You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोव्हिड निर्बंधांना वैतागलेल्या लोकांनी केली जाळपोळ, युरोपात मोठी निदर्शनं
बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्समध्ये कोव्हिडविरोधी उपायांच्या निषेधार्थ हजारो लोक मोर्चा काढत आहेत.
निदर्शनादरम्यान ज्या पोलिस अधिकार्यांनी अश्रुधूर आणि पाण्याचा मारा केला त्यांच्यावर आंदोलकांनी फटाके फेकून मारले.
आंदोलकांचा प्रामुख्याने कोव्हिड पास वापरण्यास विरोध आहे. ज्यांच्याकडे हा पास नाहीये, म्हणजे ज्यांचं लसीकरण झालेलं नाहीये, त्यांना रेस्टॉरंट किंवा बारसारख्या ठिकाणी प्रवेश करता येत नाहीये.
नवीन लॉकडाउनच्या नियमांविरुद्ध नेदरलँड्समध्ये करण्यात आलेल्या निषेधानंतर हे आंदोलन समोर आलं आहे.
शनिवारी (20 नोव्हेंबर) लोकांनी पोलिसांना फटाके फेकून मारले आणि हेगमध्ये सायकलींना आग लावली. एका रात्री रॉटरडॅममधील निषेध आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर पोलिसांनी गोळ्या झाडल्या.
नव्या निर्बंधांच्या विरोधात ऑस्ट्रिया, क्रोएशिया आणि इटलीमध्येही हजारो निदर्शक रस्त्यावर उतरले.
बेल्जियममध्ये मास्कचे नियम कडक केले गेले आहेत आणि रेस्टॉरंट्ससारख्या ठिकाणी कोव्हिड पास आधीपासूनच आवश्यक आहेत. तसंच बहुतेक लोकांना डिसेंबरच्या मध्यापर्यंत आठवड्यातून चार दिवस घरूनच काम करावं लागणार आहे. याशिवाय इथल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण सक्तीचं करण्यात आलं आहे.
युरोप खंडातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या हे मोठ्या चिंतेचं कारण आहे, असं याआधीच जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.
संघटनेचे प्रादेशिक संचालक डॉ हान्स क्लुगे यांनी बीबीसीला सांगितल, संपूर्ण युरोपमध्ये कडक उपाययोजना केल्या नाहीत, तर पुढील वसंत ऋतुपर्यंत आणखी 5 लाख मृत्यूंची नोंद होऊ शकते.
ते म्हणाले, "कोव्हिड-19 हे पुन्हा एकदा आमच्या प्रदेशातील मृत्यूचे प्रथम क्रमांकाचे कारण बनले आहे. विषाणूशी लढण्यासाठी काय केले पाहिजे ते आम्हाला माहित आहे. जसं की लसीकरण करणे, मास्क घालणे आणि कोविड वापरणे वगैरे"
वाढत्या संसर्गाचा सामना करण्यासाठी खंडातील अनेक देश नवीन निर्बंध लादत आहेत. बर्याच देशांत अलीकडेच विक्रमी संख्येत दैनंदिन प्रकरणांची नोंद झाली आहे.
निदर्शनं आणि हिंसक वळण
नेदरलँड्समध्ये अनेक गावे आणि शहरांमध्ये शनिवारी सलग दुसऱ्या रात्री दंगली उसळल्या.
दंगेखोरांनी हेगमध्ये सायकलींना आग लावली, कारण दंगल पोलिसांनी गर्दीचा पाठलाग करण्यासाठी घोडे, कुत्रे आणि लाठीचा वापर केला होता. अधिकार्यांनी शहरात आणीबाणी जाहीर केली असून किमान 7 जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितलं की, रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेच्या खिडकीतून दगडफेक करण्यात आली.
शहरातील अधिकाऱ्यांनी ट्वीट केलंय की, पाच पोलिस अधिकारी जखमी झाले आहेत, तर गुडघ्याला दुखापत झालेल्या अधिकाऱ्याला रुग्णवाहिकेतून नेण्यात आलं आहे.
काही जणांनी मैदानात घुसून खेळपट्टीवर धाव घेतल्यानंतर देशातील दोन फुटबॉल सामने थांबवण्यात आले. कोरोना व्हायरसच्या नव्या निर्बंधांमुळे चाहत्यांना सध्या स्टेडियममध्ये बंदी घालण्यात आली आहे.
रॉटरडॅममधील दंगलीचा शहराच्या महापौरांनी 'हिंसाचाराचे तांडव' म्हणून निषेध केला.
पोलिसांच्या प्रवक्त्यानं रॉयटर्सला सांगितलं की, "परिस्थिती जीवघेणी असल्याने पोलिसांनी इशारा देणारे शॉट्स आणि थेट गोळ्या झाडल्या."
बंदुकीच्या गोळीमुळे जे तीन निदर्शक जखमी झाले, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. अधिकाऱ्यांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
नेदरलँड्सने कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रकरणांमध्ये विक्रमी वाढ झाल्यानंतर गेल्या आठवड्याच्या शेवटी 3 आठवड्यांचा आंशिक लॉकडाउन लागू केला आहे. याअंतर्गत बार आणि रेस्टॉरंट्स 8 वाजता बंद होणे आवश्यक आहे आणि क्रीडा कार्यक्रमांमध्ये गर्दीवर बंदी आहे.
सरकारने नवीन राष्ट्रीय लॉकडाउन आणि फेब्रुवारी 2022 मध्ये लस अनिवार्य करण्याची योजना जाहीर केल्यानंतर ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथे हजारो लोकांनी निषेध मोर्चा काढला. ऑस्ट्रिया हा लसीकरणाला कायदेशीर गरज बनवणारा पहिला युरोपीय देश आहे.
यावेळी आंदोलकांच्या हातात 'स्वातंत्र्य' असं लिहिलेले ध्वज होते. सोमवारपासून (23 नोव्हेंबर) देशात 20 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात येईल. ज्यामध्ये सर्व आवश्यक दुकाने बंद राहतील आणि लोकांना घरून काम करावं लागेल.
युरोपियन सेंटर फॉर डिसीज प्रिव्हेन्शन अँड कंट्रोलचे संचालक आंद्रिया अमोन यांनी अनिवार्य लसीकरणाचं वर्णन 'दुधारी तलवार' असं केलं आहे.
त्यांनी बीबीसीच्या अँड्र्यू मार यांना सांगितलं की, "कठोर नियमांमुळे जे लोक अजूनही लसीवर शंका घेत आहेत, पण तिचं महत्त्वं पूर्णपणे नाकारत नाहीयेत, अशी माणसं लसीकरणापासून पूर्णपणे दूर जाऊ शकतात."
क्रोएशियामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचार्यांसाठी लसीकरण अनिवार्य करण्यात आल्यानंतर हजारो लोकांनी राजधानी झाग्रेबमध्ये मोर्चा काढला. तर इटलीमध्ये ग्रीन पासला विरोध करण्यासाठी काही हजार निदर्शक रोममधील प्राचीन सर्कस मॅक्सिमस रथ-रेसिंग मैदानावर जमले. हा ग्रीन पास कामाच्या ठिकाणी आणि सार्वजनिक वाहतुकीसाठी आवश्यक करण्यात आला आहे.
फ्रान्सच्या स्वतःच्या कोव्हिड पास धोरणाविरोधात निदर्शने हिंसक झाल्यानंतर रात्रभर झालेल्या दंगलीत लुटारूंनी डझनभर दुकानांची तोडफोड केली आणि ते पेटवून दिले.
गृहमंत्री गेराल्ड डारमॅनिन याप्रकरणावर भाष्य करताना म्हणाले की, निदर्शनात सहभागी असलेल्या काही जणांतची कायद्याच्या विरोधात जात थेट दारूगोळा वापरला. पण, सार्वजनिक विकृती करणाऱ्यांना कठोर शिक्षा केली जाईल.
यूकेचे आरोग्य सचिव साजिद जाविद यांनी सांगितलंय की, "कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांची संख्या पाहता सध्या यूके आणि जर्मनीमधील प्रवासाचे नियम बदलण्याची कोणतीही योजना नाही.
"कारण जर्मनी सध्या डेल्टा व्हेरियंटचा सामना करत आहे. आमच्याकडे आधीच डेल्टा आहे. मला खात्री नाही की अधिकच्या नियमांमुळे जास्त फायदा होईल, पण आम्ही कोणत्याही संभाव्य नवीन प्रकारांवर लक्ष ठेवत असतो."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)