You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
India Vs Pakistan : विराट कोहलीची टीम पाकिस्तानला हरवण्यासाठी समर्थ आहे का?
- Author, शारदा उगरा
- Role, क्रीडा पत्रकार, बीबीसीकरिता
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यंदाच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर टी-20 सामन्यांसाठी कर्णधारपद सोडणार आहे. यासोबतच त्याचा 9 वर्षांचा कार्यकाळ समाप्त होईल.
आज म्हणजेच 24 ऑक्टोबर रोजी भारताचा सामना परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.
यंदाच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतला हा भारताचा पहिलाच सामना आहे.
संयुक्त अरब अमिरात आणि ओमानमध्ये सुरू असलेल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होऊन आता एक आठवडा झाला आहे.
रविवारी भारत आणि पाकिस्तानात बहुप्रतिक्षित सामना होईल. या सामन्यात भारत पाकिस्तानला हरवू शकतो का?
रँकिंगला महत्त्व नाही
सध्या आयसीसी टी-20 रँकिंगमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर इंग्लंड तर तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तान आहे.
रँकिंगच्या बाबतीत भारत पाकिस्तानच्या पुढे असला तरी प्रत्यक्ष सामन्यात रँकिंगला काही महत्त्व नसतं.
त्यातही भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना असल्यास रँकिंगचा विचारही कुणी करत नाहीत.
दोन्ही संघ कोणत्याही स्थानावर असले तरी दोन्ही संघांमध्ये उत्साह जोरदार असतो. यंदाच्या वर्षीही तसंच वातावरण पाहायला मिळतं.
विराट कोहलीचं विजेतेपदाकडे लक्ष
भारतीय क्रिकेट कर्णधार विराट कोहलीने यंदाच्या वर्षी विश्वविजेतेपद पटकावण्याकडे लक्ष केंद्रीत केलं असणार आहे.
कारण विराटकडे टी-20 विश्वचषक जिंकण्याची हा अखेरची संधी आहे.
आपण भारतीय टी-20 संघ आणि आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचं कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा त्याने स्पर्धेपूर्वीच केली होती. त्यामुळे सर्वांच्या नजरा आता विराट कोहलीकडेच आहेत.
पाच वर्षांपूर्वी झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत विराट कोहली मालिकावीर ठरला होता.
त्यावेळी महेंद्रसिंह धोनी भारतीय संघाचा कर्णधार होता. भारताचा संघ त्या स्पर्धेत सेमीफायनल सामन्यात वेस्ट इंडीजविरुद्ध पराभूत झाला होता. पुढे वेस्ट इंडीजनेच ही स्पर्धा जिंकली.
त्यावेळी स्पर्धेत सहभागी असलेला अर्धा संघ यावेळीही मैदानात आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, रविंद्र जडेजा, आर आश्विन, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या पुन्हा विश्वचषक जिंकण्यास सज्ज झाले आहेत.
सध्या धोनी मार्गदर्शक म्हणून भारतीय संघासोबत आहे. त्यामुळे विश्वचषक विजयाचं स्वप्न पूर्ण करण्याचा सर्वच खेळाडूंचा प्रयत्न असेल.
संघात आयपीएल कर्णधारांचा भरणा
भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये आधीपासूनच कित्येक कर्णधार आहेत.
पाच वेळचा आयपीएल विजेता रोहित शर्मा, के. एल. राहुल, आर आश्विन आणि ऋषभ पंत यांनी वेगवेगळ्या संघांचं कर्णधारपद भूषवलं आहे. त्याशिवाय भुवनेश्वर कुमारनेही केन विलियमसनच्या अनुपस्थितीत संघाची धुरा सांभाळली होती.
त्यामुळे संघातील टी-20 फॉरमॅटमधील कर्णधारांची संख्या पाच होते. टी-20 सामन्यात कर्णधाराला अतिशय चतुराईने निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे कोहलीला त्याचा फायदा होऊ शकतो.
आयपीएलमध्ये महेंद्रसिंह धोनीने 203 सामन्यात नेतृत्व केलं. पाठोपाठ कोहलीने 140 सामन्यात कर्णधारपद सांभाळलं. पण कोहलीच्या नेतृत्वाखाली बंगळुरुने 64 सामन्यात विजय मिळवला तर 69 सामन्यात त्यांचा पराभव झाला. ही चांगली आकडेवारी नाही. त्यामुळे मेंटॉर धोनीचा त्याला फायदा नक्कीच होईल.
धोनीने कोहलीच्या नेतृत्वाखाली पांढऱ्या चेंडूने खेळले जाणारे 75 सामने खेळले आहेत.
द्विपक्षीय मालिकांमध्ये कोहलीले अनेक विजय मिळवले त्यामध्ये धोनीही संघाचा भाग होता.
भारताने दुसऱ्यांदा विश्वचषक का जिंकला नाही?
भारताने दक्षिण आफ्रिकेत झालेला पहिली टी-20 विश्वचषक स्पर्धा जिंकली होती.
पण त्यानंतर त्या कामगिरीची पुनरावृत्ती करणं भारताला शक्य का झालं नाही?
भारतात आयपीएल इतकं लोकप्रिय आहे. अनेक चांगले खेळाडू या माध्यमातून तयार केले जात आहे. पण तरीही भारत 2007 नंतर विजतेपद पुन्हा मिळवू शकला नाही.
याचं प्रमुख कारण म्हणजे टी-20 विश्वचषक स्पर्धा आयसीसीची सर्वाधिक चुरशीची स्पर्धा मानली जाते. यामध्ये थंड डोक्याने निर्णय घेणं जास्त महत्त्वाचं असतं. टी-20 फॉरमॅटमध्ये खेळाडूचा पूर्वीचा रेकॉर्ड किंवा त्याची प्रतिमा फारसी महत्त्वाची नसते.
तत्कालीन परिस्थितीवर सगळं काही अवलंबून असतं.
त्यामुळे कोणत्याही संघाला टी-20 सामन्यात विजय मिळवता येऊ शकतो. इथं प्रत्येक दोन-तीन वर्षांत ट्रेंड बदलत जातो. त्यानुसार संघ कशी कामगिरी करतील, हे ठरतं.
विजयासाठी काय आवश्यक?
एक काळ असा होता. ज्यावेळी प्रत्येकाच्या टी-20 संघात एक हिटर फलंदाज, एक फिरकी गोलंदाज आणि एक वेगवान गोलंदाज असणं आवश्यक होतं.
पण संयुक्त अरब अमिरातमधील मंद खेळपट्ट्यांवर खेळण्यासाठी काही विशिष्ट गोष्टी आवश्यक असतील. इथं फलंदाजाने संयम दाखवणं जास्त महत्त्वाचं आहे.
इथं वेगवान गोलंदाजांची धुलाई होऊ शकतो. पण गोलंदाजीत वैविध्य दाखवणाऱ्या खेळाडूला इथं चांगलं यश मिळू शकतं.
याशिवाय, संघात एक डावखुरा वेगवान गोलंदाज असणं आवश्यक मानलं जातं. पण भारताचे टी नटराजन आणि खलील अहमद जखमी आहेत.
भारताचे पाचपैकी चार सामने दुबईत आहेत. इथं धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकत आला आहे.
भारताची फलंदाजी मजबूत असल्यामुळे धावांचा पाठलाग करण्यात फारशा काही अडचणी येणार नाहीत.
शिखर धवन संघात नसला तरी के. एल राहुलचा फॉर्म उपयुक्त ठरू शकतो. राहुलने आयपीएल स्पर्धेत 626 धावा बनवल्या होत्या.
त्याशिवाय रोहित शर्माचं सातत्य आणि मुंबई इंडियन्समधील त्याचे सहकाही ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांच्या कामगिरीकडेही लक्ष असेल.
या सगळ्यांच्या एकत्रित कामगिरीच्या आधारावर आपल्या कर्णधारपदाचा शेवट करण्याचा विचार विराट कोहली नक्कीच करत असणार.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)