Sex Eco Friendly असू शकतो का? कॉंडोम्स रिसायकल न करता आल्यामुळे काय होतं?

काँडोम्स

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, हॅरिएट ओरेल
    • Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस

कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठीचे वेगवेगळे मार्ग सध्या शोधले जात आहेत. आणि हे करताना लैंगिक जीवनाचा याच्याशी संदर्भ असू शकतो हे आपल्या डोक्यात कदाचित येणार नाही.

पण गेल्या काही वर्षांमध्ये व्हेगन काँडोम्स किंवा कोणत्याही प्रकारचा कचरा निर्माण न करणाऱ्या नियोजन पद्धती याविषयीची माहिती इंटरनेटवर शोधण्याचं प्रमाण वाढलेलं आहे.

खरंच लैंगिक जीवन वा सेक्स इको-फ्रेंडली म्हणजेच पर्यावरण स्नेही असू शकतो का?

याचा कार्बन उत्सर्जन, हवामान बदल म्हणजेच क्लायमेट चेंजची काही संबंध आहे का?

इको-फ्रेंडली सेक्स म्हणजे काय?

नायजेरियामधल्या पर्यावरण संरक्षणाविषयीचा अभ्यास करणाऱ्या संशोधक डॉ. एडेनिके अकिंन्सेमोलू सांगतात, "काहींसाठी पर्यावरण स्नेही लैंगिक जीवन म्हणजे पृथ्वीची तुलनेनी कमी हानी करणाऱ्या ल्यूब्स, सेक्सटॉय, बेडशीट्स आणि काँडोम वापरणं. पण इतरांसाठी याचा अर्थ पोर्नची निर्मिती करताना व्यक्ती आणि पर्यावरणाची हानी कमी होईल याची काळजी घेणं असाही असू शकतो. दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आणि योग्य आहेत."

युनायटेड नेशन्सच्या पॉप्युलेशन फंडच्या अंदाजानुसार दरवर्षी जगभरातमध्ये पुरुषांसाठीच्या 10 अब्ज लॅटेक्स काँडोम्सची निर्मिती होते आणि वापरानंतर यातील बहुतेकांची डम्पिंग ग्राऊंडमध्ये किंवा ढिगाऱ्यातून जमिनीत विल्हेवाट लावली जाते. बहुतेक काँडोम्स सिंथेटिक लॅटेक्सने तयार केली जातात, त्यासाठी रसायनं आणि इतर गोष्टींचा वापर केला जातो. परिणामी त्यांचं रिसायकलिंग शक्य नसतं.

डॉ. एडेनिके अकिंन्सेमोलू

फोटो स्रोत, DR ADENIKE AKINSEMOLU

फोटो कॅप्शन, डॉ. एडेनिके अकिंन्सेमोलू

रोमन काळापासून वापरली जाणारी Lambskin Condoms म्हणजेच मेंढीच्या आतड्यांपासून तयार करण्यात येणारी काँडोमस हा एकमेव पूर्णपणे विघटन होणारा - Biodegradable काँडोम पर्याय आहे.

पण ही काँडोम्स मेंढीच्या आतड्यांपासून तयार करण्यात आली असल्याने त्यांच्या वापराने लैंगिक क्रियांद्वारे पसरणारे आजार - STDs (sexually transmitted infections) रोखली जाऊ शकत नाहीत.

लैंगिक क्रियांदरम्यान वापरण्यात येणारी लुब्रिकंट्स ही पेट्रोलियम पदार्थांपासून तयार करण्यात आलेली असतात. म्हणजेच यात जैविक इंधन असतं.

म्हणूनच आता पाण्याचा मुख्यत्वे वापर करून तयार करण्यात आलेली किंवा ऑरगॅनिक लुब्रिकंट्स वापरण्याकडे कल वाढतोय. याशिवाय घरगुती पर्याय वापरण्याकडेही कल आहे.

डॉ. टेस्सा कॉमर्स टिकटॉकवर लैंगिक आरोग्याविषयीचे व्हिडिओज करतात. त्यांचे 10 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. त्यांच्या एका व्हिडिओला सगळ्यांत जास्त म्हणजे जवळपास 80 लाखांपेक्षा जास्त व्ह्यू आहेत. हा व्हिडिओ घरच्या घरी कॉर्नस्टार्च आणि पाण्यापासून लुब्रिकंट तयार कसं करायचं, यावर आहे.

"पाण्याचा वापर करून तयार केलेली लुब्रिकंट, ऑरगॅनिक आणि व्हिगन काँडोम्स हा चांगला पर्याय असून त्याने सेक्स लाईफही पर्यावरण स्नेही होतं. या वस्तूंचा पर्यावरणावर मोठा परिणाम होत नाही आणि वापरणाऱ्यालाही फायदा होतो."

पण ही उत्पादनं वापरताना काही काळजी घ्यावी लागते. त्यामुळे कोणताही गर्भरोधक पर्याय वापरण्याआधी वा तसा निर्णय घेण्याआधी तुमच्या डॉक्टरचा सल्ला घ्या.

सेक्स टॉईजमध्येही प्लास्टिकचा खूप वापर होतो. यामध्ये स्टील आणि काचेचे काही पर्याय आहेत. शिवाय बॅटरी सेलचा वापर करणारे रिचार्जेबल सेक्स टॉईजचे, सोलर चार्जिंगच्या टॉईजचे पर्यायही बाजारात आहेत.

लव्हहनी सारख्या काही आंतरराष्ट्रीय कंपन्या जुनी वा मोडकी सेक्स टॉईज रिसायकल करण्यासाठी मदत करतात.

इतर कोणता कचरा कमी केला जाऊ शकतो?

लैंगिक आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टींमध्ये बदल करणं फायद्याचं ठरू शकतं.

म्हणजे योग्यप्रकारे (नियमांचं पालन करून) तयार करण्यात आलेली अंतर्वस्त्रं आणि कपडेच विकत घेणं, शॉवरमध्ये सेक्स टाळणं, गरम पाणी कमी वापरणं, दिवे बंद करणं आणि टिश्यू पेपरऐवजी धुवून पुन्हा वापरता येण्याजोगे नॅपकिन्स वापरल्याने पृथ्वीवर निर्माण होणारा कचरा कमी होईल किंवा इतर प्रकारांनी होणारी हानी कमी होईल.

आपण वापरत असलेल्या बहुतेक गोष्टींचं पॅकेजिंग कचरा निर्माण करतं. या गोष्टीमध्ये बदल केला तर त्याचा मोठा परिणाम होईल असं न्यूयॉर्कमधले उद्योजक आणि झिरो वेस्ट इन्फ्लूएन्सर लॉरेन सिंगर सांगतात.

लॉरेन सिंगर

फोटो स्रोत, LAUREN SINGER

फोटो कॅप्शन, 2012 लॉरेन सिंगर यांनी पर्यावरण स्नेही - Zero Watse जीवनशैली अवलंबलेली आहे. रिसायकल न करता येण्याजोगा त्यांचा कचरा 2012 त्यांनी या काचेच्या जारमध्ये गोळा केलाय.

काँडोम्स, लुब आणि रोजच्या गर्भरोधक गोळ्यांची वेष्टणं कचऱ्यात पडतात. IUD म्हणजे योनीच्या आत लावण्यात येणारं गर्भरोधक उपकरण आणि इतर प्रकारच्या इम्प्लांटचा परिणाम दीर्घकालीन आहे, याने कचरा कमी निर्माण होतो, पण हे लावण्यात काही धोके असतात.

लॉरेननी 2012 पासून अशी जीवनशैली अवलंबली आहे ज्यामुळे त्यांच्याकडून कोणताही कचरा निर्माण होत नाही. ज्या गोष्टी रिसायकल होऊ शकत नाहीत, त्यांचा वापर त्या करत नाहीत.

काँडोम रिसायकल होऊ शकत नाहीत, पण लैंगिक आजार रोखणारा हा एकमेव मार्ग आहे. म्हणून मग लॉरेन आपल्या जोडीदारांना आधीच असा कोणता आजार नाही ना, याविषयी खात्री करून घेतात.

"माझा एकच जोडीदार आहे. पण आपल्या जोडीदाराला चाचणी करायला सांगणं तुम्हाला शक्य नसेल, तर मग तुम्ही कदाचित त्यांच्यासोबत संबंध ठेवणं योग्य नाही. पण काँडोम्स वा गर्भरोधक गोळ्या वापरल्याने कचरा निर्माण होतो म्हणून त्यांचा वापर न करणंही बरोबर नाही. तुमची आणि तुमच्या जोडीदाराची सुरक्षा महत्त्वाची आहे."

डॉ. अकिंन्सेमोलू याला दुजोरा देतात, "इको फ्रेंडली प्रॉडक्टस वापरा किंवा नका वापरू. पण सुरक्षित सेक्स ही लोकांच्या आणि पृथ्वीच्या दीर्घकालीन फायद्याची गोष्ट आहे,"

प्रजननाचा पर्यावरणावरचा परिणाम

सेक्स आणि पर्यावरण यांच्यातला आणखी एक मुद्दा म्हणजे - प्रजनन - मुलांना जन्म देणं.

2017 मध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार कार विकत न घेतल्याने वर्षाला 2.3 टन कार्बन डायऑक्साईड कमी निर्माण होतो, तर Plant based Diet म्हणजे शाकाहारी अन्नामुळे 0.8 टन कमी उत्सर्जन होतं.

याच्याशी तुलना करायची झाली तर मूल जन्माला न घालण्याचा निर्णय घेतल्यास त्याने 58.6 टन कार्बन उत्सर्जन कमी होतं.

कमी विकसित देशांमधलं कार्बन उत्सर्जन तुलनेने कमी आहे. मलावीमध्ये एक मूल जन्माला आल्याने 0.1 टनापेक्षा कमी उत्सर्जन होतं.

अलेक्झांड्रिया ओकासियो - कोर्टेज

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 2019च्या C40 - वल्र्ड मेयर समिटमध्ये बोलताना अलेक्झांड्रिया ओकासियो - कोर्टेज

किती मुलं जन्माला घालायची हे ठरवताना अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी आपण पर्यावरणाचा विचार केल्याचं सांगितलेलं आहे. डचेस ऑफ ससेक्स मेगन आणि आपण पर्यावरणाचा विचार करता जास्तीत जास्त 2 मुलांना जन्म ठरवलं असल्याचं 2019मध्ये प्रिन्स हॅरी यांनी व्होग मासिकाशी बोलताना सांगितलं होतं.

अमेरिकेच्या काँग्रेस सदस्य अलेक्झांड्रिया ओकासियो - कोर्टेज यांनी 2019च्या C40 - वल्र्ड मेयर समिटमध्ये बोलताना म्हटलं होतं, "माझ्यासारख्या अनेक महिलांसाठी आई होण्याच्या स्वप्नाला एक किनार आहे कारण आमच्या मुलांचं भविष्य कसं असणार आहे, हे मला माहिती आहे."

जगभरातल्या अनेक देशांमधला जन्मदर कमी होतोय. पण गेल्या दशकभरात पहायला मिळालेल्या या गोष्टी संबंध फक्त हवामान बदलाशी लावता येणार नाही.

10 हजारांपैकी जवळपास 75 टक्के तरुणांना भविष्य धोकादायक असल्याचं वाटत असल्याचं ब्रिटीश वैज्ञानिकांनी याचवर्षी केलेल्या पाहणीत आढळून आलंय.

तर 41% आपण हवामान बदलाकडे पाहात मूल जन्माला घालायचं का याबद्दल साशंक असल्याचं म्हटलंय.

'मी मुलं जन्माला घालणार नाही'

पर्यावरणाचा विचार करत आपण मूल होऊ न देण्याचा निर्णय घेतल्याचं मुंबईत राहणारे तन्मय शिंदे सांगतात. 2050 पर्यंत समुद्र पातळी वाढेल आणि मुंबई पाण्याखाली जाईल असा अंदाज IPCC ने वर्तवलाय.

तन्मचया घरच्यांना त्यांचा हा निर्णय समजून घेणं अवघड गेलं. पण पुरुष असल्याने हा निर्णय घेणं तुलनेनं सोपं गेलं, एखाद्या महिलेसाठी हे आणखीन अवघड असल्याचं तन्मय सांगतात.

तन्मय शिंदे

फोटो स्रोत, TANMAY SHINDE

फोटो कॅप्शन, तन्मय शिंदे

ते म्हणतात, "भारतातली कुटुंबं पारंपरिक विचारसरणीची असतात आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या रुढी परंपरा पाळतात. मुलं होणं ही लग्नानंतरची आयुष्यातली सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट मानली जाते. म्हणूनच ही परंपरा सुरू ठेवण्यासाठी समाजाकडून दबाव असतो."

मग त्यांचा हा निर्णय बदलू शकतो का, "मुलं होण्यासाठी पृथ्वी सुरक्षित होणं, जीवनशैली पर्यावरणस्नेही असणं अतिशय गरजेचं आहे. ठोस निर्णय घेत कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठीचे, ग्लोबल वॉर्मिंग थांबवण्यासाठीचे प्रयत्न केले जात नाहीत, तोपर्यंत मी मुलं जन्माला घालणार नाही."

प्रा. किंबर्ली निकोलर या स्वीडन्या लुंड विद्यापिठात सहप्राध्यापक आहेत. पण मुलं जन्माला घालू नयेत, असं त्यांचं मत नाही. "लोकांच्या वैयक्तिक निर्णयाबद्दल मी बोलणं योग्यन नाही. मूल हवं की नाही हा मानवी हक्क आहे. मला अशा एका जगाच्या निर्मितीसाठी काम करायचं आहे जे मुलांसाठी आणि समाजासाठी सुरक्षित आहे."

लोकांनी त्याऐवजी त्यांच्या प्रवासाच्या सवयीकडे, ज्याने प्रत्यक्ष बदल घडेल त्याकडे लक्ष द्यावं असं त्या सांगतात.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)