकांच्या नजरेत ती भयंकरच ठरणार होती.
सरकार, लोकप्रतिनिधींना त्यांचं पद, सत्ता मतपेटीतून मिळते. जनता या लोकांचं भविष्य ठरवते. राजघराण्याचं तसं नाहीये. त्याच्याकडे पद आहे कारण ब्रिटनच्या लोकांनी ठरवलं आहे की ते आपल्या देशाची चांगली प्रतिमा तयार करतात.
अशात बिन लादेन कुटुंबाकडून, भले त्यांच्या ओसामा बिन लादेनशी अर्थाअर्थी संबंध नसला तरी, राजघराण्याने देणगी स्वीकारणं शोभतं का?
ओसामा बिन लादेन 11 सप्टेंबर 2001 साली अमेरिकेवर झालेल्या हल्ल्यांसाठी जबाबदार होता. अनेक वर्षं अमेरिकेच्या मोस्ट वॉन्टेड लिस्टमध्ये होता. या हल्ल्यांत 3000 लोकांचा मृत्यू झाला ज्यात 67 लोक ब्रिटिश होते.
2011 साली ओसामाला अमेरिकन सैन्याने ठार केलं.
प्रिन्स चार्ल्स यांच्या स्वयंसेवी संस्थेचं नाव पहिल्यादा वादात सापडलेलं नाही.
बातम्यांनुसार गेल्याच महिन्यात प्रिन्स चार्ल्स एका कतारच्या माजी मंत्र्याकडून यांनी एक सुटकेस भरून युरो घेतले होते.
राजघराण्याच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की या देणगीच्या वेळेसही सगळे नियम पाळले गेले होते आणि सगळ्या पडताळण्या केल्या गेल्या होत्या. पण धर्मदाय आयुक्तालयाने नंतर या देणगीची चौकशी करायचं ठरवलं.
याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात आणखी एक प्रकरण समोर आलं होतं. लंडन पोलिस काही आरोपांची चौकशी करत होते ज्यात म्हटलं होतं की द प्रिन्स ऑफ वेल्स चॅरिटेबल फंड या संस्थेने एका सौदीच्या नागरिकाला सन्मान देण्याचं कबूल केलं होतं.
राजघराण्यांच्या प्रवक्त्यांनी म्हटलं की, "त्या व्यक्तीला त्याने दिलेल्या देणग्यामुळे सन्मान किंवा ब्रिटिश नागरिकत्व देण्याची ऑफर देण्यात आली होती की नाही याबद्दल प्रिन्स चार्ल्स यांना काहीही माहीत नाहीये."
बीबीसीचे सुरक्षा प्रतिनिधी फ्रँक गार्डनर यांचं विश्लेषण
जगासाठी बिन लादेन हे नाव 9/11 च्या दहशतवादी हल्ल्याशी कायमचं जोडलं गेलं असलं तरी सौदी अरेबियातल्या लाखो लोकांसाठी हे नाव शाप नाही.
बिन लादेन हे नाव जेद्दातल्या एका बांधकाम कंपनीचं नाव आहे. बिन लादेन कुटुंबाची ही कंपनी आहे. या कंपनीला तेलामुळे प्रचंड फायदा झाल आणि त्यांनी सौदीत मशिदी, राजवाडे आणि इतर राजकीय इमारती बांधण्यासाठी बराच खर्च केलाय.
बिन लादेन कुटुंब मुळचं सौदीतलं नाही. ते येमेनच्या दक्षिण भागातून येऊन सौदीत स्थायिक झाले.
या कंपनीच्या संस्थापकांना अनेक मुलं होती, त्यातलाच एक ओसामा. ओसामा नेहमीच कुटुंबातला 'वाट चुकलेला मुलगा' होता.
1980 च्या दशकात त्याने अफगाणिस्तानातल्या मुजाहिदीनांना सोव्हियत सैन्याच्या विरोधात लढण्यासाठी मदत केली. म्हणजे एका अर्थाने तो सीआयए आणि पाकिस्तानच्या बाजूने होता.
पण नंतर 1990 च्या दशकात ओसामा बिन लादेन कट्टरतावादी आणि जिहादी झाला. त्यांच्या कुटुंबाने त्याच्याशी 1994 मध्ये सगळे संबंध तोडले. ओसामा बिन लादेन आधी सुदानला गेला आणि तिथून नंतर अफगाणिस्तानात. त्यानंतर जे झालं तो जगाचा इतिहास आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)