पगाराचं पुरेसं ज्ञान नसल्याने अनेक कामगारांना कमी पगार मिळतो का?

Office workers

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो
    • Author, अॅना जोन्स
    • Role, बीबीसी वर्कलाईफ

आपण करतोय त्याच कामासाठी इतर लोकांना किती उत्पन्न मिळतंय, याबद्दल लोक खूपच कमी बाजूचा अंदाज गृहीत धरतात, त्यामुळे त्यांना कमी वेतनावर काम करावं लागतं आणि त्यांचे इतरही अनेक तोटे होतात.

अनेक लोकांच्या दृष्टीने जास्त पगार मिळवणं ही नवीन नोकरी शोधण्यासाठीची प्रेरणा असते. पण अर्थात एवढाच विचार त्यामागे नसतो. सध्या करत असलेलंच काम करून आपल्याला जास्त पैसा कमावता येत असेल, तर असे पर्याय शोधण्यात तरी काही तोटा नाही. पण मुळात आपण करतोय त्या कामासाठी जास्त पैसा मिळण्याची शक्यता आपल्याला आधी विचारात घ्यावी लागते.

अलीकडे झालेल्या एका अभ्यासानुसार, आपल्यासारखंच काम करणाऱ्या इतर लोकांना किती उत्पन्न मिळतंय याबद्दल लोक खूपच कमी बाजूचा अंदाज गृहीत धरत असतात. त्यामुळे लोक त्यांच्या सध्याच्याच कामासाठी जास्त उत्पन्नाची किंवा जास्त वेतनाची नोकरी शोधण्याचा प्रयत्न करत नाहीत. विशेषतः सर्वांत कमी उत्पन्न असलेल्या स्तरातील लोकांना याचा मोठा फटका बसतो. कर्मचारी पगारातील विषमतेबद्दल अधिक सजग असते, तर कमी वेतनाचे किमान 10 टक्के रोजगार सध्याच्या दरानुसार व्यवहार्यच उरले नसते, असं अभ्यासक म्हणतात.

मग, आपल्यासारखंच काम करणाऱ्या दुसऱ्यांचा पगार जास्त असेल, ही शक्यता आपण का गृहीत धरत नसू?

पगाराविषयी पारदर्शकता असेल तर त्याचे काही लाभ असतात, हे लोकांना आता अधिकाधिक जाणवू लागलं आहे. विशेषतः पगारांमधील लिंगभावात्मक तफावत कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. परंतु, एकंदरीत आपण पगाराविषयी मोकळेपणाने बोलायला अनुत्सुक असतो. लोक पगाराविषयीची माहिती शोधत नाहीत, याची इतरही काही सबळ कारणं आहेत. पण अनेक वेळा पगाराबाबत अधिक माहिती राखणं आपल्याच फायद्याचं असू शकतं. जागतिक साथीच्या काळात कर्मचाऱ्यांची मागणी कधी नव्हे एवढी वाढली आहे, त्यामुळे पगाराविषयीचं कुतूहल थोडं वाढवल्याचा चांगला लाभ होऊ शकतो.

नकारात्मक धारणा

पगाराच्या बाबतीत कर्मचारी त्यांच्या 'बाह्य पर्यायां'कडे कशा रितीने बघतात, याचा शोध घेण्यासाठी अमेरिका, युनायटेड किंगडम व जर्मनी इथल्या काही विद्यापीठांमधील अभ्यासक एकत्र आले होते. या अभ्यासक-चमूमध्ये लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्समधील अर्थशास्त्रज्ञ निना रूसिली यांचाही सहभाग होता. जर्मनीत 2019 व 2020 या वर्षांमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासात 516 लोकांचं सर्वेक्षण करण्यात आलं. हे लोक 'ढोबळमानाने श्रमिक लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करणारे होते'. 'इतरत्र आपल्याला किती उत्पन्न मिळेल, याबद्दलच्या लोकांच्या धोरणा तपासणं' आणि मग 'त्यांचं प्रत्यक्षातील उत्पन्न किती आहे याच्याशी त्याची तुलना करणं', हा या अभ्यासामागील उद्देश होता, असं रूसिली सांगतात.

Office workers

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

पुढील तीन महिन्यांमध्ये निराळ्या कंपनीत याच कामासाठी रुजू व्हावं लागलं, तर तुमचं उत्पन्न जास्त असेल, कमी असेल किंवा साधारण सारखंच असेल, असा प्रश्न या सर्वेक्षणातील सहभागी व्यक्तींना विचारण्यात आला. त्यातील अर्ध्यांनी सांगितलं की, त्यांना साधारण सारखाच पगार मिळेल. पण याची तुलना त्यांच्या काही माजी सहकाऱ्यांना मिळणाऱ्या नवीन पगारांशी करण्यात आली, तेव्हा या लोकांनी स्वतःच्या संभाव्य भावी पगाराविषयी बाळगलेल्या धारणा अतिशय नकारात्मक असल्याचं स्पष्ट झालं. त्यांचे जे सहकारी पूर्वी कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीत रुजू झाले होते, त्यातील बहुतांशांच्या पगारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती, असं या अभ्यासातून समोर आलं.

शिवाय, सर्वेक्षण झालेल्यांपैकी सुमारे अर्ध्या लोकांना असं वाटत होतं की, त्यांना त्यांच्या कामाच्या हिशेबाने मध्यम पातळीवरील वेतन मिळतं आहे, पण वास्तवात केवळ 20 टक्के लोकांना त्या पातळीवरील वेतन मिळत होतं. उर्वरित लोकांना खूपच कमी वेतन मिळत होतं. विशेष म्हणजे सर्वांत कमी वेतन देणाऱ्या कंपन्यांमधील लोकांनाही ते इतरत्र जास्त पगार मिळवू शकतात हा मुद्दा पटण्याची शक्यता कमी होती.

"रोजगार बाजारपेठेविषयी योग्य माहिती नसणाऱ्या लोकांचे पगार आणखी कमी करणं कंपन्यांना का शक्य होतं, याचा अंदाज यावरून येतो," असं रूसिली म्हणतात. आपल्याला प्रचंड कमी पगार मिळतो, हे कळलं असतं तर त्या कर्मचाऱ्यांनी 'इतरत्र पर्यायांची शोधाशोध सुरू केली असती.'

व्हीडिओ कॅप्शन, नवीन वेतन नियम काय आहेत? या नियमांचा कर्मचाऱ्यांच्या /नोकरदारांच्या पगारावर काय परिणाम होई

सर्व कर्मचाऱ्यांना बाजारपेठेतील पगाराची अचूक माहिती उपलब्ध असती, तर "सध्याच्या वेतनपातळीवर 10 टक्के ते 17 टक्के रोजगार व्यवहार्य ठरले नसते," कारण कामगारांनी अधिक पगाराची मागणी केली असती, असा अंदाज रूसिली व त्यांच्या सहलेखकांनी नोंदवला आहे.

आपण अधिक माहिती का मिळवत नाही?

लोकांना इतर ठिकाणच्या पगारांविषयी इतकी कमी माहिती का असते, याचा शोध सदर अभ्यासात घेतला नव्हता. पण या संशोधनातून सूचित होतंय त्यानुसार, बहुतांश कर्मचाऱ्यांना अधिक चांगली निवड करण्यासाठी पगाराविषयी अधिक माहिती हवी असते, तरीही प्रत्यक्षात ते अशी माहिती स्वतः द्यायला किंवा मागायला मात्र अनुत्सुक असतात.

उदाहरणार्थ, एका मोठ्या आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थेचा या संदर्भात अभ्यास करण्यात आला, त्यानुसार, एखाद्या सहकाऱ्याचा पगार विचारताना आपल्याला अवघडल्यासारखं होईल, असं उत्तर 89 टक्के प्रतिसादकांनी दिलं, आणि अगदी छोटासा बोनस मिळाला तरी आपण स्वतःच्या पगाराचा आकडा कोणाला सांगणार नाही, असं 38 टक्क्यांनी सांगितलं.

अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स लॉवेल विद्यापीठात मॅनिंग स्कूल ऑफ बिझनेसमध्ये व्यवस्थापन विषयाच्या सहायक प्राध्यापक असणाऱ्या तमारा मोन्ताग स्मिट म्हणतात की, 'इतरांसोबतच्या आपल्या संबंधांना याने बाधा तर पोचणार नाही ना' या चिंतेपायी लोक पगाराविषयी चौकशी करायला अनुत्सुक असतात, असं त्यांच्या संशोधनातून सूचित होतं. आपल्याला आपल्या सहकाऱ्यांपेक्षा खूप जास्त किंवा खूप कमी पगार मिळू शकतो, असं वाटणाऱ्या कर्मचाऱ्यांना हे विशेषत्वाने लागू होतं. आपलं उत्पन्न किती आहे हे लोकांना कळलं तर कामाच्या ठिकाणी आपली पत ढासळेल, असं या लोकांना वाटत असल्याचं स्मिट सांगतात.

तसंच लोकांचं स्वतःच्या रोजगारदात्याविषयीचं मत काय आहे, यावरही पगाराबद्दलच्या चौकशीचा मुद्दा अलंबून असतो, असं त्या म्हणतात. अमेरिकी कामगारांच्या एका अभ्यासात मोन्ताग स्मिट यांना असं आढळलं की, कोणाला 'स्थितिशीलतेमध्येच सुख वाटत असेल' आणि आपला मालक वा रोजगार बाजारपेठ आपल्या कामासाठी वाजवी मोबदला देते आहे असं त्यांना वाटत असेल, तर आपल्या आजूबाजूच्या लोकांचं उत्पन्न काय आहे याबद्दल माहिती घेण्यात त्यांना काहीच रस नसण्याची शक्यता असते.

कामाचे ठिकाण

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कामाचे ठिकाण

दुसऱ्या बाजूला, व्यवस्थेच्या वाजवीपणाविषयी शंका असल्यामुळे कामगारांनी स्वतःच्या वेतनाबाबत प्रश्न उपस्थित केल्याचे दाखले मिळतात. या शंकेमुळे संबंधित कर्मचारी 'पगाराविषयीची माहिती मिळून दुसरे पर्याय शोधण्याची शक्यता वाढली'. अशा वेळी पगारविषय गोपनीयतेची कॉर्पोरेटविश्वातली धोरणं विपरित परिणाम करणारी ठरू शकतात, कारण गोपनीयतेमुळे कर्मचाऱ्याला पगाराचं अन्याय्य वाटप होत असल्याची भावना जास्त तीव्रतेने जाचू शकते, असं त्या सांगतात.

अर्थातच संरचनात्मक विषमतांमुळे काही लोकांना ते इतरांपेक्षा जास्त पगार इतरत्र जाऊन मिळवू शकतात असं वाटतं. युनायटेड किंगडममधील एका ताज्या सर्वेक्षणानुसार, गोऱ्या कर्मचाऱ्यांपेक्षा वांशिक अल्पसंख्याक कर्मचारी वेतनाबाबत वाटाघाटी करण्याची शक्यता कमी असते, कारण आपण यशस्वी होऊ असा विश्वास त्यांना वाटत नसतो. अमेरिकेत कमी वेतन असलेल्या रोजगारांमध्ये काळ्या कर्मचाऱ्यांचं प्रमाण खूप जास्त आहे. तसंच वेतनविषयक मागणी करून वाढ मिळवण्यात स्त्रियांपेक्षा पुरुषांचं प्रमाण जास्त आहे.

रूसिली व मॉन्ताग-स्मिट या दोघांच्याही म्हणण्यानुसार, किमान स्त्रियांच्या बाबतीत पगाराविषयी अधिक माहिती मिळाली तर याबाबतीत असणारी विषमता कमी होऊ शकेल. पगाराबाबत पारदर्शकता असणाऱ्या कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराकरता कर्मचारी वाटाघाटी करण्याची शक्यता पुरुष व स्त्रिया यांच्याबाबतीत समान असते. तसंच, एकाच कामासाठी पुरुष सहकाऱ्याला मिळणाऱ्या वेतनापेक्षा कमी वेतनाची मागणी स्त्रियांनी करण्याची शक्यताही संपुष्टात येते.

वरचढ ठरणारे कर्मचारी?

एकंदरीत, अलीकडच्या वर्षांमध्ये पगारांविषयीची अधिक पारदर्शकता राखण्याच्या दिशेने 'संथ प्रवाह' सुरू झाल्याचं निरीक्षण मोन्ताग-स्मिट नोंदवतात. "मध्यम पगार किती आहे किंवा सर्वाधिक उत्पन्न कोणत्या कर्मचाऱ्याचं आहे, यांसारखे तपशील उघड करण्याची कल्पना सुमारे 10 वर्षांपूर्वी मनुष्यबळ विकास विभागांमध्ये बोलणंही शक्य नव्हतं," असं त्या म्हणतात. "पण आता हा कमी-अधिक प्रमाणात नियम होताना दिसतो आहे."

ग्लासडोअरसारख्या वेबसाइटींवर लोक निनावीपणे स्वतःच्या पगारांची आकडेवारी उघड करतात. अशा वेबसाइटींच्या प्रसारामुळेसुद्धा ही प्रेरणा वाढली असेल. कर्मचारी या वेबसाइटींचा वापर स्वतःच्या लाभासाठी करत असल्याचं मोन्ताग-स्मिट म्हणतात. 'तरुण लोक पगाराविषयीची माहिती मागण्ची व देण्याची शक्यता जास्त असते,' असंही त्यांच्या संशोधनातून समोर आलं आहे. हा प्रवाह असाच सुरू राहण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

'मला वाटतं, मोठ्या प्रमाणात पार पडलेलं राजीनामासत्र आणि आपली सध्याची स्थिती, यांमुळे लोक पगाराविषयीची माहिती अधिक लाभदायक पद्धतीन वापरण्याची शक्यता आहे, कारण सध्या बहुतांश क्षेत्रांमध्ये कर्मचाऱ्यांना वरचढ ठरण्याची संधी आहे,' असं त्या म्गणतात.

आपलं संशोधन कर्मचाऱ्यांना उपयोगी पडेल, अशी आशा रूसिली व त्यांच्या सहलेखकांना आहे. लोकांनी वेतनाविषयी तुलना करणाऱ्या वेबसाइटींवर अधिक वेळ घालवावा आणि वेतनवाटपाचा अंदाज घ्यावा, असं त्या सुचवतात. पण या संदर्भातील निषिद्ध गोष्टींना न जुमानता थेट माजी सहकाऱ्यांना त्यांचं आत्ताचं उत्पन्न विचारावं, असंही त्या म्हणतात. "असं केलं तर आपल्याला आत्ता माहीत नसलेल्या काही पर्यायांविषयी माहिती मिळते, " असं त्या सांगतात.

लोकांना पगाराविषयी माहिती मिळवण्यासाठी प्रोत्साहित करण्यालाही मर्यादा असल्याचं त्या कबूल करतात. योग्य माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न व वेळ दोन्हींची गरज असते. शिवाय, मुळात आपल्यासाठी काही संधी आहेत आणि आपण जास्त उत्पन्न कमवू शकतो, असा विश्वास आपल्या मनात असणं गरजेचं आहे. कमी वेतन देणाऱ्या नोकऱ्यांमध्ये अडकून पडण्याची शक्यता ज्या 10 टक्के कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असते त्यांच्यापर्यंत आम्हाला पोचायचं आहे, असं त्या सांगतात.

"आपल्याला इतरत्र अधिक उत्पन्न मिळणार नाही असा आपला ठाम विश्वास असेल, तर आपण माहिती कशी मिळवू शकू?" असं त्या म्हणतात. "या प्रश्नाचं उत्तर आमच्या संशोधनातून अजून तरी पुढे आलेलं नाही, पण आम्ही त्या दिशेने जाऊ अशी आम्हाला आशा आहे."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)