Eid al-Fitr - Ramadan : जगातील सर्व मुसलमान एकाच दिवशी ईद का साजरी करत नाहीत?

सौदी अरबमध्ये सोमवारी, 2 मे रोजी ईद साजरी होतेय. सौदी प्रेस एजन्सीने रॉयल कोर्टाच्या हवाल्याने सांगितलं की, रविवारी, म्हणजे 1 मे रोजी रमजानचा शेवटचा दिवस होता आणि सोमवारी, 2 तारखेला ईद उल फित्रचा पहिला दिवस असेल.

तर अफगाणिस्तानात रविवारी, 1 तारखेलाच ईद साजरी झाली आहे.

भारताचं म्हणायचं झालं तर इथे 3 मेला, म्हणजे मंगळवारी ईद साजरी होणार आहे. अशात हा प्रश्न मनात येतो की जगभरातले मुस्लीम एकाच दिवशी ईद का साजरी करत नाहीत.

बीबीसी बांगला प्रतिनिधी रकीब हसनत आपल्या लेखात समजावून सांगतात.

बांगलादेशच्या इस्लामिक फाऊंडेशनची चंद्रदर्शन समिती हे ठरवते की मुस्लीम समुदायाचा सगळ्यांत मोठा सण ईद-उल-फित्र कोणत्या दिवशी साजरा करायचा. सहसा ही समिती रमजानच्या 29 व्या दिवशी दुपारी बैठक करून ईद कधी असेल हे ठरवते.

जर रमजानच्या 29 व्या दिवशी देशात कुठेही चंद्रदर्शन झालं तर दुसऱ्या दिवशी ईद साजरी होईल अशी घोषणा होते. जर चंद्र दिसला नाही तर रमजानचे 30 दिवस पूर्ण झाल्यावर ईद साजरी होते.

बांगलादेशमध्ये सहसा सौदी अरबच्या एका दिवसानंतर ईद साजरी होते. काही ठिकाणी सौदीच्या बरोबरच ईद साजरी होते पण दरवर्षी चंद्र दिसण्यावरून वाद होतात.

बांगलादेशचे प्रसिद्ध फिजिसिस्ट आणि इस्लाम तसं विज्ञानावर लिहिणारे लेखक डॉ समशेर अली म्हणतात की मुस्लीम जगत इस्लामच्या नियमांचं पालन करून एकाच दिवशी ईद साजरी करू शकतात.

समशेर यांच्या मते आपल्याच देशात चंद्र बघायला हवा असा काही नियम नाही.

ते म्हणतात, "असं नाहीये की चंद्रदर्शन स्वतःच्याच देशात झालं पाहिजे. इमाम अबू हनीफा आणि पैगंबरांनी म्हटलंय की एकाच दिवशी रोजे सुरू झाले पाहिजेत आणि संपले पाहिजेत. जेव्हा चंद्र उगवतो तेव्हा चंद्रमास सुरू होतो."

समशेर अली म्हणतात की मक्का मुसलमानांसाठी पवित्र जागा आहे आणि जर तिथे चंद्र दिसला तर त्या आधारे मुस्लीम देशांमध्ये ईद साजरी केली जाऊ शकते. दोन देशांमधलं वेळेचं अंतर इतकं महत्त्वाचं नाहीये.

ऑर्गनाझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनने एकाच दिवशी रोजे सुरू होणं आणि ईद साजरी होणं याची शिफारस केली आहे.

तरीही सौदी अरबच्या एका दिवसानंतरच बांगलादेशात ईद साजरी केली जातेय कारण राष्ट्रीय चंद्रदर्शन समितीचा तर्क आहे की पैगंबर म्हणतात चंद्र पाहूनच रोजे सुरू झाले पाहिजेत आणि संपले पाहिजेत.

वेगवेगळे तर्क का?

भौगोलिक कारणांमुळे बांगलादेशात अरब देशांच्या तुलनेत एक दिवस उशीरा चंद्र दिसतो.

पण बांगलादेशाच्या प्रमाणवेळेच्याही पुढे असणारे मलेशिया आणि इंडोनेशियासारखे देश अरब देशांसारखीच ईद साजरी करतात. आफ्रिका खंडातली काही मुस्लीम राष्ट्रही असं करतात.

ढाका विद्यापीठातले अरेबिकचे प्राध्यापक झुबैर मोहम्मद अहसानुल हक यांचं म्हणणं आहे की मुस्लीम नियमांप्रमाणे जर कोणत्याही मुस्लीम देशात चंद्रदर्शन झालं तर ते सगळ्या मुस्लिमांना लागू पडतं.

हिजरी वर्षाचा चंद्रमास प्रत्यक्ष डोळ्यांना चंद्र दिसला की सुरू होतो हे सगळ्यांनाच मान्य आहे. हाच इस्लामचा नियम आहे.

म्हणून अनेक इस्लामिक धर्मगुरू आजही आपआपल्या देशात प्रत्यक्ष डोळ्यांना चंद्र दिसण्यावर विश्वास ठेवतात.

कुशतिया इस्लामिक विद्यापीठात अल-कुराण आणि इस्लामिक स्टडीज विभागाचे प्राध्यापक एएफएम अकबर हुसेन म्हणतात की शरिया बोर्डाच्या शिफारशीवर ईद ठरली तर कोणाचा गोंधळ उडेल असं वाटत नाही.

आंतरराष्ट्रीय स्तरावर काय ठरलंय?

मे 2016 मध्ये टर्कीच्या इस्तंबुलमध्ये एक आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स आयोजित केली होती. टर्की, कतार, जॉर्डन, सौदी अरब, मलेशिया, यूएई, मोराक्कोसह 50 देशांचे इस्लामिक स्कॉलर्स इथे एकत्र आले होते.

या कॉन्फरन्सला इंटरनॅशनल हिजरी कॅलेंडर युनियन या नावाने ओळखलं जातं. या परिषदेत जगभरातल्या मुस्लिमांध्ये हिजरी कालगणनेवरून जो वाद आहे त्याबद्दल काही निर्णय घेण्यात आले होते.

बहुतांश लोकांचं म्हणणं आहे की जगातल्या सगळ्या मुसलमानांना एका कालगणनेत समाविष्ट केलं पाहिजे. जर असं झालं तर संपूर्ण जगात एकाच दिवशी रोज्यांची सुरूवात आणि ईद असू शकेल.

ईद-उल-फित्र म्हणजे काय?

रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवशी ईद-उल-फित्र साजरी केली जाते. रमजान महिना म्हणजे प्रार्थना आणि रोजा (उपवास) करण्याचा महिना.

ईद-उल-फित्र याचं शब्दशः भाषांतर करायचं झाल्यास उपवास सोडताना साजरा केला जाणारा सण असं करता येऊ शकेल.

ईद महिना संपल्यानंतर पहिल्यांदा चंद्र दिसतो, त्यावेळी रमजान ईद साजरी होते. ईदच्या दिवशी मुस्लीम नवे कपडे घालून मशिदीत जातात. शिरखुर्मासारखे गोड पदार्थ घरात बनवले जातात.

ईदची नमाज अदा करण्यापूर्वी गरिबांना दान स्वरुपात काहीतरी देण्याची परंपरा आहे. या दानाला जकात असं संबोधलं जातं. प्रत्येक मुस्लीम व्यक्ती ही जकात देऊन नमाज पठण करण्यास जाते.

नमाजानंतर परतताच मित्र-नातेवाईकांसोबत जेवणावर यथेच्छ ताव मारला जातो. एकमेकांना भेटवस्तू, पैसे दिले जातात. याला ईदी असं म्हटलं जातं. जगभरातील अनेक देशांमध्ये ईदला सार्वजनिक सुटी असते.

एखाद्या व्यक्तीला ईदच्या शुभेच्छा द्यायच्या असल्यास त्यांना ईद-मुबारक म्हणून शुभेच्छा दिल्या जातात.

रमजान म्हणजे काय?

रमजान हे एक अरेबिक नाव आहे. इस्लामिक कॅलेंडरमधील नवव्या महिन्याला रमजान महिना म्हणून ओळखलं जातं. मुस्लीम धर्मियांसाठी हा अत्यंत पवित्र महिना आहे.

मुस्लीम धर्मातील पाच मूळ तत्त्वांपैकी एक म्हणूनही रमजान महिना ओळखला जातो. प्रत्येक मुस्लीम व्यक्तीला ही पाच मूळ तत्त्वं पाळावीच लागतात. अल्लाहने तसा आदेश दिला आहे, असंही म्हटलं जातं.

रमजान महिन्यातच पवित्र कुराण या ग्रंथाचे सुरुवातीची वचनं लिहिली गेली, अशी मुस्लीम धर्मीयांमध्ये मान्यता आहे. त्यामुळेच या काळात कुराण पठण करण्यावर अधिक भर दिला जातो.

शिवाय, रोजा करणं हा प्रार्थना करण्याचा, अल्लाहच्या जवळ जाण्यासाठीचा एक मार्ग असल्याची मुस्लीम बांधव मानतात. आरोग्य आणि स्वयंशिस्त उत्तम राहण्यासाठीही रोजा करणं चांगलं असल्याचं म्हटलं आहे.

ईद हा सण दरवर्षी 11 दिवस मागे का येतो?

त्याचं कारण मुस्लीम धर्मियांचे सण ठरवणाऱ्या कॅलेंडरमध्ये आहे. मुस्लीम कॅलेंडर Lunar म्हणजे चांद्र कॅलेंडर आहे.

चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. चंद्राला एका अवस्थेत पुन्हा येण्यासाठी साधारणपणे 29.5 दिवसांचा काळ लागतो. म्हणजेच एका अमावस्येनंतर पुढची अमावस्या यायला 29.5 दिवस लागतात.

हा दोन अमावस्यांमधला काळ एक महिना म्हणून गणला जातो. असे 12 महिने मिळून एक चांद्र वर्ष होते. एका महिन्यात केवळ 29.5 दिवस असल्यामुळे या चांद्र वर्षात केवळ 354 दिवस असतात.

सौर कॅलेंडरमध्ये मात्र 365 दिवस असल्याचं तुम्हाला माहिती आहे. त्यामुळेच चांद्र कॅलेंडर आणि सौर कॅलेंडरमध्ये 11 दिवसांचा (365-354) फरक पडतो. यामुळेच दरवर्षी रमजान ईदचा सण 11 दिवसांनी मागे येतो.

यासंबंधी सविस्तर माहिती तुम्हाला इथे क्लिक करून मिळेल.

ईदची वेळ ठरवण्यात का अडचणी येतात?

ईदचा दिवस चांद्र कॅलेंडरचा 10वा महिना 'शव्वाल'च्या पहिल्या तारखेला येतो. पण ईदचा मुळ दिवस कोणता असावा यावर इस्लाममध्ये चर्चा होत आली आहे.

अनेक देशातले मुस्लीम लोक स्वत: चंद्र पाहण्याऐवजी त्या देशात चंद्र पाहण्यास जबाबदारी दिलेल्या अधिकाऱ्यांवर अवलंबून राहतात.

तर काही ठिकाणी सौर कॅलेंडरचाही आधार घेतला जातो. तर इतर ठिकाणी खगोलशास्त्राचीही मदत घेतली जाते.

सुन्नी बहुल मुस्लीम देशांत सौदी अरेबियानं ठरवलेल्या वेळी ईद साजरी करतात. तर शिया बहुल मुस्लीम देशात इराणने ठरवलेली ईदची वेळ साजरी करतात.

त्यामुळेच जगभरातले मुस्लीम एकाच दिवशी ईद साजरी करत नाहीत. ईद साजरी करण्यात एक ते दोन दिवसांचा फरक आढळतो.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)