You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कुराण हातात घेऊन शपथ घेणारी ऑस्ट्रेलियाची पहिली मुस्लीम मंत्री
ऑस्ट्रेलियाच्या नवीन सरकारमध्ये 23 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. त्यात दहा महिला आहे.
युवकमंत्री असलेल्या अॅनी अली आणि एड हुसक ऑस्ट्रेलियातले पहिले मुस्लीम मंत्री ठरले आहेत. हातात कुराण घेऊन शपथ घेणाऱ्या अॅनी एली या ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या महिला मंत्री आहेत.
ऑस्ट्रेलियामध्ये नुकतंच स्थापन झालेलं सरकार हे ऑस्ट्रेलियातलं विविधतेनं नटलेलं पहिलं सरकार आहे. त्यात अल्पसंख्याक आणि स्थानिक आदिवासींचा समावेश आहे.
पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या खासदार अॅनी अली आधी मजूर पक्षाच्या कार्यकर्त्या होत्या. त्यानंतर त्या युनियनच्या सदस्य झाल्या आणि आता त्या मंत्री झाल्या आहेत.
"मंत्री होणं माझ्या आयुष्याचं कधीच ध्येय नव्हतं" असं त्या शपथ घेतल्यावर म्हणाल्या.
डॉ. अली आधी ऑस्ट्रेलियाच्या पहिला महिला खासदार होत्या. आता त्या पहिल्या मुस्लिम मंत्री देखील असतील.
अली या पर्थ भागातील कोवान या जागेवरून निवडून आल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या महिला खासदार एडिथ कोवान यांच्या नावावर या मतदारसंघाचं नाव कोवान असं ठेवलं आहे.
अॅनी अली यांचा जन्म इजिप्तमध्ये झाला होता. जेव्हा त्या दोन वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांचं कुटुंब दक्षिण पश्चिम भागातील चिपिंग नोर्टन मध्ये येऊन स्थायिक झाले होते.
अॅनी अली यांनी 2020 मध्ये घरगुती हिंसाचाराच्या विरोधात राष्ट्रीय पातळीवर अभियानाची मागणी केली. कारण त्यासुद्धा घरगुती हिंसाचाराला बळी पडल्या होत्या.
तेव्हा प्रसारमाध्यमांशी बोलताना अली म्हणाल्या होत्या, "मी संयम ठेवला, मी माझ्या जखमांवर मलम लावत राहिले आणि माझं दु:ख लपवण्याचा प्रयत्न करत राहिले. मी खूप वेळ शांत राहिले. सगळ्या प्रकारचं दु:ख भोगून झाल्यावर माझ्या मुलांच्या वडिलांना सोडणं हा माझ्यासाठी सगळ्यात कठीण निर्णय होता."
55 वर्षीय अॅनी अली राजकारणात येण्याच्या आधी प्राध्यापक आणि शिक्षणतज्ज्ञ होत्या. त्यांनी आतंकवादावरही संशोधन केलं आहे. कमी वयातलं मुलं आतंकवादाकडे का झुकतात या विषयावर त्यांचं संशोधन उल्लेखनीय आहे.
अॅनी अली यांनी एडिथ कोवान विद्यापीठातून पीएचडी डिग्री घेतली आहे. राजकारणात येण्याच्या आधी पश्चिम ऑस्ट्रेलिया प्रशासनात अनेक महत्त्वाच्या पदावर काम केलं आहे.
अॅनी अली यांचं आयुष्य अतिशय प्रेरणादायी आहे. आपल्या सुरुवातीच्या आयुष्यात त्यंनी अगदी मजुरीसुद्धा केली आहे. एकल माता होऊन त्यांनी मुलांचं पालनपोषण केलं.
अॅनीच्या वडिलांनी टेक्सटाईल इंजिनिअरिंगचा अभ्यास केला. मात्र ऑस्ट्रेलियात त्यांना या क्षेत्रात नोकरी मिळाली नाही. ते बस चालवायचे.
ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या अडीच कोटी आहे. त्यात सहा लाख मुस्लिम लोक आहेत.
अॅनी अली मंत्री झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा मुस्लिम समुदायसुद्धा आनंदात आहे. ऑस्ट्रेलिया फेडरेशन ऑफ इस्लामिक काऊंसिलने त्यांना अभिनंदनाचं पत्र लिहिलं आहे.
या संस्थेचे मुख्य अधिकारी केयर ट्राड यांनी एका निवेदनात म्हटलं आहे की, ऑस्ट्रेलियाच्या सत्ताकेंद्रात मुस्लिमांचं असणं एक चांगलं लक्षण आहे.
ते म्हणतात, "ऑस्ट्रेलियाचे युवा मुस्लीम लोक आता पाहतील की त्यांना समाजसेवेचाही एक पर्याय डोळ्यासमोर आहे."
मुस्लीम लोक ऑस्ट्रेलियन समाजाचा महत्त्वाचा भाग आहेत हा महत्त्वाचा संदेश सर्वदूर जाईल असंही ते पुढे म्हणाले.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)