You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कझाकस्तानातल्या बंडाचं कारण काय? रशियन सैनिक का मैदानात उतरलेत?
कझाकस्तानमध्ये आंदोलकांनी पुकारलेलं बंड मोडीत काढण्यासाठी प्रशासनाने आता रशियाकडे मदत मागितली आहे.
कझाकस्तानच्या राष्ट्राध्यक्षांच्या विनंतीवरून रशियन नेतृत्वाखालील संघटनेचं सैन्य बंड मोडीत काढण्यासाठी मैदानात दाखल झालं आहे.
एका बाजूला देशातील सरकारविरोधी हिंसक आंदोलनांमुळे नुकतीच आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, आता रशियाने यामध्ये एन्ट्री घेतल्याने पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे.
कझाकस्तानमध्ये इंधनाचे दर वाढवण्यात आल्यानंतर लोकांचा प्रक्षोभ सुरू झाला होता. त्यानंतर सुरू झालेल्या आंदोलनांदरम्यान पोलीस, तसंच आंदोलकांचाही बळी गेल्याची माहिती समोर आली आहे.
देशातील सर्वात मोठं शहर असलेल्या अॅलमाटी येथे गुरुवारी (6 जानेवारी) जोरदार गोळीबार करण्यात आला. यासंदर्भातील व्हीडिओ येथील बीबीसी प्रतिनिधींनी पाठवला होता.
संयुक्त राष्ट्र, अमेरिका, युके तसंच फ्रान्स यांनी दोन्ही बाजूंना हिंसाचार थांबवण्याचं आवाहन केलं आहे.
देशातील सद्यस्थितीबाबत परदेशात प्रशिक्षण घेतलेले 'दहशतवादी' कारणीभूत असल्याचा आरोप कझाकस्तानचे राष्ट्राध्यक्ष कासीम जोमार्ट टोकायेव्ह यांनी केला आहे.
पण संबंधित आरोप करताना टोकायेव्ह यांनी कोणताही पुरावा दिलेला नाही. बुधवारी (5 जानेवारी) टीव्हीवरून देशाला संबोधित करताना त्यांनी रशियन कलेक्टिव्ह सिक्युरिटी ट्रिटी ऑर्गनायझेशनला (CSTO) मदतीसाठी आवाहन केलं. या संघटनेत रशियासह कझाकस्तान, बेलारूस, ताजिकीस्तान आणि आर्मेनिया या देशांचा समावेश आहे.
कझाकस्तानच्या विनंतीनंतर CSTO ने सुमारे 2500 सैनिक मदतीसाठी पाठवले आहेत. देशातील शांतता कायम राखण्यासाठी हे सैन्य काम करेल. देश आणि लष्कर यांचं संरक्षण करेल, असं CSTO ने स्पष्ट केलं.
पुढील काही दिवस किंवा आठवडे हे सैन्य कझाकस्तानमध्येच ठाण मांडून असेल, अशी माहिती रशियाच्या RIA वृत्तसंस्थेने दिली आहे.
अमेरिका या प्रकरणावर तसंच रशियन नेतृत्वाखालील सैन्याच्या हालचालींवर बारीक नजर ठेवून आहे. याठिकाणी मानवाधिकारांचं हनन होत असल्यास त्याकडे जगाचं लक्ष आहे, असं अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं.
अॅलमाटी येथे झालेल्या हिंसाचारात तब्बल 18 पोलीस कर्मचाऱ्यांचा बळी गेल्याची माहिती येथील प्रशासनाने दिली. तसंच अनेक दंगलखोरांनाही कंठस्नान घालण्यात आल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
सोल नामक एका 58 वर्षीय महिलेने कझाकस्तानमधील आंदोलनांमध्ये सहभाग घेतला होता. सोल या एक बांधकाम कामगार आहेत.
AFP वृत्तसंस्थेशी बोलताना सोल म्हणाल्या, "आंदोलकांवर यथेच्छ गोळीबार करण्यात येत आहे. आम्ही लोकांना आमच्या समोर मरताना पाहिलं. माझ्यासमोरच किमान 10 जण तरी मारले गेले असतील."
कझाकस्तानच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात एकूण 2298 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
कझाकस्तानमधील आंदोलन गेल्या रविवारी (2 जानेवारी) सुरु झालं होतं. देशातील LPG इंधनाचे दर वाढवण्यात आल्यानंतर लोकांमध्ये असंतोषाचं वातावरण होतं. कझाकस्तानमध्ये बहुतांश नागरिक LPG चा वापर इंधन म्हणून वाहनांमध्ये करतात.
गेल्या आठवड्यात हे दर वाढवून दुप्पट करण्यात आले. परिणामी देशातील नागरिक रस्त्यावर उतरून सरकारच्या या निर्णयाचा विरोध करताना दिसू लागले.
आंदोलनावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने गुरुवारी एक घोषणाही केली होती. सहा महिन्यांसाठी इंधनाचे दर कमी करू असं सरकारने आश्वासन दिलं. पण तरीही आंदोलन थांबलं नाही. उलट देशातील राजकीय परिस्थितीमुळे आंदोलन वाढतानाच दिसून आलं.
कझाकस्तानमधील सरकार हे हुकूमशाही म्हणून ओळखलं जातं.
येथे निवडून आलेले सत्ताधारी नेते जवळपास 100 टक्के मतांनी निवडून येतात. देशात विरोधी पक्षाचं अस्तित्व प्रभावी स्वरुपात नाही.
कझाकस्तानमधील विदारक परिस्थिती
कझाकस्तानमध्ये प्रामुख्याने अॅलमाटी शहरातील परिस्थिती अत्यंत विदारक अशी बनली आहे. शहरात विविध ठिकाणी इमारतींना तसंच वाहनांना आग लावण्याचे प्रकार पाहायला मिळत आहेत.
या परिस्थितीमुळे नागरिकांना घराबाहेर पडण्याचीही भीती वाटत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी जाळपोळ, लुटालुटीचे प्रकार वाढले आहेत.
रात्रभर स्फोट, गोळीबार यांचा आवाज कानी पडतो. त्यामुळे लोकांना घराबाहेर पडणंही अवघड झालं आहे.
अॅलमाटी शहरानजीक काही ठिकाणी स्थानिक तरूण मंडळींनी गावच्या प्रवेशद्वारांवर पहारा देणं सुरू केलं आहे. बॅरिकेडींग करून हे प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहेत.
शहरातील पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा दिसून येतात. शॉपिंग मॉल, सुपरमार्केट, कॅफे आणि हॉटेल आदी बंद असल्यामुळे नागरिकांना दैनंदिन जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठीही मोठ्या अडचणी येत आहेत.
केवळ लहान दुकानं सुरू असून तिथंही वस्तूंची टंचाई निर्माण झाली आहे. इंटरनेट पूर्णपणे बंद आहे.
गुरुवारी (6 जानेवारी) अॅलमाटी येथील राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानाला तसंच महापौरांच्या कार्यालयाला आंदोलकांनी पेटवून दिलं. नंतर लष्कराने आंदोलकांना हुसकावून लावत पुन्हा या ठिकाणचा ताबा मिळवला.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)