IVF प्रक्रिया करताना अदलाबदल, जोडप्याने दिला परक्यांच्या मुलीला जन्म

डाफ्ना आणि अलेक्झांडर कार्डिनेल

फोटो स्रोत, Peiffer Wolf Carr Kane & Conway

फोटो कॅप्शन, डाफ्ना आणि अलेक्झांडर कार्डिनेल

फर्टिलिटी क्लिनिकने IVF प्रक्रिया करताना चुकीचा भ्रूण वापरल्याने आपण परक्यांच्या मुलीला जन्म दिल्याचा दावा कॅलिफोर्नियातल्या एका जोडप्याने केलाय. यासाठी त्यांनी कायदेशीर तक्रार दाखल केली आहे.

डाफ्ना आणि अलेक्झांडर कार्डिनेल या जोडप्याने सप्टेंबर 2019मध्ये मुलीला जन्म दिला. पण ती दोघांसारखी अजिबात दिसत नव्हती.

DNA चाचणी केल्यानंतर ही मुलगी आपली नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी मग त्यांच्या मुलीला ज्या जोडप्याने जन्म दिला, त्यांना शोधून काढलं आणि मग एकमेकांच्या सहमतीने बाळांची अदलाबदल केली.

IVF प्रक्रियेदरम्यान बाळांची अदलाबदल होण्याची ही कथितरित्या पहिली वेळ नाही.

IVF पद्धतीमध्ये स्त्री-पुरुष बीजांचं प्रयोगशाळेत फलन केलं जातं आणि नंतर हा भ्रूण महिलेच्या गर्भाशयात रुजवला जातो.

कार्डिनल जोडप्याने लॉस अँजेलिसमधल्या द कॅलिफोर्निया सेंटर फॉर रिप्रॉडक्टिव्ह हेल्थ आणि इन व्हिट्रो टेक लॅब्सवर कायदेशीर खटला दाखल केलाय.

चुकीच्या वैद्यकीय प्रक्रिया करणं, निष्काळजीपणा आणि गोष्टी लपवणं याबद्दलची तक्रार करण्यात आलेली आहे. यावर यापैकी एकाही कंपनीने बीबीसी न्यूजला प्रतिक्रिया दिलेली नाही.

कार्डिनेल दांपत्याने सोमवारी (8 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना डाफ्ना म्हणाल्या, "आमच्या कुटुंबाला झालेल्या वेदना आणि उडालेला गोंधळ सांगू शकत नाही. आमच्या बाळाच्या जन्माच्या वेळच्या आठवणींवर कायमच गालबोट लागलंय. आमचं बाळ दुसऱ्या कोणाला देण्यात आलं आणि जे बाळ या जगात आणण्यासाठी मी झगडले ते मी स्वतःजवळ ठेवू शकले नाही. स्वतःच्या बाळाला पोटात वाढवण्याचा माझा हक्क हिरावून घेतला गेला."

2018मध्ये कार्डिनेल दांपत्याने बाळासाठी या फर्टिलिटी क्लिनिकचा सल्ला घेतला आणि पुढच्यावर्षी त्यांना मुलगी झाली.

त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे - 'आपल्या पहिल्या बाळाप्रमाणेच हे बाळ गोरं असेल असं अलेक्झांडर कार्डिनल यांना वाटलं होतं. पण या सावळ्या रंगाच्या नवजात मुलीला पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. हे इतकं धक्कादायक होतं की ते त्या बेडपासून मागे जात भिंतीला टेकून उभे राहिले.'

व्हीडिओ कॅप्शन, IVF treament: 70 वर्षांच्या महिलेने In-Vitro fertilization द्वारे कसा दिला बाळाला जन्म

दोन महिन्यांनंतर या जोडप्याने DNA टेस्ट किट वापरून घरीच चाचणी केली आणि हे नवजात बाळ त्यांच्याशी DNA जुळणारं नसल्याचं निकालातून निष्पन्न झालं.

"जणू काही खोली हादरली, मला भोवळ आली आणि मी सुन्न पडलो," DNA चाचणीचा निकाल कळल्यावर काय झालं हे बोलताना अलेक्झांडर सांगतात.

द कॅलिफोर्निया सेंटर फॉर रिप्रॉडक्टिव्ह हेल्थच्या मदतीने त्यांनी नंतर त्या जोडप्याला शोधून काढलं ज्यांनी त्यांच्या मुलीला जन्म दिला होता. कार्डिनेल जोडपं त्यांच्या मुलीला भेटले तेव्हा ती 4 महिन्यांची होती. काहीवेळा भेटल्यानंतर या जोडप्यांनी कायदेशीर प्रक्रियेने बाळांची अदलाबदल करायचं ठरवलं आणि जानेवारी 2020मध्ये ही प्रक्रिया पार पडली.

"स्वतःच्या बाळाला दूध पाजण्याऐवजी मी दुसऱ्या बाळाला दूध पाजलं, त्याच्याशी माझे भावनिक बंध तयार झाले आणि नंतर मला ते बाळ दूर पाठवणं भाग पडलं," डाफ्नांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

आपल्या 7 वर्षांच्या मुलीवर याचा सगळ्यात मोठा परिणाम झाला असून बाळांची अदलाबदल का केली, हे तिला समजत नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

या प्रकारानंतर कार्डिनेल जोडप्याने मानसोपचार घेतल्याचंही कायदेशीर तक्रारीत म्हटलं आहे, तर अदलाबदल झालेल्या दुसऱ्या बाळाचे पालकही कायदेशीर कारवाई करायच्या तयारी असल्याचं कार्डिनेल जोडप्याचे वकील अॅडम वुल्फ यांनी म्हटलंय.

2019मध्ये अशीच एक घटना अमेरिकेत घडली होती. कॅलिफोर्नियात राहणाऱ्या एका कुटुंबाला आपलं खरं मूल न्यूयॉर्कमध्ये जन्माला आल्याचं समजलं होतं. या बाळाला जन्म देणाऱ्या आईला बाळ स्वतःकडेच ठेवायचं होतं म्हणून तिच्यावर या जोडप्याने खटला दाखल केला. त्यानंतर कोर्टाने या बाळाच्या जनुकीय आईवडिलांकडे हे बाळ सोपवलं होतं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)