आनंद म्हणजे काय, आनंदी आयुष्याचा 'फॉर्म्युला' काय असतो?

फोटो स्रोत, Doucefleur/getty
- Author, नॅट रुदरफोर्ड,
- Role, बीबीसी फ्यूचर
आनंद या भावनेचा संबंध आरोग्याशी व स्वास्थ्याशी जोडला जातो, पण आनंदी राहण्याविषयीची आपली अवाजवी ओढ निराशेला कारण ठरत असेल का, या प्रश्नाचा शोध घेत आहेत नॅट रुदरफोर्ड.
तुम्हाला आयुष्यात काय हवंय? असा प्रश्न आपण स्वतःला वेळोवेळी विचारतो. कधी आपल्याला कुटुंबासोबत जास्त वेळ घालवायचा असतो, किंवा अधिक समाधानकारक व सुरक्षित नोकरी हवी असते, किंवा तब्येत सुधारायची असते. पण मुळात आपल्याला या सगळ्या गोष्टी का हव्या असतात?
या प्रश्नाचं अंतिम उत्तर 'आनंदासाठी' हे असण्याची शक्यता आहे. आपली संस्कृती आनंदाच्या ओढीने पछाडलेली आहे. आनंद चांगला असतो, कारण आनंदी राहणं चांगलं असतं. आनंदासाठी केलेल्या कृतींना समर्थनाची गरज भासत नाही. पण निव्वळ अशा युक्तिवादाभोवती आपण स्वतःचं आयुष्य उभारणं योग्य आहे का?
हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, पण लोकांना आयुष्यात काय हवं असतं याबद्दल पुरेशी आकडेवारी मात्र उपलब्ध नाही. 2016 साली झालेल्या एका सर्वेक्षणामध्ये अमेरिकी नागरिकांना विचारण्यात आलं की, "त्यांना काहीतरी महान गोष्ट साध्य करावीशी वाटते की आनंदी राहावंसं वाटतं?" सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी 81 टक्के लोकांनी 'आम्हाला आनंदी राहणं पसंत आहे' असं उत्तर दिलं, तर केवळ 13 टक्के लोकांनी महान गोष्टी साध्य करण्यासंबंधीचा पर्याय स्वीकारला (सहा टक्के लोकांना कोणत्याच एका पर्यायाची खात्रीशीर निवड करता आली नाही). आनंद हे एक सर्वव्यापी उद्दिष्ट असल्याचं दिसतं, पण त्याची व्याख्या कशी करायची किंवा आनंद कसा साध्य करायचा, याबद्दल काही जाणून घेणं मात्र अवघड आहे.
पण आपल्या आयुष्यातील अधिकाधिक बाजूंचं मूल्यमापन करताना आनंदाचा निकष वापरला जातो. तुमचे नातेसंबंध, तुमची नोकरी, तुमचं घर, तुमचं शरीर, तुमचा आहार- हे सगळं तुम्हाला आनंदी करतं आहे का, असा प्रश्न रास्त मानला जातो. यातून आपण आनंदी राहत नसू, तर आपलं काहीतरी चुकतंच असं मानलं जातं.
आधुनिक जगामध्ये आनंद हे सर्वोत्तम हित मानलं जाऊ लागलं आहे- जणू काही इतर प्रकारच्या हितांचा उगम आनंदातून होतो. या तर्कानुसार दुःख म्हणजे सतत टाळण्यासारखी अनिष्ट गोष्ट झालेली आहे. परंतु, आनंदाचा अवाजवी पाठपुरावा करत राहिलं, तर त्यातून निराशा येण्याची जोखमी जास्त असते, असं सुचवणारा काहीएक पुरावा उपलब्ध आहे.
'द एनलायटन्मेंट: द परस्यूट ऑफ हॅपिनेस' या पुस्तकात इतिहासकार रिची रॉबर्ट्सन यांनी असा युक्तिवाद केला आहे की, प्रबोधनकाळाने केवळ विवेकाचं मूल्य वाढवलं असं नाही, तर विवेकाद्वारे आनंदाचा शोध घेण्याला गती दिली. आधुनिकतेमधील निर्णायक बुद्धिजीवी शक्ती आनंदाशी संबंधित होती आणि आजही आपण त्याच्या मर्यादांशी झुंजत आहोत.

फोटो स्रोत, Getty Images
आनंदाला कायमच सर्वोच्च हिताचं स्थान मिळाल्याचं गृहित धरणं सोपं आहे, पण मानवी मूल्यं व भावना कायमस्वरूपी नसतात. एके काळी सर्वोच्च ठरलेली विनोद व करुणा यासारखी मूल्यं आता महत्त्व गमावून बसली आहेत, तर अनास्थेसारख्या भावना पूर्णतः लुप्त झाल्या आहेत. आपण आपली मूल्यं व भावना यांच्या वर्णनासाठी वापरतो ती भाषा आणि खुद्द भावना हे दोन्ही अस्थिर असतं.
आनंदाची आधुनिक संकल्पना ही मूलतः व्यावहारिक आहे, तात्त्विक नाही. त्यामुळे यात आनंदाच्या तंत्रावर लक्ष केंद्रित केलं जातं. त्यामुळे आनंद म्हणजे काय हा आस्थेचा विषय उरत नाही, तर आनंद कसा प्राप्त करायचा याबद्दलच तेवढी आस्था ठेवली जाते. दुःख वा निराशा यांच्या विरोधी संज्ञा म्हणून आनंदाचा विचार केला जातो. त्यामुळे मेंदूतील रासायनिक प्रतिक्रियांमधून आनंद उद्भवतो, असाही गर्भितार्थ यात असतो. आनंदी असलं की मेंदूमधील दुःखाशी संबंधित रासायनिक प्रक्रिया कमी होतील आणि आनंदी होण्याच्या प्रक्रिया वाढतील, असा समज दिसतो.
मूल्यं व नीतिमत्ता या संदर्भात काम करणाऱ्या मार्था नस्सबॉम असा दावा करतात की, आधुनिक समाजांमध्ये समाधान वा सुख यांच्या समानार्थी आनंद ही भावना मानली जाते आणि आनंद ही सर्वोत्तम मानसिक स्थिती असल्याचाही समज पसरलेला दिसतो. 'सेल्फ-हेल्प' या विषयावरची पुस्तकं आणि सकारात्मक मानसशास्त्राचे दावे या मानसिक स्थितीपर्यंत पोचण्याचे किंवा आनंदी मनस्थितीपर्यंत पोचण्याचे मार्ग दाखवण्याचे दावे करतात. पण आनंदाविषयीच्या या दृष्टिकोनाबाबत तत्त्वज्ञ कायमच साशंक राहिलेले आहेत. कारण, आपली मनस्थिती चंचल असते आणि त्याची कारणे अनिश्चित असतात. त्यामुळे चांगलं जीवन म्हणजे काय, असा याच्याशी संबंधित परंतु व्यापक प्रश्न तत्त्वज्ञ मंडळी उपस्थित करतात.

फोटो स्रोत, Getty Images
आपल्याला आवडणाऱ्या आणि आपल्याला सुखाच्या वाटतील अशा गोष्टी करण्यात आयुष्य घालवणं, हे यावरचं एक उत्तर असू शकतं. सुखाचा अनुभव घेत जगलेलं आयुष्य हे एका अर्थी चांगलं आयुष्य मानलं जातं.
पण सुख वाढवत नेणं एवढाच एकमेव पर्याय नाही. अगदी सर्वाधिक सुदैवी स्थितीत असलेलं मानवी जीवनसुद्धा दुःखाने भरलेलं असतं. दुःखद दुरावा असतो, दुःखद भ्रमनिरास असतो, शारीरिक वेदना असतात, आजार असतात, कंटाळा, एकाकीपणा वा इतर मानसिक वेदना असतात. जगण्यामध्ये दुःख अथवा क्लेश अनिवार्य असतात.
प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञ एपिक्यूरस (इसवीसनपूर्वी 341-270) याच्या म्हणण्यानुसार, कमी क्लेशकारक असणारं जीवन चांगलं म्हणता येतं. सातत्याने क्लेशाची अनुपस्थइती असेल तर आपल्याला मानसिक शांतता मिळते. आनंदाच्या आधुनिक आकलनाशी काहीसं साधर्म्य सांगणारी ही संकल्पना आहे. "स्वतःचं चित्त शांत ठेवणं", हा दुःखी व्यक्तीपासून आनंदी व्यक्तीला वेगळं ठरवणारा निकष आहे. क्लेशकारक जीवन चांगलं आहे, असं कोणाला कल्पनेतही वाटणार नाही. पण क्लेश कमी करणं हे आनंदाचं सार आहे का?
चांगलं जीवन जगण्याने आपल्या अनुभवातील क्लेश वाढत असेल तर? प्रेमाचे अनुबंध असणं आनंदासाठी गरजेचं असतं, असं अभ्यासांमधून निदर्शनास आलेलं आहे. पण प्रेम क्लेशालाही कारणीभूत ठरतं, हे आपण अनुभवातून जाणतोच. मग क्लेश आवश्यक किंवा इष्ट असेल तर? आपल्या आईवडिलांचे, मुलांचे, जोडीदारांचे व मित्र-मैत्रिणींचे क्लेशकारक मृत्यू पुसून टाकायचे तर या लोकांना आपल्या आयुष्यातून पूर्णतः लुप्त करून टाकावं लागेल. पण प्रेमाचे अनुबंध नसलेलं आयुष्य अनेक अभावांना जागा करून देतं. असे अभाव असले तर आपल्याला आपल्या प्रिय व्यक्ती गमावल्याचाही क्लेश वाटणार नाही. या युक्तिवादामधली नाट्यमयता कमी करून सांगायचं तर, आयुष्यातल्या सर्व चांगल्या गोष्टींसोबत दुःख येतंच. कादंबरी लिहायची असेल, मॅरेथॉनमध्ये धावायचं असेल किंवा मूल जन्माला घालायचं असेल, तरी अंतिमतः आनंदी परिणामासाठी दुःख सहन करावं लागतं.

फोटो स्रोत, Getty Images
हानी कमी करण्याचा प्रयत्न करत अपरिहार्य दुःख स्वीकारणं, हा जगण्याचा एकमेव मार्ग आहे. क्लेश कमी करण्याचे प्रयत्न कृतीसाठीही मार्गदर्शक ठरू शकतात. कादंबरी लिहिण्याच्या प्रक्रियेत आपल्याला अधिक क्लेश होत असेल आणि कादंबरी पूर्ण झाल्यानंतर होणाऱ्या सुखापेक्षा हा क्लेश जास्त असेल, तर कादंबरी लिहू नका. पण आत्ता थोडा क्लेश झाल्याने पुढचा मोठा क्लेश कमी होणार असेल- उदाहरणार्थ, धूम्रपान सोडण्यासाठी आत्ता होणारा क्लेश भविष्यातील कर्करोगाशी जोडलेला क्लेश कमी करणार असेल- तर, असा तात्कालिक क्लेश समर्थनीय ठरू शकतो.
फ्रेडरिक नित्शेने 'द जिनिऑलॉजी ऑफ मोराल्स' या पुस्तकामध्ये नमूद केल्यानुसार, "माणसाला दुःखाचा मुळात तिटकारा नसतो, त्याला दुःख हवंहवंसं वाटतं, किंबहुना तो दुःखाचा शोधही घेतो, फक्त त्याला त्यासाठी अर्थ माहीत असावा लागतो, दुःखाचा उद्देश माहीत असावा लागतो." नित्शेच्या दृष्टीनुसार, सुखाने क्लेश संपत नाही, तर अर्थाद्वारे क्लेश संपतो. दुःख सहनीय करण्यासाठी पुरेसा अर्थ आपल्याला सापडेल का, याबद्दल नित्शेला शंका होती, पण त्याने दिलेली मर्मदृष्टी एपिक्यूरसच्या चांगल्या जीवनाविषयीच्या मांडणीतील उणीव दाखवते.
नित्शेच्या मर्मदृष्टीचा धागा पकडून बोलायचं तर, अर्थपूर्ण क्लेशाचं जीवन हे निरर्थक सुखाच्या आयुष्यापेक्षा अधिक मूल्यवान असू शकतं. म्हणजे आनंदाचा अर्थ शोधण्याची आपली खटपट पुरेशीच नव्हती तर! आता अर्थपूर्ण जीवनाचाही शोध घ्यावा लागणार!
जीवन कशामुळे अर्थपूर्ण होतं, हा पेच बाजूला ठेवला, तरी आपल्याला आनंदाला सर्वोच्च हित मानणारी आधुनिक दृष्टी दिशाभूल करणारी असल्याचं आपल्या लक्षात येतच.

फोटो स्रोत, Alamy
अमेरिकी तत्त्वज्ञ रॉबर्ट नॉझिक यांनी या संदर्भात एक विचारविषयक प्रयोग केला. "आपल्याला हवा असलेला कोणताही अनुभव देणाऱ्या यंत्राची कल्पना करा," असं नॉझिक म्हणतात. हे यंत्र आपली प्रत्येक इच्छा पूर्ण झाल्याचा अनुभव देईल. या यंत्राद्वारे आपण महान कवी होऊ शकतो, महान संशोधक होऊ शकतो, यानातून अंतराळात फिरून येऊ शकतो, किंवा एखाद्या स्थानिक उपहारगृहात सर्वांचा लाडका शेफ होऊ शकतो. वास्तवात मात्र आपल्याला एका लाइफ सपोर्ट टॅंकमध्ये अचेतन अवस्थेत राहावं लागेल. कारण, हे यंत्र आपल्याला उत्तेजित अवस्थेत निराळ्या वास्तवामध्ये घेऊन जाईल. तर, तुम्ही कोणत्या पर्यायाची निवड कराल?
आपण अशा यंत्राची निवड करणार नाही, असं नॉझिक म्हणतात. कारण, आपल्याला प्रत्यक्षात काही विशिष्ट गोष्टी करायच्या असतात आणि विशिष्ट प्रकारचा माणूस व्हायचं असतं, केवळ सुखकारक अनुभव पुरेसे नसतात. ही कल्पित परिस्थिती क्षुल्कक वाटू शकते, पण वास्तवातील अर्थासाठी आपण अमर्याद सुखाचा त्याग करायला तयार असू, तर आनंद हे सर्वोच्च हित नाही असं यातून सिद्ध होतं. नॉझिक यांचं गृहितक योग्य असेल, तर उपरोल्लेखित सर्वेक्षणामध्ये महान उपलब्धींऐवजी आनंदाची निवड करणारे 81 टक्के अमेरिकी चुकीचे आहेत. नॉझिक यांच्या मांडणीतील यंत्रात जायला बहुतांश लोक पसंती देत नाहीत, असं अभ्यासांमधून सिद्ध झालेलं आहे.
नॉझिक यांच्या या अनुभवदात्या यंत्राद्वारे उपयुक्ततावादातील एक आवश्यक दावा नाकारण्याचा प्रयत्न केला गेला. "आनंद ही हवीशी गोष्ट आहे, आणि केवळ आनंदापुरता आनंददेखील पुरेसा आहे, " हा दावा नॉझिक यांच्या मांडणीद्वारे नाकारला गेला. जॉन स्टुअर्ट मिल यांनी 1826मध्ये हा दावा केला होता. पण स्वतः त्यांचं आयुष्य दुःखाने ग्रासलेलं होतं. मिल त्यांच्या आत्मचरित्रात लिहितात, "मी आत्यंतिक निराशेमध्ये होतो. प्रत्येकालाच कधी ना कधी या स्थितीला सामोरं जावं लागतं. त्यात मौज किंवा सुख किंवा उत्साह उरलेला नसतो. इतर वेळी सुखाच्या वाटणाऱ्या गोष्टींबाबतही अशा वेळी अलिप्तता वाटू लागते."
मिल यांना आयुष्यात सुख लाभलं नाही. बहुतांश लोकांसाठी हे त्रासदायक ठरेल, पण मिल यांच्या बाबतीत हे आणखी चिंताजनक पातळीवर गेलं. मानवतेचं सुख वाढवणं आणि क्लेश कमी करणं, हे जीवनाचं सर्वोच्च उद्दिष्ट आहे, असं त्यांना लहानपणापासून शिकवण्यात आलं होतं. मिल यांचे वडील अभिजात उपयुक्ततावादी विचारवंत जेरेमी बेन्थेम यांचे अनुयायी होते आणि त्यांनी स्वतःच्या मुलाला त्या विचारांनुसार वाढवलं होतं. बेन्थम यांनी एपिक्यूरसच्या पुढचं पाऊल टाकलं आणि आनंद ही व्यक्तीच्या जीवनातील सर्वोत्तम गोष्ट मानली. बेन्थम यांच्या मते, सर्व नैतिक, राजकीय व वैयक्तिक प्रश्न "सर्वाधिक लोकांना सर्वाधिक आनंद" या साध्या तत्त्वाद्वारे सोडवता येतील. पण एवढ्या एकाच तत्त्वानुसार आयुष्य काढायचं असेल, तर मिलला स्वतःच्या अस्तित्वाचं समर्थन कसं करता येईल? त्याच्या आयुष्यात आनंदाचा प्रचंड अभाव होता.

फोटो स्रोत, Getty Images
निराशेच्या काळात मिलच्या लक्षात आलं की, बेन्थमने मांडलेला उपयुक्ततावादी दृष्टिकोन सुखाला सर्वोच्च हित मानतो, पण हे तत्त्वज्ञान केवळ "डुकरांना सोयीचं आहे". असमाधान, दुःख व क्लेश हे मानवी स्थितीचे भाग आहेत, त्यामुळे "समाधानी डुक्कर होण्यापेक्षा असमाधानी मानव होणं कधीही चांगलं," असं मिलचं मत पडलं. आनंद खूप महत्त्वाचा आहे, ही मिलची धारणा कायम राहिली, पण आनंदाचं उद्दिष्ट समोर ठेवल्याने फारसं काही साधणार नाही, हे त्याच्या लक्षात आलं.
त्यामुळे इतर हितांचं उद्दिष्ट समोर ठेवावं, असा विचार मिलने मांडला. त्यातून आनंद ही आनुषंगिक निष्पत्ती असू शकते. त्यामुळे चांगलं आयुष्य दुःखीसुद्धा असू शकतं, असं यातून सूचित होतं. ऍरिस्टोटलने दोन सहस्त्रकांपूर्वी केलेला युक्तिवाद मिलच्या लक्षात आला- चांगलं आयुष्य जगण्याच्या तुलनेत आनंदाच्या तात्कालिक सुखाचं स्थान दुय्यम असतं.
या संदर्भात ऍरिस्टॉटलने eudaimonia ही संज्ञा वापरली आहे, याचं समकालीन संज्ञांमध्ये भाषांतर करणं अवघड आहे. जुलिआ अनास यांच्यासारख्या काही तत्त्वज्ञांनी याचं भाषांतर थेट 'आनंद' असं केलं आहे, तर इतर काहींनी 'मानवी भरभराट' असं केलं आहे. त्याचं भाषांतर काहीही केलं, तर त्यात आनंदाच्या आधुनिक संकल्पनेहून भिन्न मांडणी होती हे निश्चित आहे.

फोटो स्रोत, Getty Images
भरभराटीविषयी अॅरिस्टॉटलने केलेली मांडणी व्यामिश्र स्वरूपाची आहे, कारण त्यात व्यक्तिगत समाधान, नैतिक गुण, श्रेष्ठत्व, चांगलं भवितव्य आणि राजकीय सहभाग यांचा समावेश होतो. आनंदाच्या आधुनिक संकल्पनेप्रमाणे eudaimonia हासुद्धा आयुष्याचं अंतिम उद्देश आहे. पण ही भरभराट सवयींद्वारे व कृतींद्वारे साधली जाते, ती केवळ मानसिक स्थिती नाही. या दृष्टीनुसार आनंद म्हणजे साध्य करण्यासाठी किंवा अनुभवण्यासारखी गोष्ट नसून आपली कृती हाच आनंद असतो.
अॅरिस्टॉटलने 'निकोमॅशिअन एथिक्स' या ग्रंथात लिहिल्यानुसार, "अचानक एखाद्या दिवशी झरा सुरू होत नाही, तसंच अचानक एखाद्या दिवशी माणूस सुदैवी व आनंदी होत नाही." थोडक्यात, भरभराट आयुष्यभराच्या कृतिक्रमाचा भाग आहे- रोज आपण आपल्या कृतीद्वारे तिची रुजवण करत असतो. आनंद व गुण यांचा एकमेकांशी अपरिहार्य संबंध आहे, असा उपयुक्ततावाद्यांसारखा युक्तिवाद ऍरिस्टॉटलनेही केला.
त्याच्या मते, टोकांच्या संदर्भात मध्यमभूमीवर येण्याचं काम गुणाद्वारे केलं जातं. उदाहरणार्थ, भेकडपणा आणि वेडगळपणा या टोकांच्या मधोमध शौर्य असतं, दयनीयता व उधळेपणा यांच्या मधोमध औदार्य असतं. अशी कृती करताना टोकांमध्ये समतोल साधून गुणकेंद्री कृती करावी लागते. उपयुक्ततावाद्यांनी नैतिकतेला केवळ आनंदापुरतं मर्यादित ठेवलं, तर अॅरिस्टॉटलने गुण आवश्यक मानला असला तरी पुरेसा मानलेला नाही. आपण गुणहीन स्थितीत भरभराट साधू शकत नाही, पण गुणवान असल्याने भरभराटीची सोपी वाट सापडेल असंही नाही. उलट गुणकेंद्री कृती हा भरभराटीचा भाग आहे.
आनंद म्हणजे काय आणि चांगला माणूस म्हणजे काय, हे प्रश्न वेगवेगळे नाहीत, असे प्रतिपादन अॅरिस्टॉटलने केले. नैतिक चांगुलपणा व चांगलं आयुष्य जगणं यांच्यातील संबंध प्राचीन तत्त्वज्ञानात कळीचा ठरला होता, असं अनास म्हणतात. आजसुद्धा हा प्रश्न कळीचाच आहे.
आपण विचार करण्याच्या व विवेकी राहण्याच्या अनन्य मानवी कार्यक्षमतांचा वापर करून भरभराट साधतो, असं अॅरिस्टॉटलचं म्हणणं होतं. पण विचार करणं व विवेकी युक्तिवाद करणं, या व्यक्तिगत तसंच सामाजिक कृती आहेत. "माणसं काही सुट्या व्यक्ती नसतात, आणि मानवी श्रेष्ठत्व साधू झाल्याने साधता येत नाही". भरभराटीप्रमाणेच आनंदासाठीही इतरांची गरज असते. आनंद ही भावनिक स्थिती नाही, तर इतरांसोबतच्या संबंधांमधून साधायची श्रेष्ठत्वाची स्थिती आहे.
पण निव्वळ एवढ्यानेही भरभराटीची हमी मिळत नाही. आपल्या आनंदाला नशिबाची साथ लागते, असं अॅरिस्टॉटल मानतो. युद्ध, प्रेम, गरिबी व जागतिक साथीचे रोग, अशा गोष्टी व्यक्तीच्या हाताबाहेरच्या असतात, आणि त्यातून अनेकदा आपली भरभराट वा आनंद अशक्य होऊन जातो.
हे समजून घेतल्याने आपल्या चांगल्या आयुष्याची तजवीज होईल, असं नाही; पण अनंतकालीन सुखाची भ्रामक आशा तरी पुसली जाईल. आधुनिक संकल्पनेनुसार आनंदाविषयी गैरसमजूत करून घेतली जाते आणि त्यातून निराशा वाढण्याचीच शक्यता असते. एपिक्यूरस किंवा उपयुक्ततावादी यांनी मानलेलं सुखाचं परिमाण कोणत्याही चांगल्या आयुष्याशी सुसंगत नाही. त्यामुळे आनंदाचा पाठपुरावा करणारी आधुनिक मंडळी मानवी जीवनातील अपुरेपणामुळे निराशेत जाणं अपरिहार्य होतं. त्यापेक्षा अपुरेपणाचा स्वीकार करून आनंद वा भरभराट साधणं शक्य असतं, हे अॅरिस्टॉटलने नोंदवलेलं उद्दिष्ट जास्त वाजवी आहे.
(नॅट रुदरफोर्ड हे लंडन विद्यापीठात रॉयल हॉलोवे इथे राजकीय सिद्धान्ताचे अध्यापक आहेत.)

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








