मॅक्रॉन पुन्हा एकदा फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदी

इम्यॅन्युएल मॅक्रॉन

फोटो स्रोत, LUDOVIC MARIN

फोटो कॅप्शन, इम्यॅन्युएल मॅक्रॉन
    • Author, पॉल किर्बी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांनी फ्रान्समध्ये राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जिंकत पुन्हा एकदा पाच वर्षांसाठी सत्ता हस्तगत केली आहे. त्यांनी आपल्या विरोधक ल पेन यांचा पराभव केला.

तरीही ल पेन यांना फ्रान्समध्ये आतापर्यंत उजव्या पक्षाला जेवढी मतं मिळाली आहेत त्याहून जास्त मतं मिळाली.

मॅक्रॉन यांना 58.55 टक्के मतं मिळाली तर ला पेन यांना 41.45 टक्के. मॅक्रॉन यांना अपेक्षेपेक्षा जास्त मतं मिळालीत.

मॅक्रॉन फ्रान्समधल्या मधल्या (ना उजव्या ना डाव्या) विचारसरणीचे नेते मानले जातात. आपल्या विजयानंतर त्यांनी समर्थकांना संबोधित करताना म्हटलं की ते, 'प्रत्येकाचे राष्ट्राध्यक्ष' असतील.

ते म्हणाले, "मी आता कुठल्या एका पक्षाचा किंवा विचारसरणीचा राष्ट्राध्यक्ष नाही, तर सगळ्यांचा राष्ट्राध्यक्ष आहे."

ते पुढे असंही म्हणाले की "हा विजय म्हणजे लोकांनी उजव्या विचारसरणीला रोखण्यासाठी उचलेलं पाऊल आहे."

ल पेन ही निवडणूक हरल्या असल्या तरी त्यांना मिळालेली मतांची टक्केवारी ही एकप्रकारे त्यांची जीतच आहे.

त्यांनी आपल्या समर्थकांशी बोलताना म्हटलं की, "आपला पक्ष ज्या मुल्यांवर विश्वास ठेवतो, ती मुल्यांना फ्रान्सच्या समाजात अधिकाधिक पाठिंबा मिळतोय."

पण फ्रान्समधल्या अतिउजव्या गटाचे नेते एरिक झेमुर यांनी म्हटलं की ला पेन आपल्या वडिलांप्रमाणेच अपशयी ठरल्या आहेत. ला पेन यांच्या पक्षाची धुरा याआधी त्यांच्या वडिलांकडे होती.

एरिक म्हणाले, "आता सलग आठव्यांदा ला पेन नावाचा यांचा पराभव झाला आहे."

दुसरीकडे आपल्या विजयानंतर केलेल्या भाषणात मॅक्रॉन म्हणाले की, "आपल्या देशातल्या लोकांनी ज्या रागामुळे, मतभेदांमुळे अतिउजव्या नेत्यांना मतं दिली, त्या रागावर, त्या मतभेदांवर उत्तर शोधलं पाहिजे. ही माझी आणि माझ्या सहकाऱ्यांची जबाबदारी आहे."

उजव्या विचारसरणीच्या नेत्या ला पेन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, उजव्या विचारसरणीच्या नेत्या ला पेन

मॅक्रॉन यांच्या विजयामुळे युरोपातल्या इतर नेत्यांचा जीव भांड्यात पडला आहे. फ्रान्समध्ये अतिउजव्या नेत्याची सत्ता आली असती तर त्यामुळे युरोपियन युनियनच्या धोरणांना धक्का पोहचला असता असं त्यांना वाटत होतं.

युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला व्हॉन डेर लायन यांनी म्हटलं की, "एकत्र आपण फ्रान्स आणि युरोपला पुढे नेऊ."

युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी या आधीच फ्रान्सच्या मतदारांना आवाहन केलं होतं की मॅक्रॉन यांना मतं द्या. त्यांनी मॅक्रॉन यांच्या विजयांनंतर म्हटलं की मी माझ्या 'खऱ्या मित्राचं' अभिनंदन करतो. त्यांनी असंही म्हटलं की एका समर्थ आणि एकात्म युरोपकडे वाटचाल व्हावी अशी त्यांची इच्छा आहे.

यूकेचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनीही या निकालाचं स्वागत केलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

या निवडणुकीत जवळपास 72 टक्के मतदारांनी मतदान केलं. पण ही टक्केवारी 1969 साली झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीपासून आताच्या निवडणुकीपर्यंत सर्वात कमी आहे.

यात 30 लाख वाया गेलेली किंवा कोरी मतं (कोणालाच मत नाही) धरली तर मॅक्रॉन यांना मिळालेल्या मताचीं टक्केवारी अजूनच कमी होती.

म्हणूनच कदाचित मॅक्रॉन आपल्या भाषणात म्हणाले की, "त्यांनी कोणालाही निवडलं नाही, त्यांच्याप्रति आम्ही उत्तरदायी आहोत."

मतदानाच्या दिवशी फ्रान्सच्या बहुतांश भागात सुट्टी होती तरीही मतदानाची टक्केवारी अपेक्षेइतकी वाढली नाही. मतदारांना दोन्ही पक्षांचे नेते आपलेसे वाटले नाहीत किंवा ते खऱ्या अर्थाने आपल्या प्रश्नांचं प्रतिनिधित्व करतात असं वाटलं नाही.

फ्रान्समधल्या अनेक तरूण मुलामुलींनी म्हटलं की त्यांनी दुसऱ्या फेरीत मतदान केलं नाही.

मतांची टक्केवारी
फोटो कॅप्शन, मतांची टक्केवारी

अतिडावे नेते जॉ-लुक मेलेशॉन यांचा ल पेन यांनी निवडणुकीच्या पहिल्या फेरीत निसटता पराभव केला होता. त्यांनी मॅक्रॉन आणि ला-पेन दोघांवरही कडाडून टीका केली.

त्यांनी म्हटलं की फ्रान्सने मारीन ल पेन यांच्यावर विश्वास टाकला नाही हे चांगलंच केलं पण मॅक्रॉनही अत्यंत वाईट रितीने निवडून आलेत. "ते कोरी मतं, वाया गेलेली/घातलेली मतं आणि मतदानचं न करणं अशा घटनांमुळे निवडून येऊ शकले."

पण तरीही मॅक्रॉन यांचा विजय ऐतिहासिक आहे कारण गेल्या 20 वर्षांत पुन्हा निवडून येणारे ते पहिले राष्ट्राध्यक्ष ठरलेत.

मॅक्रॉन यांनी आपलं विजयाचं भाषण फ्रेंच राज्यक्रांतींचं प्रतिक असलेल्या ठिकाणाहून केलं. त्यांनी आपल्या समर्थकांना सांगितलं की कोणालाही 'मागे सोडलं जाणार नाही.'

महागाई हा फ्रेंच जनतेत कळीचा मुद्दा ठरला होता. याच मुद्द्याभोवती निवडणूक फिरत होती. मॅक्रॉन यांच्या विरोधकांनी त्यांच्यावर आरोप केले होते की ते सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहेत आणि फक्त श्रीमंतांचे राष्ट्राध्यक्ष म्हणून वावरतात.

मॅक्रॉन फक्त श्रीमंतांचे राष्ट्राध्यक्ष असल्यासारखे वागतात असा आरोप त्यांचे विरोधक करतात

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, मॅक्रॉन फक्त श्रीमंतांचे राष्ट्राध्यक्ष असल्यासारखे वागतात असा आरोप त्यांचे विरोधक करतात

पण फ्रान्सचे पंतप्रधान ज्यॉ कास्टेक्स यांनी फ्रेंच रेडिओशी बोलताना म्हटलं की मॅक्रॉन यांच्या पुन्हा निवडून येण्यामुळे 'दुभंगलेल्या फ्रान्समध्ये सकारात्मक संदेश गेलाय.'

जून महिन्यात फ्रान्समध्ये संसदीय निवडणुका आहेत. त्यासाठी मॅक्रॉन यांना कंबर कसावी लागणार आहे. सध्या त्यांच्याकडे बहुमत असलं तरी पराभूत उमेदवारांनी आपली निवडणूक कॅम्पेन राबवायला कधीच सुरूवात केलीये.

जॉ-लुक मेलेशॉन यांनी आधीच राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या पक्षाला पराभूत करून पंतप्रधान बनण्याचा मानस बोलून दाखवला आहेत तर दुसरीकडे मरीन ल पेन यांनी आपल्या समर्थकांना सांगितलं आहे की, 'अजूनही मॅच पूर्णपणे संपलेली नाही.'

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)