You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सेक्स आरोग्यः लिंग ताठरता आणि लैंगिक क्षमता वाढण्यासाठी तुम्ही 'त्या' गोळ्या घेत असाल तर...
(मैत्रिणीसोबत लॉजवर गेलेला तरुण सेक्स करताना अचानक बेशुद्ध पडला आणि त्यात त्याचं निधन झालं. त्या तरुणाने लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी गोळ्या घेतल्याचं समोर आलं. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या गोळ्या घेण्याचे धोके आहेत, असं सांगितलं जातं.)
लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी तसंच सेक्सचा कालावधी वाढवण्यासाठी लोक विविध प्रकारच्या औषधांचं सेवन करतात. यांपैकी बहुतांश औषधांवर बंदी घालण्यात आलेली आहे. या औषधांच्या सेवनामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे.
अशी औषधं आपण घ्यायला हवीत का? नेमक्या कुणाला यासंदर्भात औषधोपचारांची गरज असते? अशी अनेक प्रश्न याबाबत उपस्थित होतात.
बीबीसी तमीळने आपल्या लैंगिक आरोग्य विषयक मालिकेत गुप्तरोग तज्ज्ञ डॉ. जयाराणी कामराज यांच्याशी चर्चा केली. त्यांनी दिलेली माहिती सविस्तरपणे आपण पाहू.
मद्य-अंमली पदार्थांमुळे लैंगिक उत्तेजना?
लैंगिक उत्तेजना आणि क्षमता वाढवण्यासाठी विविध प्रकारच्या औषधांचा वापर गेल्या अनेक वर्षांपासून केला जात आहे. पण काही औषधांमुळे मानवी शरिरावर विपरित परिणाम होऊ शकतो, हेही तितकंच खरं.
मुळात उत्तम लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी मन आणि शरीर यांच्यात समन्वय असणं गरजेचं आहे, असं तज्ज्ञ सांगतात.
लैंगिक संबंधांवेळी मद्यप्राशन केल्यास तो कालावधी वाढवता येऊ शकतो, असा गैरसमज लोकांमध्ये आहे.
मद्यप्राशनाने सेक्स करण्याची इच्छा जागृत होते. त्यावेळी आपण काय करत आहोत, याचं भान राहत नसल्यामुळे मद्यामुळे क्षमता वाढीस लागते, असा गैरसमज पसरला आहे.
पण खरं तर मद्यप्राशनामुळे आपल्या लैंगिक क्षमतेचं नुकसान होण्याचीच जास्त शक्यता आहे. मद्याच्या अतिसेवनामुळे लैंगिक उत्तेजना कमी होऊ लागते.
याव्यतिरिक्त आणखी एक धोकादायक सवय म्हणजे ड्रग्जचं सेवन. कोकेन किंवा इतर अंमली पदार्थांच्या सेवनामुळे लैंगिक आयुष्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. त्यामुळे लैंगिक क्षमता चांगली राखायची असेल तर या सर्व गोष्टींपासून आपण दूर राहायला हवं.
डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय कामोत्तेजक औषधं घेऊ शकतो का?
तुम्हाला एखादी लैंगिक समस्या जाणवत असल्यास सर्वात उत्तम पर्याय म्हणजे सर्वप्रथम डॉक्टरांची भेट घेणं हाच असतो.
डॉक्टरांनी तुमच्या समस्येचं योग्य निदान केल्यानंतर त्यानुसार ते तुम्हाला औषधोपचार सुचवू शकतात.
पण गेल्या काही वर्षांत काही औषधांबाबत लोकांच्या मनात काही धारणा तयार झाल्या आहेत. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही औषधे थेट खरेदी केली जातात. पण त्याचा फायदा होण्याऐवजी नुकसान होण्याची शक्यता जास्त असते.
परिस्थिती हाताबाहेर गेल्यास डॉक्टरही तुम्हाला या समस्येतून वाचवू शकणार नाहीत. त्यामुळे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय स्वतःहून कधीच कोणतं औषध घेण्यास जाऊ नका.
आकडेवारीनुसार, जगातील 38 टक्के पुरुषांना लैंगिक उत्तेजन येण्यात काही ना काही समस्या असू शकतात. 41 टक्के महिलांना कोणत्या ना कोणत्या स्वरुपात लैंगिक समस्या असू शकतात.
त्यामुळे डॉक्टरांकडे गेल्याशिवाय त्यांच्या समस्येचं मूळ कारण आपल्याला समजू शकणार नाही. म्हणूनच तुमच्या पार्टनरशी याविषयी मोकळेपणाने बोलून दोघे मिळून डॉक्टरांकडे गेलात तर तुमच्यातील नातं आणखी घट्ट होऊ शकतं.
प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधं घेण्याचे दुष्परिणाम कोणते?
कोणत्याही मेडीकलमध्ये मंजुरी मिळालेली काही औषधं डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळू शकतात. उदा. व्हायग्रा. लैंगिक उत्तेजना वाढवण्याच्या बाबतीत या औषधाचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं.
मात्र, अनेक नागरिक एखाद्या अनधिकृत वैद्य/डॉक्टरांच्या नादाला लागून किंवा जाहिराती पाहून औषधं खरेदी करतात. बरेच लोक थेट मेडिकलमध्ये जाऊन औषधं खरेदी करतात.
पण बराच काळ ही पद्धत अवलंबल्यास त्याचा फायदा होण्याऐवजी नुकसान होण्याची शक्यता आहे. किंवा त्या औषधाचा तुमच्या शरिरावर परिणाम होणंही बंद होऊ शकतं.
लैंगिक समस्या उद्भवण्याचं प्रमुख कारण म्हणजे दुर्लक्ष. त्यामुळे या सर्व विषयांमध्ये लोकांमध्ये जनजागृती होणं सर्वात जास्त आवश्यक आहे.
उदा. पुर्वी हस्तमैथुन करण्याबाबत अनेक गैरसमज होते. हस्तमैथुन केल्याने लैंगिक क्षमता कमी होते असं मानलं जायचं. पण ते चुकीचं असल्याबाबत लोकांमध्ये जागृती झाली आहे.
लैंगिक क्षमतेचा हृदयाशी थेट संबंध
व्यक्ती चाळिशी पार करतो, त्यावेळी ताण-तणावामुळे त्याचं लैंगिक आयुष्य पूर्णपणे संपतं, असा विचार अनेकजण करतात. हृदयविकाराच्या बाबतीत ते काही प्रमाणात खरं मानता येऊ शकेल.
लैंगिक उत्तेजना आणि छातीचे ठोके यांच्यात एक महत्त्वाचा परस्परसंबंध असतो, हे स्पष्ट आहे. लिंगाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या आणि हृदयाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या एकमेकांशी थेट जोडलेल्या असतात.
त्यामुळे हृदयात एखादी समस्या असल्यास लैंगिक क्षमतेमधून त्याचा परिणाम दिसतो. त्यामुळे याविषयी आपल्याला योग्य माहिती असणं आवश्यक आहे. सध्या याविषयी विविध संशोधन होत असल्यामुळे याबाबत जनजागृती निर्माण झाली आहे.
लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी डॉक्टर कोणती औषधे सुचवतात?
पुरुषांमध्ये लैंगिक इच्छा जागवण्यासाठी तसंच लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी प्रामुख्याने व्हायग्रा हे औषध सुचवलं जातं. पण औषधोपचार सुरू करण्याचे चार टप्पे आहेत, हे आपण लक्षात ठेवावं.
सुरुवातीला आरोग्य चाचणी करून नंतरच्या टप्प्यात औषधोपचारांचा सल्ला दिला जातो. त्याशिवाय काहींना शीघ्रपतनाची समस्या असल्यास त्यांनाही हे औषध सुचवतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)