You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Bra कशी निवडायची? चुकीच्या साईजची ब्रा वापरल्यामुळे खरंच गंभीर आजार होतात का?
जगभरात असे अनेक अभ्यास झालेत, बायकांनी त्यांच्या वैयक्तिक अनुभवातून सांगितलं आहे की जवळपास 80 टक्के बायका चुकीची ब्रा घालतात.
म्हणजे ती ब्रा त्याच्या मापाची नसतेच. एकतर लहान असते, एकतर मोठी असते नाहीतर कपसाईजचा घोळ असतोच.
अब्जावधी डॉलर्सची उलाढाल असलेल्या या ब्रा व्यवयासात 10 पैकी 8 बायकांना आपल्या मापाची सुयोग्य अशी ब्रा मिळू नये यापेक्षा दुर्दैव नाही.
पण असं का घडतं? आधी हे पाहू की महिला चुकीची ब्रा का निवडतात.
प्रो किफा मोकबेल लंडनच्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये काम करतात. त्यांच्या मते, "महिला त्यांच्या पाठीची साईज मोजताना चुकतात. त्या त्यांच्या पाठीची साईज मोजताना 4 इंचापर्यंत कमी मोजतात तर त्यांची कपसाईज (प्रत्यक्ष स्तनांची साईज) मोजताना 3 इंचापर्यंत जास्त मोजतात."
ते पुढे असंही म्हणतात की चुकीच्या पद्धतीच्या ब्रा दीर्घकाळ घालत राहिलं तर पाठीचं आणि मानेचं दुखणं लागतं आणि कधी कधी तर पाठीचं किंवा मानेचं ऑपरेशनही करावं लागतं.
चुकीच्या मापाच्या ब्रा घातल्या तर आणखी कोणकोणते त्रास होऊ शकतात याचं उत्तर देताना ते म्हणतात की, "खांदेदुखी, मानदुखी, चुकीचं पोश्चर आणि स्तनदुखी" अशा प्रकारचे त्रास दीर्घकाळ होऊ शकतात. खूप टाईट पट्टे असतील तर अंगावर रॅश येतात, चट्टे उठतात किंवा ब्राची अंडरवायर सरळ स्तनात घुसून जखम होते आणि काहीच नाही तरी चुकीच्या साईजच्या ब्रा घातल्यानंतर शरीराची ठेवण आकर्षक दिसत नाही ते वेगळंच.
या सगळ्या त्रासांना टाळायचा एकच उपाय आहे ते म्हणजे योग्य प्रकारची, योग्य साईजची ब्रा घालणं.
योग्य ब्रा कशी निवडावी?
आता येऊ कळीच्या मुद्द्याकडे की योग्य ब्रा कशी निवडावी. बरं मुळात ब्राचे इतके प्रकार असतात की पहिला प्रश्न असतो या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये, उदाहरणार्थ पॅडेड, अंडरवायर्ड, ब्रालेट आणि पुशअप, फरक काय असतो?
त्याहीपेक्षा महत्त्वाचा प्रश्न - कपसाईज A, AA, B, C, D या कशा वेगळ्या असतात.
सेडी यूकेतल्या कॉन्सेंट शहरात महिलांच्या अंतवस्त्रांचं दुकान चालवतात. त्यांनी या सगळ्या प्रश्नांची उत्तर बीबीसीला दिली आहेत.
त्या म्हणतात, "मी फक्त समोरच्या बाईकडे पाहून तिने चुकीची ब्रा घातलीये हे सांगू शकते आणि तिने कोणत्या साईजची ब्रा घालावी हेही सांगू शकते."
बायका चुकीची ब्रा घालतात कारण त्यांना जे मापाचं गाईड दिलं जातं मुळात तेच चुकीचं आहे असं त्यांचं मत आहे.
सेडी एखाद्या महिलेची ब्रा साईज निवडताना तिच्या पाठीची साईज मोजतात आणि तिने अंगात घातलेली ब्रा तिच्या खांद्यांवर कशी बसली आहे ते पाहातात.
ब्राचे पट्टे अतीसैल असल्याने खांद्यावरून घरंगळणं किंवा अतिघट्ट आहेत म्हणून त्वचेत रुतून बसणं हे महिलांच्या बाबतीत नेहमीच घडतं.
सेडी म्हणतात की, "चांगली ब्रा तुम्हाला नेहमीच आत्मविश्वास देते."
तुमच्या अंगातली ब्रा चुकीच्या साईजची आहे का?
आपली ब्रा साईज कशी निवडायची यासाठी सेडी यांनी दिलेल्या या काही टिप्स.
तुमच्याकडे असलेली ब्रा घाला आणि खालील गोष्टी होतायत का पहा.
- तुमचे स्तन तुमच्या ब्राच्या बाहेर ओघळतात.
- तुमच्या ब्राचे स्ट्रॅप्स खाली घसरतात.
- तुमची ब्रा पाठीवर तरंगते.
- तुमची ब्रा इतकी घट्ट बसते की त्वचेवर वळ उमटतात.
- ब्रा घातल्यानंतर कसंतरी होतं. तुम्ही सतत चूळबूळ करता.
ही सगळी लक्षण तुमच्या अंगातली ब्रा चुकीची असल्याची आहेत.
परफेक्ट फिटिंगची ब्रा कशी ओळखावी?
आता येऊ मुख्य मुद्द्याकडे. चांगली ब्रा, एकदम परफेक्ट फिटची कशी ओळखावी?
सेडी म्हणतात की खरंतर ब्रा तुमच्या आयुष्यातला इतका महत्त्वाचा घटक असतो की त्यावर थोडे जास्त पैसे खर्च करायला हरकत नाही.
ब्रा नेहमी चांगल्या दुकानातून घ्यावी जिथे तुम्हाला घालून पाहाता येईल आणि तिथले मदतनीस तुम्हाला योग्य ब्रा निवडायला मदत करतील.
"एकवेळ कपड्यांवर पैसे खर्च कमी करा पण ब्रावर जास्त खर्च करा," त्या म्हणतात.
पण तुमची साईज तुम्हाला मोजायची असेल तर या गोष्टी करा.
तुमच्या एखाद्या मैत्रिणीला मदतीसाठी बोलवा आणि माप घ्या.
सर्वात आधी तुमच्या स्तनांच्या बरोबर खाली तुमच्या छातीच्या फासळ्यांची साईज मोजा. त्यात पाच इंच वाढवले की ती तुमच्या पाठीची साईज होते.
म्हणजे तुमच्या स्तनांच्या खाली फासळ्यांची साईज 28 इंज असेल तर तुमच्या पाठीची साईज (ब्रा बँड साईज) 33 इंच असेल. पण फासळ्यांचीच साईज 33 इंच किंवा जास्त असेल तर मग त्यात नंतर 3 इंचच वाढवा. ती तुमच्या पाठीची साईज असेल.
आता कप साईज मोजण्यासाठी तुमच्या स्तनांचा सर्वात भरीव भाग मोजा आणि त्यातून तुमच्या पाठीची साईज वजा करा. ती तुमची कप साईज. त्याचंही गणित आहे. गणित ऐकून घाबरू नका. चांगली ब्रा हवीये ना?
तुमच्या स्तनांच्या सर्वात भरीव भागाची साईज आणि पाठीची साईज यांची वजाबाकी झाल्यानंतर जे उत्तर येईल ते कपसाईज चार्टशी ताडून पाहा.
- 0 इंच - कपसाईज AA
- 1 इंच - कपसाईज A
- 2 इंच - कपसाईज B
- 3 इंच - कपसाईज C
- 4 इंच - कपसाईज D
- 5 इंच - कपसाईज DD
भविष्यातल्या ब्रा कशा असतील?
काही तज्ज्ञांना वाटतं की भविष्यात मायक्रोचीप असणाऱ्या 'स्मार्ट ब्रा' असतील. तुमच्या शरीराच्या हालचालींप्रमाणे त्या घट्ट किंवा सैल होतील आणि तुम्हाला आराम देतील.
काही रिसर्च असेही चालू आहेत ज्यात ब्रात काही इलेक्ट्रिकल करंट आहेत जे तुमच्या स्तनांमध्ये होणारी पेशींची अचानक वाढ लक्षात आणून देतील ज्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचा सुगावा लवकर लागू शकेल.
पण तशा भविष्यातल्या ब्रा प्रत्यक्षात यायला वेळ आहे, तोवर आपण सुयोग्य ब्रा निवडणं हेच आपल्या हातात आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)