रशिया-युक्रेन युद्धात ड्रोन किती फायदेशीर, किती घातक?

रशिया-युक्रेन युद्धात हजारो ड्रोन वापरण्यात येत आहेत. ज्याचा शत्रूचे ठिकाण शोधण्यात, क्षेपणास्त्रांचा हल्ला करण्यात आणि गोळीबारात वापर केला जात आहे. रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश खास उद्देशाने ड्रोन वापरत आहेत.

आधीच तयार असलेले आणि बाजारात मोठ्या प्रमाणात विकले जात असलेले ड्रोन यासाठी वापरण्यात येत आहेत.

युक्रेनियन सैन्य सर्वात जास्त वापरत असलेले ड्रोन तुर्कस्तानमध्ये तयार केलेले बेरक्तार टीबी 2 आहे. त्याचा आकार लहान विमानाएवढा आहे. हे लेझर गाईडेड बॉम्बने सुसज्ज असू शकतात.

रॉयल युनायटेड सर्व्हिसेस इन्स्टिट्यूट या थिंक टँकचे डॉ. जॅक वेटलिंग म्हणतात की युद्ध सुरू झाले तेव्हा युक्रेनजवळ 50 पेक्षा कमी ड्रोन होते.

ते सांगतात की, "रशिया त्याच्यापेक्षा लहान आणि सामान्य ओरलान-10 या ड्रोनचा वापर करतं आहे."

रशियाने काही हजार ड्रोनसह युद्धाला सुरुवात केली होती. परंतु आता त्यांच्याकडे फक्त काही शे ड्रोन शिल्लक आहेत. हे ड्रोन कॅमेराने सुसज्ज असून यामधून छोटे बॉम्बही वाहून नेले जावू शकतात.

लष्करी ड्रोन किती प्रभावी

रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांचे ड्रोन शत्रूंचे लपण्याचे ठिकाण शोधण्यात आणि त्यांच्यावर तोफखान्याने हल्ला करण्यास अतिशय प्रभावी ठरले आहेत.

डॉ. वेटलिंग म्हणतात, "ओरलान-10 ने लक्ष्य शोधल्यानंतर रशियन सैन्य तीन ते पाच मिनिटांत हल्ला करू शकतं. अन्यथा असा हल्ला करण्यासाठी 20 ते 30 मिनिटे लागू शकतात."

किंग्ज कॉलेजच्या डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स स्टडीजमधील संशोधक डॉ. मार्टिना मिरॉन म्हणतात, की ड्रोनमुळेच युक्रेनचे सैन्य ही लढाई लांबवू शकले आहे.

त्या म्हणतात की, "याआधी तुम्हाला जर शत्रूचा ठिकाणा शोधायचा असायचा, तेव्हा त्यासाठी सैन्याच्या खास तुकड्या पाठवल्या जायच्या. या कामात काही सैनिकांचा जीव जाण्याचा धोका होता. पण आता ही सारी जोखीम ड्रोनकडून घेतली जात आहे."

युद्धाच्या सुरुवातीच्या आठवड्यात तुर्कस्थानच्या बेरक्तार ड्रोनने खूप प्रशंसा मिळवली.

मिरॉन म्हणतात की, "सुरुवातीला त्यांना शस्त्रास्त्रांवर हल्ला करताना दाखवण्यात आले होते. मोस्कवा युद्धनौका बुडवण्यातही ड्रोनने महत्त्वाची भूमिका बजावली होती. तरी अनेक बेरक्तार ड्रोन रशियन हवाई दलाने नष्ट केलीत."

डॉ. वेटलिंग म्हणतात, "ते प्रत्यक्षात आकाराने मोठे आहेत आणि ते हळू उडतात. तसेच ते फार उंच उडवता येत नाहीत. त्यामुळे त्यांना लक्ष्य करणे सोपे होते."

गैर-लष्करी ड्रोनचा वापर

लष्करी ड्रोन खूप महाग आहेत. बेरक्तार ड्रोनची किंमत 17 लाख पाउंड पर्यंत असू शकते. म्हणून रशिया आणि युक्रेन दोन्ही देश लहान आणि व्यावसायिक मॉडेलचा वापर करत आहेत. या प्रकारचे डीजीआय मॅविक 3 ड्रोनची किंमत फक्त 1700 पाउंड इतकी आहे.

युक्रेनच्या एका ड्रोन तयार करणाऱ्या कंपनीचा अंदाज आहे की, युक्रेनच्या सैन्याकडे किमान 6000 ड्रोन असतील. पण याची पुष्टी करणे कठीण आहे. व्यावसायिक ड्रोनमध्ये बॉम्ब बसवता येतात. परंतु बहुतेक वेळा त्याचा वापर शत्रूच्या सैन्याचे लपण्याचे ठिकाण शोधण्यासाठी आणि त्यांच्यावर थेट हल्ला करण्यासाठी केला जातो.

डॉ. मिरॉन सांगतात, "दारुगोळा साठ्याच्या बाबतीत युक्रेनची परिस्थिती रशियापेक्षा खूपच कमकुवत आहे. त्यामुळे आकाशातून लक्ष्य शोधून त्यांच्यावर तोफांचा मारा करणं युक्रेनसाठी फायदेशीर आहे. परंतु व्यावसायिक ड्रोन हे लष्करी ड्रोनच्या तुलनेत कमकुवत असतात."

डीजीआय मॅविकसारख्या व्यावसायिक ड्रोनची रेंज 30 किमी आहे आणि ते फक्त 46 मिनिटे उडू शकतात. याच्यापेक्षा स्वस्त आणि लहान ड्रोन आणखी कमी वेळ उड्डाण करू शकतात. अंतर कापण्याची त्यांची क्षमताही कमी असते.

ड्रोन हल्ल्यांपासून संरक्षण

डॉ. मिरॉन सांगतात की, रशिया व्यावसायिक ड्रोन विरोधात लष्करी ड्रोन आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करत आहे.

त्या सांगतात की, "रशियन सेना स्टुपोर रायफलचा वापर करते, जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरीच्या माध्यमातून लक्ष्यावर गोळीबार करते. यामुळे व्यावसायिक ड्रोन जीपीएसचा वापर करून उड्डाण करू शकत नाहीत."

रशियन सेना एरोस्कोपसारख्या प्रणालीचा देखील वापर करत आहे. ज्याच्यामुळे व्यावसायिक ड्रोन आणि ऑपरेटर यांच्यातील संवादास ते रोखू शकतात. यामुळे ड्रोन क्रॅश होऊ शकते किंवा त्याला तळावर परत जाण्यास भाग पाडले जाऊ शकते.

ही प्रणाली त्याला माहिती परत पाठवण्यापासूनही रोखू शकते.

रॉयल युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्यूटच्या मते, सरासरी एक युक्रेनियन ड्रोन केवळ एक आठवडा टिकतो.

ड्रोन पुरवठादार कोण आहेत?

व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार रशिया सध्या इराणकडून शाहीद ड्रोन खरेदी करत आहे. येमेनमध्ये लढणारे हुती बंडखोर त्यांचा वापर सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीमधील तळांवर हल्ला करण्यासाठी करत आहेत.

दुसरीकडे अमेरिका युक्रेनला 700 स्विचब्लेड कामिकाजे मिलिटरी ड्रोन देत आहे. ते स्फोटकांनी सुसज्ज आहेत. जोपर्यंत त्यांना त्यांचे लक्ष्य मिळत नाही तोपर्यंत ते आकाशात प्रदक्षिणा घालत राहतात.

इलॉन मस्कची स्पेसएक्स कंपनी युक्रेनला स्टारलिंक सॅटेलाइट कम्युनिकेशन सिस्टम पुरवत आहे. याच्यामुळे व्यावसायिक ड्रोन आणि ऑपरेटर यांच्यामध्ये एक निश्चित दुवा तयार होत आहे.

डीजेआयने आता रशिया किंवा युक्रेनला ड्रोनचा पुरवठा बंद केला आहे.

युक्रेन हे ड्रोन कसे खरेदी करत आहे?

युक्रेनने 200 लष्करी ड्रोन खरेदी करण्यासाठी क्राउड फंडिंगचे आवाहन केले आहे.

डॉ. वेटलिंग म्हणतात, "युक्रेन टीबी-3 सोबत लहान आणि स्थिर रीकॉनेससेंस ड्रोन खरेदी करण्याचा विचार करत आहे."

युक्रेनियन बँड कलुश ऑर्केस्ट्रा ज्याने नुकतीच युरोव्हिजन गाण्याची स्पर्धा जिंकली. त्याची ट्रॉफी त्यांनी 7,12,000 पाउंडला विकली. ही रक्कम युक्रेनच्या ड्रोन खरेदीसाठी दान केली जाणार आहे. या रकमेतून युक्रेनियन बनावटीचे तीन पीडी-2 ड्रोन खरेदी करता येवू शकतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)