You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
वजन कधी कमी होतं? आपण दिवसातून कितीदा जेवायला हवं?
- Author, जेसिका ब्रॅडले
- Role, बीबीसी फ्युचर
साधारणपणे आपण दिवसात तीनदा जेवतो. आपल्या आधुनिक जीवनशैलीचा तो आता भाग झाला आहे. सकाळचा नाश्ता सगळ्यात महत्त्वाचा आहे असं आपल्याला सांगितलं जातं. ऑफिसमध्ये आपल्याला जेवणाची वेगळी सुट्टी दिली जाते. संध्याकाळच्या जेवणाभोवती आपलं सामाजिक आणि कौटुंबिक आयुष्य फिरत असतं. मात्र जेवण्याच्या या पद्धती सर्वोत्तम आहेत का?
आपण कितीदा जेवायला हवं यापेक्षा कधी जेवू नये यावर जास्त वैज्ञानिक जास्त भर देतात.
इंटरमिटंट फास्टिंग हा सध्या संशोधनाचा मोठा विषय आहे. कॅलिफोर्निया येथील Salk institute of biological studies मधील क्लिनिकल संशोधक एमिली मॅनिजन यांनी 2019 मध्ये When to eat या विषयावर एक रिसर्च पेपर प्रकाशित केला होता.
त्यांच्या मते 12 तास उपास केला तर आपल्या पचन यंत्रणेला विश्रांती मिळते.
इंटरमिटंट फास्टिंग आणि त्याचा परिणाम
विस्कॉन्सिन स्कुल ऑफ मेडिसिन अँड पब्लिक हेल्थ चे सहयोगी प्राध्यापक कॅलरी रिस्ट्रिक्शनच्या फायद्याचा अभ्यास केला आहे. शरीराच्या खालच्या भागाचं वजन वाढवणाऱ्या कॅलरीवर त्यांनी विशेष अभ्यास केला आहे.
"रोज काही वेळ उपवास केला तर त्याचा फायदा होतो. उपवासामुळे शरीराची स्थिती बदलते. त्यामुळे शरीरारची स्थिती खरंतर सुधारते. उपवासामुळे मिसफोल्डेड प्रोटिन्स स्वच्छ होतात."
मिसफोल्डेड प्रोटिन हे प्रोटिनचंच मोडकंतोडकं रुप आहे. हा एक अणू आहे जो अनेक आजारांना आमंत्रण देतो.
अँडरसन यांच्यामते इंटरमिटंट फास्टिंगमुळे शरीराची कार्य योग्य पद्धतीने पार पडण्यास मदत होते. शरीराला ब्रेक मिळतो. तो खाण्यासाठी जागा निर्माण करतो आणि शरीराच्या ज्या भागाला उर्जेची गरज आहे तीसुद्धा मिळते.
इटलीमधील पडोवा विद्यापीठातील शारीरिक विज्ञान विषयाचे प्राध्यापक अँटनिओ पाओली म्हणतात, "उपवासामुळे ग्लायसेमिक प्रक्रियेत सुधारणा होते. खाल्ल्यानंतर शरीरातील साखरेचं प्रमाण वाढतं. साखरेचं हे प्रमाण कमी करण्यासाठी उपवासाचा फायदा होतो. शरीरात साखरेचं प्रमाण कमी झालं की लठ्ठपणा वाढत नाही."
"आमच्याकडे असलेल्या आकडेवारीनुसार रात्री लवकर जेवण्याचे आणि उपवास ठेवण्याच्या वेळ वाढवल्यामुळे शरीरावर काही सकारात्मक परिणाम होतात जसं ग्लायसेमिक कंट्रोल."
"पाओली सांगतात की ग्लायकेशन नावाच्या प्रकियेमुळे सगळ्या पेशींमध्ये साखरेची पातळी कमी होणं फायद्याचं असतं. इथेच साखरेचं आणि प्रोटिन्सचं संयुग तयार होतं आणि कंपाऊंड तयार होतं. त्याला Advance Glycation end product असं म्हणतात. त्यामुळे शरीराला सूज येऊ शकते आणि डायबेटीज आणि हृदयरोगांची शक्यताही वाढते.
एकदाच खाल्लं तर भूक लागणार नाही का?
एकदा खाल्लं तर भूक लागणार नाही का? लागेलच असं काही नाही.
जर इंटरमिटंट फास्टिंग जेवणाची एक उत्तम पद्धत आहे तर मग सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की कोणत्या वेळेला खायचं?
काही तज्ज्ञांच्या मते दिवसाला एकदाच खायला हवं.
न्यूयॉर्कमधील कॉर्नेल युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक डेविड लेवित्स्की यांच्या मते असं करणं योग्य आहे. कारण ते सुद्धा हीच पद्धत अवलंबतात.
ते म्हणतात, "जर एखाद्याला खाण्याचा फोटो दाखवला तर खाण्याची इच्छा होतेच. हे सिद्ध करणारी बरीच आकडेवारी उपलब्ध आहे. तुमच्यासमोर जितक्यांदा खाण्याचे पदार्थ ठेवले तर दिवसभरात तुम्ही ते नक्कीच खाल."
खाद्यपदार्थांचे इतिहासकार सेरेन चॅरिंग्टन- हॉलिन्स म्हणतात की फ्रीज आणि सुपर मार्केट येण्याच्या आधी लोक जेव्हा जेवण मिळेल तेव्हाच खात असत. आपल्या इतिहासावर एकदा नजर टाकली तर असं लक्षात येईल की आपण दिवसातून एकदाच जेवायचो. रोममधील लोकही एकदाच जेवायचे.
एकदाच जेवलो तर भूक लागणार नाही का? शक्यता कमी आहे. लेवित्सिकी यांच्या मते भूक ही भावनाच मुळात एक विशिष्ट प्रकारची मानसिक जाणीव आहे.
"जेव्हा दुपारचे बारा वाजतात तेव्हा आपल्याला जेवायची इच्छा होते. आपल्यापैकी अनेकांना सकाळी नाश्ता करण्याची सवय असते आणि आपल्याला सांगितलं जातं की असं करायला हवं. पण हे सगळं थोतांड आहे. जर तुम्ही नाश्ता केला नाही तर त्या दिवशी शरीरात कमी कॅलरीज जातात."
ते सांगतात, "आपलं शरीर सणावाराचं जेवण्यासाठी किंवा उपवासासाठी तयार झालं आहे." मात्र ज्या लोकांना डायबेटिस आहे त्यांनी या पद्धतीचा अवलंब करू नये."
मॅनोजन एकदा जेवण्याचा सल्ला देत नाहीत. जेव्हा आपण खात नाही तेव्हा आपल्या रक्ताततली साखर वाढण्याचा धोका संभवतो. त्याला फास्टिंग ग्लुकोज म्हणतात. ती जर बराच काळ वाढत राहिली तर टाईप 2 डायबेटीज होण्याचा धोका असतो.
रक्तातली साखर नियंत्रित ठेवायची असेल दिवसातून एकदा खाऊन फायदा नाही. मॅनोजन म्हणतात, एकदा खाल्ल्याने शरीराला असं वाटतं की त्याची उपासमार होतेय त्यामुळे रक्तात आणखी साखर सोडली जाते. तसंच भूक लागल्यावर खातो ते वेगळंच
त्यापेक्षा दिवसात दोन किंवा तीनदा जेवणं सगळ्यात उत्तम आहे असं त्यांना वाटतं. कारण दिवसाची सुरुवात होते त्या काळात सगळ्या कॅलरीज खर्च होतात. कारण रात्री उशीरा खाल्ल्यामुळे डायबेटिज आणि हृदयरोगांना आमंत्रण मिळतं.
"जर तुम्ही सकाळी खाल्लं तर दिवसभर त्यातून मिळालेल्या उर्जेचा उपयोग होतो. नाहीतर शरीरात ती फॅट्सच्या रुपात साठून राहते."
मात्र अगदी सकाळी सकाळी खाणंसुद्धा टाळलं पाहिजे असं त्या सांगतात. कारण असं केल्याने उपवासाला वेळ मिळत नाही. अगदी लवकर खाल्ल्यामुळे शरीराचं चक्रही बदलतं. हे चक्रच आपल्याला दिवसभर कोणत्यावेळी खायला हवं ते सांगतं.
आपल्या शरीरात असलेल्या मेलॉटॉनिन नावाच्या द्रव्यामुळे शांत झोप येते. मात्र त्यामुळे इन्सुलिनच्या निर्मितीलाही अडथळे निर्माण होतात. इन्सुलिनमुळे शरीरातल्या साखरेचं प्रमाण संतुलित राहतं. आपण झोपेत असताना मेलॉटॉनिन या द्रव्याची निर्मिती होते, शरीर त्याचा वापर करतं आणि झोपलेलो असताना साखरेचा वापर होणार नाही अशी सोय शरीरात होते. असं मॅनोजन सांगतात.
"जर मेलॉटॉनिनची पातळी जास्त असताना अधिक प्रमाणात कॅलरीज शरीरात गेल्या तर साखरेची पातळी वाढते. रात्रीच्या वेळी जास्त कॅलरीज घेतल्या तर शरीरासमोर एक मोठं आव्हान उभं राहतं कारण इन्सुलिनचं प्रमाण कमी झालं तर शरीरात साखरेचा योग्य साठा होत नाही."
शरीरात साखरेचं प्रमाण वाढलं तर टाईप 2 डायबेटिस होण्याची शक्यता वाढते.
याचा अर्थ नाश्ता करणं सोडूनच दिलं पाहिजे असं नाही. मात्र झोपून उठल्यानंतर एक दोन तासांनी नाश्ता करायला हवा. नाश्ता करणं ही आता सर्वांच्या आवडीची गोष्ट झाली आहे. तिचा उगम आता आताच झाला आहे.
"ग्रीक लोकांनी सर्वप्रथम नाश्त्याची संकल्पना आणली. ते वाईन मध्ये बुडवलेली ब्रेड खायचे. नंतर दुपारच्या जेवणात काहीतरी थातुरमातुर खायचे. रात्रीचं जेवण मात्र तब्येतीत करायचे." चॅरिंग्टन होलिन्स सांगतात.
त्यांच्या मते नाश्ता हा सुरुवातीच्या काळात अगदीच राजेशाही थाट होता. 17 व्या शतकात या संकल्पनेचा प्रसार झाला. ज्या लोकांना नाश्ता करणं परवडायचं, ज्यांना सकाळी निवांत वेळ असायचा असेच लोक नाश्ता करायचे.
"आज आपण जो नाश्ता करतो तो दिनचर्येचा भाग 19 व्या शतकात झालेल्या औद्योगिक क्रांतीचा परिणाम आहे. कारण त्यामुळे कामाचे ठोस तास अस्तित्वात आले." ते सांगतात. त्यामुळे दिवसाला तीनदा जेवण्याची पद्धत अस्तित्वात आली. "दिवसाचं पहिलं खाणं म्हणजे साधं अगदी काहीतरी असायचं."
मात्र युद्ध संपल्यावर खाण्यापिण्याची भ्रांत निर्माण झाली आणि पूर्ण नाश्ता करणं शक्य नव्हतं आणि त्यामुळे अनेकांनी नाश्ता करणं सोडलं. "तीन वेळेला जेवण करण्याची संकल्पनाच मोडीत निघाली."चेरिंग्टन होलिन्स सांगतात. "1950 पासून आज आपण जसा नाश्ता करतो तसे कडधान्य आण टोस्ट किंवा तत्सम पद्धतीने नाश्ता करण्याची पद्धत सुरू झाली. त्याआधी लोक फक्त ब्रेड आणि जॅम खायचे"
त्यामुळे दोन ते तीनदा खाणं योग्य आहे असं विज्ञानात सांगितलं आहे. मात्र त्यासाठी रात्री बराच काळ उपवास करावा. सकाळी फार लवकर खाऊ नये, फार उशिराही खाऊ नये. तसंच दिवस सुरू होताच फार जास्त कॅलरी असलेले पदार्थ खाऊ नये. हे वास्तववादी आहे ना?
मॅनोजन म्हणतात, खाण्याची कोणतीही विशिष्ट वेळ सांगू नये हे सगळ्यात उत्तम. कारण प्रत्येक माणसाची दिनचर्या वेगळी असते. उदाहरणार्थ रात्रपाळी करणाऱ्या व्यक्ती.
"संध्याकाळी सातनंतर काहीच खाऊ नये हे सांगणं फार चुकीचं आहे कारण प्रत्येकाचं वेळापत्रक वेगळं असतं. जर रात्री शरीराला विश्रांती देऊ इच्छित असाल तर फार उशीरा खाऊ नका किंवा फार लवकर खाऊ नका. तसंच रात्रीचं जेवण भरपेट करू नका. हे सगळं केल्यास फायदा होतो. लोक हे अंगीकारू शकतात" असं त्या म्हणतात.
"दिवसाच्या पहिल्या खाण्यात थोडा उशीर आणि शेवटच्या खाणं थोडं लवकर केलंत तर बराच फरक पडू शकतो. बाकी काहीही बदल न करता केलं तर त्याचा खूप फायदा होतो."
"कोणत्याही शरीराची काम करण्याची एक विशिष्ट पद्धत असते."अँडरसन म्हणतात. "आपण काय खातो यावर सगळं अवलंबून असतं. इंटरमिटंट फास्टिंगचा एक फायदा असा असतो की त्यामुळे एक व्यवस्था तयार होते आणि जैविक प्रक्रिया त्यानुसार घडतात." आपल्या खाण्याच्या सवयीनुसार शरीराची रचना तयार होते.
किती वेळा खावं या प्रश्नावर आता विस्ताराने चर्चा होते.
"गेल्या अनेक शतकांपासून तीन वेळा खाण्याची सवय लावली आहे. पण आता त्याला आव्हान दिलं जात आहे. खाण्याबद्दल लोकांच्या वृत्तीत बदल होत आहे. आपल्यापैकी अनेकांची बैठी जीवनशैली आहे. आपण 19 व्या शतकात जसं काम करायचो तसं काम आता करत नाही. त्यामुळे आता आपल्याला कमी कॅलरीजची गरज आहे."
"मला वाटतं की पुढच्या काळात आपण आधी हलका नाश्ता, मग जेवण हीच पद्धत स्वीकारणार आहोत. आपले कामाचे तास कसे आहेत यावर सगळं अवलंबून आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)