अफगाणिस्तानच्या निर्वासित महिला खासदार सध्या काय करत आहेत?

    • Author, टॉम डॉनकिन
    • Role, बीबीसी 100 विमेन

अफगाणिस्तानात तालिबाननं सत्ता मिळवल्यानंतर महिला खासदार देश सोडून पळून गेल्या होत्या. 69 पैकी केवळ 9 खासदार देशात राहिल्या. त्याही लपून बसल्या होत्या.

यापैकी अनेक आता जगभरात विखुरल्या असून त्यांना महिलांसाठीचा लढा सुरू ठेवायचा आहे. निर्वासित महिलांची संसद स्थापन करण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे.

यापैकी सर्वाधिक महिला खासदारांचा म्हणजे 22 महिला खासदारांचा गट ग्रीसमध्ये आहे. अल्बानिया, तुर्कस्तान आणि अमेरिकेतही महिला खासदारांचे गट आहेत.

तर, एक माजी महिला खासदार परत येण्याच्या तयारीत असून देशाबाहेरून फार काही साध्य करू शकत नाही, त्यामुळं "आपण अफगाणिस्तानात असायला हवं," असं त्यांचं मत आहे.

माशीद (बदललेलं नाव) या तालिबाननं सत्ता मिळवल्यापासून लपून राहत आहेत. त्या कायम त्यांचं ठिकाण बदलत राहिल्या. सलग दोन रात्रीही एकाच घरात त्या झोपल्या नाहीत.

त्यांना कुटुंबाला काबूल विमानतळावर नेण्याचा धोका पत्करायचा नव्हता. कारण त्याठिकाणी गर्दी, गोंधळाचं वातावरण आणि अनेक स्फोट झाले होते. त्यामुळं देशाबाहेर पडण्याचा मार्ग सोपा नव्हता.

"अफगाणिस्तानची दारं बंद झाली होती," असं त्या सांगतात.

मात्र, दोन आठवड्यांपूर्वी म्हणजे तीन महिने लपून राहिल्यानंतर माशीद यांनी बुरखा परिधान केला, चेहरा पूर्णपणे झाकला आणि मुलांसह त्या एका बसमध्ये बसल्या. आधी ते हेरातला गेले आणि त्यानंतर इराणच्या सीमेवर. "तालिबानबाबतची एक बाब म्हणजे, ते महिलांना झाकलेला चेहरा दाखवण्याचा आग्रह करत नाहीत," असं त्या सांगतात.

जर त्यांना तालिबाननं तपासणीत ओळखलं असतं तर त्यांना नक्कीच ताब्यात घेतलं असतं, असं माशीद सांगतात. मात्र एक खासदार बुरखा परिधान करेल असं अधिकाऱ्यांना वाटलं नसावं. सर्व अफगाण राजकारणी आणि महिला कार्यकर्त्यांना बाहेर काढलं आहे, असं त्यांना वाटतं असंही माशीद म्हणाल्या.

10 दिवस इराणमधून प्रवास केल्यानंतर माशीद या आता तुर्कस्तानात आहेत. मात्र त्यांना तिथं राहायचं नाही. कारण त्याठिकाणचं प्रशासनं त्यांना राजकीयदृष्ट्या सक्रिय राहू देणार नाही, अशी चिंता त्यांना आहे.

अफगाणिस्तानात सध्या मुली आणि महिलांना कशा प्रकारच्या भयावह स्थितीचा सामना करावा लागत आहे, हे त्यांना जगाला सांगायचं आहे. बदलासाठी त्यांना मोहीम चालवायची आहे. सध्या त्या त्यांची ओळख लपवत आहेत. कारण त्यांना अफगाणिस्तानातील त्यांच्या नातेवाईकांचंही संरक्षण करायचं आहे.

69 महिला खासदारांपैकी 9 अजूनही अफगाणिस्तानात लपून राहत असल्याचं बीबीसीनं स्पष्ट केलं आहे.

इतरांपैकी अनेकींना अडकलेल्यांची सुटका करण्यासाठीच्या विमानांमध्ये जागा मिळाली होती.

जवळपास 46 जणी सध्या युरोप आणि तुर्कस्तानात आहेत. तर इतर ऑस्ट्रेलियापासून कतारपर्यंतच्या अनेक देशांत आश्रय घेऊन राहत आहेत.

सेरीना (नाव बदललेलं) यांना पती आणि तीन महिन्याच्या बाळासह जर्मनीला जाता आलं. अफगाणिस्तान सोडण्यापूर्वी त्यांना क्षयरोग झाला होता. सध्या त्या निर्वासितांच्या शिबिरामध्ये राहून उपचार घेत आहेत.

देश सोडून अशाप्रकारे पळून जावं लागेल याची कल्पनाही केली नव्हती, असं त्या म्हणतात. कधीही पाहिला नाही असा खंड आणि वेगळी भाषा असलेल्या या देशात त्यांना एकटेपणाची जाणीव होत आहे.

"मी अत्यंत वाईट दिवस पाहिले असून अजूनही वाईट परिस्थितीत आहे. मात्र, जेव्हा मला सध्या अफगाण नागरिक कोणत्या परिस्थितीला सामोरं जात आहेत, याचा विचार येतो तेव्हा मी माझ्या वेदना विसरते," असं त्या म्हणतात.

अफगाणिस्तानला परत जाण्याचा प्रश्नच नाही असं सेरीना म्हणतात. त्यांना आता केवळ जर्मनीच्या एखाद्या गावातील घरात पती आणि बाळासह नवं आयुष्य सुरू करण्याची अपेक्षा आहे. मागे सोडलेल्या कुटुंबाबरोबर संपर्क ठेवण्यासाठी शक्य ते करण्याची त्यांची तयारी आहे.

"मी दुःख आणि युद्धाच्या वातावरणात मोठी झाले आहे. मात्र, माझ्या मुलाला मी मातृभूमीच्या संस्कृती, परंपरा आणि भावनांसह वाढवीन," असं त्या म्हणतात.

अनेक खासदारांना कॅनडाला जायची इच्छा आहे. त्यांनी 5000 अफगाण निर्वासितांना आश्रय देणार असल्याचं म्हटलं आहे.

त्या कुठेही गेल्या तरी माशीदसारख्या त्यांच्यापैकी अनेक खासदार या महिलांच्या हक्कासाठी लढू इच्छित आहेत. त्यातून निर्वासितांची संसद ही संकल्पना पुढं आली आहे. तालिबानवर दबाव ठेवण्यासाठी आणि अफगाणिस्तानातील महिलांच्या अधिकारांचं जे उल्लंघन होत आहे, त्याकडे लक्ष वेधण्यासाठी ही संसद स्थापन करण्याची कल्पना आहे.

ही कल्पना अफगाणिस्तानातील महिला खासदारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या एका सामाजिक संस्थेची आहे. यात यश मिळेल की नाही, हे सांगता येणार नसलं तरी, युरोपातील काही महिला खासदारांनी ही कल्पना लगेचच स्वीकारली आहे.

शिनकाई कारोखैल यादेखील याच्या समर्थक आहेत. निवडून येण्यापूर्वी त्या कॅनडातील अफगाणिस्तानच्या राजदूत होत्या. सध्या त्या टोरंटोच्या बाहेरील एका घरात राहत आहेत. त्याठिकाणी त्यांनी आश्रय घेतला आहे.

मी सकाळी माझा प्रांत गमावला आणि दुपारी राष्ट्राध्यक्ष गमावले. दिवस संपला त्यावेळी माझ्यासाठी वेगळं असं काहीच नव्हतं, असं त्या 15 ऑगस्ट रोजी वेगानं घडलेल्या घटनांचं वर्णन करताना म्हणाल्या.

शिनकाई या अफगाणिस्तानातील महिलाविरोधी हिंसाचार कायद्यामागील प्रमुख प्रेरणास्त्रोत होत्या. आता काहीतरी मिळवायचं असेल तर, महिला खासदारांना आपआपसांतील मतभेद विसरावे लागतील, असं त्या म्हणाल्या.

"आपण सगळ्या अफगाणिस्तानातील वेगळ्या भागांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आहोत. सगळ्यांचे राजकीय विचार आणि प्राधान्यक्रम वेगळे आहेत. पण आता आपण सर्वकाही गमावलं आहे," असं त्या म्हणतात.

"आपल्या सर्वांमध्ये असलेले मतभेदही आपण आता गमावले आहेत. आता केवळ महिलांचा आवाज मांडून आणि लोकांना सहकार्य करून देश वाचवणं हेच महत्त्वाचं असल्याचा विचार करणं गरजेचं आहे."

अॅमस्टरडॅममधील एका लहानशा घरात एले अर्शद पारंपरिक अफगाणी स्वयंपाक तयार करत आहेत. मात्र स्थानिक बाजारपेठेत त्यासाठीचे पदार्थ आणि साहित्य मिळणं त्यांच्यासाठी कठिण ठरत आहेत. पण त्यांच्यासाठी ते मिळवणं गरजेचं आहे.

"यामुळं मला माझ्या लोकांची आठवण येते. ज्यांना खायला पुरेसं मिळत नाही आणि काहींना तर काहीच खायला मिळत नाही," असं त्या म्हणाल्या.

एले अर्शद या सध्या खासदार नव्हत्या. मात्र जवळपास दहा वर्ष त्या खासदार होत्या. तर त्यानंतर त्यांनी राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांच्या प्रवक्त्या म्हणूनही काम पाहिलं होतं. तालिबाननं ताबा मिळवल्यानंतर त्यांचं बँक खातं गोठवलं. पण त्यांनी लपून न राहता सप्टेंबरमध्ये विमानाद्वारे त्या देशाबाहेर निघून गेल्या.

त्या आता परतण्याची तयारी करत आहेत. तालिबानमधील काही संपर्कातून संरक्षण मिळेल अशी त्यांना आशा आहे. बाहेरून अफगाणिस्तानात बदल घडेल याबाबत त्यांना शंका आहे.

"इतर देशांतून किंवा विदेशातून काम करणं शक्य नाही. आपण त्यासाठी अफगाणिस्तानात असायला हवं," असं त्या म्हणतात.

"यावरचा तोडगा अफगाणिस्तानात आहे, आणि आपण तो अफगाणिस्तानातच शोधायला हवा."

मुलींसाठी शाळा सुरू करण्यासाठी आणि महिलांच्या शिक्षणाच्या अधिकारासाठी लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्थांच्या साथीनं काम करण्याचा त्यांचा विचार आहे. तालिबान सरकारच्या सत्तेतही ते करायची त्यांची तयारी आहे.

"तुम्ही समस्यांपासून दूर पळाले तर त्या समस्या कायम राहतील," असं त्यांचं मत आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)