जपान भूकंप : 7.3 रिश्टर क्षमतेच्या भूकंपानंतर दोघांचा मृत्यू

बुधवारी रात्री जपानच्या ईशान्य भागात भूकंपाचा तीव्र धक्का बसला. यामुळे वीस लाख घरांचा वीजपुरवठा तात्पुरता खंडित झाला.

11 वर्षांपूर्वी ज्या भागात तीव्र भूकंप आणि त्सुनामीमुळे फुकुशिमा आण्विक आपत्ती आली होती. त्याच भागात हा 7.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा हादरा बसला आहे.

स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यात दोन जणांचा मृत्यू झाला असून किमान 90 जण जखमी झाले आहेत.

एएफपी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, भूकंपाच्या धक्क्यामुळे काही भागात लोकांना नीट उभं राहणं देखील कठीण झालं होत. तर राजधानी टोकियोमध्ये काही इमारतींना ही हादरे बसले.

जपानी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा भूकंप स्थानिक वेळेनुसार 23:36 वाजता (14:36 GMT) 57 किलोमीटर (35.4 मैल) खोल झाला.

या भूकंपाच्या धक्क्यानंतर फुकुशिमा, मियागी आणि यामागाता प्रांतात सौम्य धक्का बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली.

या भूकंपाच्या धक्क्यानंतर लगेचच, जपानच्या हवामान संस्थेने ईशान्य किनारपट्टीच्या काही भागांसाठी एक मीटरच्या (3.3 फूट) त्सुनामीच्या लाटांची सूचना जारी केली.

पण जपानी वृत्तसंस्था एनएचकेच्या हवाल्याने, जपानकडून त्सुनामीचा देण्यात आलेला संभाव्य इशारा मागे घेण्यात आल्याचं म्हटलं आहे.

स्थानिक वीज पुरवठादारांनी सांगितले की, भूकंपाच्या धक्क्यानंतर टोकियोमधील सुमारे 7 लाख आणि जपानच्या ईशान्येकडील 1 लाख 56 हजार घरांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. मात्र त्यानंतर अनेक घरांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, भूकंपाच्या धक्क्यानंतर जपानच्या ईशान्य भागात अनेक ठिकाणी पडझड झाल्यामुळे लोक जखमी झाले आहेत. सोमा शहरातील फुकुशिमा प्रीफेक्चरमध्ये साठ वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला. तर मियागी प्रीफेक्चरमध्ये दुसऱ्या मृत्यूची नोंद झाली.

भूकंपामुळे फुकुशिमा शहराच्या उत्तरेकडील बुलेट ट्रेन देखील रुळावरून घसरली असल्याचं मेट्रो ऑपरेटरने सांगितले. मात्र या घटनेत कोणी जखमी झाल्याचे वृत्त सध्या तरी नाही.

या घटनेनंतर जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, सध्या सरकार भूकंपामुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच आपत्कालीन सेवा ही कामकाजात व्यस्त आहेत.

इशिनोमाकीमध्ये शहराच्या एका अधिकाऱ्याने एएफपी या वृत्तसंस्थेला सांगितले की, तो "अत्यंत तीव्र अशा थरथरणाऱ्या आवाजाने" जागा झाला.

2011 साली आलेल्या आपत्तीचा संदर्भ देत तो म्हणाला, "मी धरणीकंप ऐकला आणि मला भीती वाटण्याऐवजी लगेचच ग्रेट ईस्ट जपान भूकंपाची आठवण झाली."

गुरूवारच्या भूकंपाचा केंद्रबिंदू हा फुकुशिमा प्रदेशाच्या किनारपट्टीपासून 60 किमी अंतरावर झाला. जपानच्या इतिहासात आलेल्या सर्वांत शक्तिशाली भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून हा भूकंप फार दूर नव्हता. 2011 साली फुकुशिमामध्ये आलेल्या भूकंपामुळे त्सुनामी आली होती आणि 18 हजारांहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले होते.

2011 च्या भूकंपामुळे त्सुनामी आली आणि फुकुशिमा अणु प्रकल्प उद्ध्वस्त झाला. प्लांटमधून बाहेर पडणाऱ्या किरणोत्सारामुळे मोठी आपत्ती देखील आली होती.

अणुऊर्जा विभागाने सांगितल्याप्रमाणे, बुधवारी रात्री झालेल्या भूकंपानंतर याआधी उध्वस्त झालेल्या फुकुशिमा साईटवर कोणतीही अनियमितता आढळून आलेली नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)