मराठी मुलं युक्रेन-रशियामध्ये या चार कारणांसाठी जातात

फोटो स्रोत, AFP
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी
"आम्ही युक्रेनमध्ये आलो कारण आम्हाला डॉक्टर बनायचं आहे. महाराष्ट्रासह देशात सरकारी एमबीबीएस महाविद्यालयांची संख्या कमी आहे त्यामुळे प्रवेश मिळणं सुद्धा खूप कठीण आहे. खासगी शिक्षणासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च येतो. मध्यम कुटुंबातील विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या खासगी वैद्यकीय शिक्षण भारतात परवडणारं नाही," असं युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेले विद्यार्थी सांगतात.
24 फेब्रुवारीपासून आपण सगळेच युक्रेन आणि रशिया या दोन देशांमधील संघर्षाच्या बातम्या पाहत आहोत. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची दृश्य आपण पाहतोय आणि या दृश्यांमध्ये सर्वाधिक संख्या ही तरुण मुलांची दिसते. यात बहुतांश विद्यार्थी आहेत.
ही दृश्य पाहून तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल की, एवढे विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षणासाठी का गेले? त्यातही वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याने हा ही प्रश्न उपस्थित होतो की, डॉक्टर बनण्यासाठी एवढी भारतीय मुलं युक्रेनला का जातात? याच प्रश्नांचा आढावा आपण घेणार आहोत.
युक्रेनमध्ये अंदाजे जवळपास 18 हजार भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत असं अनेक मीडिया रिपोर्ट्समधून समोर आलं आहे. यामागील चार मोठी कारणं काय आहेत हे जाणून घेऊया,
1. भारतात सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या कमी
भारतात बारावीचा निकाल आणि त्यानंतर NEET (National Eligibility Test) या वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये MBBS साठीचे प्रवेश होतात. देशभरातून लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात.
महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे (DMER) माजी संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "भारतामध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी स्पर्धा खूप जास्त आहे. परीक्षा देणाऱ्या साधारण 15 लाख विद्यार्थ्यांमध्ये केवळ 1 लाख विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळतो. म्हणजेच प्रवेश मिळवण्यासाठी 15 लाख विद्यार्थ्यांना पहिल्या एक लाख मुलांमध्ये आपले स्थान मिळवावे लागते. यापैकी सरकारी महाविद्यालयात प्रवेश मिळवणाऱ्यांची संख्या काही हजारात आहे. मग उर्वरित लाखो विद्यार्थी काय करतात? हा मुख्य प्रश्न आहे."

फोटो स्रोत, ANAS CHAUDHARY
"तर हे विद्यार्थी इतर देशांमध्ये MBBS शिक्षण घेण्याचा पर्याय अवलंबतात. यापैकी बहुतांश विद्यार्थी युक्रेन, चीन, रशिया, मॉरिशयस, बांगलादेश, फिलिपिन्स अशा अनेक देशांमध्ये जातात,"
पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील 9 विद्यार्थ्यांनी डिसेंबर 2021 मध्ये युक्रेनमधील खारकीव्ह राष्ट्रीय वैद्यकीय विद्यापीठात प्रवेश घेतला. हे सर्व विद्यार्थी आता MBBS च्या पहिल्या वर्षी शिकत आहेत.
यापैकी एक विद्यार्थी सुशांत शितोळेने बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "बारावीच्या परीक्षेनंतर आम्ही वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट (National eligibility test) दिली. परंतु सरकारी महाविद्यालयात नंबर लागला नाही. सरकारी महाविद्यालयात शिक्षणाचा दर्जा चांगला असून शिक्षणाचा खर्चही कमी असतो. पण प्रवेशाच्या जागा विद्यार्थ्यांच्या तुलनेत खूप कमी आहेत."
भारतीय मुलं विदेशात वैद्यकीय शिक्षणासाठी जात असल्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे सरकारी महाविद्यालयांची अपुरी संख्या आहे असं वैद्यकीय तज्ज्ञही सांगतात.
इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे सांगतात, "महाराष्ट्रासह देशभरात सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या तुलनेत प्रवेशाच्या जागाही कमी आहेत. त्यामुळे सरकारी महाविद्यालयाच्या गुणवत्ता यादीनुसार ज्यांना प्रवेश मिळत नाही त्यांना खासगी महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागतो. खासगी महाविद्यालय हे बहुतांश विद्यार्थ्यांना परवडणारे नाही."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
2021 च्या डिसेंबर महिन्यातच केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी लोकसभेत याबाबत माहिती दिली होती. त्यांच्या मते, देशात सरकारी आणि खासगी महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसच्या एकूण 88120 जागा आहेत, तर बीडीएसच्या 27498 जागा आहेत.
या जागांसाठी गेल्यावर्षी सुमारे आठ लाख मुलांनी परीक्षा दिली होती. 88 हजार जागांपैकी सुमारे 50 टक्के खासगी महाविद्यालयांत आहेत. त्यामुळं वैद्यकीय शिक्षणाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भारताच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवणं कठिण असतं. सुमारे दहा टक्के मुलांनाच हा प्रवेश मिळणं शक्य होतं.
2. 'न परवडणारे' खासगी वैद्यकीय शिक्षण
सुशांत शितोळे पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात राहतो. मध्यमवर्गीय कुटुंब असल्याने महाराष्ट्रात खासगी महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेता आले नाही असं सुशांत म्हणाला.
तो पुढे सांगतो, "युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण भारताच्या तुलनेत स्वस्त आहे. इथेही प्रवेश परीक्षा द्यावी लागते. तसंच बारावीमध्ये 50 टक्के गुण असणं अनिवार्य आहे. युक्रेनमधील वैद्यकीय शिक्षणाला जागतिक मान्यताही आहे. भारतात आल्यानंतर आम्हाला राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची एक परीक्षा द्यावी लागेल आणि त्यानंतर आम्हाला डॉक्टर म्हणून काम करता येईल."

फोटो स्रोत, PAvan meshram
दिल्ली येथील एम्स हॉस्पिटलमध्ये आपत्कालीन कक्षात प्रॅक्टीस करणाऱ्या डॉ. अजित थोरात यांनी रशियात येथून आपलं एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलं आहे. रशियातील स्मोलेन्स्क स्टेट मेडिकल विद्यापीठात त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतलं आणि जून 2018 मध्ये ते भारतात परतले. गेल्या दोन वर्षांपासून ते एम्समध्ये काम करत आहेत.
डॉ. अजित थोरात सांगतात, "भारतात वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवणं आव्हानात्मक आहे. विद्यार्थी संख्या जास्त आणि तुलनेने प्रवेशाच्या जागा कमी हे वास्तव आहे. खासगी महाविद्यालयात फी एवढी जास्त आहे की तुम्ही प्रवेश घेण्याचं स्वप्नही पाहू शकत नाही. एवढा खर्च सामान्य घरातल्या मुलांना परवडणारा नाही. त्यामुळे इतर पर्यायी शिक्षणाचा विचार विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंब करतात."
"एमबीबीएसच काय तर भारतात बीडीएस आणि बीएएमएस आणि इतर वैद्यकीय खासगी शिक्षणाच्या एका वर्षाच्या खर्चात युक्रेन, रशिया यांसारख्या अनेक देशांमध्ये चारही वर्षाचा एमबीबीएसचा खर्च पूर्ण होतो. त्यामुळेच डॉक्टर बनण्याचं स्वप्न घेऊन विद्यार्थी तिथे जातात.
"महाराष्ट्रातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षण सामान्य किंवा गरीब कुटुंबातील विद्यार्थ्याला परवडणारे नाही," असं डॉ. प्रवीण शिनगारे यांनीही सांगितलं.
ते म्हणाले, "खासगी महाविद्यालयाचा खर्च किती असतो याचा अंदाज तुम्हाला यावा यासाठी मी नवी मुंबईतील एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयाची फी तुम्हाला सांगतो. या नामांकित महाविद्यालयाची एमबीबीएसची वर्षाची फी 26 लाख रुपये एवढी आहे. एवढ्या पैशात तर युक्रेनमध्ये विद्यार्थी चार वर्षे शिकून पदवी घेऊन परत येतात."

फोटो स्रोत, Sushant Shitole
हे खासगी शिक्षणाचं वास्तव आहे असं डॉ. अविनाश भोंडवे सांगतात. ते म्हणाले, "विद्यार्थी हुशार असला तरी खासगी शिक्षण मात्र परवडत नाही. राज्यात खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचे शुल्क वर्षाला 30 ते 50 लाख रुपयांपर्यंत आहे. सरकारी महाविद्यालयांची संख्या पुरेशी नाही. मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं?"
"मी अशा मुलांना भेटलो आहे. मी त्यांना काम करतानाही पाहिलं आहे. या मुलांची मेहनत करण्याची तयारी सुद्धा असते. युक्रेन, चीन, रशिया या देशात वैद्यकीय शिक्षणासाठी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे," भोंडवे सांगतात.
3. युक्रेनच्या एमबीबीएस पदवीला भारतात मान्यता
यूक्रेनमध्ये वैद्यकीय प्रवेशासाठी संबंधित विद्यापीठाला भारतीय मेडिकल काऊन्सिलची मान्यता मिळालेली असायला हवी.
विदेशात वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुलांना भारतात फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन (FMGE) द्यावी लागते. ती उत्तीर्ण झाल्यानंतर वैद्यकीय सेवा बजावण्यासाठी परवाना मिळतो आणि प्रॅक्टीस करता येऊ शकते.
300 गुणांची ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किमान 150 गुण अनिवार्य असतात.

फोटो स्रोत, Sushant Shelar
डॉ. प्रवीण शिनगारे सांगतात, "साधारण पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत विदेशातून पदवी घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतात वैद्यकीय प्रॅक्टीससाठी परवानगी नव्हती. पण अशा काही विद्यार्थ्यांनी या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली."
ते म्हणाले, "सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार, विदेशात एमबीबीएसचे शिक्षण घेतले असल्यास भारतात आल्यानंतर तुम्ही त्यांची एक परीक्षा घ्या. या परीक्षेत विद्यार्थी पात्र ठरल्यास भारतीय वैद्यकीय शिक्षणाच्या मापदंडानुसार त्यांना नोंदणीसाठी मान्यता दिली जाईल असा निष्कर्ष काढता येऊ शकतो. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर पदवी घेऊन भारतात परतललेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाते आणि मग त्यांना भारतात प्रॅक्टीस करण्यासाठी मान्यता दिली जाते."
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडून ही परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत पात्र ठरल्यास परवाना मिळवलेल्या डॉक्टरांना इतर डॉक्टरांप्रमाणेच वैद्यकीय सेवा देण्याची संधी मिळते.
डॉ. अजित थोरात सांगतात, "आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे जे विद्यार्थी शिक्षण घेऊन परत येतात त्यांना भारतात कामासाठी संधी मिळते हे मी पाहिलं आहे. अनेकजण स्वतंत्र प्रॅक्टीसही करू शकतात. तसंच खासगी हॉस्पिटल्समध्येही त्यांना नोकरीची संधी असते. काही विद्यार्थी युक्रेनमधूनच परस्पर इतर देशात कामासाठी जातात."
"डिसेंबर 2021 मध्ये विदेशात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सुमारे 23 हजार मुलांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी केवळ 5,665 मुलंच त्यात उत्तीर्ण होऊ शकले होते.'' अशी माहिती युक्रेनच्या उजारॉड नॅशनल युनिव्हर्सिटीतून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणारे डॉ. सुनिल फेनिन यांनी दिली.

फोटो स्रोत, ANAS CHAUDHARY
"मी 2020 मध्ये फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट परीक्षा दिली होती. ही परीक्षा सोपी नसते. त्यासाठी तयारी करावी लागते. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मला परवाना मिळाला आणि आता मी दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात डॉक्टर आहे," असं त्यांनी सांगितलं.
4. युक्रेनमध्ये एमबीबीएस कॉलेजमध्ये सहज प्रवेश मिळतो?
यूक्रेनमध्ये सुमारे दहा हजार वैद्यकीय जागांसाठी वर्षातून दोनवेळा प्रवेश मिळतो. पहिला सप्टेंबर आणि दुसरा जानेवारी महिन्यात.
युक्रेनच्या राज्यांमध्ये त्यांच्या सरकारी स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीही आहेत. त्यांच्यावर राज्याचं नियंत्रण असतं. युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची पहिली पसंती ही नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटी हीच असते.
वैद्यकीय संचालनालयाचे माजी संचालक डॉ. शिनगारे यांच्या माहितीनुसार, "2005 साली केवळ जवळपास एक हजार विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी विदेशात जात होते. आता ही संख्या दरवर्षी वाढत चालली आहे. यंदा जवळपास 11 हजार विद्यार्थी एमबीबीएस करण्यासाठी विदेशात गेले आहेत."
युक्रेनमध्ये सध्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी सांगितंल, "युक्रेनमध्ये काही विद्यापीठांत नीटच्या धर्तीवर प्रवेश मिळतो तर काही विद्यापीठं आपली स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेतात. प्रवेशाच्या जागा अधिक असल्याने बहुतांश विद्यार्थ्यांना संधी मिळण्याची शक्यता असते."

फोटो स्रोत, Rajat johal
"या देशांमध्ये शिक्षणाचा दर्जाही उत्तम आहे. एकाच वर्गात 100 ते 150 विद्यार्थ्यांना शिकवलं जात नाही. तर 10 ते 15 विद्यार्थ्यांचे गट केले जातात आणि प्रत्येक गटाला स्वतंत्र शिकवलं जातं. वैद्यकीय शिक्षणासाठी जी आधुनिक साधनं आवश्यक आहेत ती सुद्धा उपलब्ध असतात. त्यामुळे भारतात आल्यानंतर काम करताना अडचण येत नाही." असं डॉ. अजित थोरात यांनी सांगितलं.
भारतातल्या वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता युक्रेनमधील वैद्यकीय शिक्षणापेक्षा अधिक चांगली असल्याचं डॉ. प्रवीण शिनगारे सांगतात.
"भारतात वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा या देशांच्या तुलनेत उंचावलेला आहे. वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ताही चांगली आहे. त्यामुळे भारतात महाविद्यालयात सहज प्रवेश मिळत नाही. तसंच पदवीपर्यंतचे शिक्षणही एवढं सोपं नसतं. त्यामुळे अनेक विद्यार्थी या विचारानेही पर्यायी देशांमध्ये शिक्षण घेण्याचं ठरवतात."
एफिनिटी एज्युकेशन भारतीय विद्यार्थ्यांना यूक्रेनच्या मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळवून द्यायचं काम करतं. "14 फेब्रुवारीलाही आम्ही जवळपास चाळीस मुलांना युक्रेनला पाठवलं आहे. 27 फेब्रुवारीपर्यंत आमच्याकडे बुकींग आहे. सप्टेंबरच्या इन्टेकची अखेरची तारीख 28 फेब्रुवारी आहे. युक्रेमध्ये प्रवेशासाठी बायोमॅट्रिक आणि पोलिस व्हेरीफिकेशन अनिवार्य आहे. उमेदवार तिथं उपस्थित असेल तरच त्याला प्रवेश मिळेल. एक वर्ष वाचवण्यासाठी विद्यार्थी अजूनही युक्रेनला जात आहेत," असं एफिनिटी एज्युकेशनचे संचालक विशू त्रिपाठी सांगतात.
युक्रेनमधून भारतात परतण्यासाठी आता विद्यार्थ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. अजूनही शेकडो विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. सुखरूप घरी येण्याची चिंता तर या विद्यार्थ्यांना आहेच पण अर्धवट शिक्षण सोडून येताना डॉक्टर बनण्याचं स्वप्न अपूर्ण तर राहणार नाही ना अशीही भीती या मुलांना आहे.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








