श्रीलंकेतील आर्थिक संकट समजून घ्या या 5 ग्राफिक्समधून

फोटो स्रोत, Getty Images
- Author, शदाब नाझमी
- Role, बीबीसी न्यूज प्रतिनिधी
श्रीलंका सध्या आर्थिक संकटात सापडला आहे. अवघ्या 2.2 कोटी लोकसंख्येचा हा देश आता दशकातील सर्वांत वाईट आर्थिक संकटाचा सामना करत आहे.
अन्न, गॅस आणि पेट्रोलियमच्या किंमती गगनाला भिडल्या असून महागाईचा दर काही महिन्यांपासून दुहेरी आकडा गाठत आहे. त्यातच आता रशिया आणि युक्रेनमधील युद्धानं देशाला दूरवर फेकलं आहे.
वीजपुरवठा खंडित होणं, रिकामे एटीएम आणि पेट्रोल पंपावरील लांबच लांब रांगा.. हे श्रीलंकेत नेहमीचं दृश्य झालं आहे. श्रीलंका पेट्रोलियम गॅसपासून साखरेपर्यंत जवळजवळ सर्वच वस्तू आयात करतो. आता ही सगळी प्रक्रिया विस्कळीत झाली आहे. त्यामुळे देशात प्रचंड महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंसाठी लांब रांगा लागलेल्या दिसून येत आहेत.
श्रीलंकेच्या सेंट्रल बँकेच्या मते, कोरोना साथीच्या सुरुवातीच्या काळात महागाई दर (राष्ट्रीय ग्राहक किंमत निर्देशांक) केवळ 5% पेक्षा जास्त होता. फेब्रुवारी 2022 मध्ये, वर्षानुवर्षे चलनवाढीच्या टक्केवारीतील बदल जवळपास 18% वर पोहोचला. मागील वर्षाच्या तुलनेत तो 13% इतका वाढला. याशिवाय देशात वस्तूंच्या पुरवठ्याच्या तुलनेत मागणी खूप जास्त आहे.
आता तर श्रीलंकेनी अशी घोषणा केली आहे की ते कोणत्याही प्रकारचं विदेशी कर्ज परतफेड करू शकणार नाही.
कोरोना आणि युक्रेनच्या संकटामुळे कर्जाची परतफेड अशक्य असल्याचं या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
वाढती महागाई, खाद्यपदार्थांची टंचाई आणि विजेची कमतरता यामुळे या देशात मोठ्या प्रमाणात निदर्शनं झाली आहेत.
आर्थिक स्थिती रुळावर आणण्यासाठी श्रीलंका पुढच्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेबरोबर चर्चा करणार आहे.
1948 ला इंग्लंडपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कर्जाची परतफेड करण्याच्या बाबतीत श्रीलंका कायमच अग्रेसर आहे.
"सद्यपरिस्थितीतल्या घटनांनी श्रीलंकेची आर्थिक स्थिती अतिशय बिकट झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक कर्जाची परतफेड करणं अशक्य झालं आहे. मात्र या कर्जाबाबत सरकारने तातडीची पावलं उचलली आहेत. ही स्थिती कायम राहणार नाही," असं सोमवारी जाहीर केलेल्या एका निवेदनात श्रीलंकेनं म्हटलं आहे.
श्रीलंकेवर आलेलं हे अभूतपूर्व संकट आपण खालील 5 चार्टच्या माध्यमातून समजून घेऊ या.

खाद्यपदार्थ बनवण्यासाठी वाळलेल्या मिरची ही अत्यावश्यक आणि साधी गोष्ट. पण, या मिरचीच्या किरकोळ किंमतीत मागील वर्षाच्या तुलनेत 190% वाढ झाली आहे.
सेंट्रल बँकेच्या म्हणण्यानुसार, एक किलो सफरचंद ज्याची एप्रिल 2021 मध्ये किंमत जवळपास 55 प्रति किलो रुपये होती, ती आता दुप्पट झाली आहे. खोबरेल तेलासाठी स्थानिकांना जिथं एका लिटरसाठी 520 रुपये मोजावे लागत होते, ते आता प्रतिलीटर 820 रुपयांना मिळत आहे.

बातम्यांमधील रिपोर्टनुसार, श्रीलंकेनं नागरिकांनी अत्यावश्यक वस्तूंचा साठा करणं सुरू केलं आहे. त्यामुळे सुपरमार्केटमधील कपाटं पूर्णपणे रिकामी दिसत आहेत. परिस्थिती इतकी भीषण झाली आहे की, महागाईमुळे अनेकांना जेवण सोडावे लागत आहे.
श्रीलंका जवळपास सर्वच वस्तू आयात करतो. OECD नुसार, श्रीलंकेनं 2020 मध्ये 1.2 बिलियन डॉलर किमतीचे रिफाइंड पेट्रोलियम आयात केलं. फॅब्रिक्सपासून ते औषधे बनवण्यासाठी कच्च्या मालापर्यंत, गव्हापासून ते साखरेपर्यंत, श्रीलंकेत सगळ्याच गोष्टींची आयात केली जाते.

श्रीलंकेनं 2020 मध्ये, 214 मिलियन डॉलर किमतीच्या कार आयात केल्या. देशानं सर्वाधिक आयात केलेली कार ही वस्तू नाहीये. तर 2020 या एका वर्षात श्रीलंकेने 305 मिलियन डॉलर किमतीचं दूध (भुकटी) आयात केलं.
चीन आणि भारत हे श्रीलंकेचे सर्वांत मोठे निर्यातदार देश आहेत. सध्या श्रीलंका परकीय मदतीसाठी आवाहन करत असताना श्रीलंकेनं देशातील संकटाशी लढा देण्यासाठी भारत आणि चीनकडे आर्थिक मदतीसाठी संपर्क साधला आहे.

फेब्रुवारी 2022 मध्ये श्रीलंकेला भेट दिलेल्या पर्यटकांपैकी 70% हून अधिक पर्यटक युरोपमधील होते. सरकारच्या मासिक पर्यटन अहवालानुसार, 15 हजार 340 पर्यटक रशियामधून श्रीलंकेत आले. या वर्षी फेब्रुवारीमध्ये इतर कोणत्याही देशातून आलेल्या पर्यटकांच्या संख्येपैकी ही संख्या सर्वाधिक आहे.
मात्र रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणामुळे या दोन देशांतील पर्यटकांचा ओघ विस्कळीत झाला आहे. याआधी कोविड-19 ने श्रीलंकेला गुडघ्यावर आणले आणि आता देशातील पर्यटकांची ये-जा पूर्णपणे थांबवली आहे. त्यामुळे पर्यटन उद्योगाला मोठा फटका बसला आहे.
युद्धानंतर गहू, पेट्रोलियम आणि इतर वस्तूंच्या किमतींवरही परिणाम झाला आहे. देशाच्या व्यापार तुटीतील असंतुलनामुळे श्रीलंकेचा रुपया डॉलरच्या तुलनेत आणखी घसरला आहे.

श्रीलंका सध्या कर्जाच्या विळख्यात अडकली आहे. श्रीलंकेतील सरकारी विभागाच्या आकडेवारीनुसार, चीन हा श्रीलंकेचा सर्वांत मोठा कर्जदाता देश आहे. आंतरराष्ट्रीय संघटनांपैकी सर्वांत अधिक कर्ज एशियन डेव्हलेपमेंट बॅंकेनी दिलं आहे.
श्रीलंकेचं कर्ज त्यांच्याजवळ असलेल्या परकीय गंगाजळीहून अधिक आहे. परकीय कर्जामुळेच श्रीलंकेवर आर्थिक आणीबाणीची स्थिती ओढावली आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








