You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
स्टॅलिनची मुलगी भारतातून अमेरिकेच्या मदतीने कशी पळाली? तिचा भारताशी काय संबंध होता?
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
ही गोष्ट मार्च 1967 मधली आहे. भारतामधील अमेरिकेचे राजदूत चेस्टर बाउल्स यांचे सहाय्यक रिचर्ड सेलेस्ट यांनी आपल्या घरी काही लोकांना जेवणासाठी बोलावलं होतं.
पाहुणे यायला सुरुवात झाली, तितक्यात त्यांच्या फोनची रिंग वाजली. सीआयएचे दिल्लीमधील स्टेशन चीफ डेव ब्ली फोनवर होते. त्यांनी सेलेस्ट यांना तातडीने दूतावासात यायला सांगितलं.
आपल्या घरी पार्टी सुरू आहे आणि पाहुण्यांना सोडून आपण येऊ शकत नाही, असं सेलेस्ट यांनी सांगितलं. पण सीआयएच्या स्टेशन चीफवर त्याचा काही परिणाम झाला नाही.
"काहीही झालं तरी दूतावासात लवकरात लवकर पोहोचा," असं त्यांनी निर्वाणीच्या शब्दांत सांगितलं. सेलेस्ट यांचं घर दूतावासापासून फार लांब नव्हतं. त्यामुळे ते कार न घेता चालतच गेले.
जेव्हा त्यांनी दरवाजाची घंटी वाजवली तेव्हा एका गार्डनं दरवाजा उघडला. त्यानं हळू आवाजात म्हटलं, "काही वेळापूर्वी एक महिला इथे आली आहे. तिचं नाव स्वेतलाना आहे आणि ती आपण स्टॅलिनची मुलगी असल्याचं सांगत आहे."
ब्ली यांना भेटल्यावर सेलेस्ट यांनी पहिला प्रश्न विचारला, " ती खरंच स्टॅलिनची मुलगी आहे?"
ब्ली यांनी म्हटलं की, असू शकते. पण आपल्याला माहीत नाहीये. आपल्याला खिजवण्यासाठी, फसविण्यासाठी सोव्हिएतची खेळीही असू शकते.
पतीच्या अस्थी विसर्जनासाठी भारतात
काही काळाने रिचर्ड सेलेस्ट अमेरिकेचे भारतातील राजदूत बनले. त्यांनी लिहिलेलं 'लाइफ इन अमेरिकन पॉलिटिक्स अँड डिप्लोमॅटिक इयर्स इन इंडिया' हे पुस्तक प्रकाशित झालं आहे.
त्यात त्यांनी लिहिलं आहे, "तिच्या गोष्टीवर विश्वास न ठेवणं अवघड होतं. आपण स्टॅलिनची मुलगी आहोत, एवढाच त्या महिलेचा दावा नव्हता. आपण ब्रजेश सिंह नावाच्या एका भारतीय व्यक्तीची पत्नी आहोत, असंही ती सांगत होती. आपले पती मॉस्कोमध्ये परदेशी भाषा प्रेसमध्ये काम करत असल्याचं त्या सांगत होत्या."
ते पुढे लिहितात की, "ब्रजेश सिंह दिनेश सिंह यांचे काका होते. दिनेश सिंह तेव्हा परराष्ट्र राज्यमंत्री पदावर काम करत होते आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जवळचे मानले जायचे. त्या महिलेच्या पतीचं नोव्हेंबर महिन्यात निधन झालं होतं आणि ती पतीच्या अस्थी विसर्जनासाठी भारतात आली होती. अस्थी गंगेत विसर्जित केल्यानंतर तिला अमेरिकेत राजकीय आश्रय हवा होता."
स्टॅलिन यांची मुलगी नोव्हेंबर महिन्यात भारतात आली होती आणि जवळपास चार महिन्यांपासून भारतातच होती.
ब्रजेश सिंह यांच्या प्रतापगढ जिल्ह्यातल्या कलाकाँकर गावामध्येही त्या जाऊन आल्या होत्या आणि दिनेश सिंह यांच्या दिल्लीतल्या सरकारी निवासस्थानात राहत होत्या. मात्र सीआयए किंवा भारतातील माध्यमांना याबद्दल काहीही कुणकूण लागली नव्हती.
रशियन नेते ब्रेझनेव यांची इच्छा होती की, स्वेतलाना यांनी लवकरात लवकर मॉस्कोला परत यावं. त्यामुळेच सोव्हिएत युनियनचे राजदूत निकोलाय बेनेडिक्टोव्ह त्यांना सतत सांगत होते की, त्यांनी भारतात राहणं योग्य नाहीये.
टॅक्सी करून पोहोचल्या अमेरिकन दूतावासात
हा सगळा घटनाक्रम स्वेतलाना अलीलुयेवा यांनी आपल्या 'ओन्ली वन इयर' या आत्मचरित्रामध्ये सविस्तरपणे लिहिला आहे.
त्यांनी लिहिलं आहे, "मी टॅक्सीवाल्याला फोन करून दूतावासाच्या गेटवर पोहोचले. पाच मिनिटांतच एक शीख ड्रायव्हर आपली खटारा गाडी घेऊन तिथे पोहोचला.
त्याने माझ्यासाठी टॅक्सीचा दरवाजा उघडला. मी 'एक मिनिट' असं म्हणून आतमधून सूटकेस आणि कोट आणण्यासाठी पळाले. परत आल्यावर मी ड्रायव्हरला विचारलं की, तुला अमेरिकन दूतावासाचा रस्ता माहीत आहे का? ते तर जवळच आहे, असं उत्तर त्यानं दिलं."
स्वेतलाना यांनी पुढं लिहिलं आहे की, "आम्ही रशियन दूतावासाच्या मागच्या बाजूने गेलो आणि मिनिटभरातच मला दिव्यांनी उजळलेलं अमेरिकन दूतावासाचं गेट दिसलं. मी ड्रायव्हरला पैसे दिले. मी आत गेले. तिथे एका छोट्या टेबलाजवळ उंच, निळ्या डोळ्यांचा अमेरिकन सैनिक उभा होता. आधी त्यानं मला दूतावासात कोणी नाहीये, असंच सांगितलं. पण नंतर माझ्या हातात लाल रंगाचा सोव्हिएतचा पासपोर्ट पाहिल्यावर आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवायला हवं, हे त्याला कळलं."
राजदूत वोल्स यांच्यासमोर तीन पर्याय
त्यावेळी अमेरिकन राजदूत चेस्टर बोल्स हे ब्राँकायटिसनं आजारी होते आणि आपल्या घरीच आराम करत होते. सीआयएचे स्टेशन चीफ डेव ब्ली आणि सेलेस्ट त्यांच्या घरी पोहोचले आणि त्यांना परिस्थिती सांगितली.
सेलेस्ट यांनी या प्रसंगाबद्दल लिहिलं आहे, "राजदूतांनी आम्हाला विचारलं की आपल्याकडे काय पर्याय आहेत. आम्ही त्यांच्यासमोर तीन पर्याय ठेवले. एक म्हणजे राजनयिक नियमांनुसार आपण भारत सरकारला यासंबंधी माहिती द्यायला हवी की, स्वतःला स्टॅलिनची मुलगी म्हणणाऱ्या एका सोव्हिएत नागरिकाने आमच्याकडे राजकीय आश्रय मागितला आहे."
"ब्ली यांना यातली एक अडचण मांडली. त्यांनी म्हटलं की, तीन महिन्यांपूर्वी जेव्हा एका रशियन नाविकाने कलकत्त्यामध्ये (आताचं कोलकाता) आपलं जहाज सोडून आपल्या मिशनमध्ये आश्रय घेतला होता, तेव्हा भारत सरकारनं त्याला अमेरिकेला पाठविण्याची परवानगी देण्यासाठी तीन महिने लावले होते. तो नाविक राजकीयदृष्ट्या फार महत्त्वाचा नव्हता. पण आपल्याकडे आश्रय मागणारी व्यक्ती स्टॅलिनची मुलगी आहे, हे कळल्यावर भारत सरकारची प्रतिक्रिया काय असेल याचा अंदाज येत नाहीये."
सेलेस्ट यांनी पुढे लिहिलं आहे की, "आम्ही तुमची काही मदत करू शकत नाही असं सांगून स्वेतलाना यांना परत पाठवून देणं हा आमच्यासमोर दुसरा पर्याय होता. ब्ली यांनी तिसरा पर्यायही समोर मांडला. आपण स्वेतलाना यांना अमेरिकेला जाण्याचा व्हिसा द्यायचा, पण तिकीट मात्र निम्म्या प्रवासाचंच खरेदी करायचंय. रात्री एक वाजता क्वान्टास एअरलाइन्सची एक फ्लाइट रोमला जाणार आहे. आपण त्यांना रोममध्ये पोहोचवायचं आणि जोपर्यंत कोणता तोडगा निघत नाही, तोपर्यंत तिथेच सेफ हाऊसमध्ये ठेवायचं."
अमेरिकन परराष्ट्र मंत्र्यांना गुप्त तार करून पाठवला संदेश
राजदूत बोल्स यांनी तिन्ही पर्यायांवर विचार केला आणि म्हटलं की, जर आपण यामध्ये भारताला सहभागी करून घेतलं तर भारत, रशिया आणि अमेरिकेमध्ये रस्सीखेच सुरू होईल. त्यांना व्हिसा देऊ आणि आम्ही तुम्हाला विमानतळापर्यंत पोहोचवू शकतो, असं सांगू. विमानात त्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर जावं.
सेलेस्ट यांनी लिहिलं आहे, "बोल्स यांनी आम्हाला सूचना केली की, वॉशिंग्टनला एक गुप्त तार पाठविण्यात यावी. आपण घेतलेल्या निर्णयाची त्यांना माहिती द्यावी. आम्ही जवळपास साडे आठ वाजण्याच्या सुमारास दूतावासात परतलो आणि वॉशिंग्टनला संदेश पाठवला- 'फॉर युवर्स आइज ऑन्ली.' अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री डीन रस्क.
त्या तारेत लिहिलं होतं- सात वाजून दहा मिनिटांच्या सुमारास एक महिला आमच्या दूतावासात पोहोचली. आपण स्टॅलिन यांची मुलगी आहोत, असा त्यांचा दावा आहे. आम्ही त्यांना व्हिसा देत आहोत आणि क्वान्टासच्या फ्लाइटने रोमपर्यंत पाठवत आहोत. याप्रकरणी तुम्ही काय सल्ला द्याल?"
सेलेस्ट यांनी पुढं लिहिलं आहे की, अर्ध्या तासानं आम्हाला उत्तर आलं. आम्ही लवकरच आमचा निर्णय सांगू असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर मात्र परराष्ट्र मंत्र्यांनी जणू मौनच बाळगलं."
सीआयएचे स्टेशन चीफ स्वेतलाना यांना सोडण्यासाठी विमानतळावर
खूप वेळ वाट पाहिल्यानंतरही डीन रस्क यांच्याकडून कोणतंही उत्तर आलं नाही, तेव्हा मध्यरात्री दिल्लीतील सीआयएचे स्टेशन चीफ डेव्ह ब्ली यांनी स्वेतलाना यांना आपल्या गाडीत बसवलं आणि ते पालम विमानतळावर पोहोचले.
त्यांनी रशियन बोलू शकणाऱ्या एका सीआयएच्या एजंटला स्वेतलाना यांच्या आधीच विमानात बसवलं होतं. जोपर्यंत विमान टेक ऑफ करत नाही तोपर्यंत स्वेतलाना यांना स्वतःबद्दल काहीही न सांगण्याची सक्त ताकीद त्यांना देण्यात आली होती.
क्वान्टासच्या विमानानं 45 मिनिटं उशीरानं टेक ऑफ केलं. तोपर्यंत स्वेतलाना लाउंजमध्येच बसून होत्या.
दुसऱ्या दिवशी अमेरिकन दूतावासाकडे अनेक संदेश आले होते. त्यापैकी पहिला अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांचा होता. त्यांनी विचारलं होतं की, पुढे काय झालं आहे? दुसरा संदेश सीआयएकडून आला होता.
दरम्यान ब्ली यांनी सीआयएच्या मुख्यालयात संदेश पाठवून त्यांच्याकडे स्टॅलिनच्या मुलीबद्दल कोणती माहिती आहे का, याची चौकशी केली होती.
सीआयएच्या फाइलमध्ये स्वेतलानाबद्दल कोणतीही माहिती नव्हती. आठ वर्षांपूर्वी एका कमी महत्त्वाच्या सोर्सनं स्टॅलिनची मुलगी मॉस्कोमध्ये परकीय भाषा प्रेसमध्ये काम करणाऱ्या एका वयस्कर भारतीयासोबत राहत असल्याची माहिती फाइल केली होती.
त्यावेळी ही माहिती दिल्लीला पाठवणं सीआयएला तेवढं आवश्यक वाटलं नाही.
रशियन दूतावासात गदारोळ
पुढच्या दिवशी रशियन प्रशासनाला याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली.
KGB चे स्टेशन चीफ यांनी दिल्लीत डेव्ह ब्ली यांना फोन केला. त्यांनी विचारलं, तुम्ही स्टॅलिन यांच्या मुलीसोबत काय केलं? तिचं अपहरण केलं का? याचं उत्तर देताना ब्ली म्हणाले, "आम्ही कुणाचंही अपहरण केलेलं नाही. ती महिला स्वतःहून आमच्या दूतावासात आली होती. मला अमेरिकेत राजकीय आश्रय हवा आहे, असं तिने सांगितलं.
हे ऐकून KGB चीफ ओरडून म्हणाले, "ती महिला आता अमेरिकेत आहे?"
पुढच्याच दिवशी जगभरात अमेरिका आणि सोव्हिएत संघाच्या नेते-अधिकाऱ्यांमध्ये होणारी प्रत्येक बैठक रद्द करण्यात आली. पुढच्या शुक्रवारी रिचर्ड सेलेस्ट ठरलेल्या कार्यक्रमानुसार सोव्हिएत नेते वेलेरी ओस्तेपेंको यांच्या घरी भोजनासाठी जाणार होते.
पण सेलेस्ट यांनी शुक्रवारच्या सकाळी त्यांना फोन करून म्हटलं, "आज रात्री होणारा भोजनाचा कार्यक्रम आता होणार नाही, असं मी गृहित धरलं आहे."
यावर वेलेरी यांनी विचारलं, "तुम्ही असं का म्हणत आहात?"
सेलेस्ट यांनी उत्तर दिलं, "कारण जगभरात असंच होत आहे."
पण वेलेरी म्हणाले, " नाही. आपल्या कार्यक्रमात काहीच बदल होणार नाही."
गार्डला तयार राहण्यास सांगितलं
सेलेस्ट लिहितात, "फोन ठेवल्यानंतर मला काळजी वाटू लागली. मी तिथं जावं आणि त्यांनी मला परतण्यापासून रोखावं, असं मला होऊ द्यायचं नव्हतं. पण मी तिथं जायला हवं, असं माझ्या राजदूतांनी सांगितलं. पण मी माझ्या सुरक्षारक्षकाकडे संदेश द्यावा. मी ठराविक वेळेत परतलो नाही तर राजदूतांना याची माहिती द्यावी. ते भारत सरकारला याबाबत कळवतील, असंही त्यांनी मला सांगितलं.
मी आणि माझी पत्नी डॅग्नर तिथं पोहोचलो, पण वेलेरी उपस्थित नव्हते. वेलेरी यांच्या पत्नीने आमचं स्वागत केलं. वोडका आणि कॅव्हियर घेण्यास सांगितलं. पण मी वोडका पिण्यास नकार दिला. मी नशेत असताना माझं अपहरण होऊ नये, असा मी विचार केला. "
सेलेस्ट पुढे लिहितात, "वेलेरी आठच्या सुमारास तिथं पोहोचले. जेवणानंतर डेझर्ट घेण्याची वेळ आली, तेव्हा वेलेरी यांनी स्वेतलानाचा विषय काढलाच. तुम्ही स्वेतलाना स्टॅलिनचं अपहरण का केलं, असं त्यांनी विचारलं. मी उत्तरलो, आम्ही कुणाचंच अपहरण करत नाही. मी त्यांना सगळी कहाणी सांगितली. तसंच स्वेतलाना युरोपमधील एका देशात असल्याचंही त्यांना सांगितलं. पण देशाचं नाव मी सांगितलं नाही.
तोपर्यंत रात्रीचे बारा वाजले होते. तोपर्यंत मी न परतल्यामुळे माझा सुरक्षारक्षक गोंधळ घालेल, याची मला कल्पना होती. मी वेलेरी यांना काही काम असल्याचं सांगत जाऊन परत येतो, असं म्हटलं. त्यावेळी वेलेरींनी मला त्यांच्या कारमध्ये बसवलं. मी अमेरिकन दूतावासात गेलो. आत जाऊन सुरक्षारक्षकाला सगळं काही ठिक असल्याचं कळवलं. त्यानंतर वेलेरी यांच्यासोबत कारमध्ये बसून पुन्हा त्यांच्या घरी गेलो."
इंदिरा गांधींनी स्वेतलाना यांच्याकडे आपला दूत पाठवला
स्वेतलाना अमेरिकेकडे गेल्याचं कळाल्यानंतर सोव्हिएत सरकारने त्याचं खापर भारताच्या माथी फोडलं.
भारताने इतक्या महत्त्वाच्या पाहुण्यांची काळजी घेतली नाही, अशी तक्रार त्यांनी केली होती.
दोन आठवड्यानंतर पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतीय परराष्ट्र सेवेतील ज्येष्ठ अधिकारी रिखी जयपाल यांना दूत म्हणून स्वेतलाना यांना भेटण्यासाठी स्वित्झर्लँडला पाठवलं.
भारतातून स्वेतलाना यांना अमेरिकेला पलायन करण्यासाठी कुणी मदत केली का, याची खात्री पटवणं हा रिखी जयपाल यांच्या दौऱ्याचा प्रमुख उद्देश होता.
स्वेतलाना अलीलुयेवा यांनी आपल्या आत्मकथेत या भेटीचा उल्लेख केला आहे.
त्यांनी त्यांच्या आत्मकथेत लिहिलं, "जयपाल यांनी त्यांच्यासोबत मी दिनेश सिंह यांना पाठवलेल्या पत्राचा मसुदा आणला होता. हा मसुदा दिनेश सिंह यांनी स्वतः लिहिला होता. मला कोणत्याच भारतीयाने अमेरिकेला जाण्यासाठी मदत केली नाही, हे खरं आहे. सोव्हिएत संघाचा दिनेश यांच्याबाबत कोणताच संशय राहू नये, यासाठी या पत्राची त्यांना गरज होती. त्यामुळे त्या पत्रावर मी माझी सही केली.
जयपाल यांनी मला मॉस्कोमध्ये पत्र पाठवण्याबाबत प्रस्तावही दिला. मी त्यांना पत्र पाठवल्यास मॉस्कोतील राजदूताच्या माध्यमातून माझ्या मुलांपर्यंत ते पत्र पाठवण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं.
मी माझ्या मुलांना 15 पानी पत्र लिहिलं. मी देश का सोडला, हे मी त्या पत्राच्या माध्यमातून सांगितलं.
पण इंदिरा गांधींच्या दूताने त्यांचं वचन पाळलं नाही. माझं पत्र माझ्या मुलांपर्यंत कधी पोहोचलंच नाही, याचं मला दुःख होतं."
अमेरिकेतच मृत्यू
काही दिवसांनंतर स्वेतलाना रोमहून स्विर्त्झलंड गेल्या. तिथून अमेरिकेत दाखल झाल्या.
त्यावेळी न्यूयॉर्कच्या जॉन एफ. केनेडी विमानतळावर जगभरातील पत्रकार उपस्थित होते.
तिथं झालेल्या पत्रकार परिषदेत स्वेतलाना यांनी म्हटलं, "सोव्हिएत संघ सोडण्याचा निर्णय माझ्यासाठी अत्यंत कठीण होता. ते अर्थहीन आयुष्य मी पुढे सुरू ठेवू शकले नसते. मी माझ्या वयाची 40 वर्षे तिथं काढली. आता मला नवं आयुष्य जगायचं होतं. माझ्या देशातील नागरिक मला समजून घेतील, अशी मला अपेक्षा आहे."
स्वेतलाना 1984 मध्ये पुन्हा सोव्हिएत युनियनला परत गेल्या. पण तिथं त्या राहू शकल्या नाहीत. त्यानंतर पुन्हा त्या अमेरिकेला परतल्या. अमेरिकेत परतल्यानंतरचा काळ त्यांनी विजनवासात तसंच गरिबीत घालवला.
तिथं त्यांनी अमेरिकन आर्किटेक्ट विलियम पीटर्ससोबत विवाह केला. पण तीन वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला.
22 नोव्हेंबर 2011 रोजी वयाच्या 85 व्या वर्षी स्वेतलाना यांचं अमेरिकेतच निधन झालं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)