युक्रेन युद्ध : ‘रशियाला त्यांच्या सुरक्षेची वाटणारी चिंता रास्त’

फोटो स्रोत, Getty Images
युक्रेन आणि रशियामधील युद्ध आता आठव्या दिवसापर्यंत पोहोचलंय. रशियाचे सैन्य युक्रेनची राजधानी कीव्ह आणि इतर सर्व शहरे ताब्यात घेण्याच्याच्या प्रयत्नात आहेत.
रशियन सैन्याने युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं शहर खारकीव्ह मध्ये हल्ले करणं सुरूच ठेवलं असून अनेक सरकारी इमारतींना लक्ष्य केलंय. याच शहरातील प्रशासकीय इमारतीला रशियन सैन्यानं ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे.
असं मानलं जातय की आगामी काळात रशियाकडून आक्रमकता वाढू शकते, ज्यामुळे दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेचे नुकसान होऊ शकतं.
हे युद्ध थांबवण्यासाठी अमेरिका, जर्मनी, ब्रिटनसह सर्व देश रशिया आणि त्याच्या मित्र राष्ट्रांवर आर्थिक निर्बंध लादत आहेत.
या निर्बंधांमुळे रशियाच्या चलनात मोठी घसरण झालीय. मात्र हे आर्थिक निर्बंध युद्ध थांबवण्यात कितपत प्रभावी ठरतील हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
युक्रेन संकटावर आधारित एका विशेष कार्यक्रमात बीबीसीने माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. पी. मलिक आणि अमेरिकेतील भारतीय राजदूत मीरा शंकर यांच्याशी बोलून या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केलाय.
रशियन सैन्याने काही चूक केली होती का?
रशिया-युक्रेन युद्ध सुरू होण्यापूर्वी या युद्धात रशियाला सहज विजय मिळू शकेल, असा विश्वास होता.
मात्र युद्धाला सात दिवस उलटल्यानंतर आता हे मत बदलतांना दिसतंय. जनरल व्ही. पी. मलिक याबाबत सांगतात,
"पुतिन आणि रशियन सैन्याने सुरुवातीचे तीन दिवस जोरदार लष्करी मोहीम सुरू केली, त्यानंतर त्यांनी आपला वेग गमावला. याची दोन कारणं असू शकतात, पहिलं त्यांना वाटलं होतं की युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की लवकर शस्त्र खाली ठेवतील, पण ते घडलं नाही.
यानंतर युक्रेनला आपल्या सैन्याची पुनर्रचना करण्याची संधी मिळाली. इतर देशांतूनही मदत येऊ लागली, त्यामुळे त्यांचं मनोबलही वाढलं. मला वाटतं की तीन-चार दिवसांनी वेग सोडणं ही रशियन सैन्याची चुकी आहे.
या चुकीमुळे त्यांना आता चांगलाच त्रास सहन करावा लागणार आहे. यावेळी युक्रेनियन सैन्याचं मनोबल खूप उंचावलं आहे. त्यांना मदत मिळत आहे. त्यांनी विशेषत: शहरांमध्ये पुन्हा एकदा स्वत:ची पुनर्रचना केलीये. शहरांमधील लढाईची परिस्थिती नेहमीच खराब असते, ज्यामध्ये बचाव करणाऱ्या पक्षाला अधिक फायदा होतो. यामध्येही विलंब होत आहे. जीवित आणि मालमत्तेचे नुकसानही अधिक आहे.
पण इथं हे सांगणं महत्त्वाचं आहे की रशिया परसेप्शन बेटल म्हणजेच लोकांच्या दृष्टीने युद्ध हरलेला आहे. यामुळे युक्रेन, विशेषत: कीव्ह आणि इतर शहरे जिंकण्यात त्याला खूप त्रास होईल."
लष्करी युद्ध किती काळ चालेल?
मात्र रशिया आणि युक्रेनमधील लष्करी युद्ध किती काळ चालणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हा प्रश्न महत्त्वाचा आहे कारण अलीकडे रशियन लष्करी दलं युक्रेनच्या दिशेने जात असल्याच्या बातम्या येत आहेत. यासोबतच आगामी काळात रशियाकडून आक्रमकता वाढू शकते, असंही मानलं जातंय.
जनरल व्ही. पी. मलिक यांच्या मते परेस्पशन वॉरफेअर हा रणनीतीचा एक भाग आहे.
ते म्हणतात -
"आजकाल, मनं वळवण्याचं आणि मानसिक युद्धाचं महत्त्व वाढतंय. हे खरे आहे की रशियन सैन्य खूप शक्तिशाली आहे आणि युक्रेनियन सैन्य त्यांच्याशी स्पर्धा करू शकत नाही.
पण रशियाला आपले राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, म्हणजे युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना हटवण्यात आणि त्याच्या सैन्याला हद्दपार करण्यात अनेक अडचणी येतील. तुम्ही कितीही सैन्य आणलं तरी शहरामध्ये लष्कर लढाई लढणं सोपं नाही.
परंतु आता असं दिसतंय की, रशियन सैन्याला शहराच्या आत, विशेषतः कीव्हमध्ये जावं लागेल. युक्रेनच्या सैन्याकडे कमी शस्त्र आहेत, पण त्यांच्याकडे जॅव्हलिन 80 GM सारखी रणगाडाविरोधी शस्त्रं आहेत.
यासोबतच स्टिंगर मिसाईलसारखी विमानविरोधी शस्त्रं आहेत. यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागणार आहे. अशा स्थितीत हा लढा बराच काळ चालेल आणि दोन्ही बाजूंकडून मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होईल.
युद्ध थांबवण्यासाठी आर्थिक निर्बंध प्रभावी आहेत का?
अमेरिकेपासून ब्रिटनपर्यंत अनेक देशांनी रशियन बँका, उद्योग आणि व्यावसायिकांवर कडक निर्बंध लादले आहेत.
आणि जसजसं युद्ध पुढे सरकत आहे तसतशी या देशांच्या निर्बंधांची पातळीही वाढतेय. रशियन चलनात मोठी घसरण होतेय. पण असेंअसूनही रशियन आक्रमकता कमी होण्याची चिन्हं दिसत नाहीयेत.
अशा स्थितीत हे निर्बंध युद्ध थांबवण्यात प्रभावी ठरतील का,असा प्रश्न उपस्थित होत आहे.
युरोपपासून अमेरिकेपर्यंत अनेक लोक या निर्बंधांच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
या विषयावर आम्ही अमेरिकेतील भारताच्या माजी राजदूत मीरा शंकर यांच्याशी बोललो असता. या मुद्द्यावर युरोपीय देशांनी केलेल्या घोषणांना निव्वळ भाषणबाजी मानता कामा नये, असं त्यांनी सांगितलं.
या मुद्द्यावर मीरा शंकर म्हणतात-
अमेरिका आणि युरोपीय देशांनी रशियावर अतिशय कडक आर्थिक निर्बंध लादले आहेत. याआधीही, शीतयुद्ध सुरू असतानाही अमेरिका आणि नाटो यांनी कधीही रशियाला किंवा युरोपमधील व्हर्साय कराराला थेट आव्हान दिलं नाही. त्यामुळे अणुयुद्ध भडकण्याचा धोका वाढतो.
इतर देशांमध्ये, विकसनशील देशांमध्ये, आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेत त्यांची अप्रत्यक्ष युद्धं झाली आहेत. परंतु युरोपमध्ये कधीही थेट लष्करी संघर्ष झाला नाही.
यावेळी अमेरिकेने आधीच अतिशय कठोर आर्थिक निर्बंधांची तयारी केलीय. तसंच रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यास आम्ही हे आर्थिक निर्बंध लादू, असेही सांगितलं होतं. यावेळी अमेरिकेला त्यांच्या बरोबर युरोपला एकत्र आणण्यात यश मिळालंय.
सुरुवातीला जर्मनीला असे कडक निर्बंध लादायचे नव्हते. अमेरिकेचं नॉर्ड स्ट्रीम-2 पाइपलाइनवरही लक्ष होतं जी सुरू होणार होती. त्यावर बंदी घालावी अशी अमेरिकेची इच्छा होती. आधी जर्मनीला हे नको होतं. पण नंतर जर्मनीनेच ती स्थगित केलीय. आता अमेरिकेने नॉर्ड स्ट्रीम-2 वरही निर्बंध लादले आहेत.
आपण दीर्घकालीन विचार केल्यास, रशियावरील युरोपचं ऊर्जा अवलंबित्व कमी होईल. या आर्थिक निर्बंधांचा रशियावरही मोठा परिणाम होणार आहे. रुबल आधीच तीस टक्क्यांनी घसरला आहे. अनेक रशियन बँकांना स्विफ्ट प्रणालीवर बंदी घालण्यात आलीय.
परदेशी बँकांमध्ये ठेवलेल्या सेंट्रल बँक ऑफ रशियाची रिझर्व्ह मालमत्ता गोठवण्यात आलीय. रशियन लोकांना आता त्यांच्या बँकेत 20 टक्के व्याज द्यावं लागतंय कारण लोक घाबरून बँकेतून पैसे काढत होते. हे रोखण्यासाठी व्याजदरात वाढ करण्यात आलीय.
ब्रिटीश पेट्रोलियमसारख्या ऊर्जा क्षेत्रात रशियाला सहकार्य करणाऱ्या अनेक कंपन्या तिथून निघत आहेत. अशा परिस्थितीत रशियाला अडचणींचा सामना करावा लागेल, असे मला वाटतं.
पण याचे संदर्भ लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की, अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांनी रशियाला त्यांच्या सुरक्षेबाबत वाटणाऱ्या रास्त चिंतेकडे दुर्लक्ष केलंय. त्यामुळे त्यांनी युद्ध थांबवण्याची संधी गमावलीय.
आणि जोपर्यंत या युद्धावर आर्थिक निर्बंधांचा प्रभाव आहे, ते युद्ध संपवण्यात प्रभावी ठरू शकतील असं आत्ताच सांगता येणार नाही. कारण युद्ध अधिक वेगाने पुढे जात आहे आणि या निर्बंधांमुळे युद्ध संपेल असं म्हणता येणार नाही."

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








