You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हे प्राणी खरंच डोंगरावरून उडी मारून सामूहिक आत्महत्या करतात का?
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी
ती गोष्ट आठवते का? एका गावात खूप उंदीर झाले होते, त्यांनी हैदोस घातला होता. या उंदरांपासून सुटका कशी करावी हे गावकऱ्यांना कळत नव्हतं, अशात एक बासरीवाला तिथे आला आणि म्हणाला की मला पैसे द्या, मी या सगळ्या उंदरांना पळवून लावतो. गावकऱ्यांनी मान्य केलं, त्यांनी आपल्या बासरीतून असे काही सुर काढले की सगळे उंदीर मंतरल्यासारखे त्याचा मागे चालू लागले आणि काही वेळातच त्या बासरीवाल्याने त्यांना डोंगरावर नेलं आणि तिथून सगळ्या उंदरांनी पाण्यात उड्या मारल्या.
नंतर गावकरी पैसे द्यायला नाही म्हणतात आणि म्हणून हा बासरीवाला गावातल्या मुलांना भूल पाडतो. या गोष्टीच्या पुढच्या भागाचा खरं आपल्या आजच्या लेखाशी काही संबंध नाही.
पहिला भागच महत्त्वाचा. खरंच उंदरांनी अशी सामूहिक आत्महत्या केली होती का ?
पृथ्वीच्या बर्फाळ भागात सापडणाऱ्या खारी काळाच्या एका टप्प्यावर सामूहिक आत्महत्या करतात अशी दंतकथा आहे. नुसती कथा नाही, याचे पुरावेही सापडले आहेत. टुंड्रा प्रदेशाच्या डोंगराळ भागातून उन्हाळ्यात हिमनद्या वितळल्या की ओढे वाहायला लागतात.
हे ओढे खाली मैदानी प्रदेशात आले की ती 10 महिने बर्फाच्छादित असणाऱ्या या प्रदेशात जिवंतपणा परत आलाय याची खूण असते, पण या जिवंतपणात तरंगत असतात हजारो खारींचे मृतदेह.
हे मृतदेह मात्र खरे आहेत, ते अनेकांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले आहेत. गंमत म्हणजे या खारी या भागातल्या अनेक प्राण्यांचं अन्न आहेत, पण त्याचं भक्ष्य न बनता, या खारी पाण्यात बुडून मेलेल्या सापडतात.
हॅमस्टर नावाचा एक प्राणी परदेशातल्या काही जंगलात सापडतो. आपल्याकडच्या खारींचा लांबचा, मोठा भाऊ म्हणायला हरकत नाही.
बर्फाळ प्रदेशात सापडणाऱ्या या हॅमस्टर्सला लेमिंग्स असं म्हणतात. हेच लेमिंग चार वर्षांतून एकदा सामूहिक आत्महत्या करतात असं म्हटलं जातं. असतात हे आपल्या देशात सापडणाऱ्या खारूताईच्याच आकाराचे.
नक्की काय होतं इथे? काय आहे या दंतकथेमागचं खरं सत्य?
कित्येक शतकं ही दंतकथा प्रचलित होती की हे प्राणी आत्महत्या करतात. पाश्चिमात्य जगात प्रचंड गाजलेल्या एका दंतकथेपैकी ही एक कथा आहे.
ही कथा इतकी प्रचलित आहे की इंग्लिश भाषेत 'लेमिंग' हा शब्द 'परिणामांची पर्वा करता, आंधळेपणाने एखाद्याच्या मागे जाणारा' अशा अर्थाने वापरला जातो.
गेल्या काही वर्षांत संशोधनाचं तंत्रज्ञान सुधारलं आणि कॅमेऱ्याची क्वालिटी सुधारली आणि टुंड्रा प्रदेशातल्या उंच पर्वतात, जिथे पूर्वी मानवाने पाऊल टाकणंही शक्य नव्हतं, तिथे आता संशोधकांना जाता येतं.
म्हणूनच या प्रकरणामागचं सत्य समोर येतंय.
काही वर्षांपूर्वी एक व्हीडिओ फार व्हायरल झाला होता. यात एक नॉर्वेजिनय लेमिंग आपल्यापेक्षा 50 पटीने मोठ्या असणाऱ्या मांजरीवर हल्ला करताना दिसत होता. बरं, ती मांजरही त्याला घाबरली होती.
खरंतर हा लेमिंग त्या मांजरीसाठी साध्या उंदरासारखाच, त्याच आकाराचा. एका फटक्यात ती त्याला मारून खाऊ शकत होती. पण तिला हेच झेपत नव्हतं की इतका लहान प्राणी आपल्यावर हल्ला कसा करतोय, म्हणजे नक्कीच त्याच्यात काहीतरी ताकद असेल जी मला माहिती नाही.
या लेमिंगचे वेगवेगळे प्रकार आहेत. हे लहानसे प्राणी गिधाडं, घारी, मांजरी, कोल्हे अशा प्राण्यांचं भक्ष्य आहेत. ते सहसा स्वतःचं रक्षण करण्यासाठी बिळात लपून राहातात.
प्राणीशास्त्रज्ञ निक क्रॉम्टन यांनी बीबीसीशी बोलताना या प्रसंगात नक्की काय घडलं असेल ते सांगितलं. या व्हीडिओत दिसणारा लेमिंग, ज्याला मांजरही घाबरली होती, होता नॉर्वेजियन लेमिंग.
तोच बर्फाळ टुंड्रा प्रदेशात सापडणारा प्राणी. हे लेमिंग थंड भागात राहाणारे असले तरी गरम डोक्याचे असतात, आणि आपल्या ताकदीचा विचार न करता सरळ समोरच्याला भिडतात.
यांना शूर प्राणी प्राणी म्हटलं जातं, कारण ते लढाईत हरून इतर प्राणी पक्ष्यांचं भक्ष्य जरी बनत असले तरी ते एकदा तरी आपल्या भक्षकावर हल्ला करायचा प्रयत्न करतातच.
निक म्हणतात, "नॉर्वेजिनयन लेमिंगचा रंगही चमकदार असतो. एरवी आपल्याकडे सापडणारे उंदीर किंवा खारीसदृश्य प्राणी मळकट काळ्या किंवा करड्या रंगाचे असतात. भक्षकांच्या सहजासहजी नजरेत भरणार नाहीत असे त्यांचे रंग असतात. पण नॉर्वेजिनय लेमिंगच्या अंगावर पिवळसर चमकदार पट्टे असतात. पांढऱ्या बर्फात ते कुठूनही उठून दिसतात."
ते पुढे म्हणतात, "हे खरंय की हे लेमिंग वर्षाचा फार मोठा काळ बर्फाखाली बिळात लपून असतात, पण ते इतर प्राण्यांना घाबरून नाही तर थंडीपासून स्वतःचा जीव वाचवायला. हे प्राणी एरवी अत्यंत आक्रमक असतात. ते माणसावरही हल्ला करायला घाबरत नाहीत."
मग इतके शूर लेमिंग आत्महत्या कसे करतात?
दर चार वर्षांतून एकदा टुंड्रा प्रदेशात लेमिंग प्राण्यांची संख्या प्रचंड वाढते. आता ही संख्या नक्की का वाढते याचं कुठलंच कारण जीवशास्त्रज्ञांना सापडलेलं नाहीये.
आजवर अनेक प्राणीशास्त्रज्ञांनाही असंच वाटत होतं की या नॉर्वेजियन लेमिंगची संख्या गरजेपेक्षा वाढली की मग त्यांच्या शरीरात अशी काहीतरी नैसर्गिक उर्मी दाटून येते की ते दरीतून खाली पाण्यात उड्या मारून जीव देतात. या प्राण्यांची संख्या मर्यादित राहावी म्हणून निसर्गाने केलेली ही उपाययोजना आहे.
आता ही संख्या दर चार वर्षांनीच एकदा प्रमाणाबाहेर का वाढते याचं स्पष्टीकरण नसलं तरी ही गोष्ट घडल्यानेच तिथे इतर प्राण्यांचं अस्तित्व टिकून राहातं हेही खरंय.
टुंड्रा प्रदेशात, म्हणजे उत्तर ध्रुवाजवळच्या या भागात मानवी वस्ती सोडा, फारसे प्राणीही सापडत नाहीत. त्यामुळे इथली जैवसंस्था विरळ आहे.
ज्या काळात लेमिंगची संख्या वाढते, फक्त त्याच काळात इथे कोल्हे आणि या भागात आढणारे स्क्युअर नावाचे करकोच्यासारखे पक्षी प्रजनन करतात. त्या वर्षाला चक्क 'गुड लेमिंग इयर' असं नाव ठेवलेलं आहे.
कारण साहजिक आहे, टुंड्रासारख्या बर्फाळ प्रदेशात खाण्यासाठी काही असेल तर पुढची पिढी जन्माला घालण्यात अर्थ, नाहीतर पिल्लं मरून जातात.
टुंड्राच्या बर्फाळ प्रदेशात लेमिंग्सचं दर्शन होणंही अवघड असतं. एरवी ते दिसत नाही. फक्त तीन-चार वर्षांनी जेव्हा चांगला उन्हाळा वाटेला येतो, गवत भरपूर दिसायला लागतं, तेव्हा या प्राण्यांच दर्शन होतं.
तीन-चार वर्षातून दिसणारे एकदा दिसणारे लेमिंग्स आता सोशल मीडियावर लगेच हिट होतात. कधीकधी पर्यटकांच्या पायात येतात.
झोल्टोन टॉरोक या स्वीडीश दिग्दर्शकाने 'लेमिंग्स, द लिटल जायंट्स ऑफ द नॉर्थ' ही डॉक्यमेंट्री बनवली आहे. त्यात या लेमिंग्सचा आर्टिक आणि टुंड्रा प्रदेशातली जैवसंस्था टिकवण्यासाठी किती मोठा हात आहे त्याचं वर्णन केलेलं आहे.
लेमिंग विणीच्या हंगामात मोठ्या प्रमाणावर प्रजनन करतात. एक मादी एका हंगामात साधारण 8 वेळा पिल्लांना जन्म देते. एका वेळेस 8-10 पिल्लं. आणि गंमत म्हणजे या पिल्लांमध्ये ज्या माद्या असतात, त्या जन्मानंतर साधारण महिनाभरातच स्वतःची पिल्लं देतात.
विचार करा म्हणजे टुंड्रा प्रदेशात तीन महिने चालणाऱ्या या उन्हाळ्यात लेमिंग्सची संख्या किती वाढत असेल ते.
या लेमिंग्सचं मुख्य अन्न म्हणजे गवत, चारा, झाडांची पानं. जेव्हा लेमिंग्सची संख्या वाढते, त्यांच्या विष्ठेमुळे गवताला खत मिळतं, गवत जोमाने वाढतं. खायला अन्न मुबलक असलं की लेमिंगची संख्या वाढते आणि चक्र सुरू होतं.
टुंड्रा प्रदेशातल्या पर्वतरांगांमध्ये या प्राण्यांची संख्या इतकी वाढते की त्यांना खाली उतरून मैदानातल्या जंगलात अन्न शोधावं लागतं.
हजारो लेमिंग्स खाली उतरायला लागतात. पण रस्त्यात लागतात नुकत्याच वितळलेल्या आणि खळाळून वाहाणाऱ्या नद्या.
या नद्या ओलांडताना, भले पोहता येत असलं तरी अनेक लेमिंग्सचा बुडून मृत्यू होतो आणि पुढे त्यांचे मृतदेह वाहत येतात. शेकडो-हजारो लेमिंग्सचे मृतदेह कधी आर्क्टिक समुद्रात तर कधी आसपासच्या वितळलेल्या हिमनद्यांमध्ये तरंगताना दिसतात.
यामुळेच त्या दंतकथेला बळ मिळालं की लेमिंग आत्महत्या करतात. ते खरं आत्महत्येच्या विपरीत जगण्याची धडपड करत असतात. पण निसर्गात एका प्राण्याची संख्या बेसुमार वाढली की ती नियंत्रित ठेवण्याचं तंत्र आधीपासून अस्तित्त्वात आहेच आणि ते माणूस सोडून सगळ्यांनाच लागू होतं.
त्यामुळे आत्महत्या करत नसले, ती या लेमिंग्सची संख्या मर्यादित राहाते, कोल्हे आणि स्क्युअर सारख्या प्राण्यांची पुढची पिढी जन्माला येते आणि जगते, निसर्गाचं चक्र चालू राहतं. आता चार वर्षांनी पुढचं 'गुड लेमिंग इयर' येणार असतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)