एमएच370 : सात वर्षांपूर्वी उड्डाणादरम्यानच बेपत्ता झालेल्या विमानाचं गूढ उकलणार का?

    • Author, साइमन ब्राउनिंग
    • Role, बीबीसी बिझनेस रिपोर्टर

सात वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी (5 डिसेंबर) मलेशियाचं एक विमान (एमएच 370239) प्रवासी आणि क्रूसह बेपत्ता झालं होतं जे आजही सापडलेलं नाही. विमान वाहतूकीच्या इतिहासातली ही एक रहस्यमय घटना मानली जाते.

पण हे विमान नेमकं कुठे कोसळलं याचा तपास लावल्याचा दावा आता रिचर्ड गोडफ्रे या ब्रिटिश वैमानिक अभियंत्याने केला आहे. ते वर्षभरापासून या प्रकरणाचा अभ्यास करत आहेत. बोईंग 777 विमान पश्चिम ऑस्ट्रेलियातील पर्थपासून सुमारे 2,000 किलोमीटर अंतरावर समुद्रात कोसळल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

2014 साली उड्डाणादरम्यान हे विमान बेपत्ता झाले. संशोधनातून समोर आलेल्या ताज्या माहितीच्या आधारे आपण बेपत्ता प्रवाशांच्या कुटुंबियांना उत्तर देऊ शकू असं बीबीसीशी बोलताना रिचर्ड गॉडफ्रे यांनी सांगितलं.

"एमएच 370 बेपत्ता विमानचं नेमकं काय झालं हे आपण प्रवासी, विमान उदग्योग आणि सामान्य जनतेला सांगू शकू. यामुळे भविष्यील अपघातही टाळता येतील. सुरुवातीला वेगवेगळ्या ठिकाणच्या आकडेवारीचा एकत्रित अभ्यास केला. या संशोधनातून असं लक्षात आलं की या घटनेचं ठिकाण दक्षिण हिंदी महासागर असू शकतं. या निष्कर्षापर्यंत पोहचणं गुंतागुतीचं होतं. यापूर्वीही या प्रकरणाचा शोध घेतला गेला जात होता पण तो पुरेसा नव्हता," असं गोडफ्रे सांगतात.

यापूर्वी इमरसॅट सॅटेलाईट डेटा, बोईंग कामगिरीची माहिती, समुद्रात आढळलेल्या ढिगाऱ्याचा ओशिएनोग्राफिक डेटा आणि WSPR नेट डेटा याचा एकत्रित अभ्यास केला नव्हता, असंही ते सांगतात.

ते पुढे म्हणाले, "या निष्कर्षापर्यंत पोहचण्यासाठी आम्ही अनेकवेळा पडताळणी केली आहे आणि आम्हाला विश्वास आहे की, एमएच 370 चा तपास करण्यासाठी आम्ही या डेटाचा वापर करू शकतो."

या डेटाच्या आधारे संशोधन करणाऱ्या टीमचा असा अंदाज आहे की विमान हिंदी महासागरात 33 डिग्री दक्षिण आणि 95 डिग्री पूर्वेजवळ कोसळले असावे.

हिंदी महासागरात एमएच 370चा शोध घेण्यासाठी दोनवेळा व्यापक शोध मोहीम करण्यात आली पण काहीच हाती लागलं नाही. या शोध मोहिमेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. परंतु विमान कुठे बेपत्ता झालं याची माहिती मिळू शकली नाही. या विमानातून प्रवास करत असलेल्या प्रत्येक प्रवाशाचे कुटुंब आपल्या प्रियजनांसोबत नेमकं काय झालं या उत्तराच्या प्रतिक्षेत आहे.

'शोध मोहिम पुन्हा सुरू व्हावी'

या अपघातात ग्रेस नॅथन यांनी आपली आई गमावली. त्या म्हणाल्या, "आमच्यासाठी हे एका दुःस्वप्नाप्रमाणे आहे जे आजही संपलेलं नाही. त्याचा अंत नाही. आम्हाला वाटतं आम्ही गोल फिरतोय आणि पुन्हा पुन्हा त्याच भिंतीवर आदळत आहोत."

"काहीतरी नवीन माहिती मिळेल याची वाट आम्ही पाहत होतो. अशी माहिती ज्याआधारे शोध मोहिम पुन्हा सुरू होऊ शकेल. किमान आता एक ठराविक ठिकाणाची माहिती आहे. त्यामुळे शोह मोहीम पुन्हा सुरू केली जाऊ शकते. आमच्या आशा यामुळे वाढल्या आहे,"

नॅथन क्वालालंपूरमध्ये अधिवक्ता आहेत. या नवीन माहितीच्या आधारे शास्त्रीय पद्धतीने पुन्हा शोध घेऊन या थिअरीचा अभ्यास व्हावा, अशी त्यांची मागणी आहे.

"या संशोधनाचं आम्ही स्वागत करतो. पुराव्यांच्या आधारे ही माहिती समोर आली आहे. ही ठोस आकडेवारी आहे. इंटरनेटवरून घेतलेले तथ्यहीन पुरावे नाहीत," असंही त्या सांगतात.

यापूर्वीही हिंदी महासागरात शोध मोहीम सुरू होती परंतु इतक्या विशाल समुद्रात मोहिमेला यश आलं नाही. गॉडफ्रे म्हणतात, की आतापर्यंत 1 लाख 20 हजार चौरस किलोमीटरपेक्षा मोठ्या क्षेत्रात शोध घेतला पण हे एका ढिगाऱ्यात सुई शोधण्यासारखं आहे.

4 हजार मीटर खोल

गोडफ्रे यांच्या अंदाजानुसार, हे विमान 40 नॉटिकल मैलांच्या परिघात असू शकते. यापूर्वी केलेल्या शोध मोहिमेच्या परिक्षेत्राच्या तुलनेत हे खूप लहान आहे.

कोसळलेल्या विमानाचा ढिगारा एकतर समुद्रातील खोलवर कुठे असावा किंवा एखाद्या खडकाच्या मागे असा अंदाज आहे. विमानाचा ढिगारा समुद्रात चार हजार मीटर खोलवर असू शकतो असंही ते सांगतात.

आतापर्यंत या विमानाच्या ढिगाऱ्याचे तीसहून अधिक तुकडे अफ्रिका आणि हिंदी महासागराच्या बेटांच्या किनाऱ्यावर पोहचले आहेत. 2009 मध्ये गॉडफ्रे यांना ब्राझीलमधील रिओ डी जानेरोहून फ्रांसपर्यंत शोधयात्रा करायची होती पण काही कामानिमित्त त्यांना ब्राझीलमध्येच थांबावं लागलं.

उड्डाण आपल्या गंतव्यापर्यंत न पोहचता अटलांटिक महासागरात गायब झालं आणि याच कारणामुळे त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.

गोडफ्रे स्वतंत्र संस्था एमएच 370 या ग्रुपचे संस्थापक सदस्य आहेत. ते एक इंजिनीअर आहेत आणि विमान ऑटो पायलट सिस्टमच्या विकासासाठी त्यांनी काम केलं आहे.

ते सांगतात, "माहिती तंत्रज्ञान आणि डेटा शोधण्यासाठी मी खूप काम केलं आहे. या संशोधनात डेटा महत्त्वाचा आहे. डेटा खूप जास्त आहे आणि हे भुशाच्या ढिगाऱ्यात सुई शोधण्यासारखं आहे."

डेव्हिड ग्लीव एविएशन सेफ्टी कंसलटंटचे मुख्य अन्वेषक आहेत. बेपत्ता विमान आणि विमान क्रॅश झाल्याच्या प्रकरणांवर त्यांनी अनेक दशकं काम केलं आहे. या शोध मोहिमेसाठी पैसे मिळवणं आव्हानात्मक असू शकतं असं ग्लीव सांगतात.

"आता आपल्याकडे क्रॅश साईट कुठे आहे याची ठोस माहिती आहे. आतापर्यंत मिळेलेल्या माहितीपेक्षा हा डेटा विश्वसार्ह वाटतो."

आता नव्याने शोध मोहिम सुरू करणं हे समुद्राची स्थिती आणि आधुनिक तंत्रज्ञानाची उपलब्धता यावर अवलंबून आहे.

अचूक पुरावा

डेव्हिड ग्लीव सांगतात, "खरं सांगायचं झालं तर आता वेळ आली आहे की आपण उन्हाळ्याच्या दिवसांत दक्षिण समुद्रात शोध घेतला पाहिजे. नवीन शोध मोहिम सुरू होण्यासाठी आणखी 12 महिन्यांचा कालावधी लागेल असं मला वाटतं कारण त्याठिकाणी उपकरणं पोहचवणं सोपं नाही."

"मला वाटतं चीन आपल्या नागरिकांना शोधण्यासाठी शोध मोहीम सुरू करू शकतं किंवा विमा कंपन्यांना शोध मोहीम सुरू करायला लावू शकतात,"

या विमानात 122 चिनी नागरिक प्रवास करत होते. क्लालालंपूर येथून विमानाने उड्डाण केलं होतं परंतु विमान बीजिंगला पोहोचलच नाही. हे विमान बेपत्ता झाल्यापासून अनेक थिअरी सांगण्यात आल्या.

एक थिअरी अशीही आहे की, विमानाला पायलटने हायजॅक केलेलं असू शकतं आणि थायलंडच्या खाडीवरून पश्चिमेकडे वळल्यानंतर रडार बंद केलं असावं.

ऑस्ट्रेलिया ट्रान्सपोर्ट सेफ्टी बोर्डने (ATSB) ऑक्टोबर 2017 मध्ये समुद्रातली आपली शोध मोहीम संपुष्टात आणली. एटीएसबीने बीबीसीशी बोलताना सांगितलं होतं, "एटीएसबी आता शोध मोहिमेत सहभागी नाही. विमान मलेशियामध्ये नोंदणीकृत असल्याने विमानाचा शोध घेण्याबाबतचा निर्णय मलेशियालाच करावा लागेल."

यासंदर्भात प्रतिक्रिया घेण्यासाठी मलेशियन सरकार आणि चिनी सरकारला संपर्क साधला आहे.

ग्रेस नॅथन म्हणाल्या, "या विमानाचा शोध लागणं जागतिक विमान सेवांच्या सुरक्षेसाठीही गरजेचं आहे. यामुळे भविष्यात असे अपघात टाळता येतील."

कुटुंबासाठीही हा अध्याय संपेल अशी आशा त्यांना आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)