श्रीलंका : धर्माचं राजकारण महागात पडलेला देश-- ग्राऊंड रिपोर्ट

    • Author, नितीन श्रीवास्तव
    • Role, बीबीसी, कोलंबोतून

श्रीलंकेतल्या दोन मोठ्या अशा गेट्सवर सुरक्षा कर्मचारी तैनात असल्याचं दिसतात. या गेट्सवर 'ग्रॅफिटी' बनवण्यात आलीय. ज्यात 'गए न गोटा' आणि 'श्रीलंका बिना राजपक्षे' असं लिहिलंय.

मागच्या काही दिवसांपूर्वीपर्यंत 'राष्ट्रपती भवन' असलेली ही भव्य वास्तू आता एखाद्या म्युजियम सारखी दिसू लागली आहे.

माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे किती ऐशोआरामात राहतात हे पाहण्यासाठी लोक बसने प्रवास करून येत होते. वास्तूची भव्यता पाहायला जे लोक इतर शहरांमधून आले होते त्यांनी दीड किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लावल्या होत्या. पण हे सर्व शांततेत सुरू होतं.

राष्ट्रपती भवन बघायला आलेल्यांमध्ये सिंहली, तमिळ हिंदू, तमिळ मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्माचे लोक होते.

त्या दिवशी मला गुनासेखरा नावाचे व्यक्ती भेटले. त्यांच्या हातात एक लहान मूलही होतं. ते म्हणाले, "आज आम्ही सर्वजण श्रीलंकेचे नागरिक आहोत. धर्म, जात आणि इतिहास या गोष्टी आता नव्याने लिहल्या जातील."

आज श्रीलंकेतील राजकीय आणि आर्थिक संकट थांबायचं नाव घेत नाहीये. तेच दुसरीकडे तुम्हाला सामाजिक आणि धार्मिक संबंधांमध्ये एक अनोखी गोष्ट पाहायला मिळेल. ती म्हणजे सत्तेतून बाहेर पडलेल्या राजपक्षे कुटुंबाविरुद्धची एकजूट. आणि हीच खरी वास्तविकता आहे.

सेंट्रल कोलंबोमधील हॉटेल सिनॅमन ग्रँडमागे एका तलावाच्या काठावर सुंदर असं बौद्ध मंदिर आहे.

काही महिन्यांपूर्वीपर्यंत राजपक्षे कुटुंबातील सर्वच लोक दर आठवड्याला या बौद्ध मंदिरात जायचे. पण आता जात नाही.

गोटाबायांनी देश सोडलाय, तर महिंदा राजपक्षे एका अज्ञात ठिकाणी वास्तव्यास आहेत.

श्रीलंकेत मागच्या बऱ्याच महिन्यापासून महागाईने डोकं वर काढलं होतं. अन्नधान्य आणि तेलाच्या तुटवड्यामुळे लोक हैराण झाले होते. या सर्व परिस्थितीत आंदोलन सुरू असताना अचानक जमावाने पंतप्रधान कार्यालयापासून राष्ट्रपती भवनापर्यंत धडक मारली. आंदोलकांनी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या घरावर ताबा मिळवल्याच्या घटना समोर आल्या.

पण आता या इमारती रिकाम्या करण्यात आल्यात.

श्रीलंकेच्या सव्वा दोन करोड लोकसंख्येपैकी तीन चतुर्थांश लोकसंख्या सिंहली समुदायाची आहे जी बौद्ध धर्माचं पालन करते.

देशांतर्गत दुरावा निर्माण झाला होता

याआधी सत्तेवर आलेल्या जवळपास सर्वच सरकारांनी बहुसंख्य वर्गाच्या हिताचे निर्णय घेतले. ज्यामुळे तमिळ आणि नंतर मुस्लिम समाजात नाराजी वाढत गेली.

तमिळ अधिकारांसाठी जे गृहयुद्ध सुरू होतं ते बरीच वर्षे चाललं. 2009 मध्ये हे गृहयुद्ध संपल्याच श्रेय तत्कालीन पंतप्रधान महिंदा राजपक्षे आणि त्यांचे संरक्षण सचिव गोटाबाया राजपक्षे यांनी घेतलं.

त्यानंतर लगेचच झालेल्या निवडणुकीत राजपक्षे कुटुंब सिंहली राष्ट्रवादाच्या भावनेवर स्वार होऊन सत्तेत परतलं. निवडणूक जिंकल्यानंतर गोटाबाया म्हणाले होते की, "सिंहलींच्या मतांवरच मी ही निवडणूक जिंकणार हे मला माहीत होतं."

कोलंबोतील प्रसिद्ध श्रीबोधी मंदिराचे मुख्य पुजारी यटागामा राहुल म्हणतात, "देशात एकमेकांविरुद्ध नाराजी पसरल्याची परिस्थिती निर्माण झालीय हे खरं आहे. 30 वर्षे चाललेल्या गृहयुद्धानेही याला हातभार लावला. राजकारणात एकतर माणसांचा वापर होतो नाहीतर धर्माचा. आता श्रीलंकेत बहुसंख्य बौद्ध आहेत, त्यामुळे या शब्दाचा आधार घेण्यात आला."

ते पुढे म्हणाले की, "पण आम्ही लोक धर्मापेक्षा मानवतेला सर्वाधिक महत्व देतो. तुम्ही कोणत्याही शहरात जा, जर एखाद्या घरात बौद्ध कुटुंब राहत असेल तर त्याच्या शेजारी मुस्लिम कुटुंब आणि समोर तामिळ कुटुंब राहत असलेलं तुम्हाला दिसेल. एक देश म्हणून जर आपल्याला पुढं यायचं असेल तर सर्वांना एकत्र राहावंच लागेल."

तसं पाहायला गेलं तर मागच्या अनेक दशकांपासून श्रीलंकेत सांप्रदायिक तणाव वाढत चाललाय. 2019 मध्ये कोलंबोमध्ये इस्टरच्या दिवशी झालेल्या बॉम्बस्फोटात 250 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

यामागे इस्लामिक स्टेटचे काही स्थानिक युनिट असल्याचं बोललं जातंय. इथं राहणाऱ्या मुस्लिमांच्या मते, या बॉम्बस्फोटानंतर परिस्थिती आणखीनच बिघडू लागली.

रिफखान हे मागच्या अनेक वर्षांपासून कोलंबोतील अकबर जुमा मशिदीचे इमाम आहेत. ते म्हणतात की, "मुस्लिम म्हणून आमच्यासमोर आधीच बऱ्याच समस्या होत्या. इस्टर बॉम्बस्फोटानंतर त्या आणखीनच वाढल्या. मुस्लिम समुदायाचा त्या हल्ल्यांशी काहीही संबंध नव्हता. निवडणुका जिंकण्यासाठी आम्हाला टार्गेट करण्यात आलं."

ते पुढे म्हणाले की, "त्यानंतर जेव्हा कोव्हिड आला तेव्हा राजपक्षे बंधूंनी मृत लोकांचा दफनविधी करू दिला नाही. मृतदेहांना अग्नी देण्यात आला. आता त्यांना सत्तेवरून हटविण्यात आलंय, त्यामुळे भविष्य चांगलं असेल अशी आशा आहे."

सरकारच्या विरोधात सुरू असलेल्या निदर्शनांचा बालेकिल्ला असलेल्या गॉल फेस इथं अशफाक या महाविद्यालयीन तरुणाशी भेट झाली.

अशफाकला वाटतं की, "मागच्या सरकारने अॅडमिशनमध्ये मुस्लिम टक्केवारी कमी ठेवली होती. पण आता परिस्थिती सुधारू शकते."

सिंहली राष्ट्रवादाचा पुरस्कार करणार्‍या राजपक्षे कुटुंबाला या निदर्शनांमध्ये सिंहली लोक सहभागी होतील अशी यत्किंचितही अपेक्षा नव्हती.

यात काही लोक असे ही बहुसंख्यांक होते जे डोळे झाकून अल्पसंख्यांकांना बाहेरचे समजतात.

लोकांना मिळून मिसळून राहावं लागेल

कुमारा परेरा एक मोबाईल शॉप चालवतात. "देशाची झालेली दुरवस्था" बघून त्यांना वाईट वाटतं.

ते म्हणतात की, "तमिळ अधिकारांसाठी श्रीलंकेत झालेलं गृहयुद्ध समजण्यासारखं होतं. त्यानंतर देशात शांतता प्रस्थापित झाली हेही समजण्यासारखं होतं. पण नंतर अचानक विशिष्ट प्रकारचा राष्ट्रवाद पसरवला जाऊ लागला. सुरुवातीला लोकांना तो ठीक वाटला. पण आज जी खाण्यापिण्याची जी दुरवस्था झाली आहे त्यात हा राष्ट्रवाद कोणाला आठवला सुद्धा नसेल."

राजपक्षे कुटुंबाविरोधात जे शांततापूर्ण आंदोलन सुरू होतं, त्यात लष्कराने जी भूमिका बजावली तोही एक मोठा इशारा होता.

सैन्यातील बहुतेक सैनिक आणि कमांडर सिंहली समुदायातील आहेत. आणि आंदोलकांवर जी कारवाई झाली ती अत्यंत माफक आणि सौम्य होती.

कोलंबोतील सेंटर फॉर पॉलिसी अल्टरनेटिव्हचे राजकीय विश्लेषक बवनी फोन्सेका सांगतात, "श्रीलंकेतील गृहयुद्ध संपल्यानंतर अवघ्या 13 वर्षांत ही गोष्ट घडणं आश्चर्यकारक आहे."

ते म्हणाले, "धीम्या गतीने का होईना, पण आपण एकत्र राहण्याची गरज आहे हे आता लोकांना समजतं आहे. या निषेधामुळे परस्पर मत, संवाद आणि चर्चेचे नवे मार्ग खुले होताना दिसतायत. यामुळेच लोक एकमेकांशी संवाद साधू शकतील. आणि यातूनच समस्या सोडवता येईल."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)