रशिया-युक्रेन युद्धात पुतिन विजयाच्या दिशेने जात आहेत की पराभवाच्या?

फोटो स्रोत, AFP
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी विजय दिवस परेडमध्ये काहीही दाखवण्याचा प्रयत्न केला किंवा कार्यक्रमाला कोणताही रंग देण्याचा प्रयत्न केला तरी त्याला युक्रेनवर विजय मिळवला असं म्हणता येणार नाही.
संरक्षण विश्लेषक मायकल क्लार्क यांनी या संपूर्ण युद्धाच्या रणनीतीचे विश्लेषण केले आहे. ते काय म्हणाले जाणून घेऊया,
2008 नंतर पुतिन यांनी जगभरात जिथे यश मिळवलं ते विशेष सैन्य दलांच्या छोट्या तुकड्या, स्थानिक मिलिशिया (आपत्कालीन परिस्थिती काम करणारे लष्करी दल), सैनिक आणि वायू दलाच्या ताकदीमुळे. या कामगिरीच्या आधारे रशियाने आतापर्यंत कमी खर्चात मोठं यश मिळवलं.
2014 मध्ये रशियाने बेकायदेशीरपणे क्रायमियावर ताबा मिळवला आणि त्यानंतर पूर्वेकडील लुहांस्क आणि दोनोत्स्क या दोन राज्यांना स्वयंघोषित समर्थक राज्य म्हणून घोषणा केली.
खरं सांगायचं झाल्यास पश्चिमी देश केवळ पाहत राहिले आणि रशियाने प्रत्येक प्रकरणात तातडीने आणि आक्रमकतेने काम केलं. पश्चिमी देशांनी रशियावर निर्बंध तर आणली पण प्रत्यक्षात परिस्थिती त्यांनाही बदलता आली नाही.

फोटो स्रोत, Getty Images
'नवीन तथ्य निर्माण करण्यात' पुतिन पारंगत असल्याचं दिसलं. हेच त्यांनी यावर्षी फेब्रुवारी महिन्यात युक्रेनमध्ये करण्याचा प्रयत्न केला. साडे चार कोटी लोकसंख्या असलेला देश आणि युरोपातील सर्वात मोठा भूभाग असलेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या प्रदेशावरील सत्ता 72 तासांत काबीज करण्याची त्यांची इच्छा होती. ही हैराण करणारी रणनीती असून यात निष्काळजीपण होता आणि ही योजना पहिल्याच आठवड्यात फसली.
पुतिन यांच्या हातात आता पुढे जाण्याशिवाय खूप कमी पर्याय आहेत. केवळ युक्रेनमध्येच नाही तर त्यापुढेही सीमेबाहेर ते जाऊ शकतात. सध्याच्या परिस्थितीत संकट आणखी गंभीर होणं निश्चित आहे आणि युरोप आपल्या हल्लीच्या इतिहासातील सर्वाधिक धोकादायक टप्प्यावर आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की प्रतिकार करतील किंवा जगभरातून प्रतिक्रिया येण्यापूर्वीच युक्रेनवर सत्ता मिळवण्यासाठीची पहिली योजना अयशस्वी ठरल्यानंतर रशियाने 'प्लॅन बी' नुसार काम सुरू केलं आहे.
यानुसार सैन्याची ताकद वापरून राजधानी किव्हला घेराव घातला आणि युक्रेनच्या सैन्याला प्रतिबंध करण्यासाठी रशियन सैन्य चेर्नीहीव्हस खार्कीव्ह, सुमी, दोनेत्स्क, मारियापोल आणि मायकोलेव्ह या युक्रेनच्या दुसऱ्या शहरांतही घुसलं. जेणेकरून राजधानी कीव्ह उद्ध्वस्त होण्याचा धोका उद्भवू शकेल.

फोटो स्रोत, Reuters
परंतु रशियाची ही योजनादेखील अयशस्वी ठरली. युक्रेनमधील खार्सेन हे एकमेव मोठं शहर काबीज करण्यात रशियाला यश आलं. पण इथेही स्थानिक रशियाच्या प्रशासनाला विरोध करत आहेत.
एवढ्या मोठ्या देशावर नियंत्रण मिळवण्यासाठी रशियाच्या सैन्याची संख्या कमी होती हे तथ्य आहे. अनेक कारणांमुळे रशियन सैन्याची कामगिरी खराब राहिली. सर्वप्रथम सैन्याचे नेतृत्व कुचकामी ठरले आणि दुसरं म्हणजे चार आघाड्यांवर ते विभागले गेले. किव्हपासून मायकोलेव्हपर्यंत कोणताही एक कमांडर त्याठिकाणी नव्हता. त्यांचा सामना प्रशिक्षण झालेल्या आणि क्षमता असलेल्या युक्रेनी लष्कराशी होता आणि त्यांनी त्यांच्याविरोधात लढा दिला.
युक्रेनचे सैन्य केवळ एकाच आघाडीवर लढत नव्हते, तर शत्रूचे सर्वाधिक नुकसान जिथे होऊ शकेल तिथे ते हल्ला करत होते.
निराश आणि संभ्रमावस्थेत असलेला रशिया आता प्लॅन सीनुसार काम करत आहे. यानुसार त्यांनी कीव्ह आणि उत्तर युक्रेन सोडलं असून लष्कराची पूर्ण शक्ती दक्षिण युक्रेन आणि डोनबास क्षेत्रवर आक्रमणासाठी वापरली जात आहे. हा हल्ला दक्षिण पूर्वेकडील ओडेसापर्यंत सुरू राहू शकतो. ही युक्रेनला लँडलॉक करण्याची रणनीती आहे ज्यामुळे त्यांचा सागरी मार्ग बंद करता येऊ शकेल.
रशियन सैन्याची हीच रणनीती आम्ही सध्या पूर्वेकडील ईजियम, पोपासेन, कुरूल्का आणि ब्राजकिव्का याठिकाणी पाहत आहोत.

फोटो स्रोत, Getty Images
रशियाचे लष्कर युक्रेनचे जॉईंट फोर्स ऑपरेशनला (JFO) घेरण्याच्या तयारीत आहे. या योजनेसाठी युक्रेनची जवळपास 40 टक्के सैन्य काम करत आहे. युक्रेनपासून स्वतंत्र झालेले लुकान्स्क आणि दोनेत्स्क क्षेत्रात 2014 पासून ही तुकडी काम करत आहे.
यावेळी सध्या रशियाचा प्रमुख उद्देश स्लोव्यान्स्क आणि त्याहून थोडं पुढे क्रामतोर्स्कपर्यंत ताबा मिळवणं हा आहे. डोनबास प्रदेशावर नियंत्रण मिळवण्यासाठी या दोन शहरांचा ताबा मिळवणं त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे.
लष्कर एकमेकांसमोर उभं राहतील यापूर्वीच शत्रूला उद्ध्वस्त करण्यासाठी बनवलेले तोफखाने वापरण्यात येऊ शकतात अशीही योजना आहे. पण ही प्रक्रिया सरळ नाही.
रशियाचं आक्रमण करणारं सैन्य सुरुवातीलाच गोंधळात पडलं आणि युक्रेनच्या जेएफओने रशियाच्या सैन्याला अशा राज्यात पोहचण्यापासून रोखलं जिथे आतापर्यंत ताबा मिळवणं रशियाला अपेक्षित होतं.

यामुळे युक्रेनला स्वत:साठी वेळ मिळाला. आता अवजड लष्करी उपकरणांची तयारी सुरू आहे. प्रत्येक पक्षाला रणांगणात उतरण्यापूर्वी मोठी लष्करी शस्त्र पोहचवायची आहेत. पुढच्या आठवड्यापर्यंत आपल्याला या पार्श्वभूमीवर घडामोडी दिसतील.
दरम्यान, डोन्बासमध्ये जे काही होईल त्याचा अर्थ पुतिन यांच्यासाठी अपयशाचेच वेगवेगळे पर्याय दिसतील.
हिवाळ्यापर्यंत युद्ध सुरू राहिल्यास आणि स्थैर्य राहिल्यास त्यांच्याकडे एवढे मोठे नुकसान आणि विध्वंसाच्या बदल्यात फारसं काही राहणार नाही. लष्कराने परिस्थिती बदलली आणि पुतिन यांच्या सैन्याला माघार घ्यावी लागली तर त्यांच्यासमोर कठीण परिस्थिती निर्माण झालेली असेल. रशियन लष्कराने डोनबास क्षेत्र काबीज केले तरीही ताबा कायम ठेवणं सोपं राहणार नाही. विशेषत: जेव्हा लाखो युक्रेनवासी या परिस्थितीला विरोध करतील.
रशियाची कोणतीही मोठी लष्करी कामगिरी उघड आणि मोठ्या विद्रोहाला जन्म देणारी ठरेल आणि रशिया जसजसा युक्रेनच्या लष्करावर ताबा मिळवेल तसा हा विद्रोह आणखी तीव्र होईल.
पुतिन यांनी फेब्रुवारीमध्येच आपली योजना यशस्वी करण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली होती. ही योजना यशस्वी होऊ शकली नाही याचा अर्थ रशियाला प्लॅन बी किंवा प्लॅन सी किंवा पुढील योजनेसाठी आणखी शक्ती वापरावी लागेल. एका मोठ्या देशाचे काही भाग किंवा पूर्ण क्षेत्रावर दबाव आणण्यासाठी हे गरजेचं ठरेल.

पश्चिमेकडील देश युक्रेनला शस्त्र आणि आर्थिक मदत करत राहतील. रशियावरील निर्बंध लवकर उठवले जाणार नाहीत. एकदा युरोपचे रशियावरील ऊर्जेसाठीचे अवलंबित्व बऱ्यापैकी कमी झाले की, मग रशियाकडे युरोपसाठी फार काही राहणार नाही. अमेरिका आणि युरोप रशियाची अर्थव्यवस्था कमकुवत करण्याच्यादृष्टीने निर्बंध कायम करतील.
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याकडे माघार घेण्याचे सर्व मार्ग आता बंद झालेले असू शकतात आणि त्यांच्यावर युद्ध गुन्ह्याचा खटला सुद्धा चालवला जाऊ शकतो. त्यांच्याकडे एकमेव ही रणनीती असू शकते की युक्रेन युद्धाला ते वेगळ्या पद्धतीने जगासमोर आणण्याचा यशस्वी प्रयत्न करू शकले तर. उदाहरणार्थ- कथित नाझी किंवा 'रशियाला अपमानित करण्यासाठी 'पश्चिम साम्राज्यवादी' विरोधात रशियाची अस्तित्त्वाची लढाई सुरू आहे' असं काही दाखवण्याची रणनीती त्यांनी वापरल्यास.
रशिया समोर यूरोप विरोधात 'महान युद्ध 2.0'चा विध्वंसक धोका आहे असे काही भयानक विचार ते मांडू शकले तर याचीही शक्यता आहे. विजय दिवशी यासंदर्भात आणखी काही ऐकायला मिळेल अशीही शक्यता आहे.
आपल्या देशाला एका मोठ्या काळोखातून बाहेर काढून प्रकाशाकडे घेऊन जात असल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष पुतिन करू शकतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








