रशिया युक्रेन युद्ध : रशियन चॅनेलमधली संपादकच पुतिनविरोधात पोस्टर घेऊन LIVE न्यूजमध्ये आली आणि...

रशियाच्या सरकारी टेलिव्हिजन वाहिनीवरील संध्याकाळच्या कार्यक्रमादरम्यान, एक महिला अचानक एका न्यूज अँकरच्या मागे हातात युद्धविरोधी पोस्टर घेऊन उभी राहिली. "युद्ध नको, युद्ध थांबवा. प्रचारावर विश्वास ठेवू नका, हे लोक तुमच्याशी खोटं बोलत आहेत," अशा आशयाचं पोस्टर तिच्या हातात होतं.

या महिलेचे नाव मरीना ओव्हस्यानिकोवा असं सांगण्यात आलं असून त्या या चॅनलमध्येच संपादक आहेत.

रशियामधील टेलिव्हिजनवरील बातम्यांवर सरकारकडून बारकाईनं लक्ष ठेवलं जातं आणि युक्रेनबाबत केवळ रशियन बाजू दाखवली जातेय.

या प्रकरणानंतर असं सांगितलं जातंय की, ओव्हस्यानिकोव्हा आता पोलिसांच्या ताब्यात आहेत.

कार्यक्रमादरम्यान ओव्हस्यानिकोव्हा "युद्ध नको, युद्ध थांबवा!" असे म्हणतांना ऐकू येतात. मात्र, यानंतर काही वेळातच कार्यक्रमाच्या संचालकांनी कार्यक्रम मध्येच थांबवून पुढं रेकॉर्ड केलेला कार्यक्रम सुरु केला.

थेट कार्यक्रमादरम्यान निषेध करण्यापूर्वी, मरीना यांनी एक व्हीडिओ रेकॉर्ड केला ज्यामध्ये त्यांनी युक्रेनमधील सुरु असलेल्या युध्दाला "गुन्हा" म्हटलंय आणि क्रेमलिनच्या प्रचारासाठी काम करण्यास त्यांना आता लाज वाटतेय, असंसुध्दा सांगितलंय.

त्या व्हीडिओमध्ये म्हणतात की, "मला लाज वाटतेय की मी टेलिव्हिजन स्क्रीनवर खोटं बोलले. मला लाज वाटते की मी रशियन लोकांना चालती-बोलती प्रेतं बनू दिलं."

ओव्हस्यानिकोव्हा यांनी रशियन जनतेला युद्धाविरुद्ध आवाज उठवण्याचं आवाहनही केलं. त्या म्हणाल्या की आता फक्त रशियाचे लोकच हा "वेडेपणा" थांबवू शकतात.

ओव्हस्यानिकोवा यांची ओळख उघड झाल्यापासून, त्यांच्या फेसबुक पेजवर युक्रेनियन, रशियन आणि इंग्रजी भाषेत आभाराचे अनेक संदेश येत आहेत.

सरकारी नियंत्रणाखाली टीव्ही

रशियामधील टीव्हीवरील बातम्या दीर्घकाळापासून सरकारी नियंत्रणाखाली आहेत आणि सर्व प्रमुख वाहिन्यांनी वैयक्तिक विचार मांडणं जवळपास बंद केलंय.

मात्र युक्रेनवर झालेल्या हल्ल्यानंतर आलेल्या नव्या कायद्यानं प्रसारमाध्यमांसाठी पूर्वीपेक्षा अधिक भीतीचं वातावरण निर्माण केलंय. मार्च महिन्याच्या सुरुवातीला मंजूर झालेला कायदा रशियाच्या लष्करी कारवाईला "आक्रमण" म्हणणं बेकायदेशीर ठरवतो आणि त्याबद्दल कोणतीही खोटी बातमी चालवणं देखील कठीण होऊ शकतं.

रशियाची सरकारी माध्यमं युद्धाचं वर्णन "विशेष लष्करी ऑपरेशन" म्हणून करत आहेत आणि युक्रेनने चिथावणी दिल्याने कारवाई करण्यात आल्याचं दाखवण्यात येतंय.

इको ऑफ मॉस्को हे रेडिओ स्टेशन, ऑनलाइन टीव्ही चॅनेलसह काही स्वतंत्र मीडिया हाऊसेसनेही सरकारी दबावामुळे प्रसारण बंद केलं आहे.

रशियामध्ये बीबीसीवरही बंदी घातली गेलीय. यानंतर बीबीसीनेही आपल्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काही उपाययोजना केल्या आहेत. रशियामध्ये अनेक सोशल मीडिया साइट्स देखील ब्लॉक केल्या गेल्या आहेत, ज्यामुळे रशियन लोकांसाठी बातम्यांचे स्रोत कमी झाले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून रशियात फेसबुक आणि ट्विटरवरही बंदी घालण्यात आली आहे. रशियातील लोकप्रिय इंस्टाग्राम देखील सोमवारी ब्लॉक करण्यात आलं आहे. तरीसुध्दा अनेक रशियन लोक निर्बंध असूनही या साइट्सपर्यंत पोहोचत आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)