You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एक पाकिस्तानी कर्नल नेपाळमधून बेपत्ता होण्यामागचं गूढ आजही कायम आहे
- Author, शकील अख्तर
- Role, बीबीसी प्रतिनिधी, काठमांडूहून
सुमारे पाच वर्षांपूर्वी पाकिस्तानी लष्कराचे माजी लेफ्टनंट कर्नल मोहम्मद हबीब झहीर नेपाळमधून गायब झाले होते. आजपर्यंत त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. एका नोकरीसंदर्भात मुलाखत देण्यासाठी ते नेपाळला आले होते. पण आज ही त्यांच्या गायब होण्याचं गूढ कायम आहे.
पाच वर्षानंतर, कर्नल झहीर यांच्या बेपत्ता होण्यामागचं गूढ समजून घेण्यासाठी आम्ही नेपाळमधील शोध पत्रकार, पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी बोललो. हे लोक तेव्हा एकतर मोठ्या पदावर होते, किंवा या प्रकरणासंदर्भात रिपोर्टिंग करत होते. कर्नल हबीब ज्या मार्गांने नेपाळला आले त्याच मार्गांवर जात आम्ही नेपाळला भेट दिली.
माजी लेफ्टनंट कर्नल मोहम्मद हबीब झहीर एप्रिल 2017 मध्ये लाहोरहून ओमानमार्गे नेपाळची राजधानी काठमांडूला पोहोचले. त्यानंतर ते त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. त्यानंतर त्यांना भारतीय सीमेनजीकच काही किलोमीटर अंतरावर असलेल्या लुंबिनीला जायचं होतं. त्यासाठी ते आंतरराष्ट्रीय विमानतळापासून थोड्या अंतरावर असलेल्या स्थानिक विमानतळावर गेले.
लुंबिनीचं विमानतळ भारतीय सीमेपासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर आहे. कर्नल हबीब विमानतळावरून निघाल्यावर त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांशी टेक्स्ट मेसेजने संपर्क साधला होता.
नेपाळला भारत-पाकिस्तानच्या भांडणात पडायचं नाही
लेफ्टनंट कर्नल हबीब बेपत्ता झाल्याची पडताळणी नेपाळने विशेष तपास समितीमार्फत करवून घेतली. मात्र या तपास समितीचा अहवाल कधीच सार्वजनिक करण्यात आला नाही.
नवराज सेलवाल हे त्यावेळी नेपाळ पोलिस दलाचे उपप्रमुख होते. सध्या ते लोकसभेवर सदस्य आहेत. बीबीसीशी बोलताना ते म्हणाले की, या प्रकरणाचा सोक्षमोक्ष अद्यापही लागला नसल्याने नवं पॅनेल बसवून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी.
पण, या प्रकरणाबाबत काहीही सांगण्यास मात्र त्यांनी साफ नकार दिला. ते म्हणतात, 'मी पोलिस दलात काम करत असताना माझ्या पदाच्या गोपनीयतेसाठी शपथ घेतली होती. आता राजकारणात आल्यानंतर मी तत्कालीन घटनांबद्दल वाच्यता करू शकत नाही.'
राजन भट्टराई हे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांचे सल्लागार होते. कर्नल हबीब नेपाळमध्ये नसल्याचं तपासात स्पष्ट झालं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, 'सरकारने त्यावेळी चौकशीसाठी एक पॅनेल तयार केलं होतं. त्यांनी सखोल चौकशी केली. कर्नल हबीब आता नेपाळमध्ये नाहीत मात्र ते नेपाळमधूनच गायब झाले असावेत असा सरकारचा अंदाज होता.'
पाकिस्तान सरकारने कर्नल हबीबच्या यांच्या बेपत्ता होण्यामागे भारताकडे बोट दाखवत 'शत्रूच्या गुप्तचर संस्थांचा हात' असल्याचा आरोप केला होता.
दुसरीकडे, या मुद्द्यावर भारताची भूमिका आहे की, 'पाकिस्तानचे माजी कर्नल नेपाळमधून बेपत्ता झाल्याची बातमी ऐकली तर आहे, मात्र आम्हाला यापेक्षा अधिकची काहीच माहिती नाही.'
नेपाळमध्ये भारतासह इतर अनेक देशांच्या गुप्तचर यंत्रणा सक्रिय आहेत. मी नेपाळच्या गृह मंत्रालयाशी संपर्क साधला आणि पोलीस अधिकार्यांशीही बोललो. पण कोणीच या विषयावर चकार शब्द काढायला तयार नव्हतं. हे प्रकरण खूप जुनं असून त्यांना याबाबत काहीही माहिती नसल्याचं त्या अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं.
नेपाळ हा दक्षिण आशियाई सहकार्य संघटना 'सार्क'चा सदस्य देश आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. कर्नल हबीब नेपाळमधून गायब झाल्याची खंत नेपाळच्या सरकारी कार्यालयात पाहायला मिळाली. मात्र भारत आणि पाकिस्तानच्या भांडणात नेपाळी सरकारला पडायचं नाही.
'भारताचा आशीर्वाद असणे महत्त्वाचे'
कर्नल हबीब बेपत्ता झाले त्यादरम्यानच्या काळात माजी पोलीस अधिकारी हेमंत मल्ला हे नेपाळच्या केंद्रीय अन्वेषण ब्युरोचे (सीआयबी) प्रमुख होते.
ते म्हणतात की, "अनेक कारणांमुळे नेपाळ, परदेशी गुप्तचर संस्थांच्या कारवायांचं केंद्र राहिलं आहे. त्यांच्या मते, नेपाळमध्ये भारतीय गुप्तहेर संस्थेचा वरचष्मा आहे. पाकिस्तान आणि चीन ही नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहेत. पाश्चात्य देशांचे स्वतःचे प्राधान्यक्रम आहेत."
ते म्हणतात, "नेपाळ कधी कधी इतर देशांच्या कारवायांमध्ये अडकतो," अनेक वेळा तर असं झालंय की या दोन देशांच्या कारवायांमध्ये नेपाळनं कुठं जावं काय करावं असा पेच उभा राहिला आहे. नेपाळच्या एजन्सीज व्यावसायिकदृष्ट्या पुरेशा कुशल नाहीत, त्यामुळे बाहेरील एजन्सीज इथं समस्या निर्माण करतात.
कर्नल हबीब बेपत्ता होण्यामागे कोणत्यातरी गुप्तचर यंत्रणेचाच हात असल्याचं मत आहे. याबाबत शोध पत्रकार सरोजराज अधिकारी यांची भेट घेतली. नेपाळमधील परदेशी गुप्तचर संस्थांच्या कारवायांवर त्यांनी दोन पुस्तकं लिहिली आहेत.
त्यांच्या मते, नेपाळमध्ये भारतीय गुप्तचर संस्थेचा प्रभाव व्यापक प्रमाणावर आहे. ते म्हणतात, "इथल्या लोकांना असं वाटतं की जो कोणी ही भारताच्या विरोधात जाईल, तो ना राजकारणात प्रगती करू शकतो, ना पोलीस दलात आणि नोकरीत प्रगती करू शकतो. जर तुम्ही भारताला खुश ठेवण्यात अयशस्वी झालात तर तुम्ही प्रशासनातील सर्वोच्च पदापर्यंत पोहोचणार नाही असा सर्वसामान्य समज आहे. भारताचा नेपाळमधील प्रत्येक क्षेत्रात मोठा प्रभाव आणि हस्तक्षेप आहे.
ती व्यक्ती कोण होती?
कर्नल हबीब झहीर यांनी काठमांडूहून लुंबिनीला जाण्यासाठी देशांतर्गत विमान घेतलं. काठमांडूमध्ये त्यांना जी व्यक्ती घ्यायला आली होती त्याच व्यक्तीने त्यांना हे तिकीट दिलं होतं.
लुंबिनीतील त्या विमानात चढण्यापूर्वी कर्नल हबीब यांनी विमानतळावर स्वतःचा एक फोटोही काढला होता. मात्र तो सेल्फी नव्हता तर तो फोटो दुसऱ्याच कोणत्यातरी व्यक्तीने काढला होता. ती व्यक्ती बहुधा काठमांडूहून त्यांच्यासोबत प्रवास करत होती. ती व्यक्ती या प्रकरणात एक अतिशय महत्त्वाचा दुवा आहे.
कर्नल हबीब झहीर यांना युनायटेड नेशन्सच्या नोकरीच्या मुलाखतीच्या संदर्भात लुंबिनी मध्ये बोलावण्यात आलं होतं. तो एक प्रकारचा सापळा होता असं आता तरी वाटतं.
लुंबिनी हे नेपाळ आणि भारत यांच्यादरम्यानचं सीमावर्ती शहर आहे. बौद्ध धर्माची सुरुवात करणाऱ्या गौतम बुद्धांचा जन्म याच शहरातला आहे. बौद्ध धर्माच्या अनुयायांसह जगभरातून पर्यटक मोठ्या संख्येने या शहराला भेट देतात.
इथली मंदिरं पाहण्यासाठी जगभरातून, देश विदेशातून हजारो पर्यटक आणि गौतम बुद्धांचे अनुयायी नेपाळच्या या शहराला भेट देतात. हे विशेष धार्मिक स्थळ आहे.
लुंबिनी विमानतळ भारतीय सीमेपासून फक्त 5 किलोमीटर अंतरावर आहे. या विमानतळावरून बाहेर पडल्यानंतर कर्नल हबीब यांनी एक टेक्स्ट मेसेज करून त्यांच्या कुटुंबीयांशी शेवटचा संपर्क साधल्याचं सांगितलं जातं.
'थोडी वाट बघितली तर, अक्षय कुमारचा यावरही चित्रपट येईल'
कर्नल हबीब यांना भारताच्या दिशेने नेण्यात आल्याचं सरोज राज अधिकारी यांचं मत आहे. ते म्हणतात की, "मला वाटतं की त्यांना सीमेच्या दक्षिणेकडे (भारत) नेण्यात आलं असावं." भारत इथं जे काय करतो त्याची एक खून सोडून जातो. जेणेकरून आमचा इथं किती प्रभाव आहे हे तुमच्या कायम लक्षात राहील.
ते म्हणतात, 'अजून 6-7 वर्षे थांबा. कर्नल हबीबच्या अपहरणाची कारवाई कशी झाली यावर सुद्धा अक्षय कुमारचा एखादा चित्रपट येण्याची शक्यता आहे.'
नेपाळ सरकारच्या तपासात काहीही निष्पन्न झालं नसेल तरी पण एक गोष्ट स्पष्ट झालीआहे. ती म्हणजे, लेफ्टनंट कर्नल हबीब झहीर हे लुंबिनी विमानतळ, भारताची सीमा आणि लुंबिनी यादरम्यानचं कुठेतरी गायब झाले असावेत.
पण त्यांच्या सोबत प्रवास करणारी व्यक्ती नेमकी कोण होती ? त्यांना नेपाळमध्ये कोणी रिसिव्ह केलं? या प्रश्नांवर मात्र नेपाळच्या सुरक्षा यंत्रणा आजही मौन बाळगून आहेत. त्यामुळे पाच वर्ष झाले तरीही कर्नल हबीब यांच्या बेपत्ता होण्यामागचं गूढ आजही कायम आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)