श्रीलंका लष्कराकडून शांततेचे आवाहन; देशात गॅसपुरवठा सुरळीत होणार

श्रीलंका

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, श्रीलंकेचे लष्कराचे चीफ ऑफ स्टाफ जनरल शवेंद्रा सिल्वा

श्रीलंकेच्या लष्कराचे चीफ ऑफ स्टाफ जनरल शवेंद्र सिल्व्हा यांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं. देशासमोर संकट आहे, आपण त्यातून शांततामय पद्धतीने मार्ग काढू असं त्यांनी सांगितलं.

शनिवारी आंदोलकांनी राष्ट्राध्यक्ष गोटाभये राजपक्षे यांच्या घरात प्रवेश केला. संध्याकाळनंतर आंदोलकांनी पंतप्रधान रनील विक्रमासिंघे यांच्या खाजगी घरात प्रवेश केला आणि ते पेटवलं. या घटनांमुळे राजधानी कोलंबोतली परिस्थिती चिघळली होती. राष्ट्राध्यक्ष राजपक्षे कुठे आहेत याविषयी अधिकृत पातळीवर कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

रनिल विक्रमासिंघे यांच्या घराला आग लावण्याच्या प्रकारासंदर्भात तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे असं श्रीलंका पोलिसांनी सांगितलं. अटक करण्यात आलेल्या लोकांची ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

श्रीलंकेत सरकारविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात अनेक माजी क्रिकेटपटूही सहभागी झाले आहेत.

कोलंबोमध्ये तैनात लष्कर आणि पोलीस आपापल्या तळांवर परतले आहेत. शनिवारी आंदोलनाचं स्वरुप लक्षात घेऊन प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात केला होता. रविवारी अगदी मर्यादित प्रमाणावर कर्मचारी कर्तव्यावर होते.

यादरम्यान मंत्री धम्मिका परेरा यांनी राजीनामा दिला आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांच्याकडे गुंतवणूक खात्याचा कार्यभार सोपवण्यात आला होता. देशावरचं संकट तसंच देशाप्रति असलेल्या प्रेमातून हे पद स्वीकारलं होतं असं त्यांनी राष्ट्राध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

परेरा यांना पकडून आतापर्यंत चार मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. यामध्ये हेरिन फर्नांडो, मनुषा नानायकारा, बंधुला गुणवर्धने यांचा समावेश आहे.

राष्ट्रपती सचिवालयाने देशात लिक्विड पेट्रोलियम गॅस येत असल्याचं जाहीर केलं आहे. श्रीलंकेत गेले अनेक दिवसांपासून गॅस आणि पेट्रोलियम इंधनांची टंचाई होती.

3700 मेट्रिक टन गॅस कार्गोमार्गे देशात पोहोचणार आहे असं सचिवालयाने सांगितलं. गॅस पोहोचला की तातडीने सिलेंडरचं वितरण सुरू होईल. 11 जुलैला गॅस घेऊन दुसरं कार्गो दाखल होईल.

दरम्यान श्रीलंकेला या संकटातून बाहेर पडण्यासाठी भारत सर्वतोपरी मदत करेल असं काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. श्रीलंकेतली परिस्थिती चिंताजनक आहे, तिथल्या परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेऊन आहोत असं गांधी यांनी म्हटलं आहे.

आर्थिक संकट, वाढत्या किंमती, इंधन आणि जीवनोपयोगी वस्तूंची टंचाई यामुळे श्रीलंकेतल्या सर्वसामान्य माणसाचं जगणं कठीण झालं आहे. संकटकाळात श्रीलंकेतल्या लोकांच्या बरोबरीने आम्ही ठामपणे उभे आहोत.

आर्थिक संकटातून सावरण्यासाठी श्रीलंकेला मदत करत असल्याचं परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी सांगितलं. तूर्तास स्थलांतरितांचा प्रश्न नाही असं त्यांनी स्पष्ट केलं.

श्रीलंका

फोटो स्रोत, AMILA UDAGEDAR

श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी आपण 13 जुलै राजीनामा देणार असल्याचं म्हटलं आहे.

श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष महिंदा यापा अभयवर्द्धना यांनी सांगितलं की, राष्ट्रपती 13 जुलै रोजी राजीमाना देणार असल्याचं त्यांनी मला सांगितलं आहे.

याआधी पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांनीही आपण राजीनामा देणार असल्यचं म्हटलं होतं.

शनिवारी सकाळी निदर्शक गोटाबाया राजपक्षे यांच्या घरात घुसले होते. त्यानंतर संध्याकाळी त्यांनी पंतप्रधान विक्रमसिंघे यांच्या घराला आग लागवली होती.

श्रीलंका संसदेचे अध्यक्ष तात्पुरत्या स्वरुपात राष्ट्रपतीपदाचा कार्यभार हाती घेतील. महिंदा यापा अभयवर्द्धना यांनी बीबीसीला सांगितलं की, पक्षाच्या नेत्यांनी मला राज्यघटनेतील तरतुदींनुसार राष्ट्रपती पद सांभाळण्यास सांगितलं आहे, असं मी गोटाबाया यांना सांगणार आहे.

आंदोलकांनी पंतप्रधान रनिल विक्रमासिंघे यांचं घर पेटवलं

आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेत आंदोलकांनी पंतप्रधान रनिल विक्रमासिंघे यांचं घर पेटवलं आहे. गेले तासभर विक्रमासिंघे यांच्या घरासमोर आंदोलक आणि पोलीस यांच्यात जोरदार धूमश्च्क्री झाली. त्यानंतर आंदोलकांनी विक्रमासिंघे यांच्या घराला आग लावली.

आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेची परिस्थिती अजूनही नियंत्रणात आलेली नाही. दरम्यान आज दुपारी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानाला आंदोलकांनी घेराव घातला.

श्रीलंका

फोटो स्रोत, Social media

फोटो कॅप्शन, श्रीलंकेचे पंतप्रधान रनिल विक्रमासिंघे यांचं घर आंदोलकांनी पेटवलं.

दरम्यान, राष्ट्रपती निवासानंतर आंदोलकांनी आपला मोर्चा पंतप्रधान निवासाकडे वळवला. काही आंदोलक पंतप्रधान निवासातही शिरले. परिस्थिती पाहून पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे.

रनिल विक्रमसिंघे

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, रनिल विक्रमसिंघे

आता श्रीलंकेत सर्वपक्षीय सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे.

रनिल विक्रमसिंघे यांनी ट्विट करून आपल्या पक्षातील नेत्यांना म्हटलं, "सर्वपक्षीय सरकार स्थापन व्हावं, यासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देण्यास तयार आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

सनथ जयसुर्याचीही आंदोलनात उडी

आजच्या आंदोलनात माजी क्रिकेटपटू सनथ जयसुर्याही सहभागी झाला होता. त्याने आंदोलनातील काही फोटोही आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केली आहेत.

सनथ जयसुर्या

फोटो स्रोत, Twitter

जयसुर्या म्हणाला, "मी श्रीलंकेच्या नागरिकांसोबत उभा आहे. लवकरच आपण विजयाचा जल्लोष साजरा करू. हे आंदोलन आपण सुरू ठेवलं पाहिजे."

आंदोलकांची स्विमिंग पूलमध्ये आंघोळ

तसेच काही आंदोलकांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या आवारात प्रवेश केला. इतकंच नव्हे तर राष्ट्रपती निवासस्थानी असलेल्या स्वीमिंग पूलमध्ये ते आंघोळीचा आस्वादही घेत असल्याचे काही व्हीडिओ समोर आले आहेत.

काल श्रीलंकेतील विविध भागातून हजारोच्या संख्येने आंदोलक बसेस, रेल्वे आणि ट्रकमधून कोलंबोत दाखल झाले आहेत.

आंदोलकांनी थेट राष्ट्रपती निवासस्थानात प्रवेशाचे प्रयत्न केले. यावेळी निदर्शकांना रोखण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेड्स लावले. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

Sajid Nazmi

फोटो स्रोत, Sajid Nazmi

यानंतर जमाव पांगला मात्र काही तासांतच पुन्हा जमा झाला. यावेळी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा मारा सुरू ठेवला. त्यामुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये धुमश्चक्री उडाली.

हवेत गोळीबार होत असून अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर सुरूच आहे. या अश्रुधुराचा 5 जणांना त्रास झाल्याचं समजलं आहे.

दरम्यान, दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास आंदोलकांनी राष्ट्रपतींच्या शासकीय निवासस्थानाच्या आवारात घुसण्यास सुरुवात केली. यात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचारी आणि आंदोलकांच्या झटापटीत पोलिसांना घटनास्थळावरून माघार घ्यावी लागली.

काही आंदोलक निवासस्थानाच्या मुख्य गेटवर चढून निवासस्थानात घुसले. आंदोलनस्थळी लष्कराचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे सध्या त्यांच्या अधिकृत निवासस्थानी आहेत की नाही हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

अश्रुधुरामुळे जखमी झालेल्या बऱ्याच लोकांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलंय.

दिवसभरात काय काय घडलं?

देशाला आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी सरकार अपयशी ठरल्याचा संताप नागरिकांमध्ये दिसून येत आहे. श्रीलंकेची जनता इंधन,अन्न, औषधे यांच्या टंचाईशी तीव्र झुंज देत आहे. याचमुळे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे आणि पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्याविरोधात निदर्शने तीव्र होत आहेत.

गोटाबाया राजपक्षे

फोटो स्रोत, Getty Images

त्यामुळे आज सरकारविरोधी आंदोलन पुकारण्यात आले होते. विरोधी पक्ष, कामगार संघटना, विद्यार्थी संघटना, कृषी संघटना इत्यादींनी आंदोलनाला पाठिंबा देण्याचं मान्य केलं.

कालपासून देशाच्या विविध भागातून विद्यार्थी संघटना राजधानी कोलंबोच्या दिशेने येऊ लागल्या. आज सकाळीही श्रीलंकेच्या विविध भागातून हजारोंच्या संख्येने आंदोलक कोलंबोत दाखल होताना दिसले.

श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा क्रिकेट कसोटी सामना सुरू असलेल्या रिकाम्या स्टेडियमबाहेरही आंदोलक मोठ्या संख्येने जमले आहेत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)